गिरीश कुबेर

गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा करोना आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या कथित औषधाच्या चर्चेस तोंड फुटल्याचे दिसते. आपल्याकडेही काही रुग्णालयांत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या परिणामकारकतेबाबत बोलले जाते. त्यात दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भर वार्ताहर परिषदेत ‘‘हो, मी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेतो..’’ असे जाहीर केल्याने सर्वच अवाक् झाले.

कोणत्याही देशाच्या सर्वोच्च नेत्याचे म्हणून काही अनुयायी असतात. ते तसे असावेत की नाही, हा मुद्दा वेगळा. पण असतात हे सत्य. त्यामुळे ट्रंप यांच्या या कबुलीचे काय-काय परिणाम होऊ शकतात यावर अनेक पातळ्यांवर टीका सुरू झाली. चांगलेच आहे ते. कोणाच्याही कोणत्याही निर्णयावर साधकबाधक चर्चा होणे हे तसेही (खऱ्या) लोकशाहीचेच लक्षण. त्या चर्चेचा आढावा आपण घेऊच. पण तसा तो घेण्याआधी खरा गंभीर मुद्दा हा की करोनावर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध असू शकते हे मुदलात या ट्रंपबाबांना सांगितले कोणी? हा प्रश्न काही रोजच्या गप्पा/बोलणे/चर्चा यांतला नाही. म्हणजे एखादा बरे वाटत नाही म्हणून मी आज अमुकतमुक औषध घेतले असे म्हणणे शक्य. पण म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेतले का असे काही तो विचारणार नाही. आणि हा शब्द उच्चारणेदेखील किती अवघड..

तर या विषयाचाही उगम अर्थातच वुहानमध्ये आहे. करोनाच्या आधी येऊन गेलेल्या याच विषाणूच्या आजारांत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर झाला होता, हे अनेकांना ठाऊक. मुळात हे औषध आहे मलेरियावरचे. पण सार्स, मर्स साथीत त्याचा वापर झालेला. त्यात वुहानमधल्या करोना डॉक्टरांना आणखी एक बाब लक्षात आली.

ती अशी, की करोनाबाधित रुग्णांमध्ये एकही जण असा नव्हता की ज्याला लुपस (Lupus) नावाच्या आजारावर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घ्यावे लागले होते. हा एक प्रकारचा ऑटोइम्युन आजार आहे. म्हणजे यात काहींची प्रतिकारशक्ती काही प्रसंगांत विचित्र वागते. ऑटोइम्युन आजार अनेक प्रकारचे असतात आणि काही तर जीवघेणेही ठरतात. या आजारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिले गेल्याने अनेक बरे झाले. तर वुहानचे निरीक्षण असे की लुपससाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेतल्याने बरे झालेल्या एकाही रुग्णाला करोनाने स्पर्श केलेला नाही. त्यामुळे करोना आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन यांच्यातील नातेसंबंध तपासायला सुरुवात झाली होती.

इकडे अमेरिकेत करोनाच्या बातम्या येऊन थडकत होत्या. त्याच्या आजाराचे गांभीर्य सुरुवातीला ट्रंपबाबा मान्य करत नव्हते. पण लवकरच परिस्थिती बदलली. साथ पसरत असल्याचे स्पष्ट दिसू लागले. अर्थातच त्यावर औषध तेव्हाही नव्हतेच. या करोनाची आधीची आवृत्ती असलेल्या सार्स, मार्स वगैरेत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची महत्त्वाची भूमिका चर्चेत होती. त्यात वुहानमधून आलेली लुपस आजार आणि करोना यांतील संबंधांची बातमी. यामुळे अमेरिकेतही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर करोना नियंत्रणासाठी करायला हवा, यावर सर्वाचे एकमत होते.

त्यातूनच संबंधितांनी औषध नियंत्रक प्रशासनाकडून, म्हणजे एफडीए, यासाठी परवानगी मागितली. या यंत्रणेने ती देताना स्वच्छपणे नमूद केले : सदर परवानगी केवळ चाचण्यांसाठी आहे. सबब, करोनावर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन तूर्त औषध समजले जाऊ नये.

येथपर्यंत सर्व काही ठीक होते. चाचण्यांची तयारी झाली. त्यासाठी आवश्यक ते स्वयंसेवक मिळाले आणि आता प्रत्यक्ष चाचण्या सुरू होणार त्याच्या आदल्या दिवशी, १६ मार्चला, टेस्लाचा प्रमुख वाचाळवीरोत्तम एलॉन मस्क याने ही बातमी ट्वीट केली. झाले.. या आजाराने बाधित अनेकांपर्यंत ती गेली आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन संबंधित औषधाची मागणीच वाढली. त्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशी करोनासंबंधित पत्रकार परिषदेत ट्रंप यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे किती अविश्वसनीय वाटेल इतके उत्तम औषध असेल याविषयी या औषधाच्या बाजूने मतप्रदर्शन केले. तरीही औषध प्रशासनास ही बाब मान्य नव्हतीच आणि अजूनही नाही.

पण याच सुमारास न्यू यॉर्कमधील व्लादिमीर झेलेंको नावाच्या वैद्यकाने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि अन्य दोन औषधांच्या मिश्रणातून आपले करोना रुग्ण कसे बरे होत आहेत याचे बनावट व्हिडीओ समाजमाध्यमात सोडायला सुरुवात केली. त्याचाही परिणाम व्हायला लागला आणि नेमक्या त्याच वेळी ओरॅकल या विख्यात सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख लॅरी एलिसन याने ट्रंप यांच्याकडे शब्द टाकला : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मिळवायला सुरुवात करा.

त्यानंतर काय काय घडले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘वायर्ड’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आदी काही वृत्तसेवांनी या सगळ्यावर विस्तृत लिखाण/भाष्य केले आहे. मुख्य म्हणजे सर्वाना धुडकावून ट्रंप अजूनही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा प्रसार निर्धास्तपणे करीत आहेत.

तात्पर्य : उच्चपदस्थांचे गैरसमज हे सत्य आहे असा समज सामान्यांनी करून घेणे शहाणपणाचे.

@girishkuber