सामान्य लोकांच्या जीवनातील एकही पैलू असा नाही ज्याला मोदींच्या दूरदृष्टीने स्पर्श केला नाही. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय आहे. दूरदृष्टी अमलात आणून त्यांनी अनेक समस्या सोडवल्याही आहेत. नवभारताची संकल्पना त्यांनी अलीकडेच मांडली असून त्या दिशेने पावले पडत आहेत..

आजपासून बरोबर तीन वर्षांपूर्वी सामान्य जनतेच्या भावना व संकल्पांचे सत्तारोहण भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या माध्यमातून केंद्रात झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या निमित्ताने भाजपला देशाचा आत्मसन्मान वाढवण्याची व सर्वागीण विकासाची मोठी संधी मिळाली होती. तो जनादेश केवळ पंतप्रधान बदलण्यासाठी नव्हता तर देश बदलण्यासाठी होता हे आता या तीन वर्षांत स्पष्टपणे जाणवते आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील सव्वाशे कोटी लोकांच्या मनाला स्पर्श करीत त्यांच्या आशा-आकांक्षा जाणून घेतल्या. त्यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा देशाचे मनोबल तुटत चालले होते, ताळतंत्र बिघडत चालले होते. जनता निराश मन:स्थितीत असताना मोदी यांनी मनामनांत ऊर्जेचे सिंचन केले. मोदी यांनी कृती, उक्ती व कार्यक्रम यातून सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न केला व सामान्य जनतेशी नाते जोडले. आज सामान्य जनतेत जेव्हा चर्चा होते तेव्हा मोदींचा विषय असतोच, यातून ते जनमानसात किती रुजले आहेत हेच दिसून येते. रोजच्या दैनंदिन समस्यांचा सातत्याने उल्लेख पंतप्रधानांकडून भाषणांतही होणे ही विरळाच गोष्ट आहे, त्यातून सामान्य लोकांच्या आशा-अपेक्षांची जाणीव त्यांना आहे हेच लक्षात येते.

यापूर्वी कधी कुठल्या पंतप्रधानाने लाल किल्ल्यावरून देश स्वच्छ करण्यासाठी मोहीम सुरू केली होती का? घाणीत जगणे हेच देशाचे प्राक्तन बनले होते. आपल्याला स्वच्छतेची उद्दिष्टे साध्य करण्यात बराच वेळ लागेल हे खरे आहे; पण निदान लोकांनी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली आहे हे काही कमी नाही. कुणी पंतप्रधान मुलींना वाचवून त्यांना प्रगतिपथावर नेण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’सारखी योजना सुरू करील, नद्यांच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर योजना हाती घेईल, गर्भवती मातांवर महिन्यातून एकदा मोफत उपचारांचे आवाहन डॉक्टरांना करील, मुलांच्या परीक्षेचा ताण समजून त्यांना आदर्श व्यक्ती बनण्याचे धडे देईल, असे कुणाला वाटले होते का? कुणी पंतप्रधान मुले, प्रौढ व वृद्ध यांना जलसंवर्धनाचे आवाहन करील, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याविषयी विचार तरी करील असे आधी पाहिले आहे का? गरीब महिलांना स्वयंपाकघरात काम करताना पारंपरिक इंधनांमुळे होणाऱ्या धुराचा त्रास दूर करण्यासाठी ‘पंतप्रधान उज्ज्वला योजने’सारखा उपाय शोधेल, औषधांचे भाव गगनाला भिडत असताना मोफत आरोग्य विमा योजना जाहीर करील, असे वाटले होते का? पण मोदींनी ते केले. त्यांनी लाल दिव्यांची व्हीआयपी संस्कृती एका झटक्यात बंद केली. त्यासाठी जे धाडस लागते ते त्यांनी दाखवले. पाकिस्तानच्या धमक्या व सीमेपलीकडून पसरवला जाणारा दहशतवाद त्यांना नवीन नव्हता पण सर्जिकल स्ट्राइक करून त्यांनी त्याचे चोख प्रत्युत्तर दिले. आधी कुणाला हे सुचले नव्हते. अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यातून हे सिद्ध होते की, नरेंद्र मोदी देशाची नस जाणण्यात वाकबगार आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर देशी इलाजाचा पर्याय आहे. त्यामुळेच देशातील सव्वाशे कोटी लोकांना एक भरवशाची आशा, ताकद व आवाज मिळाला आहे.

सामान्य जनतेत निर्माण झालेला हा विश्वास उगाचच नाही. मोदी खुर्चीवर बसलेले नाहीत तर लोकांच्या मनात बसलेले आहेत. जेव्हा ते म्हणतात की, मी पंतप्रधान नाही. हिंदूुस्थानच्या १२५ कोटी देशवासीयांचा प्रधानसेवक आहे, तेव्हा ते देशाच्या जनतेशी नाळ जोडतात. ते केवळ बाता मारणारे पंतप्रधान नाहीत तर जसे बोलतात तसे त्यांच्या तेजस्वी कर्तृत्वातून करून दाखवतात. सामान्य लोकांच्या जीवनातील एकही पैलू असा नाही, ज्याला मोदींच्या दूरदृष्टीने स्पर्श केला नाही. त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर काही ना काही उपाय आहे. दूरदृष्टी आहे. ती अमलात आणून त्यांनी अनेक समस्या सोडवल्याही आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द प्रेरणा बनतो, कारण त्यामागे त्यांचा दृष्टिकोन व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे. गावांमधून, गल्ल्यांमधून माध्यमे व समाजमाध्यमातून ते नवभारत घडवण्याचा संदेश देत आहेत.

पंतप्रधान झाल्यानंतर संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात भाजपची पहिली संसदीय पक्ष बैठक झाली होती त्या वेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, गरिबांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध राहील. त्यांचे सरकार शेतकरी, दलित, शोषित, पीडित, वंचित, युवक व महिला यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी समर्पित राहील, गेल्या तीन वर्षांत मोदी यांनी त्यांच्या कर्तृत्वातून या दिशेने प्रयत्न सुरू केल्याचे सिद्ध केले आहे.

गेल्या तीन वर्षांत मोदी यांनी देशाचा विकास व गरिबांच्या कल्याणासाठी १०५ हून अधिक योजनांची सुरुवात केली. देशात असा क्वचितच एखादा समाज घटक असेल ज्याच्या जीवनाला मोदींच्या योजनांनी स्पर्श केलेला नाही. यात काही योजनांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. गरिबांच्या कल्याणासाठी काळा पैसा बाहेर काढून तो गरिबांच्या विकासासाठी वापरणार असे त्यांनी सांगितले. ‘जनधन योजना’ हा त्यातील एक मोठा प्रयत्न होता. या योजनेत २८.५२ कोटी बँक खाती उघडली गेली. जनधन योजनेच्या खात्यातील शिल्लक आज तारखेला २८.५२ कोटी रुपये आहे. सध्या १.२६ लाख बँक मित्र काम करीत असून २२.१८ कोटी ‘रूपे डेबिट कार्ड’ जारी करण्यात आले आहेत. समाजाच्या अंतिम स्तरातील कुठल्याही व्यक्तीने बँकेत आपले पाऊल कधी काळी पडेल असा विचार केला नसेल, त्यांच्यासाठी बँक खाते ही मोठीच गोष्ट होती. ‘पंतप्रधान मुद्रा बँक योजने’अंतर्गत ७.६४ कोटी लोकांना ३३ लाख कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहे. पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेत अद्याप १० कोटी लोक सहभागी आहेत. दहा हजार लोकांना त्याचा लाभही मिळाला आहे. ‘पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजने’त अद्याप ३.११६१ कोटी लोक सहभागी झाले आहेत व ६१ लाखांहून अधिक लोकांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरणात सरकारी रुग्णालयात गरिबांची मोफत तपासणी व औषधे यांना प्राधान्य दिले आहे. गरीब लोकांना एक लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात आला आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेत दोन कोटी लोकांना मोफत गॅसजोड देण्यात आले आहेत. २०१९ पर्यंत पाच कोटी गरीब लोकांना मोफत गॅसजोड दिले जातील, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी यांसारखी दुसरी कुठली योजना असेल असे वाटत नाही. चोवीस तास वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने ४३ हजार कोटी रुपये ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने’साठी मंजूर केले आहेत. २०१९ पर्यंत प्रत्येक घरात वीज देण्याचे काम वेगाने केले जाईल. १ मे २०१८ पर्यंत देशात सगळ्या गावात वीज दिली जाईल. २०२१ पर्यंत प्रत्येक गरिबाकडे घर असेल ही मोदी यांची योजना आहे. त्या दिशेने सरकार वेगाने काम करीत आहे. गृहकर्जे आता गरिबांना कमी व्याज दराने मिळतील. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू केली आहे, त्यासाठी अर्थसंकल्पात ५५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. गेल्या तीन वर्षांत पंतप्रधानांनी समाजातील प्रत्येक घटकांना स्पर्श केला आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचले आहेत, किंबहुना सरकारच्या योजनांनी हे लोक प्रभावित झाले आहेत. मोदी कधी सीमेवर जाऊन जवानांशी संवाद साधतात तर कधी शाळकरी मुलांशी त्यांच्याइतके लहान होऊन गुजगोष्टी करतात. रेडिओवर त्यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम जलसंवर्धन, शाळांच्या परीक्षा, दिव्यांगांबाबत नवी धोरणे, स्वच्छ भारत अभियान, कचऱ्यापासून खत, वीज वाचवण्याचे उपाय, लाल दिव्यांच्या व्हीआयपी संस्कृतीला पूर्ण विराम, सुटीत मुलांनी करायच्या गोष्टी, युवकांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी करण्याच्या उपाययोजना, क्रीडा क्षेत्रात युवकांचा ओढा वाढवण्यासाठी त्यांना प्रेरणा, युवकांना त्यांचे करिअर घडवण्यासाठी काही अनुभवाचे बोल, मुलगा-मुलगी भेद टाळण्याचे आवाहन, खादीच्या वापरास उत्तेजन अशा अनेक गोष्टींना स्पर्श करून गेला आहे. त्यामुळे मोदी आज आबालवृद्धांच्या मनात घर करून आहेत.

नवभारताची संकल्पना त्यांनी अलीकडेच मांडली. आता त्या दिशेने पावले पडत आहेत. देशाला मोदी यांच्या नेतृत्वाबाबत आस्था व विश्वास आहे हे गेल्या तीन वर्षांत दिसून आले आहे.

लेखक भारतीय जनता पक्षाच्या माध्यम-संपर्क विभागाचे प्रमुख आहेत.

(‘ सह्याद्रीचे वारेहे सदर या आठवडय़ापुरते बुधवारी प्रकाशित होईल)