हजारो प्रवाशांकडून टाकला जाणारा कचरा आणि रेल्वेची अपुरी पडणारी स्वच्छता यंत्रणा यामुळे अनेकदा मोहीम राबवूनही अस्वच्छ राहणाऱ्या रेल्वे स्थानकांसाठी ईशान्येकडच्या राज्यातील विद्यार्थी सरसावले. अभ्याससहलीच्या निमित्ताने मुंबईभेटीवर आलेल्या मेघालय राज्यातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून कुर्ला रेल्वे स्थानकाची सफाई केली.
मेघालय येथील शैक्षणिक संस्थेत समाजसेवेच्या वर्गात शिकणारे ३५ विद्यार्थी मुंबईच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आले आहेत. मुंबईतील विविध सामाजिक संस्थांची माहिती घेण्यासोबतच या विद्यार्थ्यांनी मुंबईसाठीही काहीतरी करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी मदत करणाऱ्या चाइल्ड व्हिजन फाउंडेशनच्या सहकार्याने मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकात साफसफाई मोहिम हाती घेण्याचे ठरले. त्यानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन या विद्यार्थ्यांनी कुर्ला रेल्वे स्थानक स्वच्छ केले. चार तास सुरू राहिलेल्या या स्वच्छता मोहिमेत फलाटावर पडलेला कचरा उचलण्यासोबतच बाकही पाण्याने पुसून लख्ख केले. स्वच्छ भारत मोहिमेत आपलाही सहभाग असावा यासाठी या मोहिमेत सहभागी झालो असल्याचे मेघालय शिक्षण संस्थेतील विभागप्रमुख जोशुआ थाबा यांनी सांगितले.