04 June 2020

News Flash

खचण्याची नव्हे, नव्या ऊर्जास्रोतांचा शोध घेण्याची वेळ!

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. आता जय-पराजयाची पक्षनिहाय विश्लेषणे होत राहतील.

| May 17, 2014 02:45 am

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. आता जय-पराजयाची पक्षनिहाय विश्लेषणे होत राहतील. प्रश्न आहे आलेल्या अनुभवातून बोध घेण्याचा. राजकारणातील रणनीत्यांच्या साहाय्याने आणि उत्तर-प्रत्युत्तराच्या खेळातून असा बोध होत नसतो तर कठोर आत्मपरीक्षण आणि वैचारिक विश्लेषणातूनच तो होण्याची शक्यता असते. निवडणुकीच्या पराभवातून मिळालेल्या उसंतीमुळे एवढी अंतर्मुखता आली तरी उज्ज्वल भवितव्याचे क्षितिज दिसू शकते.
भाजप आणि मित्रपक्षांच्या यशाचे श्रेय हे जितके त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणातील रणनीतीस आणि मेहनतीस द्यावे लागेल तेवढेच ते नव्वदीनंतरच्या पिढीने ज्या भारताची पुनर्कल्पना  रेखाटली आहे त्या पिढीच्या स्पंदनांनाही द्यावे लागेल. खरे तर ही स्पंदने प्रथम जाणवली ती राजीव गांधींच्या काँग्रेसला. ती नुसती जाणवलीच नाहीत तर तंत्रज्ञानात्मक विकास, माहिती क्रांती आणि ‘स्वच्छ प्रशासन’ ही परिभाषा राजकीय चर्चाविश्वात रुजवून २१ व्या शतकात झेप घेण्याचे स्वप्न युवापिढीला दाखविले ते राजीव गांधींनी. दिशा कालसंगत होती. स्वप्न आश्वासक होते. समाजवादाच्या निष्फळ परिभाषेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस नव्या युगाच्या संदेशाची वाहक होईल, अशी उमेद निर्माण झाली होती, पण स्वप्न दाखविणे वेगळे आणि प्रशासन, पक्ष संघटना व कार्यकर्ते आणि जनसामान्यांच्या गळी उतरवून ते साकार करणे वेगळे. स्पर्धाशील, प्रगत औद्योगिक आणि समृद्ध समाजाची निर्मिती करावयाची असेल तर त्याला तितक्याच प्रगतिशील व सशक्त सामाजिक अ‍ॅजेंडय़ाची गरज असते. हा अजेंडा एका रात्रीत व्यावसायिक थिंक टँकच्या साहाय्याने तयार करता येत नसतो. त्यासाठी समाजातील विविध थरांत काय चालले आहे, कोणत्या आकांक्षा पालवतायत, आपापल्या हितसंबंधांचा कसकसा पाठपुरावा ते करू पाहतायत, कोणाशी ते स्वाभाविकपणे सहकार्य करतायत, कोणाला ते हितशत्रू मानतायत, कोणती संसाधने ती निर्माण करतायत, कोणत्या परिभाषेत ते बोलतायत याची सूक्ष्म जाण असल्याशिवाय समकालीन हितसंबंध व येऊ घातलेल्या नव्या युगाच्या आकांक्षा यांचा मेळ घालतच असा अजेंडा विकसित होत नाही. काँग्रेसने ही बाब गंभीरपणे घेतली नाही. एका बाजूला २१ व्या शतकाची भाषा बोलणे तर दुसऱ्या बाजूला शहाबानो प्रकरण, अयोध्येतील राम लल्लाचे दरवाजे खुले करणे या बाबी परस्परांना छेद देणाऱ्या होत्या. स्वच्छ व पारदर्शी प्रशासनाची भाषा करतानाच ‘बोफोर्स’ उद्भवणे, जातीनिहाय आरक्षणाचे राजकारण खेळणे यातून निवडणुकीच्या राजकारणात तात्कालिक बाजी मारली जात असली तरी लोकशाही राजकारणाला आवश्यक असलेली निकोपता लयास जात होती.
पक्ष म्हणून एक ठोस सामाजिक अजेंडा तयार करणे, तो लोकांपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून सातत्याने पोहोचविणे व समाजाच्या विविध थरांत स्वत:बद्दलचा एक विश्वास निर्माण करणे या गोष्टी घडल्या नाहीत. समाजात विविध थर जागे होत होते व लोक चळवळीच्या माध्यमातून आपापले प्रश्न अजेंडय़ावर आणत होते. त्याला किमान एक जबाबदार प्रतिसाद देणे गरजेचे होते. झाले काय? ओ. बी. सी. जागे झाले, भटके-विमुक्तांना आत्मभान आले, महिला जाग्या झाल्या आणि मग ओ. बी. सीं.साठी सामाजिक न्यायाची धोरणे, महिला आरक्षण, भटक्या विमुक्तांसाठीच्या व आदिवासींसाठीच्या योजना असा क्रम होता. याच क्रमाने सच्चर समिती आली. याचा अर्थ काय होतो? प्रत्येक जागा झालेला वर्ग हा केवळ ‘व्होट बँक’ म्हणून आपण पाहणार, की त्यांच्या खऱ्या सक्षमीकरणाचा अजेंडा तयार करून तो आपला पारदर्शी पद्धतीने राबविणार!
लोकशाही राजकारण हे निव्वळ निर्वाचनाच्या राजकारणापुरते मर्यादित ठेवून चालत नाही. त्याला एका बाजूला संस्थात्मक कार्यक्षम राजकारणाचा भक्कम आधार हवा आणि जनआंदोलनाशी संवादी राहण्याचा आयामही असावा लागतो. सत्ताधारी पक्ष म्हणून अशी आंदोलने उभी करण्यावर काही मर्यादा पडतात हेही खरे. पण जनआंदोलनातून येणाऱ्या आकांक्षांची दखल वेळच्या वेळी घेतली नाही व त्याबद्दलची संवेदनशीलता दाखवली नाही तर समाजापासून आपण तुटतो याचे काँग्रेसचे भान सुटत गेले. सुशासन हा कार्यक्षम संस्थात्मक राजकारणाचा गाभा असतो. घटनात्मक संस्था असतील, संसदीय संस्था असतील, स्थानिक शासन संस्था असतील, अनेक पातळ्यांवर होत चाललेला संस्थात्मक ऱ्हास हा एक सरकार म्हणून आणि एक पक्ष म्हणून थांबवणे ही जबाबदारी काँग्रेसला कधी आपली वाटली नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे सामाजिक संबंधांवर, सामाजिक धारणांवर, सामाजिक ओळखींवर, सामाजिक संवादावर आणि आकांक्षांवर काय परिणाम झालेत याचे पुरते भानही काँग्रेस पक्षाला आले नाही. सोशल मीडिया, नागरी समाज, जनआंदोलने, सोशल नेटवर्किंग ही राजकारणाची नवी क्षेत्रे उदयास येत असून, त्यात सहभागी होणारा समाज हा पारंपरिक जात-वर्गाच्या रूढ ओळखींच्या पलीकडे जाऊन जे म्हणतोय ते अवधानपूर्वक ऐकणे व त्याला केवळ लोकानुरंजनवादी पद्धतीने नव्हे तर जबाबदारीने प्रतिसाद देणे हे काँग्रेसला लवकर सुचले नाही. प्रादेशिक राजकारणात कदाचित जात-वर्ग प्रदेशाचे पारंपरिक आधार कारणी येत असतील, पण भारत नावाच्या नव्या पुनर्कल्पनेमध्ये या घटकांचा जोर कमी होत चालला असून, नवी पिढी त्याच्या बाहेर पडू इच्छित आहे. हे भान न ठेवता जुन्याच पारंपरिक व्होट बँकेची गणिते मांडून ‘राष्ट्रीय’ पातळीवरील निवडणुकीच्या राजकारणाचे आडाखे मांडल्याने काँग्रेसच्या पदरी हा पराभव आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2014 2:45 am

Web Title: congress should learn from defeat and gain new energy sources
टॅग Lok Sabha Election
Next Stories
1 तिसऱ्याच काय, दुसऱ्या आघाडीचीही धूळधाण!
2 ‘सत्ताबाजार’ असाच चालणार का?
3 वैचारिकतेची दोन पीठे
Just Now!
X