– गिरीश कुबेर

‘‘करोनाचा आलेख सांगितले जात होते तितक्या भयावह वेगाने कधीही वाढलेला नाही. त्याच्या गतीचा वेग समजून घेतल्यास साथ किती पसरेल ते निश्चित सांगता येते. ते सांगण्याची आताची पद्धत मूलत:च चुकीची आहे. त्यामुळे वाटेल ते अंदाज केले गेले. आणि अंतरसोवळे आणि टाळेबंदी हे या साथीस उत्तर नाही. अंतरसोवळ्याने प्रसार कमी होतो हा गैरसमज आहे आणि टाळेबंदीने होणारे नुकसान हे साथीच्या प्रसारापेक्षा किती तरी प्रमाणात अधिक आहे..’’

मायकेल लेविट यांना ऐकणे वा वाचणे म्हणजे स्वत:स धक्का बसवून घेणे. ते काही कोणी सध्या लोकप्रिय असलेले प्रलयभाष्यकार वा साथरोगतज्ज्ञ नाहीत. ते स्टॅनफर्ड विद्यापीठात ‘स्ट्रक्चरल बायोलॉजी’ या विषयाचे प्राध्यापक आहेत आणि २०१३ सालचे विज्ञानाचे नोबेल पारितोषिक विजेते. नोबेल कसले? तर रसायनशास्त्राचे. आवडता विषय संख्याशास्त्र. जॉन नॅशला जसे संख्यांमध्ये आकृतिबंध दिसायचे तसे लेविट यांना दिसतात. ‘‘माझ्यापेक्षा त्यांचे संख्या, आकडे, समीकरणे यावर अधिक प्रेम आहे,’’ अशी अभिमान वाटावा अशी लटकी तक्रार त्यांच्या पत्नी करतात. त्यांचे आणि अर्धागिनीचे चीनमध्ये बरेच मैत्र आहे. गेल्या नोव्हेंबरात ते चीनमध्ये होते. यंदा जानेवारी महिन्यात करोनाच्या बातम्या यायला लागल्यावर आणि जगात करोना करोना असा प्रचार सुरू झाल्यावर त्यांनी या विषयाचा पाठपुरावा सुरू केला. चीनमधल्या मित्रमैत्रिणींकडून माहिती यायला लागल्यावर त्यांनी तिचे पृथक्करण केले आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अंदाज वर्तवला : चीनमध्ये करोनामुळे ८० हजार बाधित होतील आणि हुबेई प्रांतात करोनामुळे जास्तीत जास्त ३२५० इतक्यांचे प्राण जातील.

आज सुमारे तीन महिन्यांनंतर चीनमधील बाधितांची संख्या आहे ८२,९६५ आणि हुबेई प्रांतातल्या एकूण बळींची संख्या आहे ३,२१२.

प्रा. लेविट यांनी इतका अचूक अंदाज कशाच्या जोरावर वर्तवला?- ‘‘सोपे आहे ते. या आजाराच्या मार्गक्रमणाचा एक मार्ग आहे. तो लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी संगणक प्रारूपे वगैरेंची काही गरज नाही. प्राथमिक लक्षणे वाचण्यातच जर तुम्ही चुकलात तर तुमचा संगणक कितीही उत्तम असला तरी तुम्ही चुकणारच. ती चूक (नील) फर्ग्युसनकडून घडली. या आजाराच्या प्रसाराचा वेग कधीही सांगितला जात होता तितका नव्हता. आणि नाहीसुद्धा. तो तसा समजून ज्यांनी ज्यांनी उपाययोजना केल्या, त्या सर्व चुकल्या. इंग्लंड सुरुवातीस योग्य मार्गाने जात होता. पण त्यांनी फग्र्युसनचे ऐकले आणि ते संकटात आले. योग्य विचार करून रास्त उपाय योजणारे देश चार. स्वीडन, जर्मनी, चीन आणि इराण..’’

‘‘सध्या या आजाराच्या प्रसाराचा वेग ठरवण्यासाठी इंग्रजी ‘आर’ (एका व्यक्तीमुळे किती जणांना करोनाची लागण होईल याच्या अंदाजाचा हिशेब. सर्वाचा प्रयत्न ‘आर’ हा ०१ असावा असा असतो.) या अक्षराचा वापर करून एक समीकरण बनवले जाते. हा ‘आर’ जितका कमी तितका करोनाचा प्रसार कमी. त्यात काहीही तथ्य नाही. काही ठिकाणी अनेकांनी हा ‘आर’ १५ असेल इतका आचरट विचार केला. पण जगात कोठेही याप्रमाणे आजार वाढलेला नाही आणि मरणाऱ्यांची संख्याही वाढलेली नाही. उलट सत्य हे की ज्या देशांनी या विद्वानांच्या मागे न लागता सामान्यज्ञानावर आधारित विचार केला त्यांनी या करोनाचा प्रसार जास्त उत्तम रोखला..’’

‘‘या सामान्यज्ञानावर आधारित विचार करणाऱ्या देशांनी उगाच टाळेबंदीचे अवडंबर केले नाही. त्यात हे वर उल्लेखलेले चार देश महत्त्वाचे. चीनने तर अंतरसोवळ्यापेक्षा मुखपट्टी नियमास अधिक महत्त्व दिले. त्या देशात ती परंपराच आहे. जरा जरी बरे वाटेनासे झाले की माणसे मुखपट्टय़ा वापरतात. त्यास शरीर-तापमान मोजण्याची जोड दिल्याने करोना प्रसार रोखणे अधिक परिणामकारकरीत्या त्यांना शक्य झाले..’’

‘‘ज्यांनी ज्यांनी टाळेबंदीचा मार्ग पत्करला त्यांना ना प्रसारावर नियंत्रण राखता आले ना अर्थव्यवस्था सांभाळता आली. लहान मुलांकडून या आजाराचा कधीही प्रसार झालेला नाही. हे विज्ञान आहे. आणि तरीही अनेकांनी लहान मुलांच्या शाळा बंद केल्या. सरसकट टाळेबंदीपेक्षा हवी आहे ती शहाणी (स्मार्ट) टाळेबंदी. जीत काही काळ ५० पेक्षा अधिकांना जमावबंदी असेल, एकमेकांना स्पर्श करणारे खेळ टाळले जातील वगैरे. सरसकट टाळेबंदीने काहीही साध्य होणारे नाही. उलट ती अधिक नुकसानकारक असेल..’’

‘‘पण तरीही या रोगाचा गवगवा केला गेला आणि टोकाची पावले उचलली गेली. असे झाले कारण आपण अंदाजात कमी पडायला नको, असा सगळ्यांचा विचार. आपल्या भाकितापेक्षा बळी कमी गेले तरी चालतील, पण जास्त जायला नको, याकडेच सर्वाचा कल. सरकारांनाही हेच हवे. पण कमी काय आणि जास्त काय, अंदाजात चूक ती चूकच..’’

‘‘हे लोकांना पटत नाही. सर्वाना लोकप्रिय मेंढरांसारखे महाजनांच्या मार्गानेच जाण्यात रस. तसे करणे सोपे. मी या रोगाविषयी कमी धोकादायक असा अंदाज व्यक्त केला तर मला किती त्रास झाला. आमच्या क्षेत्रातील लोकही नाराज झाले, नातेवाईक म्हणाले हा काहीही बरळतोय म्हणून. आता सर्वाना पटते आहे सत्य काय आहे ते. पण माझ्या मनात काही त्यांच्याविषयी कटू भावना वगैरे नाही!’’

या करोनाकाळात जन्मलेल्या ‘लॉकडाऊनटीव्ही’ नामक वाहिनीतल्या मुलाखतीत मायकेल लेविट यांना ऐकणे हा एकाच वेळी कमालीचा उत्साहवर्धक आणि त्याच वेळी खिन्न करणारा अनुभव. उत्साह का, त्याची अनेक कारणे. पण खिन्नतेचे मात्र एकच.

असा एखादा मायकेल लेविट आपल्याकडे जन्मेल का? तेवढाच आत्मनिर्भरतेस हातभार.

@girishkuber