-गिरीश कुबेर

तब्बल २२४. ही संख्या नुसती सांगितली तर फारसे काही समजणार नाही. पण ही आहे औषध कंपन्यांची संख्या. औषध कंपन्या ज्या करोनाप्रतिबंधक लस तयार व्हावी यासाठी आजमितीस जिवाचे रान करीत आहेत. याआधी या स्तंभात करोना लशीबाबत लिहिले तेव्हा ही संख्या दोन आकडी होती. तिच्यात आज जवळपास सहा पटीने वाढ झाल्याचे दिसते. यावरून करोना लस ही किती जीवनावश्यक झाली आहे हे लक्षात येते. खरे तर आज समस्त विश्वास भेडसावत असलेला हा एकमेव प्रश्न.

या २२४ कंपन्या/ संस्थांतल्या सर्वाधिक एकवटल्या आहेत उत्तर अमेरिकेत. एकूण प्रयोगांतील निम्मे लसनिर्मितीचे प्रयोग हे एकटय़ा या खंडात सुरू आहेत. दुसरा क्रमांक आहे चीनचा. मानवी चाचण्यांसाठी ज्या काही लशी सिद्ध झाल्या आहेत त्यातील निम्म्यापेक्षा अधिक एकटय़ा चीनमध्ये आहेत.

जगभरात १० कंपन्यांच्या संभाव्य लशींच्या मानवी चाचण्या नुकत्याच सुरू झाल्या. त्यातील सहा चीनमधल्या आहेत. या सहांतील दोघांची प्रगती लक्षणीय म्हणता येईल अशी आहे. बीजिंग इन्स्टिटय़ूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि कॅनसिनो बायोलॉजिक्स या दोन प्रयोगशाळांनी यात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. या प्रयोगशाळांच्या आणि त्यांनी अंगीकारलेल्या शोधमार्गाचा तपशील ‘लॅन्सेट’च्या ताज्या अंकात आहे. याच्या जोडीलाच चीनमधली सिनोव्हॅक बायोटक ही कंपनी पण लस स्पर्धेत आहे. अन्य देशांपैकी फायझर आणि बायोएनटेक या जर्मनीतल्या, अमेरिकेतली मॉडर्ना आणि फ्रान्स-ब्रिटनमधल्या अस्त्राझेंका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ या दोन महत्त्वाच्या अशा लस संशोधक. या सर्वाच्या कामाचा रास्त परिचय ‘कोविडोस्कोप’च्या नियमित वाचकांना झालेला आहेच. यातल्या अस्त्राझेंका प्रयोगशाळेकडे अमेरिकेने लशीची आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. सुमारे १२० कोटी डॉलर्स अमेरिकेने त्यासाठी मोजले आहेत. हेतू हा की ही लस तयार झाली की तीवर अमेरिकेचा पहिला हक्क असेल. या पैशाच्या बदल्यात अमेरिकेला या लशीच्या ४० कोटी इतक्या मात्रा दिल्या जातील. म्हणजे अमेरिकी लोकसंख्येपेक्षाही कित्येक कोटी अधिक.

पण यातील काळजी वाढवणारी बातमी आहे ती ब्रिटनमधील. त्या देशातल्या ऑक्सफर्ड प्रयोगशाळेतल्या लस प्रयोगाबद्दल अनेकांना आशा आहेत. कारण लसनिर्मितीचा श्रीगणेशा घातला गेला ऑक्सफर्डच्या एडवर्ड जेन्नर संशोधन केंद्रात. त्याची प्रगतीही चांगली होती. पण एक नवीनच अडचण या प्रयोगाला भेडसावायला लागली आहे. ती म्हणजे..

विषाणूचे वर्तन.

हा विषाणू करोना मालिकेतील अत्यंत चपळ विषाणू असावा. तो एका जागी फार काळ रेंगाळत नाही. त्याचे गुणधर्मही बदलतात आणि आता तर पहिल्या लस प्रयोगास रुग्णांची कमतरताही जाणवू लागली आहे. या विद्यापीठातल्या चाचण्यांसाठी १० हजार स्वयंसेवक गुंतवून घेतले गेले. लवकरच या स्वयंसेवकांवर औषधाचे आणि आभासी औषधाचे (प्लासिबो) प्रयोग सुरू होतील. म्हणजे काहींना खरे औषध दिले जाते आणि काहींना आभासी औषध. या आभासाचा म्हणून एक परिणाम होत असतो. मनोकायिक पातळीवर अनेकांना आपणास काही तरी जालीम औषध दिले गेले या भावनेनेच बरे वाटू लागते वा बरे वाटण्यास सुरुवात होते. कोणत्याही औषधाच्या चाचण्यांत हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. आणि यातील महत्त्वाचा भाग असा की यात सहभागी होणाऱ्यांना आभासी वा खरे यातील फरक सांगितला जात नाही. म्हणजे आपण काय सेवन केले हे सहभागींना माहीत नसते.

तर या ऑक्सफर्डच्या १० हजार स्वयंसेवकांतील जेमतेम ५० जणांनाच प्रत्यक्ष करोनाची लागण होईल, असा अंदाज या प्रयोगाचे प्रमुख प्रा. आड्रिअन हिल यांनीच ‘द एज’शी बोलताना व्यक्त केला. ‘‘त्याहीपेक्षा कमी जणांना या प्रयोगातून करोनाची बाधा झाली तर हा प्रयोग वाया गेला, असे समजावे लागेल,’’ असे त्यांचे म्हणणे.

हे असे होण्याची भीती त्यांना वाटते याचे कारण या विषाणूची चंचलता. ‘‘करोनाच्या प्रसार आणि तीव्रतेत घसरण सुरू आहे. त्यामुळे विषाणूच्या क्षमतेचा अंदाज येत नाही. आणि आता परिस्थिती अशी की लशीसाठी का असेना पण या विषाणूचा मुक्काम आणखी काही काळ लांबावा असे वाटू लागले आहे,’’ असे प्रा. हिल म्हणतात.

विचित्रच परिस्थिती म्हणायची. जगातील काही देशांना हा विषाणू कधी काढता पाय घेईल याची चिंता. तर काहींना तो लवकर गेला याचा विषाद. आणि सत्य हे की या दोन्ही गटांना त्याचा थांग लागलेला नाही.

@girishkuber