फ्री बेसिक्सची घोषणा फेसबुकच्या मार्क झकरबर्गने केली आणि त्यावर चोहोबाजूंनी चर्चा सुरू झाली. अगदी ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेट मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यावर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत..

गावात शहरी जीवनाचे अनुकरण
नेट न्युट्रॅलिटीच्या अंतर्गत सगळ्या मोबाईल सव्‍‌र्हीस कंपन्यांना एकाच दराने इंटरनेट पुरवावे लागणार आहे. यावरुन फेसबुकवर नेट न्युट्रॅलिटी ही कॅंपेन सुरु झाली आहे. त्यावरच आधारित आता फ्री बेसिक ही नवी कँपेनही सुरु झाली आहे. त्यामुळे लोकांना एकमेकांशी जोडून ठेवणे सोपे होणार आहे. या योजनेमुळे खेडय़ापाडय़ातील लोकांपर्यंत इंटरनेटची मोफत सुविधा उपलब्ध होऊन त्यांना त्यांच्या कोशाबाहेरची माहिती मिळू शकेल. परंतू दुसऱ्या बाजूला यामुळे शहरवासींयाप्रमाणेच गावात राहणाऱ्या लोकांच्या हातात चोवीस तास स्मार्ट फोन येऊन शहरी जीवनाचे अनुकरण व्हायला सुरुवात होऊ शकेल.
– यामिनी दळवी,
भवन्स महाविद्यालय, तृतीय वर्ष, मास मिडीया 
ई-क्षेत्रात वर्णव्यवस्थेचा धोका
फ्री बेसिक्स चा उपयोग जर फक्त शैक्षणिक कामासाठी होणार असेल तर खूप चांगले होईल. पण सध्या जी माहिती मिळते आहे, त्यावरुन यात काही संकेतस्थळे मोफत तर बाकीच्यांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत ई-क्षेत्रात नसणारी एक प्रकारची वर्णव्यवस्था यातून तयार होण्याची शक्यता वाटते आहे. फ्री बेसिक् स मुळे फेसबुकचे ग्राहक वाढणार आहेत, त्यामुळेच झुकेरबर्क त्यासाठी प्रयत्न करत आहे. आतातरी फ्री बेसिक्स मधून जाहिराती दाखवल्या जाणार नसल्या करी भवि ष्यात त्या दाखवल्याच जाणार नाहीत, याची खात्री देता येणार नाही.
– प्रतिक काटे,
फ्रेमबॉक्स अ‍ॅनिमेशन इन्स्टीटय़ूट

भुर्दड ग्राहकांवर नको
जाहिरातींच्या रुपाने भविष्यात येणाऱ्या पैशांसाठी समाजसेवेचा आव आणत सर्वासमोर आणली गेलेली ही मोहीम कोणालाही मोहात पाडू शकते. परंतू याबाबत योग्य अभ्यास करुनच पावले उचलली गेली पाहिजेत. हा धोरणात्मक विषय असल्याने सवंग मतांवरुन यावर निर्णय घ्यायला नको. इंटरनेटच्या जगात असणारी लोकशाही यामुळे संपणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे ई- कंपन्यांमधील स्पर्धा वाढेल. परंतू त्याचा भरुदड ग्राहकांना सहमन करावा लागेल असे वाटते.
– आदित्य दवणे,
डॉ. व्ही. एन. ब्रिम्स महाविद्यालय,
द्वितीय वर्ष, एमबीए

ग्राहकांना फायदा कसा?
फ्री बेसिक्स ही संकल्पना भारतात आणण्यासाठी काही ठराविक घटक फारच उत्सुक दिसत आहेत. त्यामागे असणाऱ्या घटकांचा यातून होणारा फायदा लक्षात घेतला तर यातील फोलपणआ कळू शकेल. इंटरनेट वापरणाऱ्यांना याचा जितका उपयोग होणार आहे, त्यापेक्षा जास्त फायदा संकेतस्थळे व अ‍ॅप्स बनवणाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे यावर सरकारने सर्वाचा फायदा कसा होईल यादृष्टीने निर्णय घ्यायला हवा.
– उमेश घुडे, वझे-केळकर महाविद्यालय, मुलुंड

इंटरनेट व्यसनाधीन
तळागाळातल्या लोकांपर्यंत इंटरनेटची सुविधा पोहचवण्याचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. पण जिथे एक वेळेच्या जेवणाचीही भ्रांत आहे, अशा भागात या सुविधा पोहोचणार तरी कशा हा प्रश्न आहे. जिथे दळणवळणाची साधनेही उपलब्ध नाहीत त्याठिकाणी या सेवेचा उपयोग काय होणार आहे. तसेच इंटरनेटच्या सहज उपलब्धतेने आणि अतिवापराने नवीन पिढी इंटरनेट व्यसनाधीन होण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकेल. आधी खेडय़ापाडय़ांमध्ये मुलभूत सुविधा पोहचवणे गरजेचे असून सरकारने यावर चर्चा घडवून आणायला हवी.
– प्रतिभा पवार,
एम.एस्सी, रुईया महाविद्यालय

हे फेसबुकच्या फायद्यासाठी
फेसबुकला यातून आपला ग्राहक वर्ग वाढवायचा आहे. जर फेसबुकला इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहचवायचे असेल तर त्यांनी नेटीझन्स करिता ठराविक डेटा मोफत उपलब्ध करुन द्यावा, त्यातून ते स्वत:ला हवी असणारी संकेतस्थळे पाहू शकतील.
– शुभम सोनावणे,
द्वितीय वर्ष कला, किर्ती महाविद्यालय, दादर