गिरीश कुबेर

दोन-अडीच महिन्यांच्या शरीराला आणि मनालाही आंबवून टाकणाऱ्या टाळेबंदीत बरसणाऱ्या काळ्या ढगांनी अनेकांच्या मनातल्या पावसाच्या चंदेरी आठवणी जाग्या केल्या असतील. यंदा अनेकांचा उन्हाळा त्या विषाणूमुळे कुंद गेला. पण दोन दिवसांच्या या पावसाने ते कंटाळलेपण धुऊन जायला सुरुवात झाली असेल. त्यात आज ५ जून, महाराष्ट्रात टाळेबंदीमुक्तीचा थेट दुसरा टप्पा सुरू होईल. पहिला टप्पा आलाच नाही. थेट दुसराच. त्यात काय-काय सवलती आहेत वगैरे तपशील अनेकांना एव्हाना मुखोद्गत झाला असेल. महाराष्ट्रातल्या असंख्य नागरिकांसाठी ही पहिली चुणूक.. टाळेबंदी आज ना उद्या उठू शकते हे जाणवून देणारी.

आणि एका अर्थाने आतापर्यंतच्या टाळेबंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारीदेखील. देशातल्या दैनंदिन करोनाबाधितांची संख्या ९ हजारांपेक्षा अधिक झाली आहे, महाराष्ट्रातले करोना मृत्यू वाढू लागलेत आणि आपली टाळेबंदीची सहनशक्तीच संपली आहे, अशी ही अवस्था. ती होणारच होती. कारण गाण्याची सुरुवातच जर तार सप्तकात केली तर मध्येच दमसास सुटणार हा साधा नियम. असो. तर महाराष्ट्र आज अनुभवणाऱ्या पहिल्या मुक्तिदिनाच्या निमित्ताने करोनाबाधित जगात अन्यत्र कोठे काय सुरू आहे याचा हा आढावा.

पॅरिसमध्ये कालपासून त्यांचे अतिआनंददायी काफे सुरू झालेत. पॅरिसवासीयांसाठी हे काफे म्हणजे जीव की प्राण. सीन नदीच्या काठी, अतिश्रीमंती दुकानांना मिरवणाऱ्या शाँझेलिझे रस्त्यास छेदणाऱ्या लहान गल्ल्यांत, नोत्रदाम चर्चच्या परिसरात, पॅलेस रोयालच्या ऐश्वर्यी वातावरणात, उत्तुंग आयफेल टॉवरच्या छायेत, लुव्रच्या कलात्मक धुंदीत.. असे कोठेही या काफेत बसावे आणि एका ‘कापुचिनो’च्या मोलात हवा दु:खाच्या मंद सुराने..

तितका वाहता आनंद अनुभवावा असे पॅरिस. अनेक अनभिज्ञांच्या सहवासात असूनही सुंदर एकटेपणा या काफेत मिळते. करोनाकाळात हे काफे बंद झाले होते. पॅरिसकरांना एक वेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल, पण काफे बंद म्हणजे त्यांच्या जगण्याची चवच गेली म्हणायची. अखेर करोनाची भीती झुगारून अखेर हे काफे सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि पॅरिस जिवंत झाले. पण त्या देशाची सांस्कृतिक श्रीमंती अशी की करोनाच्या ऐन कहरकाळातही आपल्या असंख्य वस्तुसंग्रहालयांची रया जाऊ दिली नाही.

पलीकडच्या स्पेनमधला तिसरा दिवस एकही करोना बळी न जाण्याचा. कोलंबसाचे गर्वगीत गाणारा हा देश करोनाच्या विषाणूने पार मोडून पडला होता. त्या देशानेही करोनाचे काळे ओझे झुगारून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेनही तसा उत्साही देश. युरोपियनांना न शोभणाऱ्या मोकळेपणात ‘होला’ (हॅलो) आणि ‘लो सियांतो’ (सॉरी) यांचा मुक्त वापर करत मजा करणारे स्पॅनियार्डस घराबाहेर पडू लागलेत. मोकळ्याढाकळ्या पबमध्ये आपल्या परातीपेक्षाही मोठय़ा ताटात छान सजवलेल्या ‘पाएला’वर (मटण, मासे आणि निवडक भाजीपाला यांच्या साथीने स्पॅनिश मसाल्यात शिजवलेला भात) बीअरच्या साथीने ताव मारणाऱ्या स्पॅनियार्डाचे थवेच्या थवे अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत.

युरोपात सगळ्यात अधिक वाताहत झाली ती इटलीची. सर्वाधिक बळीही त्या देशातच असावेत. पण तो देशही करोनाचे भूत गाडून आपली हरवलेली जगण्याची लय शोधू लागलाय. तशी संचारबंदी त्या देशात कधीच उठली. पण आता श्वास घ्यायलाही उसंत नाही इतके काम कोणाचे सुरू झाले असेल? ब्युटिपार्लर्सचे. तुडुंब भरून वाहू लागली आहेत सुंदर देहांवर सुंदर नक्षीकाम करणारी ही प्रसाधनालये. सर्वात जास्त मागणी आहे ती नखप्रसाधनकर्त्यांना. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत त्या देशातील हे ‘नखुरडे’ नोंदले गेले आहेत. मुळातच सर्व युरोपीय देशांत सौंदर्यप्रसाधनगृहांचे प्रमाण इटलीत सर्वाधिक आहे. त्या देशातल्या महिला भाजी आणायला एक वेळ जाणार नाहीत. पण सौंदर्यप्रसाधनगृहात न जाणे केवळ अशक्य. ते सर्व आता त्या देशात नियमित झाले आहे.

स्वीडन, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे वगैरे देशांतले आयुष्य जणू काही झालेच नाही, इतके सुरळीत दिसू लागले आहे. इतकंच काय पण ब्रिटनमध्येही पब्समध्ये कार्यालयोत्तर गर्दी दाटू लागली आहे. परवा बीबीसीवर ट्राफल्गार चौकात कबुतरांना दाणे घालणाऱ्या कुटुंबवत्सलांची गर्दी पाहिली आणि करोनाने सर्वच काही संपवले नाही, याची खात्री पटली. जर्मनीत तर फुटबॉल सामने सुरू झाले आहेत. बुंडेसलिगा ही त्यांची स्पर्धा दोनेक आठवडय़ांपूर्वीच सुरू झाली. इकडे आशियात दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, चीन, मलेशिया, थायलंड आदी देशांतही जगणे रुळांवर आले आहे. अमेरिकेतही अनेक राज्यांनी टाळेबंदी मागे घेतली आहे.

खरी कमाल आहे ती न्यूझीलंड या देशाची. नेमक्या वेळी नेमकीच टाळेबंदी लावल्यानंतर त्या देशात आता नव्या करोनाबाधितांची संख्या शून्यावर आली आहे. गेल्या ११ दिवसांत त्या देशात एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे त्या देशाने गेल्या रविवारपासून सर्व म्हणजे सर्व निर्बंध मागे घेतलेत. मागे म्हणजे किती मागे? तर अंतरसोवळ्याची आणि गर्दी वगैरेचीही अट त्या देशाने काढून टाकली आहे. म्हणजे ५० जणांच्या साक्षीनेच लग्न करा.. वगैरे काही नाही.

आणि आपल्याकडे लवकरच करोना रुग्णांची संख्या सव्वा दोन लाख होईल, मृत्यू साडेसहा हजारांवर जातील आणि टाळेबंदीही शिथिल होईल. साधारण ७२ दिवसांनंतर महाराष्ट्रात आज, शुक्रवारी पहिला सवलत दिन उजाडेल. पाऊस पडत असेल. झाडांची पाने हलत असतील आणि ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला आलेली जाग मात्र ‘दु:खाच्या मंद सुराने’ असेल.

@girishkuber