News Flash

महाराष्ट्रातील कॉफी लागवडीचे प्रयोग!

महाराष्ट्रात चिखलदरा येथे ब्रिटिशांनी कॉफीची लागवड केली होती.

पराग श्याम परीट

कॉफी म्हटले, की दक्षिणेकडील प्रांत डोळय़ांपुढे येतो. कॉफीच्या उत्पादनासाठी लागणारे विशिष्ट हवामान, जमीन यामुळे हे पीक आजवर प्रदेशनिष्ठ राहिलेले आहे. या कॉफी लागवडीचे राज्यातही प्रयोग सुरू झाले आहेत. याचाच हा आढावा.

कॉफी हा शब्द कानावर पडल्याबरोबर तरतरीतपणा अंगात संचारतो. कॉफी न आवडणारे लोक विरळच भेटतील. तरीही जगासोबत तुलना केली तर भारतात कॉफीचा खप तसा कमीच आहे. आपल्याकडचे लोक कॉफीपेक्षा चहाचे चाहते आहेत. पण जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर कॉफी ही एक फार मोठी अर्थव्यवस्था आहे. पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरउताराच्या लाल मातीत ही कॉफी रुजू शकते. उसाला पर्याय ठरू  शकते आणि आपल्या या भागातील कष्टाळू शेतकऱ्यांना चांगला पैसा आणि नवी ओळख मिळवून देणारे एक नगदी पीक ठरू शकते. प्रयोगशील शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.

जगात सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन घेणारा आणि जागतिक बाजारपेठेतील एकूण कॉफीपैकी तब्बल ४० टक्के वाटा असणाऱ्या ब्राझीलपाठोपाठ व्हिएतनामचा क्रमांक लागतो. भारत उत्पादनात सहावा आणि विक्रीत पाचवा सर्वात मोठा देश आहे. देशाच्या एकूण कॉफी उत्पादनातील ७१ टक्के कॉफी कर्नाटकात उत्पादित होते. त्यापाठोपाठ केरळ २१ टक्के उत्पादनासह दुसऱ्या तर तामिळनाडू ५ टक्के उत्पादनासह तिसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. उर्वरित तीन टक्के उत्पादन देशात विखुरलेल्या स्थितीत आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या कॉफी रोबस्टा आणि कॉफी अरेबिका या प्रमुख दोन प्रकारांपैकी कॉफी रोबस्टा मोठय़ा प्रमाणात निर्यात केली जाते.

महाराष्ट्रात चिखलदरा येथे ब्रिटिशांनी कॉफीची लागवड केली होती. आजही येथे कॉफीचे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते पण क्षेत्र आणि उत्पादन दोन्ही खूप नगण्य आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमधील पन्हाळा गडावरील मातीत कॉफी आणि चहा लागवडीचे यशस्वी प्रयोग राबविले होते. त्याकाळी कोल्हापूर नंबर वन कॉफी आणि कोल्हापूर नंबर वन चहा या ब्रँडखाली ही दोन्ही दर्जेदार उत्पादने विक्री केल्याचेही संदर्भ पाहायला मिळतात. पन्हाळ्यासह शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांमध्येही कॉफीची चांगली वाढलेली झाडे दिसून येतात.

कॉफी करण्याची पद्धत

उताराची वालुकामय लाल माती, दरवर्षी पावसाळ्यात हमखास पाऊस पडणारा भाग, इतरवेळी हवेत आद्र्रता आणि फुले येण्याच्या वेळेस धुके पडण्याचे कमी प्रमाण या जमेच्या बाजू लक्षात घेतल्या तर पश्चिम घाटाच्या जवळपासच्या ठिकाणी कॉफीची लागवड करता येऊ  शकते. पाणी साठून राहणारी चोपण जमीन, जास्त काळ राहणारे धुके, ३५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान आणि तीव्र सूर्यप्रकाश या गोष्टी कॉफी पिकाला मानवत नाहीत. चिकमंगळुर, कुर्ग येथे कॉफीच्या रोपवाटिका आहेत. येथून रोपे आणणे शक्य नसेल तर बियाणे आणून इथे त्यापासून रोपे तयार करता येतात. कॉफीची प्रायोगिक लागवड बांधावर करणे शक्य आहे. बांधावर आधीपासूनच काही झाडे असतील तर अशा झाडांपासून जवळ की जिथे दिवसातून ठरावीक वेळ सूर्यप्रकाश जमिनीवर पडतो अशा अर्थात पन्नास टक्के ऊ न सावली असलेल्या ठिकाणी कॉफीची रोपे दोन रोपांमधे पाच फूट अंतर ठेवून दोन फूट बाय दोन फूट आकाराचा खड्डा घेऊन लागवड करावी. बांधावर स्थिरावल्यानंतर अंदाज आणि अनुभव घेऊन मुख्य शेतात कॉफी लागवड करता येईल.

स्वतंत्र लागवड करायची झाल्यास आधी पूर्वतयारी म्हणून शेतात वीस बाय तीस फुटांवर सिल्व्हर ओकची रोपे लावावीत. सिल्व्हर ओक तीन वर्षांचा झाल्यानंतर कॉफीची लागवड पाच बाय पाच फुटांवर करावी किंवा सुरुवातीला तीन बाय चार फुटांवर लागवड करुन पाच ते सहा वर्षांनी एक आड एक झुडूप काढून टाकून विरळणी करता येते.  पाच बाय पाच फुटांवर लागवड केल्यास एकरात १७४२ झाडे बसतात. कर्नाटकात योग्य व्यवस्थापनेत प्रती एकरी दीड टन कॉफी बियांचे उत्पादन मिळते.

उत्पन्नाची हमी

कॉफी बियांना दोन प्रकारचे आवरण असते. पाण्यात बिया भिजवून बाहेरील साल काढता येते. त्यानंतर बियाणं उन्हात सुकवून आतील पांढऱ्या रंगाचे कवच फोडता येते. त्याच्या आतली बी उन्हात सुकवून ओव्हन किंवा भट्टीत भाजून त्यापासून कॉफी पावडर तयार करता येते. कॉफीची रोपे लावल्यापासून तीन वर्षांत उत्पादन सुरु होते. सुरुवातीला एका रोगापासून दोनशे ते पाचशे ग्रॅम बियाणे मिळते. झाडाची वाढ होत जाईल तसे उत्पादनही जास्त मिळत जाते. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी रोपे पुरवठा, वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिल्यास कॉफीची लागवड वाढू शकते. यानंतर प्रक्रिया युनिट सुरु करुन एखादा आकर्षक ब्रँड तयार करुन कॉफीची विक्री करता येऊ  शकते. शक्यतो सेंद्रिय पद्धतीने कॉफी उत्पादन केल्यास त्याला वीस ते पन्नास टक्के अधिक दर मिळू शकतो. वाढ पूर्ण झालेल्या पण हिरव्या बिया प्रक्रिया करुन ग्रीन कॉफी या प्रकारे विक्री करता येते. ग्रीन टी प्रमाणेच ग्रीन कॉफी देखील आजकाल लोक मोठय़ा प्रमाणावर वापरतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ग्रीन कॉफी उपयुक्त ठरते.

राज्यातील प्रयत्न

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी ब्रिटिशकालीन तीन कॉफी इस्टेट्स अजूनही अस्तित्वात पण दुर्लक्षित आहेत. ७० एकरांवर असणाऱ्या या तीन कॉफी इस्टेट्समधून उत्पादित होणारी कॉफी स्थानिक स्तरावर पर्यटकांना विकली जाते. म्हणावे तसे लक्ष न दिल्याने कधीकाळी आर्थिक प्राप्तीचा स्र्ोत असणाऱ्या या बागा सध्या केवळ पर्यटन व्यवसायावर तग धरुन आहेत.

पर्यटनाची जोड

महाराष्ट्रातील समुद्रसपाटीपासून सर्वसाधारणपणे ६०० ते १२०० मीटर उंचीवरील सर्वच समशितोष्ण ठिकाणी कॉफीची लागवड करता येऊ  शकते. गरज आहे ती लागवड, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन ही साखळी निर्माण करण्याची. कॉफी लागवड आणि प्रक्रियेला पर्यटनाची जोड देणे आवश्यक आहे. पश्चिम घाट आणि सह्यद्री रांगांमधलं आल्हाददायक वातावरण आणि येथील संस्कृती याचा प्रत्यय आणि त्याच्या जोडीलाच स्थानिक उत्पादन असलेली दर्जेदार कॉफी हे समीकरण जुळलं तर डोंगरउतारांवर कॉफीच्या माध्यमातून हिरवाई नटेल आणि अर्थार्जनाचा आणखी एक राजमार्ग खुला होईल.

कॉफीच्या पानांचे आच्छादन वर्षभर जमिनीवर होत असल्याने मातीची प्रत सुधारण्यास, जमिनीत ओलावा टिकून राहण्यास आणि मातीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. कॉफीच्या बियांवरील साल आणि गर ज्याला कॉफी पल्प म्हणतात त्याचा आणि त्याच्या आतील कवच म्हणजेच  सिल्व्हर स्कीनया दोन्हीचा काही प्रमाणात वापर जनावरांच्या खाद्यसाठी करता येतो. यापासून इथेनॉल निर्मितीही केली जाते. चांगल्या प्रतीचे कंपोष्ट खतही यापासून तयार करता येते.

चिखलदरा तालुक्यात ब्रिटिशांनी कॉफी लागवडीचा प्रयोग केला होता. आजही सत्तर एकर कॉफीचे तीन मोठे मळे तालुक्यात आहेत. मी माझ्या अर्ध्या एकर क्षेत्रावर कॉफीची लागवड केली आहे. हंगामात मला पाचशे ते सहाशे किलो बिया मिळतात. याच्या विक्रीतून मला वर्षांला एक लाखापर्यंत उत्पन्न मिळते. क्षेत्र वाढवून प्रक्रिया करून कॉफी पावडर विक्री करण्याचे नियोजन आहे.

प्रकाश काळे, चिखलदरा, जि.अमरावती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:26 am

Web Title: coffee cultivation experiments in maharashtra zws 70
Next Stories
1 रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण व्हावेच; पण…
2 विनोबांची भाषिक भूमिका…
3 सावरकरांचा समाजसुधारणा मार्ग…
Just Now!
X