07 July 2020

News Flash

कोविडोस्कोप : ‘पीपीई’चे पेहराव पुराण!

पीपीई पेहराव कोणा एकाच रोगापासून संरक्षण देतील अशी हमी देता येत नाही

गिरीश कुबेर

परवा एका डॉक्टर मित्राचा फोन आला. सरकारी नोकरीत आहे तो. आणि सध्या करोनाकाळ हाताळणीतही गुंतलेला आहे. सजग आणि चौकस असल्यामुळे करोनाच्या सरकारी हाताळणीतल्या ‘सब घोडे बारा टक्के’ धोरणविचारातल्या भेगा त्याला जास्त दिसतात. पण त्याचा फोन यासाठी नव्हता. ‘‘हे पीपीई किट्स करोना हाताळणीत आपल्याकडेही अत्यावश्यक आहेत, हे ठरवले कोणी,’’ असा त्याचा संताप/ उद्वेग/ असाहाय्यता/ निराशा/ हताशा वगैरे वगैरे दर्शक प्रश्न.

त्यामागे काय झाले असेल ते ओळखणे अवघड नाही. ते तसेच झाले होते. त्यात त्याच्या एका मित्राची पत्नी या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स ‘पीपीई’ पेहरावात आठ तास राहावे लागल्याने भंजाळून बेशुद्ध झाल्याचा प्रकार नुकताच घडला होता. ‘‘या तपमानात पीपीईच्या आतून काम करण्यापेक्षा मी जन्मभर काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला तयार आहे,’’ असे त्यावर या मित्राचे म्हणणे. यावर काहीही करता येण्यासारखे नसल्याने अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’चे म्हणजे वैद्यकविश्वातील सर्वशक्तिमान ‘एफडीए’चे या पीपीई विषयावर काय मत आहे हे पाहण्याचे ठरवले. त्यातून जी माहिती हाती लागली ती साधारण याप्रमाणे..

१. रसायने, द्रव, स्पर्श, श्वासोच्छ्वास यातून कोणत्याही प्रकारे संसर्ग होऊ नये यासाठी हे पीपीई किट्स बनवले जातात. एफडीएने त्यासाठी काही दर्जानिश्चिती निकष नक्की केले आहेत. या सर्व निकषांचे पालन करून पीपीई पेहराव बनवला गेल्यास तो रोगप्रसारापासून रोखण्याची ‘बऱ्यापैकी’ (रीझनेबल.. शब्द लक्षात घ्यायला हवा. म्हणजे नक्की नाही.) खात्री देतो.

२. हे पीपीई पेहराव कोणा एकाच रोगापासून संरक्षण देतील अशी हमी देता येत नाही. म्हणजे हा पेहराव सर्वसाधारणपणे सर्वच साथीच्या आजारांपासून सुरक्षा देणे अपेक्षित आहे. तरीही ‘‘हे पीपीई किट्स कोणा एका विशिष्ट आजारापासून तुमचे रक्षण करतील याची हमी एफडीए अथवा या पेहरावांचा निर्माता देऊ शकणार नाही,’’ असे ती यंत्रणा स्पष्ट सांगते.

३. साथीच्या आजाराने बाधित पण घरात उपचार घेणाऱ्याने काही एक परिस्थितीत पीपीईचा वापर करावा असे ‘कदाचित’ वैद्यक तज्ज्ञ सांगतील. पण हे लक्षात घ्यायला हवे की ‘‘केवळ पीपीई परिधान केले आहे म्हणून आपणास त्या आजाराची बाधा होणार नाही वा आपणाकडून त्याचा प्रसार होणार नाही, असे कोणी समजू नये,’’ असे एफडीए बजावते. ‘‘पीपीई असले, तरी हात धुणे, खोकताना/शिंकताना काळजी घेणे यास पर्याय नाही.’’

४. पीपीईची विल्हेवाट लावणे हे तो परिधान करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे दिसते. अयोग्य पद्धतीने तो अंगावरून काढणे आणि त्याची अयोग्य विल्हेवाट अत्यंत धोकादायक.

५. बहुतांशी पीपीई हे फक्त आणि फक्त एकदाच वापरण्यासाठी बनवलेले असतात. एकदाच आणि तेसुद्धा एकाच व्यक्तीने. धुऊन पुन्हा वापरणे असे काही याबाबत शक्य नाही. एकदा वापरलेला पीपीई हा लगेच जरी अंगावरून काढला तरी तो शास्त्रीय पद्धतीनेच मोडीत काढायला हवा. कोणत्याही परिस्थितीत तो पुन्हा कोणाच्याही अंगावर चढता नये.

६. पीपीईचा उपयोग रोगप्रसाराच्या अन्य सर्व उपायांच्या साथीनेच केला जाणे अपेक्षित आहे. तसेच भिन्न-भिन्न निर्मात्यांनुसार पीपीई पेहरावांची परिणामकारकताही बदलू शकते. त्यामुळे प्रत्येक पीपीई पेहरावाचे मूल्यमापन स्वतंत्रच हवे.

अशी बरीच माहिती या सध्या बहुलोकप्रिय पीपीईविषयी एफडीएकडून देण्यात आली आहे. तिचे संकलन करून मी ही माहिती या डॉक्टर मित्राला पाठवली. त्यावर त्याची प्रतिक्रिया अशी : ‘‘याचा अर्थ करोनाकालीन मंदीच्या काळात काही कंपन्यांना तरी चांगली व्यवसायसंधी आहे याचा आनंद आहे. आरोग्याइतकीच अर्थव्यवस्थाही महत्त्वाची. काही कंपन्यांची तरी ती यामुळे सुधारेल..’’

@girishkuber                   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 1:37 am

Web Title: covidoscope personal protective equipment information about ppe kit zws 70
Next Stories
1 करोनाप्रसाराची भाकिते करताना संशोधकांची नैतिक जबाबदारी
2 कोविडोस्कोप : विविधतेतील एकता
3 करोनाशी ‘तह’ करताना माहिती हेच अस्त्र!
Just Now!
X