गिरीश कुबेर

नील फर्ग्युसन या एका साथआजार तज्ज्ञ/ प्राध्यापक/ अर्थतज्ज्ञ अशा आदरणीय व्यक्तीने इंग्लंडमध्ये करोनामुळे अडीच-तीन लाख नागरिक मरतील, असा जाहीर इशारा दिला आणि पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचे अवसान गळाले. तोपर्यंत जॉन्सन हे ब्रिटनमध्ये सामुदायिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार व्हायला हवी या मताचे होते. म्हणजे सुमारे ५० ते ६० टक्के नागरिकांना करोनाची बाधा झाली की जनतेत आपोआप या आजाराविषयी प्रतिकारशक्ती तयार होईल, असे मानणारे. जॉन्सन त्याच पद्धतीने करोना हाताळणी करीत होते.

पण नील फर्ग्युसन यांचा होरा आला आणि त्यांनी आपल्या करोना हाताळणीची दिशा पूर्णपणे बदलली. ठिकठिकाणी टाळेबंदी जाहीर केली, प्रचंड प्रमाणावर व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स वगरे वगरे खरेदी करण्यासाठी मोठी तरतूद केली. आणि त्यात त्यांना स्वत:ला करोनादंश झाला. रुग्णालयात दाखल करायची वेळ आली. ऑक्सिजनवर होते ते काही काळ. त्यामुळे एका वर्गाकडून ‘बरी जिरली बोरीसबाबाची’ अशी प्रतिक्रिया त्यांच्याविषयी व्यक्त झाली असणार. साहजिकच आहे असे होणे. त्यात त्या देशाची राणी, राजपुत्र चार्ल्स अशा मातबरांना या करोनाने घायाळ केले. त्यामुळे तर त्याविषयी चांगलीच दहशत तयार झाली. एव्हाना युरोपातल्या अन्य देशांत करोनाने हाहाकार उडवला होता. करोनाबाधितांचे प्राण जाण्याचा वेग इतका भयावह होता की मती गुंग व्हावी.

साहजिकच या काळात फर्ग्युसन हे जणू करोना काळाचे नायक बनले. अमेरिकेनेही त्यांचा आधार घेतला. फर्ग्युसन यांनी तयार केलेल्या प्रारूपाच्या आधारे अमेरिकेतही मरणाऱ्यांचे भाकीत वर्तवणाऱ्यांचे पेव फुटले. यानुसार व्यक्त झालेला पहिला अंदाज होता २० लाखांचा. म्हणजे इतके अमेरिकी ख्रिस्तवासी होतील. सुदैवाने तसे काही झाले नाही. आता तर हा अंदाज दिवसागणिक बदलू लागला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तो मध्यंतरी एक लाखापर्यंत खाली आणला. मध्येच तो दोन लाखांपर्यंत गेला. हे अर्थातच त्यांच्या स्वभावानुसार झाले असे म्हणता येईल. आले ट्रम्पोजीच्या मना.. या वास्तवाची जाणीव अमेरिकनांना एव्हाना झाली असेलच.

पण इंग्लंडमधे हा करोना आलेख आता स्थिरावला आहे. पंतप्रधान जॉन्सन यांनी आजच, रविवारी, यास अधिकृत दुजोरा दिला. त्यांनी हा मुद्दा योग्य पद्धतीने समजावून सांगितला. ‘‘बऱ्याचदा एखादे अवघड शिखर आपण काबीज करतो. त्यामुळे एक प्रकारचा विश्वास मनात तयार होतो. आणि त्याच विश्वासात आपण परतीचा, उतरणीचा प्रवास सुरू करतो. तेथे नेमका घात होतो,’’ असे त्यांचे म्हणणे. ते शहाणपणाचेच. तेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार करोनाची साथ काही प्रमाणात नियंत्रणात आली असली तरी आपला पहारा सल करण्याचे कारण नाही. तेही ठीक.

एव्हाना ब्रिटिश जनतेलाही या सगळ्याचे भान येत असावे. कारण अनेक देशांत मृतांचे अंदाज वर्तवणाऱ्यांचा हिशेब करायला सुरुवात झाली आहे. यात फर्ग्युसनही आले. हा मजकूर लिहिला जात असताना ब्रिटनमधे करोनामुळे प्राण गेलेल्यांची संख्या होती ३१,५८७. सुरुवातीच्या काळात ब्रिटनने बेफिकिरी दाखवली वगरे मान्य केले तरी फर्ग्युसन यांनी व्यक्त केलेल्या अडीच लाख बळींच्या जवळपास देखील त्यांचे भाकीत पोचलेले नाही. ही अर्थातच चांगली बाब. मरणाचा अंदाज चुकणे स्वागतार्हच तसे.

पण यामुळे फर्ग्युसन आणि तत्समांच्या प्रारूपाविषयीच शंका व्यक्त व्हायला लागल्या आहेत. तेही स्वागतार्हच. याचे कारण असे की या फर्ग्युसन यांनी २००१ साली जनावरांना झालेल्या बुळकांडय़ा आजारामुळे संभाव्य बाधितांची संख्याही अशीच अचाट असेल असा ‘अंदाज’ व्यक्त केला होता. तो निम्म्याच्या निम्म्याने चुकला. नंतर बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू या आजारांबाबतही असेच झाले. गणितात शंभरपकी नव्वद मिळतील असा अंदाज वर्तवणाऱ्यास प्रत्यक्षात पाचदहा मिळावेत तसा हा प्रकार. करोना काळात अनेक तज्ज्ञांबाबत तो घडला.

पण नील फर्ग्युसन यांच्यासारख्या तज्ज्ञांचा अंदाज चुकला हा या लेखाचा मुख्य विषय नाही. तर पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या सल्लागारपदाचा राजीनामा या प्राध्यापकास द्यावा लागला, हा मुद्दा आहे. आणि हा राजीनामा फर्ग्युसन यांचा अंदाज चुकला म्हणून द्यावा लागलेला नाही, ही आणखी एक महत्त्वाची बाब. मग ते पायउतार का झाले?

फर्ग्युसन हे जगात प्रत्येकाने या काळात कडकडीत बंद पाळावा या मताचे. त्यासाठी सरकारांनी निष्ठूरपणे टाळेबंदी लावायलाच हवी असा आग्रह धरणारे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी एकमेकांपासून अंतर राखायला हवेच हवे असे जाहीर सांगणारे.. तशी भूमिका घेणारे.. देशोदेशीच्या प्रमुखांना तसा सल्ला देणारे आणि हे ‘अंतर’विज्ञान जगाच्या गळी उतरवणारे. पण या अंतरसोवळे पाळायच्या काळात त्यांची एक मत्रीण त्यांना अंत:पुरात भेटून गेल्याचा बभ्रा झाला आणि अंतरसोवळे नियमांचा भंग झाल्याची कबुली देत त्यांना पदत्याग करावा लागला.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे संपादक जेरार्ड बेकर यांनी या निमित्ताने सध्याच्या टाळेबंदी पर्यायाचा फोलपणा नेमकेपणाने व्यक्त केला. फर्ग्युसनयांच्यासारख्यांचा उल्लेख ते ‘टाळेबंदीवादी अतिरेकी’ असा करतात आणि माध्यमांची संभावना ‘सरकारांचे प्रतिध्वनीकक्ष’ अशी करतात. सरकार जे काही म्हणते त्याचाच प्रतिध्वनी माध्यमांतून दिसतो, असे त्यांचे म्हणणे. या दोहोंत अधिक धोकादायक कोण?

@girishkuber