माजी आमदार व समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यां मृणाल गोरे यांचा पहिला स्मृतिदिन आज, १७ जुलै रोजी आहे. त्यानिमित्ताने, गोरे यांच्या आणीबाणीपर्यंतच्या प्रवासाची आत्मीयतेने ओळख करून देणारे हे आठवणींचे टिपण..
गांधीजींच्या खुनानंतर रा. स्व. संघावर केंद्र सरकारने निमलष्करी संघटना आहे, असे म्हणून बंदी घातली होती. मुंबई सरकारात त्या वेळी, १९४८ साली मोरारजी देसाई गृहमंत्री होते.
राष्ट्र सेवा दलाच्या वतीने खुल्या मदानात संध्याकाळी शाखा भरायची. त्यात कवायत, मार्चिंग, लाठी वगरे शिकवले जायचे. तेवढय़ावरून तीही निमलष्करी संघटना आहे, असे ठरवून मोरारजीभाईंनी त्यावरही बंदी घातली होती. एस. एम. जोशी त्यांना भेटले. सेवा दल समाजवादी विचारांची संघटना असून गांधीजींच्या शांततामय मार्गावर तिचा पूर्ण विश्वास आहे असे मांडले. पण लाठीचे शिक्षण..? मोरारजीभाईंचा प्रश्न. मग चर्चा होऊन असे ठरले की बौद्धिके, गाणी इत्यादी कार्यक्रम करायला सेवा दलाला परवानगी असावी.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला मोठे शाखा नायक शिबीर व्हायचे. त्या वर्षी मात्र एस. पी. कॉलेजच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये शिबीर झाले. मी त्या वेळी बार्शीला हायस्कूलमध्ये सहावीच्या वर्गात होतो. आम्हा तीन-चार जणांची पुणे शिबिरांसाठी निवड झाली. पुण्यात ज्यांची राहायची-जेवायची सोय आहे अशांना निवडले होते. माझे चुलत मामा तेथे असल्याने माझी निवड झाली होती. शिबिरात एके दिवशी दुपारी व्यासपीठावर वेगळा कार्यक्रम झाला. मृणाल मोहिले व केशव गोरे यांचे लग्न लावण्यात आले. भाऊ रानडेंनी त्यांचा परिचय करून दिला आणि आंतरजातीय विवाहाचे महत्त्व विशद केले. मी मृणालताईंना पहिल्यांदा तेथे पाहिले. त्या मुंबईला. मी बार्शी, सोलापूर-पुण्यात (कॉलेजला असताना) सेवा दलाचे काम करीत होतो. त्यामुळे ताईंची भेट व्हायची संधी नव्हती.
१९६३ पासून मी प्रजा सोशालिस्ट पार्टीचे काम करायला लागलो. राज्य शाखेचा सहसचिव होतो. शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत आणि जीवनाश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवून स्वस्त धान्य दुकानातून पुरवाव्यात-आदी मागण्यांसाठी प्रज्ञा सोशालिस्ट पार्टी (प्रसोपा), सोशालिस्ट पार्टी (सोपा) व हिंद मजदूर सभा-हिंद मजदूर पंचायत यांच्या वतीने सत्याग्रह झाला. मी बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बठका घेतल्या. त्यातून प्रसोपा-सोपाचे ऐक्य होऊन संयुक्त सोशालिस्ट पार्टी (संसोपा) झाली. पण बनारसच्या स्थापना संमेलनात (डिसेंबर १९६५) प्रसोपाचे नानासाहेब गोरे, नाथ प, मधु दंडवते आदी बाहेर पडले व त्यांनी परत प्रसोपा सुरू केली. एस. एम. जोशी मात्र संसोपात राहिले. म्हणून राजहंस, भाई वैद्य, बाबा आढाव, दशरथ पाटील, मी असे आम्हीही संसोपात राहिलो. मी महाराष्ट्र शाखेचा चिटणीस झालो.
त्याच वेळी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, अमरावती, सोलापूर आदी महापालिकांसाठी नवा एकत्रित कायदा करण्याचे राज्य सरकारने ठरवले. लोकांकडून सूचना मागवल्या. मी राज्य शाखेच्या वतीने एक अभ्यासगट नेमला. पुण्यात भाई, नाना, निरफराळे, मोतीराम कल्याणकर, रामदास परांजपे वकील हे महापालिका राजकारणात असायचे. त्यांचा अभ्यासगटात समावेश केला. ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिव बागाईतकर म्हणाले की मुंबईचे बाबुराव सामंत व मृणाल गोरे यांनाही त्यात घ्या. त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल. त्या अभ्यासगटाच्या बठका रामदास परांजपेंच्या मंडईजवळील कार्यालयात संध्याकाळी व्हायच्या. बाबुराव व मृणालताई न चुकता यायचे. चर्चा चांगल्या झाल्या. त्यांचा अहवाल तयार करून मी सरकारकडे पाठवला. वर्तमानपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली.
तेव्हा झालेला ताईंचा परिचय पुढे सतत वाढत गेला. जळगावच्या राज्य अधिवेशनात ब्रिजलाल पाटील अध्यक्ष, वसंत उपाध्ये सचिव, मी व मृणालताई सहसचिव म्हणून निवडले गेलो. आम्हा पदाधिकाऱ्यांच्या काही बठका मृणालताईंकडे, म्हणजे टोपीवाला बंगल्यावर व्हायच्या. घरी वीणेला मी स्वयंपाकात मदत करायचो. मृणालताईंनाही कांदा चिरून दे – वगरे मदत करू लागलो. आमचे काम चालू असले तरी ताईंना भेटायला येणाऱ्यांची वर्दळ चालू असायची. त्यांना अंजूकडेही बघायला फुरसत मिळायची नाही.
महाराष्ट्रात १९७२-७३ साली भयंकर दुष्काळ पडला. ताई विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. कधी मृणालताई-प्रधानमास्तर, कधी ताई आणि खासदार मधु दंडवते असे दौरे आम्ही आखायचो. नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, औरंगाबाद आदी जिल्हय़ांत जायचो. दुष्काळी कामांना भेटी द्यायचो. तिथल्या बाया ताईंच्या भोवती कोंडाळे करायच्या. आपल्या तक्रारी सांगायच्या. एकदा स्वस्त धान्य दुकानातून दिल्या जाणाऱ्या इलो-मिलोचा नमुना दिला. त्यात धोतऱ्याच्या बिया होत्या. ताईंनी तो प्रश्न विधानसभेत मांडला. पुरवठामंत्री भाऊसाहेब वर्तक चांगलेच गोत्यात आले. अमेरिकेतून आलेले धान्य नीट निवडून साफ करूनच दिले पाहिजे, असा आग्रह ताईंनी व इतर अनेकांनी धरला. ते काम सुरू झाले. २ जानेवारी १९७४ ला आम्ही महाराष्ट्र बंद घडवला. दुष्काळी कामावर मजुरी दीड रुपया असायची. पन्नास पसे महागाई भत्ता द्या अशी मागणी आम्ही केली. सीटू, आयटीयूसी, हिंद मजदूर सभा आदी कामगार संघटनांनी पाठिंबा दिला. संघटित कामगारांनी त्यांच्या प्रश्नासाठी नव्हे तर ग्रामीण श्रमिकांच्या प्रश्नासाठी पाळलेला तो बंद अभूतपूर्व होता. सरकारने ती मागणी मान्य केली.
महागाईच्या प्रश्नावर लाटणी-मोच्रे सुरू झाले होते. गुजरातेत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. ताईंना खूप बोलावणी आली. पण त्यांना मुंबईतून बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यांच्या सांगण्यावरून मंगला परिख, विमल परांजपे व मी तिकडे जाऊन आलो.
नागपूर अधिवेशनाच्या वेळी चंद्रपूर जिल्हय़ातील माणिकगड भागातले काही शेतकरी ताईंना भेटले. आमच्या भागात या- म्हणाले. ताईंना जाणे अवघड होते. त्यांनी मला सांगितले. मी व गोपाळराव कोरेकर तिकडे गेलो. मोठय़ा कंत्राटदारांनी जिथली झाडे कापली होती तेथे उस्मानाबाद-लातूर-अहमदपूर भागातून गेलेल्या शेतमजूर व शेतकऱ्यांनी त्या जमिनी वहीत केल्या. ज्वारीचे भरघोस पीक आले होते. पण ते सगळे अतिक्रमण आहे असे म्हणून विभागाने त्या लोकांच्या झोपडय़ा जाळल्या होत्या. आम्ही तो लढा उभा केला. विजया जोशी, अण्णा खंदारे, शिवाजी शिंदे यांच्या सहकार्याने विमलताईंनी तो चालवला. मी रेल्वे संपात पकडला गेलो होतो. पुढे मुंबईत वनमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या बंगल्यावर घेराव घातला. त्या वेळी ताईंची मोठी मदत झाली.
त्यानंतर आणीबाणी पर्व आले. ताई भूमिगत राहिल्या. मीही राहिलो. गुजरातेत त्या वेळी नानुभाई पटेलांचे जनता मोर्चाचे राज्य होते. फर्नाडिस तेथे पोहोचले होते. त्यांनी निरोप पाठवला म्हणून ताई व मी त्यांना भेटायला गेलो. दाढी-मिशा वाढलेल्या. पांढरी लुंगी व पांढरे उपरणे अशा पोशाखात जॉर्ज. ताईंनी डोक्यावर टोप (विग) बसवलेला व पंजाबी ड्रेस. मी – जीन्स आणि पट्टय़ापट्टय़ाचा शर्ट अशा पोशाखात. फर्नाडिसांनी सुरुवात केली, बाईंनी हुकूमशाही लादली. पण जनतेचा उठाव नाही. आपण कसे करायचे? ‘आपण लोकांना भेटत राहावे. पत्रके वाटावीत, मधूनमधून सत्याग्रह करावा’, ताई म्हणाल्या. १९४२ सारखे काही करावे का? जॉर्जनी विचारले. अजिबात नको. तशा कारवायांबद्दल अच्युतराव, लोहिया यांनाही पश्चात्ताप झाला होता, मी म्हणालो. परतताना आपण शांततेचा मार्ग सोडायचा नाही यावर आमचे एकमत झाले. अकोला, औरंगाबाद असे ताईंचे दौरे ठरवले. आम्ही वेगवेगळेच हिंडायचो. फक्त औरंगाबादहून नाशिकला प्रा. म. द. पाध्येंनी मोटारीने आम्हाला एकत्र नेले. तिथून औरंगाबादला परतल्यावर त्यांना अटक झाली. ताईंना त्यानंतर काही महिन्यांनी तुरुंगात धाडण्यात आले. आणि मला तर १९७६च्या नोव्हेंबरात. जेमतेम अडीच महिनेच नाशिक जेलमध्ये राहायला मिळाले.