कलेक्टिव्ह म्हणजे कलावंत-समूह. भारतात त्यांचा इतिहास ७० वर्षांचा तरी आहेच; पण साधारण १९९०च्या दशकानंतर, दोघांचा गट, जोडपं, यांनाही कलेक्टिव्ह म्हटलं गेलं. राजकीय/ सामाजिक विषय त्यांनी हाताळले, कलेच्या नव्या वाटा एकमेकांसोबत शोधल्या.. त्यांचा हा धावता आढावा..

आधुनिक आणि समकालीन कलेच्या क्षेत्रात कलाकार एकत्र का येतात? कोणत्या भूमिकेतून हे गट (कलासमूह) किंवा ‘कलेक्टिव्ह’ बांधले जातात? त्यांच्यात सामायिक असं काय असतं? कलाकार आणि क्युरेटर यांना बांधून ठेवणारी अशी नेमकी कोणती गोष्ट असते? आपल्या दृष्टीनं त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे कलेक्टिव्ह्ज उभारण्यात, त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानात स्त्री कलाकारांची काय भूमिका दिसून येते? आधुनिक कलेच्या सुरुवातीपासून भारतात कलाकारांनी एकत्र येऊन आधुनिक कलेची मांडणी केली. स्वातंत्र्याच्या काळात दिल्ली शिल्पी चक्र, मुंबईत प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप, कलकत्ता ग्रुप असतील किंवा थोडं नंतर तयार झालेले ग्रुप १८९० सारखे गट असतील. त्या त्या काळातल्या कला प्रवाहांना प्रश्न विचारण्याचं काम या कलावंत-समूहांनी पार पाडलं. ‘फोर विमेन आर्टिस्ट्स’ हा १९८०च्या दशकातला असाच एक प्रयत्न. नलिनी मलानी, अर्पिता सिंग, नीलिमा शेख आणि माधवी पारेख या चार कलाकारांनी एकत्र येऊन प्रदर्शनं भरवली. स्त्री कलाकारांनी एकत्र येऊन एखादा गट तयार करायचा हा तसा पहिलावहिला प्रयत्न होता. या चौघींचा कलाव्यवहार अगदी वेगळा तरी एकमेकींच्या विचारांना आणि अभिव्यक्तीला पूरक ठरलेला. त्या काळातल्या इतर कुठल्याही कलेक्टिव्हपेक्षा जास्त प्रदर्शनं या गटाने भरवली होती. पण तरीही या गटाला कला जगतात फारसं गंभीरपणे घेतलं गेलं नाही किंवा नंतर ही कलेतिहासाच्या लिखाणात इतर गटांबद्दल जशी सैद्धांतिक मांडणी झाली तशी या गटाबाबत फारशी कधी झालेली दिसत नाही.

Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

अलीकडच्या काळात धंदेवाईक कलाजगतापासून स्वत:ला दूर ठेवत कलाव्यवहार जोखायचं काम काही कलेक्टिव्ह्जनी भारतात केलेलं दिसतं. यात अर्थातच स्त्री कलाकारांचा आणि क्युरेटर्सचा वाटा मोलाचा आहे. कधी हे कलेक्टिव्ह्ज अल्पजीवी ठरले, कधी त्यांना डावललं गेलं तर कधी त्यांनी समकालीन कलेची व्याख्या आणि दिशा बदलून टाकली. कलाजगत हे आर्ट फेअर, लिलाव या भोवती फिरत असताना त्या पलीकडे जाऊन कलेचा विचार करणं, त्यासाठी तसा अवकाश तयार करणं हे वाखाणण्याजोगं आहे. १९९०च्या दशकात शर्मिला सामंत आणि तुषार जोग यांनी (अन्य कलाकारांच्या साथीनं) ‘ओपन सर्कल’ची स्थापना करून यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात कलाकार, विद्यार्थी, अभ्यासक, कार्यकर्ते यांना एकत्र आणून कार्यशाळा, अभ्यास शिबिरे, प्रदर्शने भरवली. यातून संवाद सुरू व्हावा हा उद्देश होता. कलाकार म्हणून लोकांशी, आयुष्यातल्या प्रत्यक्ष गोष्टींशी कसं जोडून घेता येईल त्याचा हा शोध होता. त्यात पुढे काही कला-हस्तक्षेप केले. इतर कलाकार बाहेर पडल्यावरही शर्मिला सामंतने ‘ओपन सर्कल’चे काम काही काळ चालू ठेवले. नवीन आर्थिक धोरण, धर्माधता, ध्रुवीकरण या सगळ्याला दृश्यकलेतून हात घातला. गुजरात दंगलीनंतर ‘रीक्लेम युअर फ्रीडम’ ही मोहीमही सार्वजनिक ठिकाणी राबवली. यातून कलाकारांना या मुद्दय़ांवर लोकांशी संवाद साधता आला.

मुंबईतच झाशा कोलाह आणि सुमेश शर्मा यांच्या पुढाकारातून सुरू झालेला आणखी एक गट म्हणजे ‘क्लार्क हाऊस इनिशिएटिव्ह’. आज १७ कलाकारांना एकत्र बांधणाऱ्या या समूहाला ते ‘कलाकारांची युनियन’ म्हणतात. स्वातंत्र्य आणि समतेच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या या क्लार्क हाऊसने गॅलरीपेक्षा हटके जागांमध्ये प्रदर्शनं भरवली. जेजे/ रहेजासारख्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणणं, कला आणि राजकारण यांची सांगड घालत कलाकारांची मोट बांधणं, समाजातल्या आणि कलेतिहासाच्या प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारत क्लार्क हाऊसने क्युरेशन बरोबर सहयोगाने काम करायचे एक प्रारूपच कला जगतासमोर आज उभे केलेले दिसते.

इतरत्र, बेंगळूरुमध्ये कलाकारांच्या विचारविनिमयातून आणि अर्चना प्रसाद यांच्या पुढाकारातून ‘जागा’ची कल्पना पुढे आली. सुरुवातीच्या काळात कायमस्वरूपी कलासंस्था न उभारता कमी वजनाच्या पोलादी पट्टय़ा जोडून तात्पुरत्या उभारलेल्या इमारतीत त्यांनी काम सुरू केले. ही इमारत सहजपणे कुठेही उचलून घेऊन जाणं शक्य होतं. उपलब्ध असलेल्या जागेनुसार रचना करत नंतर त्यांनी ‘जागा’ची बांधणी केली. गेल्या आठ-दहा वर्षांत ‘जागा’मध्ये व्हर्टिकल गार्डनपासून भित्तिचित्रांपर्यंत आणि मौखिक इतिहास व स्मृती यांच्याकडे संसाधन म्हणून पाहण्यापासून पर्यावरणाचे मुद्दे हाताळण्यापर्यंत अनेक कला-प्रकल्प सादर केले गेले. शहरातले काही नवे भाग, जुन्या वस्ती, त्याचबरोबर, नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलांखालच्या जागा, जुन्या वापरात नसलेल्या इमारती, बस स्थानके यांसारख्या ठिकाणी त्यांनी लोक-सहभागातून प्रकल्प साकारले.

अशा पद्धतीनं कलेक्टिव्ह्जमधून काम करताना कलाकार स्वत:ची शैली जपत व्यक्तिगत पातळीवर काम करत राहतात. पण बऱ्याचदा कलेक्टिव्ह म्हणून काम करत कलानिर्मिती करताना दिसतात. हे करताना त्यांची वैयक्तिक भाषा या प्रक्रियेत अडसर न बनता त्यातून एक सामुदायिक प्रक्रिया घडताना दिसते. १९९२ मध्ये सुरू झालेला मोनिका नरुला, शुद्धोब्रता सेनगुप्ता आणि जीबेश बागची यांचा ‘रक्स मीडिया कलेक्टिव्ह’. दिल्लीतला ‘सराय’ हा प्रकल्प चालवणं असेल, स्थानिक समुदायांबरोबर माध्यमांच्या संदर्भात काम करणं असेल, वेगाने बदलणाऱ्या शहरातल्या नागरी प्रश्नांवर संशोधन करणं असेल, जागतिकीकरणाचे परिणाम जोखत त्यावर मांडणी शिल्पं, व्हिडीओ तयार करणं असेल किंवा शांघाय बिएनाले क्युरेट करणं असेल. ‘रक्स’ अनेक डगरींवर पाय ठेवत त्यांचा कलाविष्कार साकारताहेत, जगभरात पोहोचत आहेत. अशाच प्रकारे, व्हिडीओ आणि इतर चित्रीकरण माध्यमातल्या प्रयोगांना ‘चित्रकारखाना’पासून शायना आनंदने सुरुवात केली. नंतर ‘कॅम्प’ हा कलेक्टिव्ह त्यांनी अशोक सुकुमारन यांच्यासोबत सुरू केला. ‘पद्म’ हे माहितीपट आणि चित्रित केलेल्या फुटेजचं ऑनलाइन अर्काइव्ह ते चालवतात. ‘कॅम्प’मधून व्हिडीओ, मांडणीशिल्प, इंटरनेटसारखी नवमाध्यमे अशा अनेक कलाप्रकारांतून शायना आणि अशोक कला व सौंदर्य, खासगी आणि सार्वजनिक, सत्तासंबंध आणि मालकी हक्क यांसारख्या संज्ञांचा सखोल विचार करतात.

गुवाहाटीचा ‘डिझायर मशीन कलेक्टिव्ह’ हा सोनल जैन आणि मृगांक मधुकालिया या जोडप्याने उभा केला आहे. आपला सामाजिक इतिहास समजून घेण्यात प्रतिमा, खासकरून हलत्या प्रतिमा, काय भूमिका बजावतात याचा माग हे कलाकार घेतात. प्रभुसत्ताक रचना बाजूला सारून समांतर वास्तवाच्या कथनातून आधुनिक आणि समकालीन काळाची मांडणी कशी करायची याचा पडताळा ते व्हिडीओ कलाकृतींतून घेतात. हे करताना प्रतिमा, पोत, नाद, कल्पितं या सगळ्यांच्या मिसळणीतून या कलाकृती तयार होतात. परात्मता व विखंडितता यामुळे माणसाला जखडून टाकणाऱ्या भांडवली समाजरचनेला तोंड देण्याकरिता वैचारिक आणि दृश्यात्मक पातळीवर काय प्रयोग करता येतील हे आजमावण्यासाठी हा कलेक्टिव्ह आकाराला आला. सोनल जैन यांनी त्यांच्या ‘पेरिफेरी’ या प्रकल्पांतर्गत एक जुनी बोट भाडय़ाने घेऊन ती ब्रह्मपुत्रेच्या काठावर उभी केली. यात कला, नदीचा, शहराचा इतिहास, परिसर, मौखिक परंपरा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, जन-कला हस्तक्षेप, अर्बन डिझाइन अशा विविध विषयांतल्या संवादात्मक उपक्रमांसाठी ती एक प्रयोगशाळा ठरली. ‘डिझायर मशीन’चे हे प्रकल्प आणि गुवाहाटीला त्यांनी आपला तळ बनवणं, तसंच त्यांनी वापरलेल्या आकृतिबंध, रचना आणि माध्यमं यातून एक प्रकारे केंद्र-परीघ रचनेला उलथून टाकण्याचा प्रयत्न दिसतो.

हे आर्ट कलेक्टिव्ह्ज पूर्णपणे बंडखोर विचार मांडणारे आहेत असा दावा करणं, हे थोडं धाडसाचं ठरेल. पण कलानिर्मिती, सर्जनात्मक प्रक्रिया याकडे पाहाण्याची वेगळी दृष्टी त्यांनी दिली, हे मात्र नक्की. कलानिर्मितीबद्दलच्या आपल्या नेहमीच्या समजेला मात्र ते धक्का देतात. लोकांपर्यंत ही कला घेऊन जातात, सहयोगातून निर्मिती करतात, व्यक्ती-केंद्रित प्रक्रियेतून बाहेर येत सामूहिक कृतीतून ते घडवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही तडजोडीतून न घडता, याउलट निरनिराळे सामाजिक-सांस्कृतिक घटक एकत्र बांधत हे कलेक्टिव्ह्ज अर्थपूर्ण कला व्यवहाराकरिता अवकाश उभं करतात.

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत. ईमेल:

नूपुर देसाई noopur.casp@gmail.com