नमोंच्या दिमतीला अहोरात्र विमान, हेलिकॉप्टर, वॉर रूम, विद्वान सल्लागार, भाषणाची पटकथा लिहून देणारे असा मोठा लवाजमा होता. भाजपला पाठिंबा देणारा वर्ग म्हणजे व्यापारी. ते मोदींची प्रतिमा उंचावत होते व मोदी ब्रँडच्या वस्तू विकून नफाही कमवत होते. जाहिरातीचा दबदबा इतका जोरात होता की लोकांना नमो हा समर्थ पर्याय वाटला. म्हणून वस्तुनिष्ठ व भावनिष्ठ हे दोन्हीही घटक एकत्र आले व आजचा निकाल लागला.
२०१४ सालची लोकसभा निवडणूक सर्वार्थाने भारताच्या इतिहासाला वळण देणारी ठरली आहे. काँग्रेसच्या राजवटीत अमर्याद महागाई व भ्रष्टाचार याला लोक कंटाळले होते. जनतेला कंटाळा आला म्हणून सत्तापरिवर्तन होत नसते हे खरे आहे. लोकांना पर्यायी सत्ताकेंद्र दृष्टिपथात यावे लागते. परिवर्तनाला वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) आणि भावनिष्ठ (सब्जेक्टिव्ह) असे दोन घटक असतात. लोक कंटाळले होते, निराश झाले होते, त्यांना बदल हवा होता. बदलाबरोबरच त्यांना स्थैर्यदेखील हवे होते. ३० वर्षांपूर्वी राजीव गांधी यांच्या पाठीमागे लोकसभेत स्पष्ट बहुमत होते. त्यानंतर मात्र कोणत्याही पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळे आघाडीची लंगडी सरकारे देशावर राज्य करीत होती. गेली काही वर्षे आघाडीची सरकारे येत होती-जात होती. या पाश्र्वभूमीवर मतदारांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले. भाजपला आता आघाडीवर विसंबून राहिल्यामुळे आम्हाला आमचा जाहीरनामा अमलात आणता आला नाही ही सबब सांगता येणार नाही. लोकांनी रोखठोक मतदान केले आणि रोखठोक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ‘नमों’ना महागाई व भ्रष्टाचार यांना यशस्वीपणे तोंड देण्याशिवाय अन्य पर्याय नाही. या वेळी राजकीय रिंगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खुलेपणाने उतरला होता. संघाचा पाठिंबा नसता तर मोदी इथवर पोहोचू शकले नसते. देश अवाढव्य, हजारो जाती, शेकडो भाषा! संघाची किमया मात्र अशी आहे की एका आदेशाने व एका विचाराने त्यांची फौज कार्याला लागते. त्यामुळे भाजपच्या कामात देशभर एकसंधपणा आला. भाजपला निवडणुकीचा खर्च उभा करता आला असता की नाही याबाबत शंका घेता येईल. आतापर्यंतच्या १६ लोकसभा निवडणुकांमध्ये ही निवडणूक उच्चांकी खर्चाची झाली. देशातल्या भांडवलदार कंपन्यांनी भाजपच्या मागे आपली आर्थिक शक्ती उभी केली नसून ती फक्त ‘नमों’च्या मागे उभी केली आहे. याचा अर्थ पक्षांनी आपला पंतप्रधान निवडायचा ही पद्धत मागे पडली. पक्षाने कोणाला निवडायचे याचा आदेश कॉर्पोरेट कंपन्या देऊ लागल्या आहेत.
काँग्रेस व हिंदुत्ववादी यांच्या राष्ट्रवादाचा अर्थ परस्परविरोधी आहे. जे पिढय़ान्पिढय़ा भारतात राहिले ते सारे भारतीय नागरिक, त्यांना समान दर्जा ही स्वातंत्र्यलढय़ातून निर्माण झालेली राष्ट्रवादाची भूमिका आहे. याउलट धार्मिक बहुसंख्याकांची मुख्य सत्ता असावी आणि अल्पसंख्याकांनी त्यांची मर्जी संपादन करून राहावे, ही हिंदुत्व छापाच्या राष्ट्रवादाची कल्पना आहे. या दोन राजकीय भूमिकांची या निवडणुकीत जोरदार टक्कर होईल असे वाटले होते, परंतु काँग्रेसने नमोंच्या प्रचाराच्या रणगाडय़ापुढे हातपाय गाळलेले दिसले. या निवडणुकीत नमोंसमोर एक पेच होता. सर्व मतदारसंघांत भाजपचा नामफलक नव्हता. मग बेरीज कशी होणार? म्हणून त्यांनी उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांतून अधिक खासदार मिळवायचे अशी रणनीती आखली. त्याची जबाबदारी गुजरातमधील मोदींचे उजवे हात अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांच्या कमांडखाली संघाचे हजारो सैनिक काम करू लागले. तिथे त्यांनी मुझफ्फरनगरच्या धार्मिक दंगलीचा फायदा घेऊन धार्मिक ध्रुवीकरण केले. धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण झाल्याने बसप व सपा यांचा जातीय आधार तोडण्यात भाजप यशस्वी झाली. उत्तर प्रदेशातून ७१ जागा मिळाल्यामुळे २७२ हा जादूई आकडा प्राप्त करणे सोपे झाले. कोणत्याही राज्यातला प्रादेशिक पक्ष म्हणजे स्थानिक पातळीवरील बहुसंख्य जातीचा पक्ष असतो. बहुसंख्याक जातीत अरेरावी, बेकायदेशीर कृत्ये, दंभ व अहंकार असतो. तथापि, भारतात एकही जात ५१ टक्के संख्येची नाही. बहुसंख्याक जातीच्या अरेरावीविरुद्ध आवाज उठवला तर अन्य अल्पसंख्याक जाती एका झेंडय़ाखाली येतात हे धोरण आखण्यात आले. मुस्लिमांना तोंडदेखली सहानुभूती दाखवायची, परंतु आपली हिंदुत्ववादी शैली, रंग, ढंग सोडायचे नाहीत असा त्यांचा निर्णय होता. त्यासाठी वाराणसीचा प्रयोगशाळा म्हणून उपयोग करण्यात आला. गंगामैया, काशी विश्वनाथ व हर हर मोदी हा नारा ही सारी हिंदुत्ववादाची प्रतीके चतुराईने वापरण्यात आली. भविष्यकाळात अनेक बाबा, आचार्य, महंत, साधू, संन्यासी यांचा वरचष्मा वाढेल. रामदेव बाबा आताच बोलू लागले आहेत. गिरिराज सिंग हिंदुत्ववादी सोडून इतरांनी पाकिस्तानात जावे, असा जाहीर सल्ला देऊ  लागले.
काँग्रेसने जातिधर्मनिरपेक्षतेचे कुंकू लावले आहे, पण ते कुंकवाला जागले नाहीत. देशात सेक्युलॅरिझम टिकवण्याची जबाबदारी फक्त मुस्लीम समाजावर आहे असे सांगून काँग्रेसवाले मोकळे झाले. काँग्रेसवाल्यांना एकत्र बांधून ठेवायला तत्त्वज्ञान उरले नाही. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराकडून निवडणुकीत काम करण्यासाठी पैसे मागण्याची त्यांना लाज वाटत नाही. शिवाय घराणेशाहीने बरबटलेला हा पक्ष. पुढाऱ्यांच्या मुलाशिवाय काँग्रेस पक्षात इतर तरुण कार्यकर्त्यांना सन्मान नाही. परिणामत: पर्याय दिसताच लोकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र भविष्यात भाजपचा काँग्रेस पक्ष होईल हा धोका डोळ्यांआड करता येणार नाही. अनेक काँग्रेसवाले भाजपमध्ये घुसतील, शिवाय आणखी एक यक्षप्रश्न आहे- नमो एकचालकानुवर्तित्व या विचारसरणीत वाढले आहेत. त्यामुळे भाजपला नमोंना शरण जावे लागेल काय, नमो भारतातील लोकशाही संस्था बरबाद करतील काय? हिटलरने रस्ते केले, युद्ध केले, नोकऱ्या वाढल्या. काही काळापुरते जर्मन लोक संमोहित झाले. त्यांची विवेकबुद्धी बधिर झाली. ६० लाख ज्यूंची कत्तल झाली तरी हिटलरची लोकप्रियता कमी झाली नाही. असे होते त्याचे कारण, विवेकबुद्धी कुठल्यातरी मोहात गहाण पडते.
एक होऊ नये, काँग्रेस गेली आणि काँग्रेसनियुक्त भाजप राज्य करू लागली, एवढीच अपेक्षा!