-गिरीश कुबेर

संख्येस भावना नसतात. पण संख्या भावनांना हात घालू शकते. अनेकदा घालतेदेखील. आणि भावनांना संख्येत मापता येत नाही. पण कधी कधी संख्या हीच भावना होते. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेस याचा प्रत्यय येत असेल.

कारण त्या देशातील करोनादंशात मृत पावलेल्यांची संख्या नुकतीच एक लाखांहून पुढे गेली. साधारण सहा वर्षे चाललेल्या दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जे सैनिक गमावले त्याच्या एकचतुर्थाश बळी गेल्या काही महिन्यात या अत्यंत प्रगत देशाने एका विषाणूसमोर गमावले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे सुमारे सव्वाचार लाख सैनिक बळी पडले. त्यानंतर इतका मनुष्यसंहार अमेरिकेने गेल्या काही महिन्यांत अनुभवला. या मृतांस श्रद्धांजली म्हणून ‘न्यू यॉर्क टाइम्स दैनिका’ने परवाच्या दिवशी आपल्या दैनिकाच्या पहिल्या पानावर त्यातली हजार नावे छापली. संपूर्ण पानभर तेच. मृतांचे नाव आणि दोनेक ओळीत त्यांचा परिचय. वर्तमानपत्राचे ते पान डोळ्याला आणि मेंदूला टोचणी लावते.

त्याच देशातल्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने आणि सरकारच्या साथ रोग विभागाने या मृतांचे वर्गीकरण केले. त्यावर नजर टाकल्यास या करोनाच्या तांडवाची स्थळे/कारणे लक्षात येतात आणि मृतांच्या संख्येला काही एक अर्थ येऊ लागतो. उदाहरणार्थ..

१. या करोनात बळी पडलेल्या महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या दुप्पट आहे.

२. गौरवर्णीयांच्या तुलनेत तिप्पट बळी हे कृष्णवर्णीयांचे आहेत. त्यांच्यातील ड जीवनसत्त्वाची कमतरता यामागे आहे किंवा काय, हे आता तपासले जात आहे. शिकागोसारख्या शहरात तर करोनाबाधितांतील ७० टक्के हे अफ्रिकी आहेत.

३. मृतांतील ८० टक्के हे वयस्कर आहेत. रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात प्राण गेलेल्यांतील ५३ टक्के आणि एकूणच रुग्णालयांत मरण पावलेल्यांतील ४५ टक्के हे वय वर्षे ६५ वा अधिक असलेले आहेत.

४. करोनाबाधित मुलांतील किमान २०० जणांना कावासाकी सिंड्रोम या आजाराने गाठले. हा आजार अगदी तान्ह्या बाळांना होतो. त्यात ताप येतो आणि डोळे, हातपाय, तोंड लालबुंद होते. हा आजार सुदैवाने जीवघेणा नाही. पण त्याच्या करोना साधम्र्याविषयी संशोधन सुरू आहे.

५. एकुणांतील साधारण निम्मे वा अधिक बळी हे वृद्धाश्रम वा शुश्रूषागृहातील आहेत. ब्रुकलीनसारख्या ठिकाणच्या एकाच शुश्रूषागृहात तब्बल ५५ वृद्धांचे प्राण गेले.

६. काही राज्यांत एकूण मृतांतील साधारण २० टक्के हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित दिसतात. अन्यत्रदेखील परिचारिका वा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मरणाचे प्रमाण अधिक आहे.

७. देशभरात सर्रासपणे गेले आहेत ते किराणा दुकानदार. मॅसेच्युसेट्समधल्या एकाच मॉलमधले ८१ कर्मचारी करोनाबाधित आढळले.

८. विविध खाटिकखान्यांतही जवळपास १६ हजारांहून अधिकांना करोनाची लागण झाली.

९. दुसरी सार्वत्रिक लागण आढळली ती तुरुंगातून.

१०. अमेरिकेत नोंदली गेलेली गमतीशीर बाब म्हणजे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्कार केल्यानंतर देशभरातून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाच्या मागणीत तब्बल एक हजार टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजे या आजारावर हे औषध नाही असे अमेरिकेचे औषध नियंत्रक आणि जागतिक आरोग्य संघटना हे सांगत असले तरी हेच औषध नागरिकांना हवे होते.

११. या साथीची आर्थिक किंमत अर्थातच खूप मोठी आहे. संपूर्ण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिकांचे, म्हणजे ३.९ कोटी नागरिकांचे रोजगार गेल्या काही आठवडय़ांत गेले.

१२. यात सर्वात भरडले गेले आहेत ते अर्थातच गरीब. वर्षांला ४० हजार डॉलर्सपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांतील ४० टक्के घरांत कोणाचा ना कोणाचा रोजगार करोनाने हिरावला.

१३. यातही परत सूचक फरक असा की कृष्णवर्णीय कामगारांतल्या जेमतेम २० टक्क्यांना घरातून काम करण्याची मुभा होती. पण गोऱ्या कामगारांत मात्र हे प्रमाण ३० टक्के इतके होते.

१४. मार्चपासून देशभरातील किमान १ लाख छोटय़ा व्यावसायिकांनी आपापल्या व्यवसायांना कायमचे टाळे ठोकले.

१५. देशभरातील ३ टक्के खाद्यान्नगृहांनीही कायमचा राम म्हटला. उरलेल्यांतील ११ टक्क्यांना व्यवसाय पुन्हा सुरू होईल याची काहीही खात्री नाही.

असे अनेक मुद्दे या पाहण्यांतून समोर येतात. लंडनच्या  ‘गार्डियन’सारख्या वर्तमानपत्रानेही त्या सगळ्याचे संकलन केले आहे. हा संख्यासत्याचा साक्षात्कार ज्यास शिकावयाचे आहे त्यास बरेच काही शिकवू शकेल..

@girishkuber