पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्चलनीकरणाच्या घोषणेसोबत एटीएम-बँकांची रांगकरी बनलेली जनता आणि तिच्या चलनजाचाच्या गाथा वृत्तपत्रांमध्ये सुरू झाल्या तेव्हापासूनच माध्यमांवर रोषासोबत विनोदालाही प्रचंड धार आलेली होती. या योजनेच्या विडंबनामध्ये निव्वळ टीव्हीवरील सेलेब्रेटी विनोदवीर नव्हते तर शाळकरी नाटुकल्यांपासून हौशा-गवशा-नवशा संगीतकारांनीही सहभाग घेतला. या विडंबनाचे शेकडो व्हिडीओज दररोज यूटय़ूबवर अपलोड्स झाली आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार इतर माध्यमांतून व्हायला लागला.

गेल्या आठवडय़ामध्ये नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवर चार तरुणांनी केलेल्या ‘बार बार फेंको’ या गाण्याने समाजमाध्यमांत सैरावैरा पसरण्याचा विक्रमच केला. ३ नोव्हेंबर रोजी यूटय़ूबला पडलेल्या या गाण्याचे फक्त या माध्यमावर अर्ध्या  लाखांहून अधिक हिट्स आहेत. इतर माध्यमांतूनही ते पसरविले जात आहेत. १९६२ सालच्या अभिजात हिंदूी सिनेमातील गाण्याचे शब्द बदलून ते पंतप्रधानांना समर्पित केल्याने गमतीशीर झालेले आहे. गिटार, पियानिका आणि हार्मोनिका या वाद्यांवर बसविलेल्या गाण्यात ‘बार बार फेंको, ये फेकने की चीज है विकास के पिता’ हे शब्द फिरवून मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे. नुसते मोदीच नाही तर अर्थमंत्र्यांनाही या गाण्यात सोडले नाही. अल्पबजेटी असूनही बहुप्रदर्शन झालेला हा एकटाच व्हिडीओ नाही, तर गेल्या वर्षभरामध्ये गाणी, नाटक, विनोदिका, वात्रटिका आणि वाटेल त्या प्रकारे या निर्णयाची खिल्ली उडविण्यात आली. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये लोकांना होणाऱ्या त्रासाच्या, जाचाच्या वृत्तपत्रीय बातम्या मोठय़ा प्रमाणावर येत होत्या. त्याचा आधार घेऊन नजरबट्टू या यूटय़ूबवरच छोटय़ा वात्रटिका बनविणाऱ्या सतबीर आणि दलबीर या संता-बंताछाप द्वयीने जनतेच्या अपरिमित दु:खांवर आणि सरकारच्या विचित्र धोरणांवर शब्दतलवार परजली आहे. नोटाबंदीला दोन दिवस झाल्यानंतर विडंबनाद्वारे सरकारला झोडपणारा हा व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा आहे. याच काळात आमिर खानच्या कुण्या चाहत्याने त्याची लोकप्रिय गाण्यांचे तुकडे जोडून त्याला नोटाबंदीच्या धोरणांच्या ओळी देत चपखल टीका केली आहे. यात लगानमधील ‘घनन घनन’ पाऊस गाण्यापासून ते दिल चाहता हैंमधील ‘तनहाई’ या दु:खात्मी गाण्यापर्यंत सगळ्याच गाण्यांच्या कॅप्शन्स या हसविणाऱ्या आहेत. नोटाबंदीवरील टीकांच्या नाटुकल्यांमध्ये तर कौटुंबिक विनोदिकांचा प्रचंड मोठा साठा यूटय़ूबवर आहे. नवऱ्याच्या खिशातून गुपचूप पैसे पळवून साठविणाऱ्या एका महिलेची पतीसमोर पैशांसाठी रडारड असणारा दिवस नोटाबंदीनंतर आणखी रडारडीचा होऊन बसतो, त्याची गोष्ट सांगणारा व्हिडीओ लोकप्रिय होता. त्याचसोबत सासू नोटाबंदीचा निर्णय टीव्हीवर ऐकल्यानंतर आपल्याजवळच्या रद्दी झालेल्या नोटा ऐषोआरामी जावयाला देऊन त्याची कशी फटफजिती करते, त्याचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी  माध्यमांतून पसरविला जात होता. नोटाबंदीच्या तीनच दिवसांनंतर यूटय़ूबवर अपलोड झालेल्या ‘नरेंद्र मोदी किसी को नहीं छोडेगा’ या व्हिडीओत श्रीमंत आणि गरीब या दोहोंची पैशावाचून होणारी फरपट दाखविणाऱ्या व्हिडीओत अगदी तळागाळातील माणसांमधील चीड व्यक्त झाली आहे. या सगळ्यांसोबत कॉमेडी शोजमधील कलाकारांनीही धम्माल उडवून दिली आहे. पण कलाकार नसलेल्या सर्वसामान्यांचे हाल दाखविणाऱ्या व्हिडीओजला पसंती सर्वाधिक मिळालेली दिसते. मोदींच्या निर्णयाने आणि त्याच्या ढिसाळ अंमलबजावणीने जे लोक आधी त्यांचे अव्याहत कौतुक करीत होते, ते आता वाटेल त्या पद्धतीने त्यांना टपली मारण्याचा उद्योग रचत आहेत. समाजमाध्यमांमध्ये विडंबन करणाऱ्या व्हिडीओजच्या वर्षपूर्तीमधून जनमानसातली खदखदती विनोदबुद्धीच समोर आली आहे.