गिरीश कुबेर

आपले तसे सगळेच माकडांपासूनचे. म्हणजे मनुष्याची उत्क्रांती माकडांपासूनची. तथापि उत्क्रांती ही शहाणपण कमावण्यासारखी सततची प्रक्रिया असल्याने ती कधी पूर्ण झाली असे मानायचे नसते. असो. आपल्या मुळाबाबतचे हे मर्कटी सत्य एकदा का मान्य केले की आपल्या काही सवयी वा आजार हे मर्कटोद्भव असणार हे मान्य करणे अवघड जात नाही. अशांतील एक ‘सिमिअन इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम’ या नावाने ओळखला जातो. विसाव्या शतकाची पहाट होत असताना, म्हणजे १९०० सालच्या आसपास, आफ्रिकेतील कांगो आदी प्रांतांत या काही माकडांमध्ये या आजाराची लक्षणे आढळल्याची नोंद आहे.

मर्कटांपुरताच सुरुवातीस मर्यादित असलेला हा आजार मर्कटांच्या अन्य सवयींप्रमाणे माणसांतही अवतरला. कसा आणि का याचा पूर्ण तपशील अद्याप उपलब्ध नसावा. त्याच आफ्रिकेच्या कांगो खोऱ्यात मनुष्यांस या आजाराची लागण झाल्याचे आढळले. ही बहुधा विसावे शतकसाठी साजरी करीत असतानाची गोष्ट. त्यानंतर न्यू यॉर्कमध्येही या आजारात एक बळी पडला. हा इसमही आफ्रिकी होता. त्याच्या शवविच्छेदनात अनोख्या, तोपर्यंत अज्ञात विषाणूच्या उपस्थितीची नोंद आढळते. याच्या बाधेमुळे बाधिताच्या देहातील प्रतिकारशक्ती हळूहळू नष्ट होत जाते आणि व्यक्तीचे मरण ओढवते. शरीर कशाचाच प्रतिकार करू शकत नसेल तर मृत्यू अर्थातच अपरिहार्य. त्या वेळी या आजारावर अनेक वैद्यक प्रकाशनांत संशोधनपर लिहिले गेले. तसे ते लिहिताना या आजाराचे बारसे झाले ‘अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम’. याचेच लघु रूप म्हणजे एड्स. पॅरिस येथील लुई पाश्चर (विख्यात जीवशास्त्रज्ञ.. ज्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ शोषून काढत रेबीज प्रतिबंधक लस विकसित केली. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेचा हा जनक फ्रेंच होता.) संस्थेत ‘ह्य़ुमन इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम’ म्हणजेच एड्स यावर शिक्कामोर्तब झाले.

त्यानंतर पुढे काय आणि कसे होत गेले हा इतिहास अजूनही वर्तमानात आहे. मुक्त लैंगिक संबंध, टोचून घेतल्या जाणाऱ्या अमली पदार्थासाठी वा इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या सुया, रक्तघटकांचा वापर केला जातो ती औषधे वगैरे अनेक मार्गानी या आजाराचा प्रसार होत गेला. त्या वेळी केस भादरताना दूषित वस्तऱ्यातूनही या विषाणूचा प्रसार होऊ शकतो अशी भीती तयार झाली होती. त्यामुळे अनेकांनी ‘आपले मस्तक, आपला वस्तरा’ असा बाणा अंगीकारला होता. या विषाणूची भीती इतकी होती की पुण्यदायी केशदानावर त्यामुळे गदा आली. पण हा तसा लहानसा मुद्दा. या आजाराची दहशत त्या वेळी कमालीची होती. आणि परत पंचाईत अशी की हा आजार झाला आहे, हे सांगायची चोरी. आधी मुळात आपल्याकडे अधिकृत लैंगिक व्यवहारांबाबतही सांस्कृतिक चोरटेपण. वर त्यात या आजाराने एकमेकांविषयी भयानक संशय निर्माण केलेला. अशात सतत फिरतीवर असणारे ट्रकचालक वा देहविक्रयींना हा आजार प्राधान्याने होतो असे लक्षात आल्याने सर्वसामान्यांचीही त्याच्या केवळ कल्पनेने पाचावर धारण बसली होती.

या रोगाच्या साथीस रोखायचे कसे, हाच प्रश्न ज्याच्या-त्याच्या डोक्यात. अशा वेळी समाजसेवा करणाऱ्यांचे पेव फुटते. आपल्याकडेही ‘इंडियन हेल्थ सोसायटी’ अशा अधिकृत वाटेल अशा संस्थेसारख्या अनेक संस्था त्या वेळी जन्माला आल्या. वास्तविक ही कऌड संस्था जितकी बोगस होती तितक्याच बोगस अन्य संस्थाही होत्या. बिल गेट्स फौंडेशनसारख्या अनेकांकडून एड्सच्या नावे आर्थिक मदत मिळवणे हेच त्यांचे उद्दिष्ट. त्या वेळी या कऌड च्या डॉ. ईश्वर गिलाडा याला अटक झाल्याचेही अनेकांना आठवत असेल. या डॉ. गिलाडा याचा गुन्हा काय?

तर एड्सवर त्याच्याकडे लस होती म्हणे आणि त्याच्याच तो बेकायदा चाचण्याही घेत होता.

पण तिकडे अमेरिकेत तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी एड्सला रोखण्याचा चंग बांधला. इतकी मोठी महासत्ता आणि या क्षुद्र विषाणूला रोखू शकत नाही, म्हणजे काय? याचा समूळ नायनाट करायचा त्यांचा निर्धार दिवसेंदिवस घट्ट होत गेला. अमेरिकेत जगातली उत्तमोत्तम वैद्यक विद्यापीठे आणि संशोधन संस्था आहेत. त्यातलीच एक म्हणजे बाल्टिमोर येथील मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटी. त्या विद्यापीठाच्या दीक्षान्तसारख्या एका विशेष समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून क्लिंटन निमंत्रित होते. ही १९९७ सालातील घटना. ही संधी साधत क्लिंटन यांनी समस्त वैज्ञानिक विश्वास एड्सचा प्रसार रोखण्यासाठी आवाहन केले आणि आव्हान दिले. एचआयव्हीची लस तयार करून दाखवा..!

त्यानंतर पुढच्या वर्षी हा दिवस ‘जागतिक एड्स लस दिन’ म्हणून पाळायचं वैद्यकविश्वानं ठरवलं. तो दिवस होता १८ मे. आज, १८ मे हा २३वा एड्स लस दिन होता. पण अजून एचआयव्हीची लस दृष्टिपथातही नाही.

या लशीच्या भरवशावर करोनाशी झुंजणारे आजचे वीर पाहताना या वेदनेचा वर्धापन दिन अधिकच वेदनादायी असेल.

@girishkuber