News Flash

कोविडोस्कोप : ..हे खरे की ते खरे?

संधिवात, अंगावरच्या चट्टय़ांचा त्वचाविकार (सोरायसिस), हेपटायटिस-सी म्हणजे विशिष्ट प्रकारची कावीळ, एबोला, पचनसंस्थेचा विकार..

(संग्रहित छायाचित्र)

– गिरीश कुबेर

संधिवात, अंगावरच्या चट्टय़ांचा त्वचाविकार (सोरायसिस), हेपटायटिस-सी म्हणजे विशिष्ट प्रकारची कावीळ, एबोला, पचनसंस्थेचा विकार..

ही काही माहीत असलेल्या आजारांची नावे नाहीत. तर ज्या आजारांवरची औषधे करोनावरील उपचारांसाठी सध्या वापरली जात आहेत, त्यांची ही नावे. म्हणजे सोरायसिस वा संधिवात वा कावीळ यांवरची औषधे सध्या करोनाबाधितांना दिली जात आहेत असाच याचा अर्थ. अर्थातच ही सर्व औषधे एकत्र करून तयार होणारा नवीनच एखादा काढा करोनाबाधितांना दिला जात आहे, असे नाही. तर यातील प्रत्येक औषधाची स्वतंत्रपणे करोनावर चाचणी सुरू आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांत.

असे करावे लागत आहे यामागचे कारण उघड आहे. करोनावर स्वतंत्रपणे एखादे रामबाण औषध आहे असे समोर आलेले नाही. तसे पाहू गेल्यास करोना हा नेहमीच्या हिवतापांचीच सुधारून वाढवलेली आवृत्ती. फक्त फरक असा की याचा प्रसार वेगात होतो आणि फुप्फुसाला इजा होते. वर उल्लखलेल्या आजारांच्या औषधांतील एखादा वा अधिक घटक असा आहे की ज्यामुळे विषाणूचा शरीरांतर्गत प्रसार रोखायला मदत होईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे काही ना काही, नवनव्या मार्गानी या आजारास रोखता कसे येईल यावर प्रयोग सुरू आहेत. त्याचाच हा भाग. त्यात अनेक कंपन्या मैदानात उतरल्या आहेत. परदेशी आहेतच. पण भारतीय कंपन्यांनीही यात उडी घेतली आहे.

‘एकाची घाण हे दुसऱ्याचे अन्न असते’ या अर्थाचा एक वाक्प्रचार आहे. त्याच अर्थाने अनेकांचा जीव घेणारे हे विषाणू विष औषध व्यवसायासाठी अमृत ठरू शकते, अनेकांचे असे घाऊक मरणे हे अनेकांसाठी उत्तम व्यवसाय संधी असू शकते, हे मान्य करायला हवे. जीव वाचवणे हे उदात्त वगैरे कर्तव्य आहेच. पण अशा जीव वाचवायच्या संधींतून व्यवसाय फुलू शकतो, या सत्याकडे उगाच दुर्लक्ष करून चालणार नाही. तेव्हा भारतीय कंपन्यादेखील या करोना गंगेचा एखादा ओघळ आपल्याही अंगणात यावा म्हणून उतरल्या असतील तर त्याचे स्वागतच.

यात आघाडीवर आहे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ही कंपनी. मुंबईस्थित या कंपनीच्या औषधाच्या करोनारोधक वापरासाठी औषध नियंत्रक आणि भारतीय वैद्यक परिषद अशा दोघांनीही मान्यता दिली आहे. तेव्हा आता या कंपनीच्या चाचण्या आताच मे महिन्यात सुरू होतील. या कंपनीचे सदर औषध जपानमधे ‘फुजीफिल्म टोयामा केमिकल कंपनीतर्फे’ फ्लू या आजारासाठीच दिले जाते. Favipiravir हे त्याचे नाव. जपानमधे ते Avigan या मुद्रानामाने (ब्रँड नेम) विकले जाते. देशभरात किमान दीडशे करोनाबाधितांवर आता या औषधाच्या चाचण्या सुरू होतील. या चाचण्या १४ दिवसांच्या असतील आणि २८ दिवस त्या औषध परिणामांच्या नोंदी ठेवल्या जातील. या क्षेत्रातले संबंधित या औषधाच्या परिणामांकडे डोळे लावून बसले आहेत. याविषयी इतकी आशा असायची कारणे तीन. एक म्हणजे एक तर हे औषध फ्लू.. हिवतापावरती आताही दिले जातेच. दुसरे म्हणजे ते भारतीय असेल. आणि तिसरे कारण हे की हे औषध तोंडावाटे दिले जाते. त्यामुळे ते अन्य औषधांच्या तुलनेत स्वस्त असेल. स्वस्त आणि मस्त.. हेच तर आपले ध्येय!

या जोडीला दुसरी एक भारतीय कंपनी झायडस कॅडिला हिच्या ‘हेपटायटिस सी’वरील औषधाकडूनही काहींना आशा आहेत. ‘Interferon alfa-sb’  या तांत्रिक नावाने ओळखले जाणारे हे औषध अधिक तीव्र अशा जीवघेण्या काविळीवर सध्या दिले जाते. या औषधाच्या चाचण्याही याच मे महिन्यात सुरू होतील. या औषधाच्या वापरामुळे विषाणूच्या पेशींची जाडी कमी होते.. म्हणजे तो अशक्त होतो, असे एका पाहणीतून आढळल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

याच्या जोडीला औषध क्षेत्रातील जागतिक बलाढय़ कंपनी रोश, आपल्या भारतातली बायोकॉन (या कंपनीचे नाव माहीत असेल/नसेल पण तिच्या प्रवर्तक किरण मुजुमदार शॉ अनेकांना माहीत असण्याची शक्यता अधिक) या कंपन्यांची उत्पादने स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणेही करोनास कह्यत आणण्याच्या प्रयत्नात आहेत.

रोश कंपनीचे तीव्र संधिवातावरचे Actemra  हे करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वापरून पाहिले जात आहे. या औषधाचा उपयोग सूज कमी करण्यात होतो. करोनाच्या काही गंभीर रुग्णांना सूज येते. त्यांच्यावर या औषधाचा प्रयोग केला जाईल. त्याच वेळी बायोकॉनचे Itolizumab हे जैविक औषधही करोनाबाधितांवर वापरले जात आहे. मुंबई महापालिकेने बायोकॉनशी तसा करार केल्याची माहिती मध्यंतरी तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ‘लोकसत्ता’ व्यासपीठावरच दिली होती. या दोन्ही औषधांमुळे फुप्फुसाच्या संरक्षणास मदत होते. त्यामुळे त्यांच्या चाचण्या.

तर अशी ही औषधमाला आणि असे हे औषध कंपन्यांचे प्रयोग. वर रक्तद्रव चाचण्या आहेतच. एका विषाणूस रोखण्यासाठी हे सारे उपाय. हे कळले तर आणि हा विषाणू काव्यप्रेमी असेल तर सुरेश भट यांच्या ओळी उसन्या घेऊन तो इतकेच म्हणेल :

एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे /

हे खरे की ते खरे की ते खरे की ते खरे!

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:28 am

Web Title: covidoscope article various medicines used in corona treatment abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोविडोस्कोप : लसराष्ट्रवाद !
2 लोकज्ञान : विझागमधील स्टायरिन वायुगळती
3 साथ-नियंत्रण प्रारूपाची गरज
Just Now!
X