|| संजीव साने

डॉ. दत्ता सामंतप्रणीत चिघळलेल्या गिरणी संपानंतर गिरणी कामगार देशोधडीला लागला, अशी स्थिती असताना दुसरा दत्ता उभा राहिला- दत्ता इस्वलकर! आता तोही गेला, पण प्रश्न विचारणारे कार्यकर्ते आहेत, तोवर संघर्ष नाही थांबणार.. ‘गिरणी कामगारांचे नेते साथी दत्ता इस्वलकर यांचे ब्रेन हॅमरेजमुळे नुकतेच जे.जे. रुग्णालयात निधन झाले’

– ही बातमी आल्यावर १९७६ पासूनचा काळ डोळ्यासमोर येत गेला. मुंबईच्या सातरस्ता येथील मॉडर्न मिलमध्ये तो कामाला होता. गिरणी व मिल कम्पाउंडमध्ये ‘मास्तर’ याच नावाने परिचित असलेला दत्ता, राष्ट्र सेवादलातून जीवननिष्ठा घेत विकसित झालेला.

दत्ता तसा अबोल कार्यकर्ता, नेता होता पण वाटला कधीच नाही. तो कार्यकर्त्यांची सर्व कामे करत सर्वाच्या हृदयात जाऊन घट्ट बसला. गिरणी कामगारांच्या संपातही त्याचे शेजारी व समाजवादी चळवळीतील मध्य मुंबईतील महत्त्वाचे असलेले मधू राणे यांच्यासह सर्व कामे करत होता.

कोणतीही राजकीय अपेक्षा व अभिलाषा नसलेला दत्ता खरा अस्वस्थ झाला तो गिरणी संपातून कोणताही मार्ग निघत नव्हता त्यामुळे. हा संप आजही कोणी अधिकृतपणे मागे घेतलेला नाही. साधारण १९८५ नंतर गिरण्यांच्या जमिनीचा पूर्ण घास मालकांनी गिळण्यास सुरुवात केली.

१९८४-८५ मध्ये या जमिनींचे दीर्घ भाडेकरार (लीज) संपुष्टात आले. म्हणजे यानंतर मुंबई महापालिकेने या गिरण्यांच्या जमिनी परत आपल्या ताब्यात घेणे गरजेचे होते. ही कायदेशीर बाब फार उशिरा कामगारांना समजली. पण मालकांनी कोणतीही संधी न देता गिरणीतील साचे व अन्य सामुग्री रात्रीच्या अंधारात बाहेर काढण्याचा उद्योग सुरू केला. यात त्या विभागात ज्यांची दहशत चालत होती त्यांची- ‘गँग्ज’ची किंवा गुंडटोळ्यांची मदत घेण्यात आली. याच काळात जमिनी नावावर करण्याचा निर्णय झाला आणि तो अमलातही आला.

दत्ताला त्याच काळात असे वाटू लागले की हा प्रश्न पुन्हा जिवंत होऊ शकतो. हे त्याला मनापासून वाटत होते. त्यामुळे प्रत्येक चर्चेत तो हे मत मांडायचा. पण अनेक ज्येष्ठ व अनुभवी मंडळी त्याच्या या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करत. काही जण तू भावनिक पद्धतीने विचार करतोस असे सांगायचे. चळवळीचा व आंदोलन चालविण्याचा अनुभव असलेले समाजवादी व साम्यवादी सर्वच जण हा प्रश्न संपलेला असून तो लढा वा चळवळ उभी राहू शकत नाही असे मत मांडायचे. दत्ताला हे पटत नव्हते; पण या मोठय़ा पुढाऱ्यांना पटवून देऊ शकणारा तर्क, युक्तिवाद त्याच्याकडे नव्हता.

या सर्व चर्चेत हताश न होता तो एका तपस्वी समाजवादी नेत्यास भेटला. दत्ताच्या मनातील विचार शांतपणे ऐकल्यावर त्या नेत्याने शांतपणे पण निर्धाराने, ही चळवळ पुन्हा उभी राहू शकते हे सांगितले.

त्या नेत्यांचे नाव साथी बगाराम तुळपुळे.

तुळपुळे हे स्वत: मिल मजदुरांची संघटना चालवत असत. त्यांच्याकडे मोठय़ा कारखान्याचे व्यवस्थापन चालविण्याचा दीर्घ अनुभवही होता.

दत्ताच्या विचाराला एक आधुनिक तर्क बगारामजी यांनी दिला तो असा की, कोणताही उद्योग चालवायला काय लागते  (१) कच्चा माल  (२) उत्पादन करण्याची जागा (३) उत्पादन करण्यासाठी कुशल कामगार (४) उत्पादित मालाची विक्री होईल अशी मागणी आणि (५) भांडवल.

या पाचही महत्त्वाच्या गोष्टी उपलब्ध असल्या तर, कोणत्याही वेळी तो उद्योग पुन्हा सुरू करता येऊ शकतो. कापड उद्योगासाठी या सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध होत्या. मग हा उद्योग का चालणार नाही?

पण तो पुन्हा उभारताना प्रचंड मेहनत व सच्चे कार्यकर्ते हवेत. आणि त्यासाठी, कितीही त्रास झाला तरी प्रलोभन व दहशत यास शरण न जाणारे नेतृत्व हवे.

साथी बगाराम तुळपुळे यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे दत्ता नव्या जोमात कामाला लागला. संप संपला नसल्याने कामगार अजूनही गेटवर येऊन सही करतात ती वेळ गाठून गेटवर भेटणे, सुरू झाले. या प्रयत्नांतून एक अनौपचारिक, अ-दृश्य असे केंद्रक (न्यूक्लिअस) आकाराला आले. मिलच्या गेटवर सभा सुरू झाल्या. सुरुवातीला कामगारांनी फारसे लक्ष दिले नाही. पण हळूहळू गिरणगाव हलायला लागले. यासाठी राज्यभर दौरे व बैठका समितीने केल्या.

गिरण्यांच्या गेटवरून नंतर मध्य मुंबईत बैठका व चौक सभा सुरू झाल्या. संपाने गिरणी कामगाराचे कुटुंबही पणाला लावले. एक बाजूला गँगची दहशत व त्यातील पैशाच्या उलाढाली, दुसरीकडे घर चालविण्याकरिता केवळ नाइलाज म्हणून नाइट क्लबमध्ये तरुणींना उतरावे लागले. अनेक कुटुंबे कायमची गावाला स्थलांतरित झाली.

आपल्या गिरणी कामगार आई-बाबांचे उद्ध्वस्त आयुष्य या तरुणाईने स्वत:ला संकटात टाकून वाचवण्याचा प्रयत्न केला. याचा काही काळ लाभ कुटुंबाला मिळाला, पण त्यासाठी फार मोठी किंमत द्यावी लागली.

हा वर्ग रोजगार नसल्यामुळे काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता, तरी संवाद सुरू होता. याच संवादातून स्थापन झालेल्या ‘बंद गिरणी कामगार संघर्ष समिती’ने पोदार कॉलेजच्या हॉलमध्ये ‘कामगार परिषद’ नाही, तर ‘वस्त्रोद्योग परिषद’ घेतली. परिषदेचे अध्यक्ष साथी बगाराम तुळपुळे व उद्घाटक संपाचे नेते डॉ. दत्ता सामंत होते.

या परिषदेस सर्व डावे, अति डावे, समाजवादी, शिवसेना/ भाजपचेही कार्यकर्ते उपस्थित होते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपकरी कामगार खच्चून उपस्थित होते. यातून डॉ. सामंतांनंतरचा दुसरा दत्ता मध्य मुंबईत उदयास आला.

या दत्ताचे एक वैशिष्टय़ होते की त्याने कधीच डॉ. दत्ता सामंत यांच्यावर टीका केली नाही. त्यांची मते वेगळी आहेत हे एकमेकांना माहीत होते. पण जाहीर टीका दोघांनीही टाळली.

या दत्ताने आपले सहकारी कामगार निवडले. सेवादल, समता आंदोलन व युवक चळवळीतील कार्यकर्ते आणि अति डाव्या समजल्या जाणाऱ्या संघटनेतील कार्यकर्ते हेही एकमेकांसह काम करू लागले.

विठ्ठल घाग, मीना मेनन, गायत्री सिंग, प्रवीण घाग असे अनेक जण काम करत. त्यांना सुनील तांबे, मोहन सकपाळ, प्रकाश डाकवे, जोती नारकर हे मदत करत. समितीच्या कार्यकर्त्यांच्या बुद्धीने व चर्चेतून कार्यक्रम तयार होत. दत्ता मग अगदी सहजपणे महमद खडस व गजानन खातू, निखिल वागळे, कॉ. गंगाधर चिटणीस, कॉ.जी.एल.रेड्डी यांच्याशी बोलून त्यावर सूचना घेई. आपल्या गटात / समितीत मांडे व निर्णय घेतला जाई.

‘गटाने घेतलेला निर्णय फायनल’ या पद्धतीने त्याने पूर्णपणे विझलेला गिरणी कामगारांचा प्रश्न मुंबईच्या व महाराष्ट्राच्या मध्यभागी आणला.

यातील सर्वच निर्णय वा कार्यक्रम यशस्वी झाले असे नाही, पण लढण्याची जिद्द कायम ठेवत आणि त्यात योग्य ते बदल करत त्याने आपल्या समितीची उपक्रमशीलता ही लक्षवेधक केली. काही वेळा हटवादी भूमिकाही घेतली. पण प्रश्न व आंदोलन दरवेळी एक पाऊल तरी पुढे जाईल या दिशेने दिवसरात्र एक केले.

यातून दहा गिरण्या सुरू झाल्या, कामगारांना त्यांची बुडालेली थकीत रक्कम मिळाली. जे गिरण्यांच्या आवारातील घरात राहात होते त्यावर त्या कामगारांचा हक्क सनदशीर मार्ग वापरून शासनाकडून मान्य करवून घेतला. त्यानंतर त्यांनी समितीच्या नावामधील ‘बंद’ हा शब्द काढून टाकला.

राजकीय धुमाळीत महाराष्ट्रात जसे ‘ध’ चा ‘मा’ वा ‘कात्रजचा घाट दाखवणे’ हे शब्दप्रयोग प्रसिद्ध आहेत तसा याच काळात प्रशासकीय कौशल्य / लबाडी व राजकीय आशीर्वादाने ‘गिरणीच्या मोकळ्या जागेतील’ ही संज्ञा महत्त्वाची झाली. ‘गिरणीच्या जागेतील’ नव्हे- गिरणीच्या ‘मोकळ्या’ जागेतील!

वास्तविक गिरणीच्या आवारातील एकूण जागेच्या ३३ टक्के जमीन गिरणी कामगारासाठी, उरलेली ३३ टक्के मुंबई महापालिकेला आणि बाकीची ३३ टक्के गिरणीमालकांना मिळणार होती म्हणजे अंदाजे २०० एकर जागा प्रत्येक गटास मिळणार होती, पण या संज्ञेने (कायद्यातील एका शब्दाच्या बदलाने) घात केला. कामगारांना आणि मुंबई महापालिकेला अत्यंत कमी जमीन घरासाठी मिळाली. घसघशीत फायदा मात्र मालकांचा झाला. त्या वेळी सर्व राजकीय पक्ष गप्प राहिले. तरीही चळवळीने या जागेवर सुमारे १५ हजार घरे या कामगारांना मिळवून दिली. हे दत्ता व समितीचे मोठे कार्य.

हे काम अजून अपूर्ण आहे. ही लढाई अजून संपलेली नाही.

८२ च्या संपानंतर कामगार संपले; पुढे डॉ. सामंत यांच्या हातातही काही राहिले नाही. असे असताना दत्ता इस्वलकर उभे राहिले, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे या प्रश्नात त्यांनी जान फुंकली व बंद दारे उघडली, हा इतिहास झाला.

या इतिहासाच्या खुणा म्हणून आजही मध्य मुंबईत उंच इमारतीच्या जोडीने गिरणीच्या चिमण्या दिसतात. आज त्या शांत असल्या तरी, होत्या तिथेच आहेत.

पण सरकारच्या नव्या कामगारविरोधी संहितेमध्ये (कोड) कामगार चळवळीने लढून मिळवलेले अधिकार व हक्क बंद व बाद करण्याचा निर्णय हाच या शांत चिमणीतून नवे धुमारे घेत नवीन दत्ता पुन्हा उभा राहील. इतिहास व वर्तमान कितीही दमनकारी झाले तरी बदलाचा शोध व बदलाची आस येणाऱ्या काळात पुन्हा उभी राहील. कारण जितके दमन मोठे तितके त्याविरुद्ध संघर्षही मोठे. म्हणून या दत्ताचा संघर्ष थांबणार नाही, विझणार तर नाहीच नाही.

दत्ता इस्वलकरच्या संघर्षांच्या स्मृतीस सलाम!

 

(लेखक ‘स्वराज अभियान’चे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत. )

sanesanjiv@gmail.com