News Flash

डाळिंबावर तेल्याचे संकट

माणदेशाच्या भूमीत यंदा बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर तेल्याचा घाला झाला आहे

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

करोनावर जसे खात्रीलायक औषध नाही त्याप्रमाणेच डाळिंबावर पडलेल्या ‘तेल्या’ आजाराचे आहे. या तेल्या रोगाने डाळिंब उत्पादक पुरता हैराण झाला आहे. आटपाडी, सांगोला तालुक्यातील सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावरील डाळिंब बागा यंदा तेल्याच्या कचाटय़ात सापडल्या आहेत.

माणदेशाच्या भूमीत यंदा बदलत्या हवामानामुळे डाळिंबावर तेल्याचा घाला झाला आहे. ज्या पध्दतीने करोनावर खात्रीलायक औषध नाही त्याप्रमाणेच तेल्यावर जालीम उपाय अद्याप सापडला नसल्याने यंदाची डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी कडू होणार आहे. यंदाचा उन्हाळी हंगाम तेल्याने पुरता मातीमोल तर केलाच आहे, पण मृग बहारही शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणारा ठरला आहे. आटपाडी, सांगोला तालुक्यातील सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावरील डाळिंब बागा यंदा तेल्याच्या कचाटय़ात सापडल्या आहेत.

कायमचा दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या माणदेशात डाळिंबाने गेल्या तीन दशकात कृषी क्रांती घडवून आणली आहे. अल्प पाण्यावर माळरानात जोमाने वाढणारे डाळिंब पीक हक्काचे उत्पन्नाचे साधन बनले आहे. माणदेशातील माण, आटपाडी आणि सांगोला तालुक्यासह जत तालुक्यात डाळिंबाखालील क्षेत्र वाढले आहे. लाल चुटुक डाळिंबाचे दाणे परकीय चलन मिळवून देणारे तर  आहेच, पण भगवा, गणेश डाळिंब या जाती देशांतर्गत बाजारपेठेतही चांगला जम बसवत आहेत. टणक कवचामुळे अन्य फळापेक्षा आपला वेगळा दर्जा राखून आहे.

डाळिंबाची फळधारणा तीन हंगामात होते. मात्र अधिक उत्पन्न येण्यासाठी झाडाला विश्रांती देऊन एकच हंगाम धरला जातो. आंबा, मृग आणि हस्त बहार हे तीन हंगाम. यापैकी माणदेश हा मान्सूनचा फारसा गवगवा नसलेला भाग आणि कमी पर्जन्यछायेचा  प्रदेश असल्याने प्रामुख्याने मृग बहारच धरला जातो. आंबा बहार धरण्यासाठी प्रामुख्याने उन्हाळ्यात पाण्याची गरज असते, मुळात पाणीच कमी असल्याने हा बहार ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे तेच शेतकरी धरतात. हस्त बहार धरला तर कळी सेटिंग होण्यावेळीच परतीचा मान्सून झोडपण्याची शक्यता असल्याने हा बहार टाळला जातो. याऐवजी मृग बहार हमखास खात्रीलायक असल्याने याच हंगामातील बहार धरण्याचा प्रघात माणदेशातील शेतकऱ्यांचा आहे.

यंदा मान्सूनच्या हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक पाउस झाला. अगदी जुलअखेर विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने मृग बहारात धरण्यात आलेल्या कळीमध्ये फळधारणा झालीच नाही. कळीमध्ये पाणी साचल्याने कळी गळून पडली. बहार सुरू झाल्यापासून फळ बाजारात पाठविण्यायोग्य होण्यापर्यंत भांडवली गुंतवणूक वगळता एकरी सत्तर हजार ते एक लाखापर्यंतचा खर्च येतो.

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात बहार धरलेल्या बागा या तेल्या रोगाने धोक्यात आल्या आहेत. तालुक्यातील सुमारे तीन हजार एकर क्षेत्र तेल्याने बाधित झाले आहे. एकीकडे यंदाच्या बदलत्या पावसाने मृग बहारातील कळी गळाली तर उन्हाळी हंगामातील बागा तेल्यामुळे फळ डागाळले.

तालुक्यात मागील वर्षी सतत रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे मृगबहार पूर्ण वाया गेला. बागांना विश्रांती मिळाली होती. पाऊस पडल्यामुळे अनेक भागात उन्हाळ्यात विहिरींना चांगले पाणी होते. त्यामुळे तालुक्यात तीन हजार एकर क्षेत्रावर उन्हाळी हंगाम धरला होता. आटपाडी, करगणी, काळेवाडी, माळेवाडी, गोमेवाडी, बाळेवाडी, शेटफळेसह पूर्व भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी जानेवारी, फेब्रुवारी तर काही शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिलमध्ये बागा धरल्या होत्या. या बागांना स्वच्छ सूर्यप्रकाश लाभल्याने फळाचे चांगले सेटिंग झाले. मोठय़ा प्रमाणावर फळे लागली पण एप्रिलमध्ये दोन वादळी पाऊस झाले. त्यानंतर मे च्या शेवटच्या आठवडय़ात पावसाची सुरुवात झाली.

जुलअखेर मध्येही पंधरा दिवस सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत होता. त्यामुळे हवेत प्रचंड आर्द्रता वाढून उष्णता वाढली. बागांमध्ये पाण्याचे बाष्पीभवन होऊन प्रचंड उष्णता वाढल्यामुळे त्याचा परिणाम फळावर झाला. बागांमध्ये अंतिम टप्प्यातील आणि सेटिंग होऊन हिरव्या अवस्थेत असलेल्या फळावर मोठय़ा प्रमाणावर तेलकट रोगाने हल्ला केला. आटपाडी येथील विजय माळी यांच्या आटपाडी-दिघंची रस्त्यावरील तीन एकर क्षेत्रावरील बाग तेल्याने उद्ध्वस्त झाली. डाळिंब काढून टाकावी लागली.

करगणी येथील विठ्ठल जाधव यांची तर तब्बल सहा हजार झाडे तेलकट रोगाने पछाडली. रमेश खिलारी, सचिन खिलारी, महेश खिलारी, तळेवाडीचे विठ्ठल सरगर, माळेवाडीचे दत्तात्रय चव्हाण यांच्यासह, भिंगेवाडी, मासाळवाडी, पुजारवाडीसह तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या बागा  तेल्या रोगाने पूर्ण वाया गेल्या आहेत.

डाळिंब तज्ज्ञांच्या शिफारशीप्रमाणे अनेकांनी औषध फवारणी केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. मे पूर्वी धरलेल्या बहुतांश भागांमध्ये  तेल्या  रोगाने शिरकाव केला आहे. अनेक बागा वाया गेल्या आहेत, तर काही बागा वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे तेल्याचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.तालुक्यातील डाळिंब  बागांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील हीटला पण तोंड द्यावे लागणार आहे. निसर्गाच्या या तडाख्याने डाळिंब उत्पादक शेतकरी हबकला आहे.

मार्चमध्ये तीन एकर क्षेत्रावर एकावेळी डाळिंब बाग धरली. उन्हाळ्यात स्वच्छ वातावरण असते. पण या वर्षी वातावरण  तेल्या रोगाला पोषक होते. सर्व झाडे तेल्या रोगाने झाकोळून गेली. तीन ते चार लाख रुपये केलेला खर्च वाया गेला आहे आणि आठ ते दहा लाख रुपयांच्या संभाव्य उत्पन्नावर पाणी फिरले गेले आहे.

– विजय माळी, आटपाडी

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने उन्हाळी हंगामासाठी पुरेसे पाणी होते. यामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मृग बहार घेण्यासाठी कळी सेट केली होती. मात्र यंदा ऐन मान्सूनमध्ये कधी न पडणाऱ्या पावसाने सातत्य राखले. यामुळे कळीकुज, डांबऱ्या याने बागातील ७० टक्के फळधारणा वाया गेली. डाळिंबावर पडणाऱ्या तेल्या रोगावर  सोलापूरच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रात मागील दहा वर्षांपासून संशोधन सुरू आहे. परंतु अद्याप या संकटावर कोणताही उपाय सापडलेला नाही.  कमी पर्जन्यछायेच्या प्रदेशात डाळिंब लागवड  लाभदायी ठरत असताना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासनाकडूनही मदतीची अपेक्षा आहे. परकीय चलन मिळवून देणारे हे  पीक वाचविण्यासाठी अधिक संशोधन होण्याची गरज आहे. फळ पीक विमा योजनेमध्ये डाळिंबावरील तेल्या या रोगाचा समावेश केला गेला, तर उत्पादकांना निश्चित उत्पन्नाची हमी नसली तरी नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे

– केशव मिसाळ, सोमनाथ कुंभार, दिघंची.

digambar.shinde@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:11 am

Web Title: crisis of telya disease on pomegranate abn 97
Next Stories
1 दुष्काळावर मात करणारी ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती
2 सर्वकार्येषु सर्वदा : जीवनशाळा
3 शिक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा!
Just Now!
X