गिरीश कुबेर

आपल्याकडे करोना काळ आणि त्याच्या हाताळणीतल्या गमती काही संपायला तयार नाहीत. उदाहरणार्थ अमेरिकेत रेमडेसिवीर या करोनावरील औषधाची बरीच चर्चा असताना आपणही त्याचा वापर आपल्याकडे करोनाबाधितांवर करायचा निर्णय घेतला. खरे तर अमेरिकेतच मुळात या औषधाला करोना उपचाराची मिळालेली परवानगी हा वादाचा विषय. या कंपनीचे वपर्यंत पोहोचलेले हात वगैरे चर्चा कोविडोस्कोपच्या वाचकांना आठवतच असेल. पण अमेरिका करतीये म्हणून आपणही या औषधाचा वापर करोनाबाधितांवर करायचे ठरवले. तर समजून चालू या तो निर्णय योग्य होता.

त्यानंतर आपल्या काही कंपन्यांनी या औषधाच्या निर्मितीचे परवाने अमेरिकी कंपनीकडून घेतले. सुरुवातीला अमेरिकेतच या रेमडेसिवीरच्या चाचण्यांचे उलटसुलट अहवाल आले. त्यामुळे त्या कंपनीचा समभाग गडगडला. पण नंतर तो पुन्हा सावरला. कारण त्या चाचण्यांतला औषधाविषयीचा नकारात्मक भाग हा चुकून नोंदवला गेल्याचे ‘स्पष्ट’ झाले. मग अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले विशेषाधिकार वापरून हे औषध करोनाग्रस्तांवर वापरण्याची मुभा दिली. काही मोजक्याच रुग्णांवर ते उपचार केले गेले. आणि त्याचे परिणाम ‘उत्साहवर्धक’ दिसल्याचे जाहीर झाले. कंपनीच्या समभागांचे दर वाढले. आणि मग या औषधाच्या वापराची सिद्धता आपल्याकडेही झाली. तशा बातम्या मागेच झळकल्या.

मग आपल्या औषध महासंचालकांनी रेमडेसिवीर भारतातही वापरता येईल यासाठी परवानगी दिली. पण प्रत्यक्षात याबाबत आपल्या सरकारने औपचारिक निर्णय घेतला

१ जूनला. दुसऱ्या दिवशी आरोग्य खात्याच्या पत्रकार परिषदेत त्याची रीतसर घोषणा झाली. अनेकांनी पाहिली असेल ही पत्रकार परिषद. ‘‘या कंपनीने औषधाचा परवाना मागताना जे काही पुरावे दिले त्याच्या आधारे औषध संचालकांनी रेमडेसिवीर हे आणीबाणीकालीन औषध म्हणून मंजूर केले,’’ असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकी अध्यक्षांनी आणीबाणीकालीन अधिकार वापरले. आपल्या सरकारनेही तेच अधिकार वापरले. अमेरिकेत तोंडी लावण्यापुरत्या रेमडेसिवीरच्या काही चाचण्या तरी झाल्या. आपल्याला त्याचीही गरज नाही. अमेरिकेने केले.. आपण उगाच वेळ कशाला घालवा त्यात.. असा विचार नसेलच असे नाही.

आणि आता करोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांहून अधिक झालेला असताना आणि त्याच्या वाढीचा वेग कायम असताना आपल्याकडे या कथित औषधाच्या वापराचे सर्व उपचार मात्र अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. इतकेच काय पण हे औषध बाजारात आणायचे झालेच तर त्याची किंमत काय असायला हवी याचाही निर्णय व्हायचाच आहे अजून. सिप्ला, ज्युबिलंट लाईफसायन्सेस, जेनेरिक औषधांची निर्माती हैदराबादची हेटेरो ड्रग्ज, मूळची अमेरिकेतील पण भारतातही असलेली मायलॅन आणि इतकेच काय आपला शेजारी पाकिस्तानची फिरोझसन्स लॅब या कंपनीलाही रेमडेसिवीर निर्मितीचा परवाना दिला आहे अमेरिकी कंपनीने. जगभरातल्या जवळपास १३० देशांत हे कथित करोनाप्रतिबंधक औषध विकलं जाणार आहे म्हणे.

ते जगाचे जाऊ द्या पण भारतात अद्याप त्याची विक्री सुरू होण्यातले अडथळे दूर झालेले नाहीत. त्याची किंमत वगैरे ठरायची आहे ते ठीक. पण या औषधाच्या मात्रा मुळात द्यायच्या किती हेच भारतीय औषध विज्ञान संस्थेने, म्हणजे आयसीएमआर, स्पष्ट केलेले नाही. या संदर्भात सर्व संबंधितांच्या वेबिनारमार्फत बैठका वगैरे झाल्या म्हणतात. पण या औषधाच्या अंतिम वापराची परवानगी आणि मग त्याचा वापर अजून काही आपल्याकडे सुरू झालेला नाही. या संदर्भातील सविस्तर वृत्तांत आपल्याच ‘बिझनेस स्टँडर्ड’ या वृत्तपत्राने दिला. ही परवानगी मिळाली, सर्व अडथळे दूर झाले, औषधाची मात्रा किती ते नक्की झाले की मग रुग्णालयांत करोनोपचारार्थ दाखल रुग्णांना हे औषध दिले जाणार. आणि तसे ते त्यांनी घ्यायच्या आधी त्यांच्याकडून लेखी निवेदन घेतले जाणार.. म्हणजे, हे औषध प्राशन करायला माझी तयारी आहे.. असे या रुग्णाने लिहून द्यायचे.

हे असे का करायचे? कारण करोनावर रेमडेसिवीर हे औषध आहे ही बाब सिद्धच झालेली नाही म्हणून. म्हणजे ज्याचा दर्जा औषध म्हणून अद्याप निश्चित झालेला नाही ते कथित औषधी रसायन करोनाने अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना दिले जाणार.. आणि ते घ्यायच्या आधी या रुग्णांनी ‘‘यास आपली हरकत नाही,’’ असे लिहून द्यायचे. खरे तर या अवस्थेस पोहोचलेला कोणताही इसम.. किंवा त्याचे आप्तेष्ट पुरेसे घायकुतीला आलेले असतात. काहीही द्या पण यास बरे करा.. असे म्हणण्याची वेळ नातेवाईकांवर आलेली असते.

एका बाजूने चाचण्याही न करता रेमडेसिवीरला औषधाचा दर्जा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूने बाकीचे सोपस्कार मात्र तसेच तरंगत ठेवायचे असा हा प्रकार. कोण म्हणेल आपल्याकडे विविध सरकारी खात्यांना स्वायत्तता नाही म्हणून..

@girishkuber