|| डॉ. राहुल पंडित

‘२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज (२-डीजी)’ या औषधाला अलीकडेच भारतीय औषध महानियंत्रकांनी करोना रुग्णांसाठी आपत्कालीन स्थितीत वापर करण्यास परवानगी दिली आहे. हे औषध नेमके काय आहे, त्याविषयी हे टिपण…

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती
Letter from Amolakchand college professor to district election decision officer regarding ballot paper voting
‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा 

करोना साथीविरोधातील आपल्या लढ्याला आणखी एक शस्त्र देण्यासाठी भारत सरकारने ‘२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज (२-डीजी)’ नावाचे एक प्रभावी कोविडविरोधी औषध आणले आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लीयर मेडिसिन अ‍ॅण्ड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस)’ या संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या प्रयोगशाळेने हैदराबादच्या डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज्च्या सहयोगाने हे औषध विकसित केले आहे. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा कोविड-१९ झालेल्या रुग्णांमध्ये आपत्कालीन स्थितीत अनुयोगी (अ‍ॅडजंक्ट) उपचार म्हणून या औषधाचा उपयोग करण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) मंजुरी दिली आहे.

हे औषध नेमके काय आहे?

‘२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज’ या औषधाच्या चाचण्या कर्करोगावरील उपचारांच्या दृष्टीने पूर्वीपासून सुरू आहेत; पण आत्तापर्यंत या औषधाला मंजुरी मिळालेली नव्हती. मात्र, कोविड-१९ आजारावर हे औषध प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. हे औषध पावडर स्वरूपात सॅशेमध्ये उपलब्ध होते आणि ही पावडर पाण्यात विरघळवून तोंडावाटे रुग्णाला दिली जाते. विषाणूप्रभावित पेशींमध्ये हे औषध साचते आणि विषाणू संश्लेषण (व्हायरल सिंथेसिस) व ऊर्जानिर्मिती थांबवून विषाणूच्या वाढीला आळा घालते. प्रादुर्भावित पेशींमध्येच साचून राहण्याच्या वैशिष्ट्यामुळे हे औषध अनन्यसाधारण ठरते. ‘डीआरडीओ’मधील प्रयोगशाळा हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज्च्या सहयोगाने कर्करोगावरील ‘रेडिएशन थेरपी’संदर्भात या औषधाचा अभ्यास करत आहे.

या औषधाच्या मूलभूत यंत्रणेमध्ये ग्लायकोसिस प्रतिबंधित करण्याचा किंवा पेशी ऊर्जानिर्मितीसाठी ग्लुकोजचे विभाजन करण्यासाठी जे मार्ग वापरतात त्यांपैकी एखादा मार्ग प्रतिबंधित करण्याचा समावेश होतो. कर्करोगाच्या पेशींद्वारे होणारी ऊर्जानिर्मिती थांबवून त्यांना नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत प्रतिकृती निर्मितीसाठी ग्लायकोसिसवर अवलंबून असलेल्या विषाणूग्रस्त पेशींबाबतही वापरली जाऊ शकते. भारतात कोविड साथीचा उद्रेक झाला तेव्हा, हे औषध कोविड-१९ बरा करण्यासाठी वापरले जाऊ शकते का, याची शक्यता तपासून बघण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. हैदराबाद येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मोलेक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी)’मध्ये गेल्या वर्षी झालेल्या चाचण्यांत असे आढळून आले की, हे औषध विषाणूग्रस्त पेशींना नष्ट करत आहे. त्यानंतरच्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकांवर याच्या चाचण्या घेण्यात आल्या.

एप्रिल २०२० मध्ये ‘आयएनएमएएस’ने ‘सीसीएमबी’च्या मदतीने हैदराबादमध्ये या औषधाचे प्रायोगिक परीक्षण सुरू केले. त्यानंतर मे २०२० मध्ये ‘सेण्ट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ)’ आणि भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी संयुक्तपणे दुसऱ्या टप्प्यांतील चाचण्यांसाठी परवानगी दिली. मे ते ऑक्टोबर २०२० या काळात कोविड-१९ रुग्ण या औषधाला कसा प्रतिसाद देत आहेत याच्या प्रारंभिक चाचण्या इन्स्टिट्यूटने सुरू केल्या. या औषधाचा उत्तम परिणाम दिसून आला, कोणतेही ‘साइड-इफेक्ट्स’ दिसून आले नाहीत आणि रुग्ण जलदगतीने बरे झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या काळात दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकात चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांतून अनुकूल निष्पत्ती प्राप्त झाली.

‘क्लिनिकल ट्रायल्स’च्या निष्पत्तीतून असे दिसून आले की, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण जलदगतीने बरे होण्यात हा रेणू उपयुक्त ठरतो, तसेच यामुळे रुग्णाचे पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्वही कमी होते. कोविड-१९ आजार झालेल्या रुग्णांसाठी हे औषध खूपच गुणकारी ठरेल असे यातून स्पष्ट झाले. परिणामकारकतेबद्दलच्या सांख्यिकीनुसार, २-डीजी औषध देण्यात आलेल्या रुग्णांमधील आजाराची लक्षणे तुलनेत जलदगतीने नाहीशी झाली. तिसऱ्या दिवसापर्यंत हे रुग्ण पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्वापासून मुक्त झाले. याचा अर्थ हे औषध ऑक्सिजन थेरपीची गरज किंवा त्यावरील अवलंबित्व जलदगतीने कमी करत आहे.

आपला देश कोविड-१९च्या विध्वंसक ठरलेल्या दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी झगडत असतानाच या औषधाला मंजुरी मिळून ते उपलब्ध झाले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे आपल्या संरचना व संसाधने यांच्यावर प्रचंड ताण आलेला आहे, या दोन्ही बाबी कमाल मर्यादेपर्यंत ताणल्या गेल्या आहेत. मी याकडे कोविड-१९ चा उपचार करण्यासाठी आमच्या हातात असलेले आणखी एक औषध म्हणून पाहात आहे. अर्थात, हे औषध खबरदारी पाळून घेतले जाणे अत्यावश्यक आहे. कोविड-१९ आजारावरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या सूचनेशिवाय घेतले जाऊ नये. याशिवाय औषधाचा साठा करून ठेवणे हा गुन्हा आहे. या औषधाची ज्यांना गरज आहे, त्यांना ते उपलब्ध झाले पाहिजे याची काळजी देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण घेतलीच पाहिजे.

(लेखक फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे संचालक असून मुंबई तसेच महाराष्ट्राच्या करोनाविषयक कृतिदलाचे सदस्य आहेत.)