जगभरातील बहुतांश देशांतील बँका आणि वित्त संस्थांची व्यवसाय प्रक्रिया केंद्रे भारतात आहेत. यामुळे भारत हा एकमेव असा देश आहे की, जेथे जगभरातील विविध देशांतील विविध लोकांची माहिती उपलब्ध आहे. म्हणूनच सायबर हल्लेखोर माहिती चोरीसाठी भारतावर लक्ष केंद्रित करतात.
भारतात परदेशी कंपन्यांची व्यवसाय प्रक्रिया केंद्र सुरू झालीत त्यानुसार देशात विविध तंत्रज्ञानही विकसित झाले. यामुळे हा व्यवसाय अधिकच वाढत गेला. परिणामी देशातील लोकांबरोबरच परदेशांतील लोकांची माहितीही भारतीय कंपन्यांकडे उपलब्ध होऊ लागली. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार जास्तीत जास्त भारतीय साइट्स हॅक करून ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सायबर सुरक्षेबाबत नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. माहिती चोरीचा सर्वाधिक धोका बँकिंग आणि वित्त संस्थांच्या संकेतस्थळांना सर्वाधिक असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. देशातील अनेक कंपन्या सायबर सुरक्षेबाबत तितक्याशा सजग नाहीत. त्यातच काही लघू व मध्यम उद्योजक तर कमीत कमी गुंतवणुकीत उपलब्ध होणारी सुरक्षा व्यवस्था स्वीकारतात. यामुळे त्याचा फायदाही सायबर हल्लेखोर घेतात आणि ते देशी संकेतस्थळांच्या माध्यमातून माहिती चोरीचा प्रयत्न करतात. साधारणत: २०११ पासून देशात संकेतस्थळ हॅक होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.
माहिती विक्री
माहिती चोरीबरोबरच अनेक कंपन्या माहिती विक्रीही करतात. अर्थात ही विक्री करताना अनेकदा सुरक्षेचे नियम पाळले जातात. मात्र आपल्या नकळत आपण भरलेली माहिती किंवा त्याचा काहीसा भाग दुसऱ्यांना देणे हेही चुकीचे आहे. अनेकदा विविध संस्थांच्या अर्जावर किंवा संकेतस्थळांवर आपण माहिती भरल्यानंतर त्याखाली दिसणाऱ्या नियम आणि नियमावलींमध्ये बारीकसा कुठे तरी ही माहिती ते वापरू शकतील असे नमूद केलेले असते. ते आपण वाचत नाही आणि मान्य करून पुढे जातो . यामुळे कंपन्या यामध्ये कोणत्याही अडचणीत सापडताना दिसत नाही. आपण अनेकदा विविध कंपन्यांसाठीची माहिती ऑनलाइन भरत असतो. ही माहिती ऑनलाइन भरत असताना आपण ज्या संकेतस्थळावर ही माहिती भरत असतो ते संकेतस्थळ कंपनीचे अधिकृत असले तरी ते सांभाळण्याची जबाबदारी कंपन्या अनेकदा दुसऱ्या उपकंपनीला देतात. या दोन्ही कंपन्यांच्या करारांमध्ये अनेकदा माहितीची देवाण-घेवाण करण्यासंदर्भात नमूद केलेले असते ज्याची आपल्याला कल्पनाही नसते किंवा ती माहिती अनेकदा छोटय़ाशा अक्षरात कुठे तरी नमूद केलेली असते. यामुळे आपण एकदा भरलेली माहिती अनेकदा एकाच वेळी दोन कंपन्यांनाही मिळते.
काही कंपन्या माहिती विक्री करताना आपली संपूर्ण माहिती विकतातच असे नाही, तर ते त्यातील काही भाग विविध कंपन्यांना आवश्यकतेनुसार विकत असतात. उदाहरणार्थ आपण एखाद्या संकेतस्थळावर आपल्या ब्लड ग्रुपपासून आपल्याला कोणकोणते आजार आहेत इथपर्यंतची माहिती भरली. तर यातील एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आजाराची माहिती एखाद्या कंपनीला कशाच्या तरी मोबदल्यात उपलब्ध करून देण्याचे अनेक प्रकार घडत असतात. आपण रेल्वेचे किंवा बसचे तिकीट ऑनलाइन बुकिंग करतो त्या वेळेस आपण पैसे भरण्यासाठी ज्या पेमेंट गेटवेचा वापर करतो ती कंपनी वेगळी असते. यामुळे प्रत्यक्षात आपण रेल्वेच्या किंवा बस कंपनीच्या भरवशावर सुरू केलेल्या संकेतस्थळातून एखाद्या वेगळ्या कंपनीच्या संकेतस्थळावर नकळतपणे जातो आणि तेथे आपली माहिती भरतो. त्या कंपनीकडे एकदा का तुमचा फोन नंबर गेला की, तुम्हाला विपणनाचे संदेश किंवा फोन येण्यास सुरुवात होते. अशा विविध प्रकारे माहितीची देवाण-घेवाण करण्याचे व्यवसाय देशात मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. यामुळे माहितीची देवाण-घेवाण करणारे हे सर्व चोर आपल्या माहितीतलेच असतात, पण हेच ते चोर हे आपल्या लक्षात येत नाही.
माहितीचा विमा
देशातील विमा कंपन्यांना माहितीचा विमा सुरू केला. ही सुविधा थेट ग्राहकांसाठी उपलब्ध नसली तरी माहितीचा मोठय़ा प्रमाणावर साठा करणाऱ्या कंपन्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये जर सायबर गुन्हेगारांनी हॅकिंग करून संकेतस्थळावरील माहिती चोरून नेली तर कंपनीला त्याची नुकसानभरपाई मिळते. त्याचबरोबर थेट कंपनीलाही काही रक्कम देण्याची सुविधा विमा कंपन्यांनी केली आहे.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com