गिरीश कुबेर

आपल्याकडे मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात करोनाचे करुणगान सुरू झाले. जनता टाळेबंदी, टाळी/थाळी वादन आणि मग धाडकन तीन आठवडय़ांच्या संचारबंदीची घोषणा. मग सारेच सुन्न. मग मध्येच या विषाणूच्या नावाने दिवेलागण. पण तरी ‘कोविडोस्कोप’ सुरू व्हायला एप्रिलचा तिसरा आठवडा उजाडला. या विषयावर लगेच स्तंभ सुरू करता आला असता. पण मुद्दामच नाही केला.

कारण सुरुवातीला आपल्याला या करोना विषाणूवर मात करायची होती, त्याला पराभूत करायचे होते किंवा त्याची हकालपट्टी करायची होती. पण एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात भान यायला लागले : आपल्याला करोनास बरोबर घेऊनच जगायचे आहे. एव्हाना त्यावर मात करू म्हणणाऱ्यांची भाषा बदलली. वास्तव काय ते कळले.. सर्व संबंधितांना आणि जनतेलाही.

हीच वेळ होती हा स्तंभ सुरू करण्याची. या विषयावर एक पुस्तक लिहिलेले असल्याने या विषाणूवावराशी परिचय होता. पण अलीकडचे ‘सार्स’, ‘मार्स’ किंवा ‘एबोला’ आपल्याकडे इतके जोमाने आले नव्हते. त्यामुळे करोनाच्या दर्शनाने सर्वच भारावले. त्यामुळे सुरुवातीला टाळेबंदीचाही ‘आनंद’ अनेकांनी घरातल्या घरात लुटला. नंतर नंतर त्याचेही कौतुक संपले. मनात कंटाळा दाटून येऊ लागला. त्या वेळी ‘कोविडोस्कोप’ सुरू झाला. विषाणू प्रसाराच्या आघाडीवर जगात काय सुरू आहे, कोणता देश त्यास कसा सामोरा जातो आहे, आरोग्यविज्ञानात संशोधन कशावर सुरू आहे अशी चौरस माहिती द्यावी हा या सदराचा उद्देश.

त्याची गरज होती. याचे कारण असे की आपल्याकडे करोना नावाचा जो काही बागुलबोवा तयार केला गेला तो भयंकर आहे. माणसामाणसांमधले संबंध त्यामुळे बिघडू लागलेत. श्रमिक/ स्थलांतरित यांचे जे आपण केले ते माणुसकीला काळिमा आणणारेच. उच्च मध्यमवर्गीयांच्या गृहसंस्थांत यानिमित्ताने जे काही सुरू आहे ते तर निव्वळ भयंकर म्हणावे असे. या इमारतीत अजूनही गृहसेविकांना प्रवेश नाही. या इमारतींतले इतके झापडबंद आहेत की वर्तमानपत्रे टाकणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यासारखा अज्ञ निर्णय ते घेतात आणि तो सुखेनैव राबवलाही जातो. या इमारतीतला एखादा धाडसी जरा काही कोठे बाहेर पडला की तो परतल्यावर अन्यांच्या नजरा तो नको त्या ठिकाणी जाऊन आल्यासारख्या असतात.

समाजातल्या एका मोठय़ा वर्गाला भीती आवडते आणि त्यांना घाबरवणे व्यवस्थांना भावते. तो त्यांच्या कर्तव्याचाही भाग असावा.

म्हणूनच या साथकाळात शिस्तीत, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून आणि मुख्य म्हणजे मानवी चेहरा राखून सामोरे जाण्याचे प्रयत्न जगात होत असतील तर त्याचा रास्त परिचय आपल्या वाचकांना करून देणे इतकेच माफक उद्दिष्ट या सदराचे होते. ते अपेक्षेपेक्षा अधिक साध्य झाले असे म्हणता येईल. अनेक वाचकांनी या सदरात दिलेल्या माहितीबाबत अधिक काही ऐवज मिळवला किंवा तो मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. सगळ्यात आनंददायक भाग होता तो ‘लोकसत्ता’च्या आंतरराष्ट्रीय वाचकांच्या प्रतिक्रियेचा. अफ्रिका आणि उत्तर अमेरिका खंडातले काही देश सोडले तर जवळपास सर्वच देशांतल्या मराठी वाचकांकडून यास प्रतिसाद मिळत गेला. अनेकांनी आपापले अनुभव लिहून पाठवले. दुसरा आनंददायक भाग होता तो वैद्यक क्षेत्रातून येणाऱ्या प्रतिक्रियांचा. त्या अर्थाने हे सदर काही वैद्यकीय दृष्टिकोनातून लिहिले गेले नव्हते. तसे ते अपेक्षितही नव्हते. पण तरी इतके सारे विख्यात, ज्येष्ठ वैद्यकतज्ज्ञ हे वाचत आहेत आणि आपली प्रतिक्रिया कळवत आहेत हे निश्चितच समाधान देणारे होते. एका अर्थी हे सदर ‘लोकसत्ता’चा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, पोक्त, अभ्यासू वाचकांचा ‘तपमापक’ ठरले. गंभीर लेखन वाचकांना नको असते असे म्हणण्याची पद्धत हल्ली रूढ झाली आहे. ती किती खोटी आहे हे यातून दिसते. वाचकांना वैविध्यपूर्ण, विविधांगी असे काही हवे असते. त्याची किती उणीव आहे हेच या काळात अधिक दिसून आले.

आता करोना आपल्यातला झाला आहे. सांगितले जात होते तसा हा विषाणू काही आपल्यातून जाणार नाही, हे आता शहाण्यांना कळले आहे. करोनाशी निगडित शब्दनामावली आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, अस्त्राझेनेका, गिलियड (की जिलाद), लसराष्ट्रवाद, रेमेडेसिवीर, एडवर्ड जेन्नर, मायकेल लेविट, जोहान गिसेक, लॅन्सेट, मॉडेर्ना.. अशा अनेक नवनव्या व्यक्ती/नावे यांच्याशी ‘लोकसत्ता’ वाचकांचा परिचय झाला असेल. उंच गेलेल्या विमानाप्रमाणे हे सर्व शब्द, वैद्यकीय परिभाषा आता स्वचालन (ऑटोपायलट) मार्गाने पुढे निघाली आहे.

याचाच अर्थ कोविडोस्कोप स्तंभ थांबवण्याची वेळ आली आहे. बघता बघता यात ५० लेखांक लिहिले गेले. इतके लिहिले जाईल असे वाटले नव्हते. पण विषयाचा रेटा आणि याबाबतच्या भीतीचा फेरा इतका होता की लिहिणे आवश्यक होत गेले. हे वाचून आमची भीती/गैरसमज कमी व्हायला मदत झाली अशी प्रतिक्रिया मराठीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विख्यात लेखकाने दिली. करोनाविषयी इतरांच्या मनातीलही भीती आणि गैरसमज कमी व्हायला यामुळे मदत झाली असेल तर हा स्तंभ आणि तो विषाणू यांना समाधान वाटेल.

निसर्गात कोणी कोणावर मात करण्यासाठी वा कोणाचा पाडाव करण्यासाठी जगत नाही. मुंबईच्या लोकलडब्यात जसे सर्वाना एकमेकांना सामावून घेत प्रवास करावा लागतो तसेच मानवाने पृथ्वीवर जगणे अपेक्षित आहे. आपले ‘सहनाहवतु..’ हेच तर सांगते. करोना विषाणूने त्याची आठवण करून दिली इतकेच.

आमेन.

@girishkuber