-गिरीश कुबेर

या देशाला आता धक्क्यांचा धक्का बसत नाही. ‘आलिया भोगासी..’ किंवा ‘ठेविले अनंते..’ ही आध्यात्मिक वृत्ती समाजाचा पाया असल्याचा हा फायदा. त्यामुळे आताही टाळेबंदीची मुदत संपत आली की उतावीळ माध्यमे सोडली तर कोणाच्याही छातीत धडधड वाढत नाही. समाजाचे अंकगणितही पक्के असल्याने १, २, ३, ४ आणि त्यानंतर ५ येतात हे तसे सर्वच जाणतात. त्यामुळे टाळेबंदी ही संकल्पना वाढण्यासाठीच असते हे आता त्यांच्या मनाने घेतले आहे.

पण जगात असे काही देश आहेत की जे टाळेबंदी उठवण्याचा विचार करतात. ज्याचा विचार करतात त्याचा अभ्यास करतात. आणि अभ्यास झाला की मग कृती करतात. तर ज्यांचा असा अभ्यास झाला आहे अशांनी टाळेबंदी उठवावी कशी याचे एक सखोल मार्गदर्शन करून ठेवले आहे. अमेरिकेत ‘द हिल’ या नावाचे एक वर्तमानपत्र होते. काही वर्षांपूर्वी ते बंद झाले. आता त्याची वृत्तसेवा वेबसाइटमार्फत दिली जाते आणि त्यांचे एक अ‍ॅपदेखील आहे. अनेक वैद्यकीयतज्ज्ञ, शल्यक, साथरोगतज्ज्ञ अशा अनेकांशी बोलून त्यांनी टाळेबंदी कशी उठवावी यावर एक मार्गदर्शनपर लेख लिहून ठेवला आहे. महाराष्ट्र सरकारला समजा चुकून टाळेबंदी उठवण्याविषयी विचार करावा असे वाटलेच तर ही माहिती असावी म्हणून हा प्रपंच..

टाळेबंदी उठवण्यासाठी कोणत्या घटकांची गरज आहे. ‘द हिल’चे म्हणणे असे की दोनच गोष्टी त्यासाठी हव्यात. एक म्हणजे या काळात जमा झालेली वैद्यकीय विदा (डेटा) आणि दुसरे म्हणजे सामान्यज्ञान. पहिले मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. दुसऱ्याचे काय करायचे हा जरा गंभीर प्रश्न. या दोन्हींच्या आधारे टाळेबंदी, तिचे महत्त्व, या सगळ्याची अपरिहार्यता, त्यातून बाहेर येण्याचा मार्ग अशा अनके मुद्दय़ांच्या आधारे जनतेस या सगळ्याची तर्काधिष्ठित माहिती द्यावी. कारण त्यातून जनतेच्या मनात काही एक विश्वास तयार होऊ शकतो. तो विश्वास जनतेस देताना आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची पूर्ण कल्पना द्यायला हवी. हे केल्यानंतर टाळेबंदी उठवताना काय काय करावे..

१. सर्वप्रथम करोनाचा धोका सर्वाधिक कोणास आहे, हे निश्चित करायला हवे. हे कोण आहेत? सर्वाधिक धोका आहे तो वैद्यकीय कर्मचारी या गटास. या क्षेत्रातील अनेक आधीच करोनास सामोरे गेल्याची शक्यता अधिक. त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींच्या वारंवार आणि सातत्याने चाचण्या घेण्याची व्यवस्था तयार असायला हवी. तसेच या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार झाली आहेत की नाही, याचीही सातत्याने तपासणी केली जायला हवी. शक्यता ही की अशी प्रतिपिंडे त्यांच्या अंगात तयार झाली असतील. तसे असेल तर या वर्गास करोनाचा धोका नाही. यांच्या जोडीला वयोवृद्ध. आणि त्यातही रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार असलेले वृद्ध. अशांचा सार्वजनिक वावर मर्यादित ठेवायला हवा. या वयोगटातल्या मंडळींसाठी भल्या पहाटे दोन-तीन तासांची सवलत टाळेबंदी काळातही दिली जाणे आवश्यक आहे. तसे केले असेल तर या गटातील व्यक्ती अधिक निरोगी असतात.

२. दुसरा मुद्दा म्हणजे करोनाची हलकी, मध्यम लक्षणे असतील अशांना सांगा : घरी बसा. त्यांना रुग्णालयांत दाखल करून घेण्याचा अट्टहास करण्याची गरज नाही. अशांना केवळ ताप आल्याप्रमाणेच हाताळा. उगाच जास्त कौतुक/काळजी करायचे कारण नाही. अशांसाठी त्यांचे घर यापेक्षा उत्तम आणि सुरक्षित निवास अन्य नाही.

३. मुख्य म्हणजे बालवाडय़ा वगैरे सुरू करा. लहान मुलांना करोनापासून कोणताही धोका नाही. अर्थात प्रत्येकाप्रमाणे याबाबतही अपवाद आहेत. पण अपवादांसाठी सर्वाना शासन करण्याची गरज नाही. तरुणांना मुक्तपणे जगू द्या. तरुणांना करोनाची बाधा झाली तरी तो तितका जीवघेणा असत नाही. उगाच त्यांनाही घाबरवण्याचे कारण नाही.

४. व्यवसाय.. मुख्य म्हणजे हॉटेले आदी.. सुरू होऊ द्या. हॉटेले, काही व्यवसाय हे स्वच्छता, अंतरनियम पाळून सहज सुरू करता येतात. ग्राहकांना रास्त माहिती द्या. तेदेखील योग्य ते नियम पाळण्यात सहकार्यच करतील. दोघांत सहा फूट वगैरे अंतर असायला हवे असा दुराग्रह करू नका.

५. सार्वजनिक वाहतूक वाहू द्या. त्यातून प्रवास करताना मुखपट्टय़ा अनिवार्य केल्यात तरी पुरे. उगाच नियमांचा बागुलबुवा अनावश्यक.

६. अत्यंत महत्त्वाचे. बागा/उद्याने/समुद्रकिनारे.. खुले करा. नागरिकांना घेऊ द्या मोकळ्या हवेत श्वास. बघू द्या त्यांना बदलत्या आकाशाचे रंग आणि ऐकू द्या त्यांना लाटांची गाज. घरात डांबणे हाच करोना प्रतिबंधाचा उपाय आहे हे सिद्ध झालेले नाही.

वाचाल तर वाचाल.. असे म्हणतात. आपल्याकडे कोणी हे वाचेल काय? तसे झाल्यास आपणास ‘वाचायला’ मदतच होईल त्याची.

झाले काय?

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या सुधारित आकडेवारीनुसार, गेल्या वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीत विकास दर ५.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ४.४ टक्के, तर तिसऱ्या तिमाहीत तो ४.१ टक्के नोंदला गेल्याचे स्पष्ट करण्यात आले.

स्थिती काय? गेल्या तिमाहीत तुलनेत कृषी क्षेत्राची थेट ५.९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती अवघी १.६ टक्के  होती, तर निर्मिती क्षेत्राची वाढ यंदा १.४ टक्क्यांपर्यंत, बांधकाम क्षेत्राची २.२ टक्क्क्यांपर्यंत घसरली आहे. गेल्या तिमाहीत बहुपयोगी सेवा, स्थावर मालमत्ता, वित्त, दळणवळण, आदरातिथ्य क्षेत्रालाही फटका बसला.

@girishkuber