28 January 2021

News Flash

देश आणि राष्ट्र

आपल्याकडे ‘देश’ आणि ‘राष्ट्र’ हे दोन शब्द सामान्यत: समान अर्थाने प्रचलीत आहेत. परंतु या शब्दांमध्ये काही मूलभूत फरक आहे.

‘राष्ट्र’ या शब्दाचा अर्थ ढोबळपणे एका भूप्रदेशावर राहणाऱ्या आणि संयुक्त सरकार असणाऱ्या व्यक्तींचा मोठा समूह असा होतो. एका राष्ट्रातील लोक साधारणपणे काही देशांचा अपवाद वगळता सारख्या वंशाचे, वर्णाचे असतात. ते बऱ्याच वेळा एकच भाषा बोलतात. भारतीय प्रदेशातील एकत्र नांदणाऱ्या विविध संस्कृतींच्या जनसमूहांना राष्ट्र म्हणून संबोधण्याचाही प्रघात आहे. जसे तमिळराष्ट्र, बंगराष्ट्र आणि महाराष्ट्र.

‘देश’ हे राजकीय विभागणी झालेले जगातील भौगोलिक प्रदेश. यांतील अनेक देश सार्वभौम भूभाग आहेत, तर काही देश इतर देशांचे भाग आहेत. जगातील काही देशांना काही बडय़ा देशांनी ‘देश’ म्हणून मान्यता न दिल्यामुळे अमान्य अवस्थेत आहेत. अनेक देशांना गुंतागुंतीचे अस्तित्व आहे. ‘देश’ हा शब्द प्रामुख्याने ज्यांचे सार्वभौम, स्वायत्त सरकार आहे अशा लोकांचा समूह दर्शवतो. असा जनसमूह ज्या सीमित भौगोलिक प्रदेशात राहतो तो प्रदेश म्हणजे देश! ‘देश’ ही संकल्पना तो भौगोलिक प्रदेश अधिक ध्वनित करते; तिथे राहणाऱ्या लोकांची संस्कृती, जीवनशैली ध्वनित करीत नाही.
‘देश’ या शब्दाचा वापर बऱ्याच वेळा वेगवेगळ्या अर्थानी केला जातो. जसे बिहार, उत्तर प्रदेशचे लोक दूरवर, मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी व्यवसायासाठी येतात. ते त्यांच्या गावी जाताना ‘हम जा रहे है अपना देस’ असे म्हणतात. कोकणातील माणूस घाट ओलांडून पलीकडे जाताना ‘देशावर जाऊन येतोय’ असे म्हणतो. ‘देश’ या शब्दाला इंग्रजीत ‘कंट्री’ हा शब्द आहे. इंग्लंडच्या पश्चिम भागाला इंग्रज ‘वेस्ट कंट्री’ म्हणतो, तर मोठे औद्योगिकीकरण झालेल्या भागाला तोच इंग्रज ‘ब्लॅक कंट्री’ म्हणतो. अमेरिकेच्या पश्चिम भागाला ‘बिग कंट्री’ म्हणतात.

‘राष्ट्र’ या शब्दाला इंग्रजीत ‘नेशन’ हा समानार्थी शब्द आहे. ‘राष्ट्र’ हा शब्द एखादा मोठा जनसमूह राहत असेल तो केवळ भूप्रदेश ध्वनित न करता, त्या भूप्रदेशावरील स्थायिक लोक, त्यांची संस्कृती, जीवनशैली, परंपरा, अस्मिता अशा अनेक गोष्टी दर्शवतो.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 1:21 am

Web Title: country and nation mppg 94
Next Stories
1 शुल्बसूत्रांतील गणित
2 सम्यक् दर्शन
3 स्नोडेनने गुपित फोडल्यानंतर..
Just Now!
X