जागतिक दर्जाचे भारतीय सायकलपटू अशोक खळे यांना सायकलिंग करताना झालेला अपघात, त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आणि त्यानंतर गेल्याच रविवारी त्यांचे झालेले दुखद निधन यामुळे हौशी आणि व्यावसायिक या दोन्ही गटांमध्ये मोडणाऱ्या सायकलपटूंना मुळापासून हादरा बसला आहे. अनेक आघाडीच्या सायकलपटूंनी त्यांचा जीव की प्राण असलेले सायकलिंग कमी करण्याचा तर काहींनी थेट थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अनेकांनी खासगीत सांगितला, जाहीर बोलण्यास कुणीही तयार नाही इतकेच.

भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक नामवंत सायकलपटूंना रस्त्यावरील अपघातांमध्येच आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारताच्या व्यावसायिक सायकलपटूंच्या चमूची प्रशिक्षक असलेल्या आणि अव्वल दर्जाची व्यावसायिक सायकलपटू असलेल्या रूमा चॅटर्जीचा प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातात नोयडा एक्स्प्रेसवेवर १८ जून २०१३ रोजी झालेला मृत्यू ही भारतीय सायकलविश्वासाठी सर्वात मोठी धक्कादायक घटना होती. खरे तर त्या घटनेनंतर आपण खूप काही शिकणे अपेक्षित होते. पण त्याहीनंतर भारतात अनेक सायकलपटूंचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.  क्रिकेटच्या संदर्भाने बोलायचे तर अशोक खळे हे सायकलविश्वाचे सुनील गावसकर होते.  पहाटे साडेपाचला उठून आजही वयाच्या साठीनंतरही ‘खोपोली बॅक’ करणारा सायकलपटू आजच्या कालखंडात आणि संदर्भातही तेवढाच ताज्या दमाचा आणि इतर स्पर्धकांच्या मनात धडकी भरवणारा असतो. सायकल हा त्यांचा श्वास होता. .

सायकल आणि बाइकचे व्हील बाइंडिंग करण्याचा व्यवसाय असलेले अशोक खळे आजही तेवढय़ाच उत्साहात आणि त्याच दमात सर्व स्पर्धामध्ये यशस्वी होत होते. शारीरिक तंदुरुस्तीची ही पातळी केवळ अतुलनीय अशी होती.  महत्त्वाचा प्रश्न आहे तो अशोक खळे यांना गमावल्यानंतर त्या घटनेतून आपण काही शिकणार की, त्यांचे जाणे असेच वाया जाऊ देणार आणि याहीपुढे देशातील व्यावसायिक तसेच हौशी सायकलपटूंचे प्राण रस्ते अपघातात जाणे आपण निव्वळ हातावर हात घेऊन पाहत राहणार हा आहे.

गेल्या १० वर्षांमध्ये भारतामध्ये सायकलिंग या खेळाला चांगले दिवस आले आहेत. आता जागतिक ब्रॅण्डची सायकलखरेदी तुम्हाला भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सहज करता येते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक हौशी सायकलपटू आठवडय़ाअखेरीस एखादी मोठी रपेट किंवा वर्षांतून एकदा किंवा दोनदा मोठी सायकल टूर करताना दिसतात. काही जणांनी तर इंधनाचे प्रदूषण टाळणारी आणि पर्यावरणपूरक म्हणून सायकल वापरण्यास सुरुवात केली आहे. हौशी सायकलपटूंच्या संख्येमध्ये देशभरात खूप मोठय़ा संख्येने वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षांतील वाढ ही ५० टक्क्यांहून अधिक असल्याचे सायकल उत्पादक आणि वितरकांनी अधिकृतरीत्या जारी केलेली आकडेवारी सांगते. पण याच कलाखंडात सायकल अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची संख्याही ६६ टक्क्यांनी वाढल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाची आकडेवारी सांगते. यातील अनेक व्यावसायिक तसेच हौशी सायकलपटूंचा मृत्यू हा रस्ते महामार्गावर झाला आहे. मृत्यूची आकडेवारी उत्पादकांच्या आकडेवारीपेक्षा अधिक असणे हे वाईट लक्षण आहे.

अशोक खळे हे  नियम अतिशय काटेकोरपणे पाळायचे. तरीही त्यांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला हे कटू वास्तव आहे. यातील दुसरा धडा म्हणजे तुम्ही वाहतुकीचे नियम पाळता याचा अर्थ लोक किंवा इतर वाहकचालक ते नियम पाळतातच असे नाही. किंबहुना त्यामुळेच तुम्ही तुमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेणे म्हणजेच स्वतच्या जिवाची हमी स्वतच घेण्यासारखे असते.

मुंबईसारख्या शहरात सायकलपटू आपल्या संकुलाबाहेर पडतो तेव्हा अनेकदा जवळच हमरस्ता किंवा महामार्ग असतो. तो थेट हमरस्त्यावरच असतो, याचे भान आता सायकलपटूंनी ठेवायला हवे. हमरस्त्यावर किंवा महामार्गावर तुमची काळजी घेत इतर वाहनचालक गाडय़ा चालविणार नाहीत. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी. अनेक जण सायकल महागडी घेतात पण हेल्मेट घेताना पैसे वाचविण्याचा विचार करतात. सर सलामत तो सायकल पचास हे लक्षात ठेवा.

हमरस्त्यावर किंवा महामार्गावर सायकलस्वाराचा वेग हा इतर कोणत्याही गाडीएवढा नसतो. अशा वेळेस इतर चालकांना सायकलस्वार हा अडथळा वाटतो. अनेकदा शेजारी उभ्या असलेल्या वाहनातील कुणीतरी अचानक दरवाजा उघडणे, बाजूने जाणाऱ्या बसमधील कुणीतरी अचानक थुंकणे त्यामुळे सायकलस्वाराचे बावचळणे, एखादा दगड पुढच्या वाहनाच्या वेगामुळे आपल्या अंगावर अचानक येणे हीदेखील महत्त्वाची कारणे  असल्याचे लक्षात आले आहे. सायकलला कट मारून जाणारे दुसरे वाहन खूपच घातक असते. काही वेळेस पुरेसा पाणी न प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी अचानक घसरून सायकलस्वार पडणे व बाजूने जाणाऱ्या वाहनाने त्याला उडवणे असेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे पाण्याची बाटली सोबत घेणे व पाण्याचा शरीरातील अंश कमी न होऊ देणे महत्त्वाचे असते.

सायकलस्वारांचे अनेक अपघात फ्लायओव्हर उतरताना झाल्याचे लक्षात आले आहे. उतरताना तुम्ही फ्लायओव्हरच्या डाव्या बाजूला असलात तरी तो उतरतो आणि मुख्य रस्त्याला जोडला जातो, त्या ठिकाणी तुम्ही रस्त्याच्या मधोमध असता. तुमच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूंनी वेगात वाहने पुढे जातात. अशा वेळेस अपघाताची शक्यता सर्वाधिक असते. हे टाळायचे असेल तर सायकलस्वारांनी फ्लायओव्हर्सचा वापर टाळणे सर्वात उत्तम असे जाणकार सांगतात.

पर्यावरणपूरक म्हणून सायकलला प्राधान्य देण्याचे सरकारी धोरण हे कागदावर खूपच छान आहे. पण प्रत्यक्षात तो एक विनोदच असल्याचे अनेकदा लक्षात येते. मुंबईत बीकेसीमधील सायकल ट्रॅकवर अनेकदा वाहनांचे पाìकग असल्याची छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत. सायकल ट्रॅकमध्ये इतर वाहने येणारच नाहीत याची भारतात खात्री नसते. जिथे माणसांना चालण्यासाठी साधे पादचारी मार्ग अर्थात फुटपाथ नाहीत तिथे सायकल ट्रॅक म्हणजे लक्झरीच ठरतात. त्याबद्दल न बोललेच बरे. मध्यंतरी सरकारी धोरणानुसार सायकल पाìकगसाठी मध्य रेल्वेने सवलतीचा बोर्ड ठाणे स्थानकाजवळ लावला आणि प्रत्यक्षात त्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गेलेल्या सायकलपटूला सुविधाच नसल्याचे लक्षात आले. व्यवसायाने पत्रकार असलेल्या या सायकलपटूने अखेरीस भांडून तो हक्क मिळवला. कामावर सायकलने जायचे तर त्याला प्रोत्साहन मिळायला हवे असे आपण म्हणतो, जवळपासचा प्रवास सायकलने करावा असे म्हणणे ठीक आहे. पण मॉलमध्ये चित्रपट पाहायला सायकलने गेल्यानंतर तिथे सायकल स्टॅण्डच नाही हे लक्षात येते तिथे काय करायचे. धोरणे आहेत पण अंमलबजावणीचे आणि पूरक गोष्टींचे काय. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच आहे. सायकलची संस्कृती अद्याप आपल्याकडे रुजायची आहे, हेच यातून प्रकर्षांने लक्षात येते.

सायकली वाढताहेत, सायकलस्वार वाढताहेत, त्यांचे गट, संस्था वाढताहेत अशा वेळेस सायकलिंग फेडरेशनची जबाबदारी अधिक वाढते. अशोक खळे यांचे निधन झाले त्या दिवशीही स्पर्धा घेऊन बक्षीस वाटप करणाऱ्या सायकलिंग फेडरेशनच्या वर्षांनुवर्षे पदालाच चिकटून राहिलेल्या पदाधिकाऱ्यांविषयी न बोललेलेच बरे. ती पराकोटीची असंवेदनशीलता होती. या सायकलिंग फेडरेशनने या क्षेत्रातील सुरक्षितता वाढावी आणि त्याचा वापर वाढावा म्हणून कोणते प्रयत्न केले याचा लेखाजोखा लिहायला घेतला तर सुरक्षा कार्यशाळांच्या संदर्भातील आकडेवारी ही पाटी कोरी असल्याचेच निदर्शक ठरणारी आहे, हे स्पष्ट होते. खरे तर अशा वेळेस त्यांनी पुढाकार घेऊन गोष्टी मार्गावर आणायला हव्यात. पण त्या पातळीवर आनंदच आनंद आहे.

अनेक वर्षांपूर्वी ऐन दिवाळीमध्येच अजित कांबळी नावाच्या आणखी एका दर्जेदार सायकलपटूला आपण गमावले होते. मरिन लाइन्सला पेट्रोल पंपजवळ झालेल्या त्या अपघाताच्या वेळेस अशोक खळे साक्षीदार होते. आता तेही आपल्यात नाहीत, त्यांचेही अपघाती निधन व्हावे हा दैवदुर्वलिासच.

या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट खळे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस व त्याही आधी उपचाराच्या वेळेस लक्षात आली. ते आजही छोटेखानी खोलीतच राहत होते. घाटांचा हा राजा प्रत्यक्षात मात्र दीनवाणे आयुष्य जगत होता. अंत्यसंस्काराच्याच ठिकाणी त्यांच्या गावकऱ्यांवर कुटुंबीयांची हलाखी पाहून मदतीचे आवाहन करण्याची नामुष्की ओढवली. जागतिक दर्जाच्या सायकलपटूसाठी असे आवाहन करावे लागणे ही त्यांच्या कुटुंबीयांवरची किंवा गावकऱ्यांवरची नव्हे तर आपल्या भारतीय समाजावरची नामुष्की आहे. आपले काही तरी चुकते आहे. क्रिकेट म्हणजेच खेळ नव्हे हे कधी तरी आपल्याला कळायला हवे. त्याहीपलीकडे रोचक खेळ आहेत. त्यांना जागतिक स्तरावर खेळाचा दर्जा आहे. त्याकडे आणि तो खेळणाऱ्यांकडे समाजाचे लक्ष असायला हवे. आपण त्यात चुकलो आहोत हेच खळेंच्या दुर्दैवी निधनाने दाखवून दिले त्याच वेळेस भारतात सायकलिंग हा खेळ नव्हे तर दुसाहस ठरते आहे, हेच अधोरेखित केले आहे.

विनायक परब

vinayak.parab@expressindia.com

Twitter- @vinayakparab