२००९ साली ‘..आणि दोन हात’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहून मराठी साहित्यक्षेत्रात सलामीलाच विजयश्री संपादन करणारे ख्यातनाम शल्यकर्मी डॉ. वि. ना. श्रीखंडे यांना यकृत-स्वादुपिंड-पित्ताशयविषयक आंतराष्ट्रीय संघटनेने अलीकडेच त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला. त्यानिमित्त..
२००९ साली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शल्यविशारद डॉ. वि. ना. ऊर्फ विनायक नागेश श्रीखंडे यांचं ‘..आणि दोन हात’, हे आत्मकथन हातात पडलं आणि ते वाचून हातावेगळं केलं तेव्हा अक्षरश: भारावून गेले. पण वाचून संपवल्यावरही मनाला एक चुटपुट लागून राहिली. पुस्तकाच्या शीर्षकातील टिंबमालिकेचा (..) अर्थ काय याची उकल होईना.
‘..आणि दोन हात’ या शब्दांच्या आधीची मोकळी जागा भरण्यासाठी कोणते शब्द आवश्यक आणि अपेक्षित आहेत याचं उत्तर शोधून काढण्याचा मनाला चाळाच लागला. इतर काही वाचन करीत असताना अचानक एक साक्षात्कार झाला. मानवी जीवनात head, heart and hands या तिघांचा संगम होणं आवश्यक असतं. संस्कृतमध्येही अशीच एक हकारत्रयी आहे- हृषीक (ज्ञानेंद्रिय म्हणजे मर्यादित अर्थाने मस्तक), हृदय (सहृदयता) आणि हस्त (हातांचे कष्ट व कौशल्य)- या तिघांची सांगड जमली की, माणसाकडून लोकोत्तर कार्ये घडतात. हे कळल्याबरोबर ‘..आणि दोन हात’ या शीर्षकामागची मोकळी जागा भरून आली.
जुन्या काळी काही योगायोगाने डॉ. श्रीखंडे यांचे वडील कै. नागेशराव श्रीखंडे यांच्या हाताखाली काम करण्याची मला संधी मिळाली होती व त्यांच्या कुटुंबाशी माझा घनिष्ठ परिचय होता. परंतु डॉ. श्रीखंडे हे आपल्या व्यवसायात कार्यमग्न असल्यामुळे खुद्द त्यांच्याशी कित्येक र्वष माझा फारसा संपर्क नव्हता; पण अचानक त्यांचं पुस्तक हाती आल्यामुळे त्या निमित्ताने अलीकडे त्यांची खरी ओळख पटली.
डॉक्टरांचा सारा जीवनप्रवास म्हणजे ‘सामान्यातून असामान्यत्व’ कसं साकारू शकतं याचं झळझळीत उदाहरण आहे. जन्मजात वाचादोषामुळं मनात न्यूनगंडाची भावना रुजण्याचा धोका असतानाही आई-वडिलांच्या व भावाबहिणींच्या पाठिंब्यामुळं डॉक्टरांच्या मनोभूमीत त्या भावनेनं मूळ धरलं नाही आणि हळूहळू आपल्या हातात काहीतरी वेगळं कसब आहे याची त्यांना जाणीव होऊ लागली.
१९५३ साली एम.बी.बी.एस. होऊन   डॉ. श्रीखंडे यांनी काही र्वष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात यशस्वी उमेदवारी केली. १९५७ साली ते एफआरसीएसच्या उच्च शिक्षणासाठी परदेशी प्रस्थान ठेवण्यापूर्वी वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. तेव्हा वडील म्हणाले, ‘तिकडे जाऊन तू खूप शीक, पण भारतात परत ये, कारण आपल्या देशात असंख्य लोकांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. तू सर्वसामान्य माणसांचा असामान्य सर्जन हो!’ डॉक्टरांनी हे उद्गार मनात साठवून जन्मभर सोबत वागवले आणि कृतीत उतरवले.
आपल्या असामान्य बुद्धीचा उपयोग त्यांनी सामान्य माणसांना व्याधीमुक्त करण्यासाठी कसा केला त्याची असंख्य उदाहरणं त्यांच्या खात्यावर जमा आहेत. पण १९९४ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीवर त्यांनी जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली तेव्हा, लौकिकदृष्टय़ा डॉक्टरांचा मोठा सन्मान झाला हे खरंच; पण त्याचबरोबर तेव्हापासून भारतातील उच्चपदस्थांचा परदेशी डॉक्टरांकडील ओढा कमी होऊन त्यांचा भारतीय डॉक्टरांवरील विश्वास दृढमूल झाला ही त्या घटनेची फलश्रुती होय, असं डॉ. श्रीखंडे मानतात.
कोणतीही शस्त्रक्रिया छोटी असो वा मोठी असो, रुग्ण व्यक्ती सर्वसामान्य असो वा असामान्य (व्हीआयपी); डॉ. श्रीखंडे कोणतीच शल्यक्रिया क्षुल्लक मानत नाहीत. किरकोळ वा मोठी शल्यक्रिया ते सारख्याच एकाग्रतेने व गांभीर्याने करतात आणि आपलं शल्यकौशल्य पणाला लावतात. प्रत्येक शस्त्रक्रिया म्हणजे नवीन काहीतरी शिकण्याची संधी असंच ते मानतात आणि त्यामुळंच दरवेळी अनुभवान्ती आपल्या शस्त्रकर्मात ते काहीतरी सुधारणा घडवून आणतात. म्हणून ते खऱ्या अर्थाने ‘सर्जनशील सर्जन’ आहेत असंच म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया कक्षात त्यांच्यासोबत जे परिचर व परिचारिका असतात, त्यांच्याकडूनही ‘बालादपि सुभाषितम्’ अशा वृत्तीने काहीतरी शिकण्यास ते उत्सुक असतात. पूर्वायुष्यात स्वत:मधील कमतरतेमुळे काही प्रसंगी त्यांच्यावर जे मानहानीचे प्रसंग आले, त्या सर्वावर मात करून ते आता सुप्रतिष्ठित झाले असल्यामुळे ते कोणाही सामान्य वाटणाऱ्या व्यक्तीला कमी लेखत नाहीत.
त्यांच्या आत्मकथनातील एका प्रकरणाचा मथळा मोठा गमतीशीर आहे- ‘सर्जरीचा रियाज’. याचा अर्थ असा की, डॉ. श्रीखंडे शल्यक्रिया हा जणू एक प्रकारचा सांगीतिक सरावच आहे असं मानतात. संगीतात ‘आलापचारी’ म्हणजे आवाज लावण्याची पूर्वतयारी करणं होय. प्रत्येक शस्त्रक्रियेच्या आधल्या दिवशी डॉक्टरांनीच वर्णन केल्याप्रमाणे ते मनातल्या मनात त्या शस्त्रक्रियेची काल्पनिक रंगीत तालीम करतात. अर्जुनाने ज्याप्रमाणे पोपटाचा डोळा हेच आपलं लक्ष्य मानून त्यावर लक्ष केंद्रित केलं होतं, त्याप्रमाणे रुग्णाचा व्याधिग्रस्त अवयव हेच डॉक्टरांचं लक्ष्य असतं. ही एक कलाकारीच मानल्यामुळे डॉक्टर तिच्यात लीलया तल्लीन होतात व त्यांची ‘सहजसमाधी’ लागते.
असाच रियाज करून डॉक्टरांनी आपल्या उपजत वाचादोषावर मात तर केलीच, पण शिवाय कष्टसाध्य अशी वक्तृत्वकलाही आत्मसात केली. त्यामुळंच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना व्याख्यानांसाठी सन्मानाने निमंत्रित केलं जातं.
A bad workman quarrels with his tools  अशी एक म्हण आहे. याउलट तल्लख बुद्धी, संवेदनशील मन आणि कुशल हात एवढी पुंजी जवळ असली की, कोणाही शल्यकर्मीच्या मार्गात साधनांची कमतरता वा त्यांचा अपुरेपणा फार आड येत नाही, हे खरं असलं तरी कालमानानुसार अद्ययावत शस्त्रसाधनांची सुसज्जता असणं हेही आवश्यक आहे. याची डॉ. श्रीखंडे यांना जाण होती व म्हणूनच त्यांनी काही वर्षांपूर्वी नव्याने आलेलं ‘एण्डोस्कोप’ म्हणजे ‘अंतिर्विक्ष’ हे उपकरण अगत्याने मागवले व त्याचा उपयोग करून रुग्णांचे अचूक निदान करण्यास सुरुवात केली. या उपकरणाच्या आधारे ते जसे रुग्णाच्या पोटात शिरत तसे ते त्याच्या मनातही शिरकाव करून घेत आणि रुग्णाला शस्त्रक्रियेतील एक निष्क्रिय घटक न मानता, सकारात्मक मानसिक प्रतिसाद देणारा घटक मानून त्याचाही सहभाग वाढवीत.
या व्यावसायिक जीवनाबरोबरच खासगी आयुष्यात डॉक्टरांनी ग्रंथसाहित्य व इतर कला यांबद्दलची रसिकता जोपासून आयुष्याला एक रंगत आणली. त्यांच्या या पुस्तकात ठायीठायी त्यांच्या बहुश्रुततेचा प्रत्यय येतो. इंग्रजी साहित्याबरोबरच मराठी साहित्याचीही त्यांना जाण आहे. त्यांचं स्वत:चं व त्यांच्या मुलांचंही शालेय शिक्षण मातृभाषेतून झालंच आहे पण प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झालं तरच प्रत्येकाला आपल्या समाजाच्या संस्कृतीची ओळख होईल, या मुद्दय़ावर ते आजही ठाम आहेत. कारण वैद्यकीय शिक्षण-प्रवेशासाठी मुलाखतीला आलेल्या एका उमेदवाराला बाबा आमटे यांचं नाव ठाऊक  नव्हतं, हे अनुभवल्यावर त्यांना खेद वाटला. १९७९च्या सुमारास (कै.) डॉ. अरुण लिमये यांनी ‘क्लोरोफॉर्म’ या पुस्तकाद्वारे वैद्यकीय व्यवसायाची काळी बाजू उजेडात आणून एकच खळबळ माजवून दिली. तेव्हा डॉ. श्रीखंडे यांनी मोठय़ा धाडसाने व परखडपणे त्याचा प्रतिवाद केला.
साधारणपणे वयाच्या पंचाहत्तरीनंतर बहुसंख्य डॉक्टर मंडळी निवृत्तिमार्गाला लागतात. पण आजमितीला वयाची ८० र्वष पूर्ण करीत असताना काल-परवापर्यंत ते खऱ्या अर्थानं शस्त्रक्रियारत डॉक्टर होते. (नुकतीच त्यांच्या हृदयावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली, तेव्हाच काहीसा खंड पडला.) पंचाहत्तरीनंतर अलीकडेच त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचं स्थित्यंतर घडलं. आजपर्यंत ज्या हातांनी त्यांनी वैद्यकीय शस्त्रं हाताळली त्याच कसबी हातात त्यांनी लेखणी धरली. ‘जे जे आपणांसि ठावें तें इतरांसी शिकवावें’ अशी शिकवण देणारे समर्थ रामदासस्वामी आणि डॉक्टरांनी आत्मकथनपर लिखाण करावं, असा रेटा लावणारे आधुनिक रामदास (भटकळ) अशा दुहेरी रामदासी प्रेरणेमुळं डॉक्टर हे पुस्तक लिहिण्यास उद्युक्त झाले. आजवर वैद्यकीय जीवनात डॉक्टरांनी जेवढय़ा शस्त्रक्रिया केल्या त्यापेक्षा काही अधिक शस्त्रक्रिया त्यांनी टाळलेल्या आहेत. रुग्ण समोर आला की, आर्थिकदृष्टय़ा व अन्य प्रकारे त्याला कापण्यास उत्सुक असलेल्या कसाबकरणीच्या बहुसंख्य डॉक्टरांच्या आजच्या जमान्यात डॉ. श्रीखंडे एखाद्या रुग्णावरील शस्त्रक्रिया टाळून इतर उपचारांनी तो बरा होऊ शकेल का, याचा प्रथम विचार करतात आणि ते अशक्य असेल तरच निर्वाणीचा उपाय म्हणून हाती शस्त्र धरतात तेव्हा, आपण खरोखरी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो.
२००९ साली डॉक्टरांचं हे पुस्तक ‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे प्रकाशित झालं तेव्हा, एखाद-दुसरा अपवाद वगळता वृत्तपत्रांतून कोठेही त्याचा परिचय वा परीक्षण न आल्यानं रूढार्थानं हे पुस्तक गाजलं वा गाजवलं गेलं नाही; परंतु त्यांना ओळखणाऱ्या व न ओळखणाऱ्या असंख्य वाचकांनी खुशीपत्रं लिहून त्यांना भरभरून प्रतिसाद दिला व ते वाचकांच्या अंत:करणात निनादत मात्र राहिलं. सुदैवानं या पुस्तकाला पुण्याच्या ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा, ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा व नुकताच ‘कोकण मराठी साहित्य परिषद’चाही साहित्य पुरस्कार जाहीर झाला. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांना अनेक सन्मान लाभलेले असले तरी, साहित्यक्षेत्रातील या पुरस्कारांचं त्यांना अधिक अप्रूप वाटतं.
अलीकडेच डॉ. श्रीखंडे यांच्याप्रमाणे ‘ताठ कण्या’चे डॉ. प्रेमानंद रामाणी, डॉ. रा. भा. भागवत, डॉ. हिंमतराव बावस्कर, डॉ. प्रकाश आमटे अशांसारख्या काही सत्त्वशील डॉक्टरांचीही आत्मकथनं प्रसिद्ध झाली आहेत. सार्वत्रिक भ्रष्टाचारानं बरबटलेल्या मिट्ट काळोखात या मिणमिणत्या पणत्याच काय त्या तेवताहेत. ‘पणती जपून ठेवा, अंधार फार झाला’ ही हिमांशू कुलकर्णी यांची गजल डॉ. श्रीखंडे यांना फार आवडते. आपण सर्वानीच या पणत्या जपून ठेवल्या पाहिजेत आणि आणखी पणत्या लावून अंधार अधिकाधिक उजळला पाहिजे.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी