ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरे आणि ग्रामीण भागांची करोना दाढेतून सुटका व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनासह सर्वच शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्था जोमाने उपाययोजना आखताना दिसत आहेत. यामध्ये जागोजागी विविध संस्था, उद्योजक, विकासक यांचीही मदत घेतली जात आहे. नागरिकांचेही प्रशासनाला सहकार्य लाभत आहे. जिल्ह्य़ाला करोनामुक्तीकडे नेण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा घेतलेला हा आढावा..

सहा तालुके, सहा महापालिका आणि दोन नगर परिषद अशी रचना असलेला ठाणे जिल्हा खाडी, नद्या आणि दाट जंगल अशा निसर्ग सौंदर्याने वेढलेला आहे. मुंबईच्या तुलनेत कमी दराने घरे उपलब्ध झाल्याने जिल्ह्य़ाचे गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने नागरीकरण झाले आहे. दोन दशकांपूर्वी ग्रामीण समजल्या जाणाऱ्या याच जिल्ह्य़ात आता क्लस्टर आणि मेट्रोसारखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. तसेच विविध महामार्गदेखील उभारण्याचे जिल्ह्य़ात नियोजन आहे. काही वर्षांपूर्वी जिल्ह्य़ाचा मुंबई महानगर क्षेत्रात समावेश झाल्याने जिल्ह्य़ातील अनेक शहरांमध्ये मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत पायभूत प्रकल्प उभारले जात आहेत. जिल्ह्य़ातील पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये अनेक नामांकित आणि परदेशी कंपन्यांनी गुतंवणूक सुरू  केल्याने जिल्ह्य़ात तरुणांना उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्य़ाचा सर्व बाजूंचा आर्थिक गाडा रुळावर असतानाच जगभरात आलेल्या करोना विषाणू संकटाच्या कचाटय़ात ठाणे जिल्हाही सापडला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आत्मनिर्भर होण्याचा ध्यास घेतला आहे. जिल्ह्य़ात आजमितीस करोनाची लागण झालेले सहा हजारांहून अधिक रुग्ण आहेत. असे असले तरी जिल्ह्य़ातील करोनाची साखळी तोडण्यासाठी, मृत्यू दर रोखण्यासाठी आणि टाळेबंदीच्या काळात नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन विशेष नियोजन पार पाडत आहे. शहरांच्या हद्दीत तापाचे दवाखाने, कोविड केंद्र, करोना चाचणी प्रयोगशाळा, प्रत्येक शहरात करोना रुग्णालय, शहरांच्या हद्दीत निर्जंतुकीकरण, रुग्ण आढळणाऱ्या भागांना प्रतिबंधित करणे, सुरक्षित अंतर राखण्यासाठी बाजारांचे विशेष नियोजन अशा विविध उपाययोजना राबवून करोनामुक्तीकडे जाण्याचा प्रयत्न जिल्ह्य़ात सध्या सुरू आहे.

जिल्ह्य़ात मार्च महिन्याच्या अखेरीस ठाणे शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यापूर्वीच ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात करोना रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी केली होती. तसेच जिल्हा प्रशासनाने ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी या महापालिकांना त्यांच्या क्षेत्रात परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासोबतच जिल्ह्य़ातील रेल्वे स्थानके, बस स्थानके, बँक एटीएम आणि गर्दीची ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासोबतच जिल्ह्य़ातील गर्दीचे कार्यक्रम आणि आठवडी बाजार रद्द करण्यासह मोठी धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. यानंतर करोनाचा वेग वाढू लागल्याने केंद्र सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीची जिल्ह्य़ात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थासोबत समन्वय साधून नियोजन केले होते.

प्रशासनाने ठाणे सामान्य रुग्णालयाला स्वतंत्र कोविड रुग्णालये म्हणून आरक्षित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच जिल्ह्य़ातील बीएसयूपी इमारती आणि रिकामी असलेली मोठी गृहसंकुले जिल्हा प्रशासनाने विलगीकरण कक्षासाठी ताब्यात घेतले होते. त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने दाखल होणाऱ्यांची जेवणाची आणि राहण्याची सोय करण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासने करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी टाटा आमंत्रा या रांजणोली येथील गृहसंकुलात एक हजार खाटांचे कोविड सेंटरही सुरू केले आहे. त्याचबरोबर वाढती करोनाची रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्ह्य़ातील पाच तालुक्यामंध्ये दोन हजार ५०० खाटांचे कोविड रुग्णालयही सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

ठाणे जिल्हा प्रशासन आणि ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे समन्वय साधून आत्तापर्यंत ६० हजारांहून अधिक परप्रांतीय मजुरांना रेल्वे आणि बसने त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. तर जिल्ह्य़ातील टाळेबंदीच्या काळात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी जिल्ह्य़ात १० हजार मेट्रीक टनपेक्षा जास्त धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्य़ात भाजीपाला आणि अन्नधान्याची आवक सुरळीत राहण्यासाठी जिल्हा कृषी विभाग वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत समन्वय साधत आहे. ठाणे जिल्हा परिषेदच्या आरोग्य विभागानेही जिल्ह्य़ातील अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, शहापूर आणि भिवंडी या तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या अर्धनागरी क्षेत्रात करोना प्रतिबंधित योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ातील ४२७ ग्रामपंचायतींमध्ये रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी सर्वेक्षण करणे, परिसर प्रतिबंधित करणे, तापाच्या रुग्णांना दवाखान्यात पाठवणे, अशा विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

त्याचबरोबर जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात करोना संसर्गाविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे.

जिल्ह्य़ात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडी या महापालिकांसह बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद त्यांच्या क्षेत्रात करोना रोखण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करत आह़े  जिल्ह्य़ामधील सर्वाधिक करोना रुग्ण ठाणे शहरात असल्याने महापालिकेने शहरातील काही खासगी रुग्णालये करोनासाठी आरक्षित केली आहेत. काही इमारती आणि शाळा विलगीकरण कक्षासाठी ताब्यात घेतल्या आहेत. शहराच्या हद्दीतील करोना चाचण्या शहरात व्हाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाने वाडीया रुग्णालात करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे, तर वागळे इस्टेट परिसरातील एका खासगी प्रयोगशाळेलाही चाचण्या घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांनी शहरातील नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे यासाठी शहरात ६००हून अधिक करोना योद्धय़ांची नेमणूक केली आहे. याचबरोबर वाढत्या करोना रुग्णांसाठी महापालिका प्रशासन लवकरच एक हजार खाटांचे करोना रुग्णालय सुरू करणार असल्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे करण्यात आली असून हे रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेने वाशी येथील महापालिका रुग्णालय करोनासाठी आरक्षित केले असून वाशीच्या सिडको प्रदर्शन केंद्रात एक हजार खाटांचे स्वतंत्र करोना रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय करोना रुग्णालय म्हणून आरक्षित केले आहे. त्यासह होलीक्रॉस, आरआर रुग्णालय आणि न्युआन रुग्णालय ही तीन खासगी रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. तर महापालिका एक हजार २०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. उल्हासनगर महापालिकेनेही करोना रुग्णांसाठी सेंट्रल रुग्णालयासह एक खासगी रुग्णालय करोनासाठी आरक्षित केली आहे. तर महापालिकेने करोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीसांठी विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. भिवंडी आणि मीरा-भाईंदर महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषद आपल्या परिसरात करोना सेंटर तसेच तापाचे दवाखाने सुरू केले आहेत. तर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर या तीन महापालिकांनी रांजणोली येथील टाटा आमंत्रा या गृहसकुंलात प्रशस्त विलगीकरण कक्ष उभारला आहे.

या सर्वच उपाययोजनांमुळे जिल्ह्य़ात अलगीकरण कक्ष, विलगीकरण कक्ष, करोना सेंटर आणि करोना रुग्णालय मिळून १३ हजार ५००हून अधिक खाटा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील काही भागांत सध्या रुग्ण संख्या कमी होत असल्याने टाळेबंदीचे काही नियम शिथिल करण्याचा विचार स्थानिक स्वराज्य संस्था करत आहेत. प्रशासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांना जिल्ह्य़ातील नागरिकही उत्तम प्रतिसाद देत असून ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी-मुंबई आणि मीरा-भाईंदरमधील अनेक गृहसंकुले काटेकोर पालन करत असून आपले गृहसंकुल करोनामुक्त राहावे, यासाठी गृहसंकुलांनी स्वतंत्र नियमावली आखली आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आत्मनिर्भरतेमुळे राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे जिल्हा लवकरच करोनामुक्त होण्याची आशा जिल्ह्य़ातील नागरिक व्यक्त करत आहेत.