26 May 2020

News Flash

‘एकसांस्कृतिक’ राष्ट्रवादाचा खटाटोप? 

मुळात एखाद्या राज्याने ‘पिसा’सारखी आंतरराष्ट्रीय परीक्षा देण्याच्या हेतूने शेकडो शाळा उघडणं धक्कादायक आहे.

 

|| किशोर दरक

इयत्ता चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास ‘जड’ वाटेल, म्हणून तो वगळणाऱ्या ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळा’च्या (एमआयईबी) नव्या पाठय़पुस्तकांत तसेच शिक्षकांसाठी या मंडळाने तयार केलेल्या पुस्तिकांत असे बरेच काही आहे, ज्यावर शिक्षणतज्ज्ञांचे आक्षेप असू शकतात. त्याविषयीचे हे टिपण..

मावळत्या सरकारच्या उत्तरार्धात दुर्लक्षित राहिलेला एक जागतिक विक्रम म्हणजे हजारो मुलांना शिकवला जाणारा अभ्यासक्रम व पाठय़पुस्तके ‘गुपित राखणे’. पारदर्शकतेला उत्तम प्रशासनाचा निदर्शक मानण्याच्या काळात राज्याच्या शिक्षण विभागाने निर्माण केलेल्या, दरवर्षी दहा कोटींचा निधी मंजूर केलेल्या, कॉर्पोरेट ऑफिस असलेल्या ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळा’ने (एमआयईबी) पाठय़पुस्तकांबाबत इतकी गोपनीयता बाळगण्याचं कारण काय? एखाद्या संस्थेला निधी देताना किमान पारदर्शकतेची अट नसेल तर तो सार्वजनिक निधीचा अपव्यय नव्हे? मध्यंतरी ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित ‘आंतरराष्ट्रीय बोर्डातून शिवरायांचा इतिहास हद्दपार’ अशा आशयाच्या बातमीनंतर या मंडळाच्या कारभाराकडे राज्याचं लक्ष गेलं.

मुळात एखाद्या राज्याने ‘पिसा’सारखी आंतरराष्ट्रीय परीक्षा देण्याच्या हेतूने शेकडो शाळा उघडणं धक्कादायक आहे. ‘शिक्षण हक्क कायदा’ (आरटीई) लागू झाल्यानंतरदेखील दोन प्रकारची शिक्षणव्यवस्था अस्तित्वात आणणे, शिक्षकासाठीची अर्हता बदलून ‘टीच फॉर इंडिया’सारख्या खासगी संस्थांच्या फेलोंना शिक्षकपदी नियुक्त करणे, आरटीईनुसार ‘विद्या परिषद’ अभ्यासक्रमासाठीची शिखर संस्था असताना ‘एमआयईबी’ने अभ्यासक्रम व पाठय़पुस्तके विकसित करणे, शासनाची मंजुरी न घेताच पाठय़पुस्तके व शिक्षक हस्तपुस्तिका वितरित करणे, असे अनेक कायदेशीर व नैतिक गुंतागुंतीचे मुद्दे यात दडलेले आहेत.

पंचकोषांवर आधारित, विषयगोफांमधून विविध विषयांचा एकात्मिक पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, वेद, उपनिषदे व पुराणांची साक्ष काढत पहिलीपासून मराठी, इंग्रजी व संस्कृत या तीन भाषा तसेच गणित, सामान्य विज्ञान व सामाजिक अभ्यास असे तब्बल सहा विषय शिकवणाऱ्या या पुस्तकांतील ‘‘प्रत्येक घटक हा सहेतुक, विचारपूर्वक दिल्याचा’’ दावा करण्यात आलाय. साहजिकच पुस्तकांमधून कोणता विचार व हेतू दिसतो याचा अभ्यास क्रमप्राप्त ठरतो. ‘‘मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय जाणिवा सुदृढ करणारे शिक्षण देणे’’ हा मुख्य हेतू असणारं ‘एमआयईबी’ पहिलीपासून संस्कृत कोणाची ‘मातृभाषा’ म्हणून शिकवतंय? जागतिक ऊध्र्वगमनशीलतेमुळे इंग्रजीला लोकांमधून मोठी मागणी आहे कबूल; पण पहिलीपासून संस्कृतची मागणी केली कुणी आणि कधी? सुरुवातीच्या इयत्तांमध्ये घराची भाषा व शाळेची भाषा यात पूल निर्माण करून क्रमश: शाळेच्या भाषेकडे जाण्याविषयी सूचना अनेक धोरणात्मक दस्तऐवजांनी केलेली असताना पहिलीच्या पहिल्याच महिन्यात ‘‘एष:, एषा, मम, तव, किम् या सर्वनामांची ओळख करून देण्या’’चं किंवा ‘‘शुद्ध उच्चारासह श्लोक व अमरकोष: पंक्ती म्हणता येण्या’’चं उद्दिष्ट ठेवणारा अभ्यासक्रम कशाच्या आधारे तयार करण्यात आलाय? ‘‘संस्कृत भाषा वाणीवर संस्कार करते’’ अशी अशास्त्रीय समजूत बाळगून अंगणवाडीच्या मुलांनी ‘योग्य’ उच्चारांसह संस्कृत श्लोक पाठ करण्याचा आग्रह कशासाठी? ‘‘मुलांची भाषा विनादुरुस्ती स्वीकारणे’ ही मुलांच्या घराच्या भाषेविषयी संवेदनशीलता, आदर बाळगण्याची पहिली पायरी आहे. पण इथे शिक्षकांना विद्यार्थी ‘‘विसर्गाचा किंवा अनुस्वाराचा उच्चार करत आहेत का’’ याकडे विशेष लक्ष द्यायला सांगण्यात आलंय. जिल्हा परिषद शाळांमधली बहुसंख्य मुलं दलित- आदिवासी- बहुजन- अल्पसंख्याक वर्गातली, अप्रमाण मराठी किंवा मराठीतर भाषा बोलणाऱ्या घरांमधली असतात. अशा परिस्थितीत इयत्ता पहिलीपासून ‘‘शुद्ध भाषा’’ किंवा ‘‘योग्य उच्चार’’ लादण्याला ‘भाषिक हिंसा’ म्हणतात. एखादं संस्कृत गीत, एखादा श्लोक आठ ते दहा दिवस ऐकायला लावावं, म्हणून घ्यावं अशा सूचना एखाद्या वेदपाठशाळेच्या पुस्तकांतून आल्यात का? अंगणवाडीपासूनचे हे सगळे श्लोक पाहिले तर बहुजनांचं संपूर्ण ब्राह्मणीकरण करण्याचा हा प्रकल्प आहे, यात शंका उरत नाही. यातला विरोधाभास म्हणजे ‘‘विद्यार्थ्यांच्या हातात त्याचं स्वत:चं, त्यांना आपलं वाटणारं, त्यांच्या भाषेत बोलणारं, असं संचिका हे पुस्तक असणार आहे’’ असा दावा करण्यात आलाय. संस्कृत वाक्यांचा ‘‘प्रत्यक्ष जीवनात उपयोग करतो’’ किंवा ‘‘दैनंदिन जीवनात भोजनासंबंधीचे संस्कृत शब्द वापरतो’’ अशा अध्ययननिष्पत्त्या पाहिल्या की, ‘संस्कृत बोलणारी बहुजन खेडी’ तयार करणे हा ‘एमआयईबी’चा हेतू आहे का, असा प्रश्न पडतो. संस्कृत श्लोकांचा मराठी अर्थ सांगताना ‘ब्राह्मण’ म्हणजे ‘विद्वान’ असं सांगत ‘कर्माधारित वर्णव्यवस्थे’च्या सिद्धांताच्या दृढीकरणाचा नवा प्रयत्न दिसतो. ‘ब्राह्मण’ या शब्दाचा उल्लेख जात म्हणून करण्यास कचरणारी पुस्तकं ‘चर्मकार’ व ‘नाभिक’ अशा रूढ शब्दांऐवजी ‘चांभार’, ‘न्हावी’ असे त्याज्य उल्लेख सहज करतात. इयत्ता दुसरीला सगळे ‘बलुतेदार’ ज्या फसव्या व खोटय़ा पद्धतीने मांडलेत त्या अभिजनवादी चलाखीला तोड नाही. गणितातही सुतार, कुंभार, शिंपी या साऱ्या कष्टकरी, श्रमजीवी समाजघटकांचा उल्लेख एकेरीत, तर डॉक्टरसारख्या पांढरपेशा लोकांचा उल्लेख आदरार्थी आहे. हे सगळं ‘सहेतुक व विचारपूर्वक’ असणं चिंताजनक आहे.

अभ्यासक्रमात मुलाचं भावविश्व, अनुभवविश्व याविषयी संवेदनशील असल्याचं निव्वळ नमूद करण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीतून तसं दाखवावं लागतं. उदाहरणार्थ, इयत्ता तिसरीला ‘आपला चौरस आहार’ हा एक विषयगोफ दिलाय. अन्नाविषयी शतपत्रब्राह्मण, भगवद्गीता, ततरीय उपनिषद, चरकसंहिता, आयुर्वेद, अथर्ववेद या सर्व ठिकाणी काय काय सांगितलंय याचा उल्लेख ‘शिक्षक संहितेत’ करून कुपोषण आणि अतिपोषणासाठी मुलांनाच जबाबदार धरण्यात आलंय. ज्या शाळांना आंतरराष्ट्रीय करण्याचा घाट घातलाय त्या शाळांमधली किती तरी मुलं ‘शाळेतली खिचडी’ या मुख्य कारणासाठी शाळेत येतात, ही वस्तुस्थिती नजरेआड करून अन्नातील पोषणतत्त्वे ओळखणे, त्यांची कार्ये सांगणे, सकस व सात्त्विक आहाराचे महत्त्व जाणणे, अशा अध्ययननिष्पत्त्या देण्यात आल्यात. ‘अस्सल भारतीय व सात्त्विक पदार्थच खावेत’ असं मुलांना बजावण्यात आलंय. ‘सात्त्विक’ म्हणजे काय हे सांगितलं नसलं तरी केळीच्या पानावर ‘शुद्ध ब्राह्मणी’ पद्धतीने (डाव्या हाताला मीठ, मग लिंबू, असा क्रम किंवा भात-पिवळं वरण) वाढलेल्या ज्या पानाचं चित्र दिलंय, ते पाहता ‘सात्त्विक’चा अर्थ लपून राहात नाही. आहाराचा मोक्षपटम् (सापशिडी) तर हजारो मुलांच्या परिस्थितीची खिल्ली उडविणारा आहे. ‘शिळे अन्न’ खाल्ले तर ‘साप गिळतो’ असं या खेळात दाखवलंय. घरातलं अन्न, त्याची उपलब्धता, त्याचा प्रकार, याबाबत पूर्णत: भिन्न सामाजिक परिस्थिती असताना अन्नाचा केवळ अभिजनवादी विचार समस्त बहुजनांवर लादायचा, ही विचारपूर्वक केलेली कृती असेल तर आजच्या राजकीय परिस्थितीत त्यामागचा हेतू उघड आहे.

मुलं कोणत्या वयात काय शिकू शकतात याविषयी शास्त्रीय संशोधनांना किमान दोनशे वर्षांचा इतिहास आहे. सगळे ‘राज्यस्तरीय’ अभ्यासक्रम यावर आधारलेले असतात. मात्र थेट ‘आंतरराष्ट्रीय’ असणाऱ्या ‘एमआयईबी’ने मुलांच्या क्षमतांविषयी स्कीनरपासून पियाजेंपर्यंत सर्व आधुनिक अभ्यासकांना पूर्णपणे हद्दपार केलंय. मंडळाच्या गृहीतकानुसार दुसरीच्या विद्यार्थ्यांना पृथ्वी व भोवतीचे हवेचे आवरण, हवेचे गुणधर्म, आंतरेन्द्रिये, हे सगळं समजू शकतं. तिसरीचे ‘आंतरराष्ट्रीय’ विद्यार्थी अन्नघटक, त्याचा व्यवहारात उपयोग, चार वेदांची वैशिष्टय़े, मानवी पचनसंस्थेतील अवयवांची कार्ये, कोटय़वधी म्हणजे किती, इ.स.पूर्व व इ.स.नंतर यातला फरक, मुख्य व उपदिशा जाणून पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण, चंद्राच्या स्थितीनुसार तिथीनिश्चिती, राज्याच्या व देशाच्या नकाशाचा वापर हे सगळं करू शकतात. तिसरीमध्येच ऊर्जेची रूपे व प्रकार (चुंबकीय, ध्वनी, रासायनिक, प्रकाश, विद्युत, सौर) समजावून घेऊन, वस्तू पाहून ऊर्जेचा प्रकार सांगू शकतात. भास्कराचार्य ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इतका सारा पट या बोर्डाच्या तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांना समजू शकतो, समजू शकत नाही तो शिवरायांचा इतिहास! मंडळांचा हा तर्क नेमका कशावर आधारलेला आहे? नाही म्हणायला तीन-चार वर्षे वयोगटासाठी (अंगणवाडी) ‘सारे भारतीय’ या सदरात शिवाजी महाराज व हनुमान असे दोन ‘भारतीय’ आहेत. या दोघांची माहिती एकत्र देणं हा हनुमानाचं मानवीकरण करण्याचा प्रयत्न आहे की शिवरायांचं मिथकीकरण करण्याचा ते समजायला मार्ग नाही.

‘‘भारत देशामधील ज्ञान कालातीत आहे’’ असे यातले वर्चस्ववादी दावे किंवा ‘‘राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी मायेने पालन करण्यासाठी राष्ट्रालाही एक पिता असावा लागतो’’ अशी पुरुषसत्ताक, लोकशाहीविरोधी मांडणी असो, ही पुस्तकं म्हणजे अगदी छोटय़ा वयापासून ‘एकसंस्कृती सिद्धांत’ मुलांच्या गळी उतरवण्याचा भक्कम प्रयत्न करीत आहेत. सगळा भारतीय विचार वैज्ञानिक होता हे भासवण्याच्या फोल प्रयत्नापायी पंचमहाभूतांचे जे अर्थ देण्यात आलेत – ‘‘पृथ्वी (खनिजे), आप (जलविद्युत), तेज (सूर्य), अग्नी (कोळसा), वायू (पवनऊर्जा)’’.

आपणच आपल्याला ‘आंतरराष्ट्रीय’ म्हणून कोणताही अभ्यासक्रम प्रसृत करून तो कुठल्याही तपासणीविना, गुप्त पद्धतीने शाळांमध्ये राबवणं हा केवळ आरटीईचा भंग नाही तर समाजाचा विश्वासघात आहे. नव्या सरकारने या मंडळाचा अभ्यासक्रम मागे घेऊन ‘एमआयईबी’चं कामकाज बंद करावं म्हणजे महाराष्ट्रासाठी ‘पुरोगामी’ हे विशेषण विनासंकोच वापरता येईल.

लेखातील सर्व मते वैयक्तिक; दुहेरी अवतरणचिन्हांतील (‘‘- ’’) मजकूर  ‘एमआयईबी’च्याच साहित्यातून.

ईमेल : kishore.darak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 2:01 am

Web Title: cultural nationalism shivaji maharaj akp 94
Next Stories
1 ‘आरसेप’ टाळणे, हा उपाय नव्हे!
2 अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि खासगीपणा
3 विश्वाचे वृत्तरंग : ब्रेग्झिटसाठी जुगार
Just Now!
X