पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं ना खुद खाता हूँ, ना खाने देता हूँ’ अशी घोषणा करून सुरुवातीला टाळ्या मिळवल्या. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर, प्रकाश मेहता, रवींद्र चव्हाण यांच्यासारखे सहकारी आणि काही आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक यांच्यावर असलेले आरोप किंवा गुन्ह्य़ांची जंत्री पाहिली तर भ्रष्टाचारमुक्त सुप्रशासन व पारदर्शी कारभाराची हमी देणाऱ्या भाजपने जनतेच्या तोंडाला कशी पाने पुसली आहेत, हे लक्षात येते..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत ‘राष्ट्रभक्ती, जनसेवा व एक विचार’ घेऊन शिस्तबद्धपणे मार्गक्रमण करीत असलेला पक्ष अशी एके काळी ओळख असलेल्या पक्षाचे नेतृत्व अलीकडच्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी प्रभृतींनी केले. मात्र केंद्रात व काही राज्यांमध्ये सत्ता मिळाल्यावर पैसा व सत्तेमुळे येणारे दुर्गुण भाजपमध्ये आले. गेल्या दोन-तीन वर्षांत तर यशाची चढती कमान असल्याने आणि मिळेल त्या मार्गाने व अपप्रवृत्तींनाही बरोबर घेऊन यश संपादन करण्याची झिंग चढल्याने भाजपमध्ये अन्य पक्षांमधूनही अगदी लोंढे आले. भाजपच्या जुन्या निष्ठावंतांची गळचेपी झाली. यश संपादन करण्यासाठी आणि देशात १० कोटी कार्यकर्ते असलेला जगातील एकमेव पक्ष अशी बिरुदावली मिरविण्यासाठी येणाऱ्यांसाठी सताड दारे उघडली गेली आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी ही अडचणीची न ठरता भाजप प्रवेशासाठी कार्यक्षमतेची निदर्शक ठरली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात घसा फोडून सत्तेवर येणाऱ्या भाजपने लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यांच्याच पक्षाच्या आरोप असलेल्या नेत्यांना मुक्त प्रवेश दिला. महाराष्ट्रात राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याबद्दल १९९० नंतरच्या काळात ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी हल्ला चढविला होता. पण अजून न्यायालयाने शिक्षा सुनावलेली नाही, अशी सबब बेमुर्वतपणे सांगत गुन्हेगारी स्वरूपाचे व फसवणुकीचे आरोप असलेल्यांना भाजपने निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली, पक्षात पदे दिली व काही जबाबदाऱ्याही दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही हेच सुरू आहे. त्यामुळे पैशांच्या जोरावर पक्षातील निष्ठावंताच्या डोक्यावर पाय देऊन ही स्वार्थी मंडळी पक्षात पुढे गेली.

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
sanjay raut narendra modi (3)
“केंद्राने मोदींबरोबर असहकाराची भूमिका घेतल्यावर शरद पवारांनीच…”, राऊतांकडून पंतप्रधानांच्या जुन्या वक्तव्यांची उजळणी
Narendra Modi Sharad Pawar
“यूपीए सरकारचे कृषीमंत्री दिल्लीत पॅकेज घोषित करायचे, पण ते पैसे…”, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘आधी देश, मग पक्ष आणि शेवटी मी,’ असे ब्रीदवाक्य घेऊन एके काळी काम करणाऱ्या भाजपचा उलटय़ा क्रमाने सध्या राज्यात व देशात प्रवास सुरू आहे. यशाची शिखरे सर करण्यासाठी नीतिमत्तेची चाड न ठेवता वादग्रस्त नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.

‘मैं ना खुद खाता हूँ, ना खाने देता हूँ’ अशा घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या. पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील जयकुमार रावल, संभाजी निलंगेकर, प्रकाश मेहता, रवींद्र चव्हाण यांच्यासारखे सहकारी आणि काही आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक यांच्यावर असलेल्या आरोप किंवा गुन्ह्य़ांची जंत्री पाहिली तर भ्रष्टाचारमुक्त सुप्रशासन व पारदर्शी कारभाराची हमी देणाऱ्या भाजपने जनतेच्या तोंडाला कशी पाने पुसली आहेत, हे लक्षात येते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जनतेचा विश्वास गमावल्याने सत्तेची संधी मिळालेल्या भाजपने आचार-विचाराने थोर असलेल्या नानाजी देशमुख यांच्यासारख्यांचे स्मरण केले, तर आपण सत्तेसाठी कुठे पोहोचलो आहोत, हे लक्षात येईल. गुंडापुंडांना, बँकांच्या कर्जबुडव्यांना आणि जनतेला फसविणाऱ्यांना बरोबर घेतल्याने ‘देश बदलतोय’ हे सांगण्यासाठी जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करण्याची व जनतेच्या दारी जाऊन प्रचार करण्यास कार्यकर्त्यांना सांगण्याची वेळ भाजपवर आली आहे. आगामी मुंबई, ठाणे व अन्य महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना याचे भान भाजपला ठेवावे लागेल. जनता दुधखुळी नाही. जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांप्रमाणेच भाजपची ओळख पटू लागली, तर ऊध्र्वगतीकडून अधोगतीकडे वळण्यास वेळ लागणार नाही. ‘नमामि गंगे, नमामि चंद्रभागा’ या उपक्रमांच्या माध्यमातून नद्यांच्या शुद्धीकरणाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. पण देशात १० कोटी व राज्यात एक कोटी कार्यकर्त्यांचे लक्ष गाठल्याचा दावा करणाऱ्या भाजपमधील अनिष्ट व विघातक प्रवृत्तींना दूर करण्यासाठी पक्षशुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे. साधी राहणीचा उपदेश कार्यकर्त्यांना देऊन आपला बडेजाव मिरविण्यासाठी राज्य अतिथी दर्जा व पोलीस संरक्षण मिळविणाऱ्या आणि मुंबईत घर असूनही पात्र नसताना शासकीय बंगल्यात ठाण मांडणाऱ्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडून पक्षशुद्धीकरणासाठी फारसे काही होण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनाच त्यासाठी काही कटू निर्णय घेऊन पावले उचलावीच लागतील.

 

– मुंबई / कल्याण-डोंबिवली

  • प्रकाश मेहता : झोपुतील भ्रष्टाचार

पद – गृहनिर्माणमंत्री

’गुन्हा – झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील (एसआरए) भ्रष्टाचाराचा आरोप. मुंबई विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १५६ (३) अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १० मार्च २००८ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे कलम ७ व कलम १३ (१)(ई) खाली लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्तरावर जैसे थे परिस्थिती.

  • प्रवीण दरेकर : बँक घोटाळा

पद – आमदार, विधान परिषद

’गुन्हा – मुंबई बँकेत १९९८ पासून करण्यात आलेल्या गैरव्यवहारात बँकेचे सुमारे १२३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप. आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यावर माजी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेकांवर त्यात सहभागाचा आरोप आहे. पुढील कारवाई प्रलंबित आहे. याशिवाय बेकायदा जमाव जमवून दंगल घडविणे, इजा घडविणे आदी प्रकारचे १३ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल.

  • राम कदम : मारहाण, धमक्या, अपहरण..

पद – आमदार

’गुन्हा – शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर व अन्य पोलीस ठाण्यात दाखल.

  • रवींद्र चव्हाण : १९ गुन्हे, तीन ते सात वर्षांच्या शिक्षेचे गंभीर गुन्हे

पद – राज्यमंत्री

’गुन्हा – १. झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल. ठेकेदारांना देण्यात आलेल्या १६ कोटींच्या अग्रिम रकमा आणि अनियमितता यापुरतीच या गुन्ह्य़ाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्याप्ती. संथ गतीने प्रकरणाचा तपास सुरू. २. काँग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे समर्थकांना मारहाणप्रकरणी विष्णूनगर पोलिसांकडून १ नोव्हेंबर २०१० रोजी अटक. ३.विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्ह्य़ांची नोंद. त्यांत खंडणी, अपहरण,  मारहाण, अ‍ॅट्रॉसिटी यांचा समावेश.

 

– पुणे

  • दीपक (बाबा) मिसाळ : खुनाचा प्रयत्न, धमक्या

पद – सरचिटणीस, शहर कार्यकारिणी, माजी नगरसेवक (आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर)

’गुन्हा – २००३ मधील बबलू कावेडिया खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई, मात्र निदरेष मुक्तता. कबड्डी संघाचे प्रमुख आणि प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी सध्या जामिनावर. महंमदवाडीतील एका जागेच्या वादातूनही गुन्हा दाखल. मिसाळ यांच्या पत्नीकडूनही संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात फिर्याद. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल. सध्या या प्रकरणी मिसाळ यांना जामीन.

  • मराठवाडा संभाजी पाटील निलंगेकर : आर्थिक गैरव्यवहार

पद – कामगारमंत्री

’गुन्हा – मेहुणे आणि अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग कंपनीस एकूण ४९ कोटी रु. कर्जासाठी जामीनदार. त्यासाठी लीजने मिळालेली जमीन तारण ठेवल्याचा आरोप. कर्जाची व्याज मिळून ७२ कोटी रुपयांची थकबाकी. त्याविरोधात बँकांची कर्ज प्राधिकरणामार्फत सीबीआयकडे तक्रार. लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. ऋण वसुली न्यायाधिकरणाकडून कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे आदेश. त्याविरोधात मुंबईतील प्राधिकरणाकडे अपील.

 

  • एकनाथ खडसे : जमीन गैरव्यवहार

पद –  माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते

’ पुणे येथील जमीन खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महसूलमंत्रिपदाचा राजीनामा. उत्तर महाराष्ट्र

 

  • विजयकुमार गावित : भ्रष्टाचार, फसवणूक

पद – आमदार,  माजी मंत्री ( नंदुरबार)

’गुन्हा – संजय गांधी निराधार योजनेत भ्रष्टाचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाकडे आरोप आणि गुन्ह्य़ाबाबत विचारणा केली असता कारवाईस स्थगिती देण्याचा शासनाचा निर्णय. ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविण्याच्या प्रकरणात जनहित याचिका दाखल. या प्रकरणात राज्य शासनाकडून ‘क्लीन चिट’. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी न्या. गायकवाड आयोगापुढे तक्रारी. आयोगाचा अंतिम अहवाल येणे बाकी.

  • जयकुमार रावल : आर्थिक घोटाळे

पद – पर्यटनमंत्री

’गुन्हा – दोंडाईचा येथील दादासाहेब रावल सहकारी बँक डबघाईला येण्यास रावल व कुटुंबीयांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा लेखापरीक्षणातील ठपका. या प्रकरणी गुन्हे दाखल. औरंगाबाद खंडपीठात खटला सुरू. संचालक असणाऱ्या रावल कुटुंबीयांनी बँकेतून नियमबाह्य़ पद्धतीने कोटय़वधींचे कर्ज घेतले. त्यात जयकुमार रावल यांचाही समावेश. गुन्हे दाखल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम भरली. दादासाहेब रावल बँकेच्या संपूर्ण व्यवहाराची धुळे एसआयटीकडून चौकशी पूर्ण. रावल यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास धुळे एसआयटीकडून काढून घेत तो सीआयडीकडे सोपविल्याचा विरोधकांचा आरोप. या गुन्ह्य़ात दुसऱ्या क्रमांकावर असणारे रावल यांचे नावही कालांतराने बचावासाठी यादीत नंतरच्या क्रमांकावर नेले गेले. या प्रकरणी काही संचालकांना पूर्वीच अटक. उर्वरित संशयितांची चौकशी सुरू. त्यात मंत्री रावल यांचा समावेश.

 

– नगर

  • दिलीप गांधी : कर्जवाटप व सोनेतारण गैरव्यवहार

पद – खासदार, नगर दक्षिण, अध्यक्ष, नगर अर्बन सहकारी बँक

’गुन्हा – बँकेतील एक कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी  भादंवि ४०९, ४२० व ३४ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन. संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी. रिझव्‍‌र्ह बँकेकडून या बँकेला पाच लाख रुपयांचा दंड.

  • शिवाजी कर्डिले : फसवणूक व शस्त्रास्त्र

पद – आमदार, राहुरी

’गुन्हा – एका जमीन खरेदीच्या व्यवहारात ९१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भादंवि ४२०, शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी कर्डिले यांना अटक. सध्या खटला सुरू.  शिक्षा – जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी घातलेल्या गोंधळाच्या गुन्ह्य़ात पंधरा महिन्यांची शिक्षा.

  • बबनराव पाचपुते : शेतकऱ्यांची देणी व बँकेची कर्ज थकबाकी

पद – माजी आमदार

’गुन्हा – चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष विक्रम पाचपुते व अन्य दोघांवर साईकृपा खासगी साखर कारखान्यावर (श्रीगोंदे) शिरूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल. बबनराव हे या कारखान्याचे संस्थापक व माजी अध्यक्ष. शेतकऱ्यांच्या उसाचे तब्बल ३८ कोटी रुपये या कारखान्यास देणे आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट. पंजाब नॅशनल बँकेच्या पुणे शाखेकडून कारखान्यावर बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई.

 

– विदर्भ

  • कृष्णा खोपडे : क्रीडा घोटाळा

पद – आमदार, पूर्व नागपूर

’गुन्हा – २००२ मध्ये महापालिकेतील दोन कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीच्या अहवालात ठपका. या प्रकरणी काही पोलीस ठाण्यांत भादंविच्या ३४१, ३५३, ३३६, ३३७, ३४१ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.

  • विकास कुंभारे : क्रीडा घोटाळा

पद – आमदार, मध्य नागपूर

’गुन्हा – महापालिकेतील दोन कोटींच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीने केलेल्या चौकशी अवालात ठपका. या प्रकरणात भादंविच्या ४२०, ४६७, ४०६ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.

  • रामदास तडस : आर्थिक गैरव्यवहार

पद – खासदार, वर्धा 

’गुन्हा – देवळी पालिकेचे अध्यक्ष असताना आमदार निधी वेतनावर खर्च केला व नंतर वेतनाचा निधी आमदार निधी म्हणून वापरला. या आर्थिक गैरव्यवहारावरून भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाने जमीन मंजूर.

  • उत्तमराव इंगळे : खंडणीखोरी

पद – माजी आमदार, उमरखेड

’गुन्हा – उमरखेडचे वन परिक्षेत्राधिकारी के. एम. तर्टेकर यांच्यावर हल्ला केल्याचा व खंडणी मागितल्याचा आरोप. पुसदच्या वसंतनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५३, ३८४, ३८५, १८६, २९४ आणि ५०६ कलमांखाली १३ जुलै २०१६ रोजी गुन्हा दाखल.