24 September 2020

News Flash

मैत्र जीवांचे!

जवळपास ४७ वर्षे रात्रंदिवस कधीही न थकता अविरतपणे प्रगतीचे नवे मार्ग शोधणारा व देशात त्या अनुषंगाने निर्णय घेतले जावेत म्हणून धडपडणारा हा नेता, कितीही मोठा

| December 12, 2012 01:09 am

जवळपास ४७ वर्षे रात्रंदिवस कधीही न थकता अविरतपणे प्रगतीचे नवे मार्ग शोधणारा व देशात त्या अनुषंगाने निर्णय घेतले जावेत म्हणून धडपडणारा हा नेता, कितीही मोठा असला तरी सामान्य माणसाशी कायम नाते ठेवणारा आणि इथल्या शेतीशी- मातीशी घट्ट नाळ, जिव्हाळा बांधून आहे. वास्तवदर्शी स्वप्न पाहणारा शेतकरी म्हणूनच शरद पवार ‘जाणता राजा’ आहेत.
भा रत हा अतिशय मोठा देश. विविध प्रांतांनी, विविध जाती-जमातींनी, मोठा इतिहास व परंपरांनी सजलेला, विविध प्रकारचे हवामान असणारा, सांस्कृतिकदृष्टय़ा व शेतीविषयक प्रगत ज्ञानाने संपन्न असा हा देश आहे. आज स्वातंत्र्योत्तर काळात मात्र तो खूप नवनव्या प्रश्नांनी काहीसा अवगुंठित झालेला दिसतो आहे.
महाराष्ट्रासारखे मोठे, पुढारलेले, विकसित राज्यसुद्धा खूप काही प्रगती करूनही, आज अनेक प्रश्नांनी व्यापून राहिलेले आहे. देशाचे व महाराष्ट्राचे प्रश्न, इथल्या माणसामाणसांमधले ऋणानुबंध, एकसंध नातेसंबंध आणि वेगवेगळय़ा प्रांताचे असलो तरी आपण सगळे एक आहोत, या विचाराने प्रगल्भ असलेली जनता व समाज हे चित्र इथे दिसते. या सगळय़ांना अतिशय जवळून, खोलवर ओळखणारा, जाणणारा व त्यांच्या उन्नतीसाठी ध्यास घेतलेला माणूस म्हणजे शरद पवार!
आज जवळपास ४७ वर्षे रात्रंदिवस कधीही न थकता अविरतपणे प्रगतीचे नवे मार्ग शोधणारा व देशात त्या अनुषंगाने निर्णय घेतले जावेत म्हणून धडपडणारा हा नेता, कितीही मोठा असला तरी सामान्य माणसाशी कायम नाते ठेवणारा आणि इथल्या शेतीशी- मातीशी घट्ट नाळ, जिव्हाळा बांधून असलेला अन् तरीही वास्तवदर्शी स्वप्न पाहणारा हा शेतकरी म्हणूनच ‘जाणता राजा’ आहे.
राजकीय नेत्याच्या पलीकडे अनेक छंद जोपासणारा आमचा हा मित्र! उत्तम वाचक, संगीताची आवड जोपासणारा, कलाकारांच्या व साहित्यिकांच्या सहवासात रमणारा, त्यांचा यथोचित गौरव करणारा, सामान्यातल्या सामान्य माणसासाठी काळ-वेळ न पाहता काम करणारा, कुटुंबात- मित्रपरिवारात आपले सामाजिक-राजकीय व्यक्तिमत्त्व अगदी खांद्यावरून उपरणे बाजूला ठेवावे इतक्या सहजपणे बाजूला ठेवावे इतक्या सहजपणे बाजूला ठेवून ‘घरगुती’ होणारे साहेब! त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या असंख्य छटा मला अनुभवता आल्या. एक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख सर्वाना आहे. तीसुद्धा वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आखलेल्या चौकटीतलीच! त्यापलीकडचे साहेब मी अनुभवतो आहे. त्यांच्या निमित्ताने समाजातील अनेक क्षेत्रांतील कर्तृत्वसंपन्न लोकांच्या सहवासात मी येऊ शकलो. माझे जगणेही समृद्ध झाले. अगदी महाविद्यालयातील काळापासून युवकांचे नेतृत्व करणारे साहेब १९६७ सालात विधानसभेची पहिली निवडणूक लढले, जिंकलेही. तद्नंतरच्या सर्व निवडणुका साहेबांनी जिंकल्या. राजकारणापेक्षा समाजकार्याला प्राधान्य देण्याचे त्यांचे धोरण आणि ध्येय ठेवल्यामुळे त्याच्या ध्येयपूर्तीसाठी आपले सर्व आयुष्य वाहून देण्याच्या त्यांच्या निर्धारामुळे गेल्या ४७ वर्षांत बावनकशी सोन्याप्रमाणे साहेबांचे नेतृत्व उजळून निघाले आहे. सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाला पात्र राहून स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेणे, त्याला व्यवहाराची जोड देणे आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नेटाने करणे ही साहेबांची त्रिसूत्री आहे. त्याला अनुसरूनच त्यांनी आजपर्यंतची वाटचाल केली आहे.
आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर असाध्य ते साध्य करण्याचा साहेबांचा स्वभाव असल्याने यशाची अनेक शिखरे ते गाठू शकले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर जिवावर बेतलेल्या गंभीर आजारपणातूनही साहेब बाहेर पडले. तो प्रसंग आजही अंगावर काटा उभा करतो. २००४ मध्ये दाढेवर सूज आल्याने साहेब त्रस्त होते. त्या वेळी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. अर्थातच प्रचाराची मुख्य धुरा साहेबांवरच होती. त्यातच त्यांना प्रकृतीचा त्रास सुरू झाला. निवडणुकाजिंकणे आणि प्रकृतीही सांभाळणे अशा द्विधा मन:स्थितीत साहेब होते. अशा परिस्थितीत दाढेवर शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. स्वत:चा उमेदवारी अर्ज भरून ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घेण्यास साहेब दाखलही झाले. एप्रिल महिन्यात त्यांच्या दाढेवरील यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे आम्हा सर्वाचाच जीव भांडय़ात पडला. साहेबांनी आठ दिवस दवाखान्यातच राहून विश्रांती घेतली. तेथूनच निवडणूक प्रचाराचा दौरा आखून ते प्रचारासाठी बाहेर पडले. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी आपल्या दौऱ्याने ढवळून काढला. शारीरिक त्रासाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. किंबहुना त्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. अपेक्षेप्रमाणे साहेब जिंकले होते. केंद्रात सरकार स्थापन झाले आणि साहेबांना मंत्रिपदही मिळाले. निवडणुकांनंतर साहेबांना खरेतर विश्रांतीची गरज होती. परंतु विश्रांतीचा काळ त्यांना त्रासदायक ठरणार आहे. हे स्पष्ट दिसू लागले होते. झंझावाती प्रचार, निवडणुकीच्या दौऱ्यातील त्रास, थकवा साहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आल्याने त्यांना विश्रांती मिळालीच नाही. त्यांना देण्यात आलेले खाते नव्याने तयार करण्यात आले होते. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे आवश्यक होते. त्यातच डॉक्टरांनी जवळपास एक महिन्याची रेडिएशनची ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला साहेबांना दिला, तो त्यांनी स्वीकारला आणि ट्रीटमेंट सुरू केली.
या काळातच मी साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो होतो. त्या वेळी तोंडाला रेडिएशन सुरूच होते. रेडिएशनमुळे त्यांचे तोंड भाजून निघाले होते. पाणी पिण्याआधीही त्यांना लोकल अ‍ॅनेस्थेशिया घ्यावा लागत होता. त्यांना होणाऱ्या वेदना काय असतील, याचा अंदाजच केलेला बरा. या काळात वेदना विसरण्यासाठी साहेब सकाळी ९ वाजताच ऑफीस गाठत. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते तेथे बसून काम करत. वहिनी दुपारी डबा घेऊन ऑफिसमध्ये जात असत. तोंडाची ट्रीटमेंट सुरू असल्याने घास घेण्यासाठी, तोंड उघडण्यासाठीही त्रास होत असे. त्यांना प्राणांतिक वेदना होत असत. त्यांना सर्व आहार पातळच दिला जात असे. पण त्यासाठी चमचा तोंडात घालण्याइतके तोंड उघडतानाही त्रास होत असे. चमचा अक्षरश: तोंडात ढकलावा लागत असे. ओठाजवळची त्वचा नाजूक झाली होती. त्यामुळे एका घासासाठी चमचा तोंडात गेला की, रक्त येत असे. एकीकडे घास घ्यायचा, लगेचच टॉवेलने जखमेतून आलेले रक्त पुसायचे, अशी कसरत करावी लागत होती. साहेब एरवी दहा मिनिटांत जेवत असत. पण या आजारामुळे त्यांना त्यासाठी अर्धा तास लागत असे. जेवणापूर्वी पांढराशुभ्र असणारा टॉवेल, जेवणानंतर रक्ताच्या डागांनी लाल होत असे. त्यांना होणाऱ्या वेदना आम्हाला बघवत नव्हत्या. परंतु साहेब मात्र शांतपणे ते सारं सहन करत होते. या काळात साहेब फार मोजके बोलत. अनेकजणांशी लेखी संवाद होत असे. अगदी ऑफीसमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही ते जरुरीपुरतेच बोलत असत. साहेब एरवी माणसांच्या गराडय़ात रमत असत. पण या आजारामुळे ते संध्याकाळी कोणालाही भेटत नसत.
एक-दोन दिवस ही सारी त्यांची कसरत पाहिल्यानंतर मलाच कसेतरी वाटू लागले. इस्पितळात विश्रांती घ्या, असे मी त्यांना सांगितले. त्यावर कोणत्याही वेदना कशा विसरायच्या याचे सूत्रच त्यांनी मला सांगितले. ते म्हणाले, रोग औषधाने बरा होऊ शकतो, तशी मानसिकता आपण बनवू शकतो. प्रश्न असतो तो वेदना, शारीरिक त्रास यांचा. कामात व्यग्र राहून आपण ते विसरू शकतो. त्याची प्रचीती साहेबांनी स्वत: घेतली आणि आम्हालाही दिली. अशा या साहेबांना काय म्हणावे? प्रबुद्ध उद्योजक, आधुनिक शेतकरी व शेतकऱ्यांच्या कैवारी, सुजाण व्यापारी व यशस्वी राजकारणी, मुरब्बी व्यवस्थापक, अनुभवी संघटक, नेहमीच सगळय़ाच क्षेत्रांत खेळाडू, चोखंदळ साहित्यप्रेमी, परस्पर संबंधांना जोपासणारा मित्र, तल्लख बुद्धिवादी, मोठी स्वप्नं बघणारा व ती पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक करणारा द्रष्टा, वेळप्रसंगी शिष्टाचाराला बाजूला ठेवून आपसी ऋणानुबंधांना प्राथमिकता देणारा, शास्त्र, तंत्र यांच्याबद्दल कमालीची जिज्ञासा बाळगणारा, नेहमीच वास्तवाचा ध्यास व ध्यान ठेवून तोलून-मापून बोलणारा-चालणारा, संकटाची चाहूल.. सावध पाऊल या मंत्रावर विश्वास ठेवणारा, बहुविध वैचारिक आदानप्रदानावर विश्वास ठेवून आपले निर्णय स्वत:च घेण्यात पारंगत, अफाट स्मरण-श्रवणशक्ती बाळगणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला ‘लोकनेता’ नाही म्हटले तर आणखी काय म्हणावे?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 1:09 am

Web Title: close friend
टॅग Sharad Pawar
Next Stories
1 अमावस्येमुळे वाजले लग्नाचे १२-१२-१२!
2 सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अभिजात स्वरसोहळ्याची साठी
3 राष्ट्रीय समृद्धीसाठी सागरी सामर्थ्य
Just Now!
X