28 May 2020

News Flash

काँग्रेसमुक्त भारत शक्यच नाही!

काँग्रेसपुढे संघटना भक्कम करण्याचे आव्हान

काँग्रेसपुढे संघटना भक्कम करण्याचे आव्हान

राजीव सातव (काँग्रेस नेते)

पुढील काळात काँग्रेस आघाडीला विरोधी पक्ष म्हणून अधिक बळकट व्हावे लागेल. त्यातही काँग्रेसला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, असा या निकालांचा अर्थ काढता येईल. काँग्रेसला ग्रामीण क्षेत्रापेक्षा मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरी भागांमध्ये काम करण्याची गरज आहे. अगदी कोकणातही काँग्रेसला कामगिरी सुधारावी लागेल.

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमधील विधानसभा निवडणुका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे राज्य म्हणून गुजरातमधील पोटनिवडणुकांचे निकाल महत्त्वाचे ठरतात. या निवडणुकांमध्ये भाजपने प्रचार केला की विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. महाराष्ट्रामध्ये अब की बार दोसो बीस पार आणि हरियाणामध्ये पचहत्तर पार असे भाजप म्हणत होता. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद मिळवता येईल इतक्याही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार नाहीत, हरियाणात काँग्रेस दहापेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, असा दावा भाजपकडून केला गेला होता. संपूर्ण प्रचारात भाजपचा भर अनुच्छेद ३७० कसे रद्द केले, या मुद्दय़ावर होता. निकालांनी भाजपचे हे सगळे दावे फोल ठरवले आहेत.

भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीतून ज्या नेत्यांना उमेदवारी दिली त्यापैकी एखादा अपवाद वगळता त्यांचा पराभव झाला. उदयनराजे भोसले, हर्षवर्धन पाटील अशी अनेक नावे घेता येतील. गुजरातमध्ये ओबीसींचा मोठा नेता अल्पेश ठाकूर याने काँग्रेसची साथ सोडून भाजपचे कमळ हातात घेतले. अल्पेशला हार पत्करावी लागली. त्याला  गुजरातच्या मतदारांनी धडा शिकवला. निव्वळ सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी नाकारलेले आहे. पक्षबदलूंचे राजकारण चालणार नाही असा थेट संदेश मतदारांनी भाजपला दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत याच मतदारांनी भाजपला भरघोस मते दिली होती, मात्र विधानसभा निवडणुकीत आयारामांच्या भाजपच्या धोरणाला त्यांनी चपराक दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या पराभवातून पुन्हा एकदा दिसले की, तुम्ही चुकला तर जनता तुम्हाला माफ करत नाही! गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यांमध्ये काय केले याची चर्चा भाजपने ना महाराष्ट्रात केली ना हरियाणात. शहांनी महाराष्ट्रात खूप सभा घेतल्या. मोदींनी नाशिक, सातारा, परळी अशा जिथे जिथे सभा घेतल्या तिथले उमेदवार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय ‘स्वच्छता’ मोहीम हाती घेतली होती. विरोधी पक्षांतील नेत्यांना आणि नंतर पक्षांतर्गत स्पर्धकांची सफाई करण्याचे काम मुख्यमंत्री करत होते. नारायण राणे यांच्याबद्दल आक्षेप असतानाही भाजपने त्यांना पक्षात घेतले. विरोधी पक्षांतील नेत्यांना प्रवेश देऊन सगळ्या पक्षांच्या िभती तोडून टाकण्याचा उद्योग मुख्यमंत्र्यांनी केला. या धोरणाला निकालातून मतदारांनी उत्तर दिलेले आहे. भाजप पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पूर्णपणे का उभा राहिला नाही, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीतच मिळते. एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना राजकीयदृष्टय़ा संपवण्याचा घाट घातला. परळीत पंकजा मुंडे यांचा पराभव होण्यासाठी प्रयत्न केले.  त्यामुळे भाजपचे कार्यकत्रेच मुख्यमंत्र्यांवर नाराज झालेले होते. भाजपमधील नेत्यांचा अहंकार महाराष्ट्र, हरियाणा आणि गुजरातमधील मतदारांनी उतरवला!

भाजपच्या तुलनेत विरोधी पक्षाकडे साधनसामग्री, आर्थिक बळ कमीच होते. पण जनतेने काँग्रेस आघाडीला सुमारे १०० जागा मिळवून दिल्या. काँग्रेसमुक्त भारत करण्याचे भाजपने कितीही ठरवले असले तरी त्यांना कधीच यश येणार नाही हे जनतेनेच दाखवून दिले आहे. भाजपला विरोधी पक्ष संपवता येणार नाही.  विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने जोर लावला होता. भाजपने जसा प्रसारमाध्यमांतून प्रचार केला तसा काँग्रेसने केला नाही. प्रसारमाध्यमांवर काँग्रेसचे अस्तित्व कमी होते पण, मतदारसंघांमध्ये काँग्रेस नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेनेविरोधात पुरेपूर लढत दिली. काँग्रेसच्या किल्लेदारांनी त्यांचे बुरुज राखले. त्याची प्रसारमाध्यमांमधून चर्चा कमी झाली इतकेच!

विधानसभा निवडणुकीत प्रदेश नेतेच अधिक सक्रिय असतात. मोदी नेहमीच पंतप्रधान असण्यापेक्षाही प्रचारमंत्रीच असतात. त्यामुळे ते प्रत्येक निवडणुकीत प्रचार करत असतात. पण तसे अन्य पक्षाचे राष्ट्रीय नेते करत नाहीत. राज्यांमधील निवडणूक राज्यांमदील नेत्यांच्या ताकदीवरच लढवायची असते. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने या निवडणुका लढल्या आणि त्यांच्या कष्टाचे चीज झाले असे म्हणता येईल.

लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यांवर उतरणे हाच भाजपच्या सत्तेला आव्हान देण्याचा आणि लोकशाही टिकवण्याचा एकमेव मार्ग आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 3:29 am

Web Title: congress leaders rajeev satav review maharashtra election result 2019 zws 70
Next Stories
1 अटीतटीच्या लढतीत सुनील कांबळे विजयी
2 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सुनील टिंगरेंचा भाजपला धक्का
3 मुंबईचा कौल पुन्हा युतीलाच!
Just Now!
X