रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

‘लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांचे राज्य’ हे डोक्यात भिनले की अल्पमताचा अनादर होणारच. तेथून आपण अल्पसंख्याकांना पायदळी तुडविण्यापर्यंत केव्हा येऊन पोहोचतो हे कोणाला कळतच नाही. हे सूत्र मग सामाजिक-राजकीय संघटना, साहित्यिक संस्था, हाऊसिंग सोसायटय़ा.. सर्वत्र वापरले जाते. हरलेलेही मग गप्प बसत नाहीत, आपण बहुसंख्याक कसे बनू, याचा ‘जुगाड’ करण्यात ते ‘मग्न’ होतात..

विचार करणाऱ्या माणसाला विचार करण्याची भीती वाटावी, चिमूटभर माती अंगावर पडली तर ज्याची कातडी अजून थरथरते, त्याने आपली संवेदना अद्याप हरवली नसल्यामुळे भयभीत व्हावे, अशी परिस्थिती सभोवार आहे. प्रत्येकाला वाटते : फक्त मलाच तेवढा त्रास होतोय. मला असा त्रास व्हावा म्हणून ‘ते’ पद्धतशीर प्रयत्न करताहेत. ‘ते’ कोण आहेत, याबद्दल वाद आहेत. पण खरे तर, ‘इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूं है?’ असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती सभोवार आहे. शहर, गाव, वस्ती, माजघर, दिवाणखाने, प्रासाद, फाटक्या झोपडय़ा.. कोठेही जा, तेथील प्रत्येक व्यक्ती तणावात, चिंतेत आहे हे नक्की. प्रत्येक माणसाला जणू दुसऱ्याची भीती वाटते आहे. त्याला कशाचीच शाश्वती वाटत नाही. या साऱ्याच्या मुळाशी आहेत विभाजनरेषा.

आंतरराष्ट्रीय राजकारण ते आपल्या घरकुलापर्यंत विश्वाला शतखंडित करणाऱ्या विभाजनरेषा. त्या कोणी निर्माण केल्या, का निर्माण केल्या, कोणी त्या अधिक ठळक केल्या याबद्दल चर्चा होऊ शकते. ती दबक्या आवाजात होतानाही दिसते (कारण तेच- सर्वव्यापी दहशत). मुद्दा एवढाच की, आपणही कळत-नकळत अशा विभाजनरेषा आखत आहोत, त्या अधिक गडद करीत आहोत. ‘ते’ व ‘आपण’ अशी विभागणी करणाऱ्यांत आपणही सामील होत आहोत, याची कोणाला जाणीव होताना दिसत नाही. त्यामुळे विभाजनरेषा आखणारे अधिकाधिक यशस्वी होत आहेत व ‘मानव तितुका एक’ मानणारे अधिकच एकाकी.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण झाला, दोन वेगळ्या जात-धर्माच्या व्यक्तींनी राजीखुशीने लग्न केले किंवा कोणी असलेले लग्न विचार करून वा अविचाराने मोडले, कोणा स्त्रीवर बलात्कार झाला किंवा  कोणी आत्महत्या केली- घटना कुठलीही असो; तिच्याविषयीचा आपला प्रतिसाद हादेखील आता या विभाजनरेषांनुसार ठरू लागला आहे. ‘ती’ व्यक्ती रेषेच्या कोणत्या बाजूला उभी आहे हे जोखून माणसे आपला प्रतिसाद निश्चित करतात; नव्हे, प्रतिक्रिया देतात. आपली मने कोठल्या तरी सामूहिक मनाशी जोडली गेली आहेत; असे सामूहिक मन, जे कोणाच्या तरी विरुद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक घटनेनंतर समाजमाध्यमांतून माणसे वचावचा बोलत सुटतात, हमरीतुमरीवर येतात, परस्परांना आईबहिणीवरून शिव्या देतात, स्त्रियांना बलात्काराच्या धमक्या देतात. वरून ‘असे वागणे हा आमचा स्वभाव नाही, पण ‘त्यांच्या’शी असेच वागावे लागते’ असे समर्थनही करतात. पूर्वी हे असे नव्हते, हा गेल्या काही वर्षांत उभा राहिलेला ‘खेळ’ आहे हे खरे असले; तरी त्याचे नेपथ्य सारे जण अनेक दशकांपासून निर्मित होते, हेही तितकेच खरे. त्यामुळे आज आपण सारेच- माणसे, संघटना, समाज, देश- हा खेळ अटीतटीने खेळत आहोत.

सुरुवात व्यापक प्रश्नापासून करू. या वेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, तसेच आपल्याकडील बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, त्यापूर्वी गोवा येथील विधानसभा निवडणुका अतिशय अटीतटीच्या झाल्या. अगदी दोन-तीन टक्के मते इकडची तिकडे झाली असती, तर निकाल उलट लागले असते. मात्र विजेत्यांच्या आरत्या करणे व पराभूतांना खिजवणे यापलीकडे जाऊन या राजकीय दुभंगलेपणाची चर्चा कोणीही का केली नाही? पलीकडच्या अध्र्या जगाशी बोलावे, त्याला समजून घ्यावे असे कोणाला का वाटले नाही? ‘विजेत्याला सर्व काही, पराभूताला काही नाही’ किंवा ‘५१ टक्के = १०० टक्के, पण ४९ टक्के = शून्य टक्के’ ही तत्त्वे चुकीची आहेत असा विचारही कोणी का मांडला नाही? कसेही करून आवश्यक मतांची सीमारेषा पार करणे महत्त्वाचे ठरले की मग ध्रुवीकरण अपरिहार्य ठरणार. ‘लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांचे राज्य’ हे डोक्यात भिनले की अल्पमताचा अनादर होणारच. तेथून आपण अल्पसंख्याकांना पायदळी तुडविण्यापर्यंत केव्हा येऊन पोहोचतो हे कोणाला कळतच नाही. हे सूत्र मग सामाजिक-राजकीय संघटना, साहित्यिक संस्था, हाऊसिंग सोसायटय़ा.. सर्वत्र वापरले जाते. हरलेलेही मग गप्प बसत नाहीत; आपण बहुसंख्याक कसे बनू, याचा ‘जुगाड’ करण्यात ते ‘मग्न’ होतात. अशा प्रकारे जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील पुसट-बारक्या विभाजनरेषा दिवसागणिक ठळक होत जातात.

समाज म्हणजे परस्परांशी सुखदु:खाने बांधला गेलेला समूह. अशी बांधिलकी नसेल, तर उरतो फक्त जमाव; आणि जमाव हा स्वभावत:च हिंस्र असतो. आपला समाज हा समाज म्हणण्याच्या पात्रतेचा आहे का, याची शंका यावी अशी उदाहरणे रोज घडत आहेत. गेल्या काही महिन्यांत दोन आत्महत्यांमुळे आपले सामाजिक जीवन घुसळले गेले. दोन्ही घटनांमध्ये बळी गेलेल्या व्यक्ती या अतिशय उमद्या व कर्तबगार होत्या. त्यांचे अकाली जाणे ही अतिशय शोकाकुल व अस्वस्थ करणारी बाब होती. अशा वेळी काय व्हायला हवे? आत्महत्यांमागील कारण समजेपर्यंत वाट पाहणे, त्या व्यक्तींच्या जवळच्या लोकांच्या दु:खात सामील होणे आणि कारण कळल्यावर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी व्यक्ती व समाज म्हणून विचार व कृती करणे, हा झाला नागरी समाजाचा प्रतिसाद. आपण मात्र त्यानिमित्ताने बळी गेलेल्यांच्या जवळच्या व्यक्तींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडून मोकळे. हे मृत्यू जर एकाकीपणाच्या तीव्र भावनेतून घडले असतील, तर इतक्या मोठय़ा गोतावळ्यात वावरणाऱ्या व्यक्तीला एकाकी का वाटते, याचा आपण समाज म्हणून शोध घ्यायला हवा. जर त्यामागे एखादी मानसिक व्याधी असेल, तर त्याविषयीचा अपराधभाव कसा कमी करता येईल, यावर खुली चर्चा कशी होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. आपण मात्र आपल्या दृष्टीने ‘पलीकडे’ असणाऱ्या व्यक्तींवर शरसंधान करण्यासाठी एक निमित्त म्हणून या घटनांचा वापर केला. उद्या अशी घटना आपल्याही घरात घडू शकेल, याचे भानही असे करणाऱ्यांना उरले नव्हते.

मग आपण कोणतीही वैचारिक भूमिका घ्यायची नाही का? सार्वजनिक जीवनातील व्यक्ती किंवा संस्था यांच्या कार्याची चिकित्सा करायचीच नाही? जरूर करावी. पण त्यात ‘ते’ कसे चारित्र्यहीन, अनैतिक व ‘आम्ही’ कसे चारित्र्यवान, असा रोख नसावा. करायचीच झाली तर आपल्या समाजाच्या सर्वंकष ऱ्हासाची समीक्षा करावी व तिची सुरुवात आत्मपरीक्षणाने करावी. काळ्या-पांढऱ्याशिवाय रंगांच्या असंख्य छटा आहेत आणि साऱ्या प्रश्नांना दोनपेक्षा अधिक बाजू असतात, याचे भान विसरू नये. कालचे साथीदार आज आपले शत्रू क्रमांक एक बनत असतील, तर त्यामागे वैचारिक भाग किती व वैयक्तिक सत्तास्पर्धा किती, हे तपासून पाहावे. एखाद्याला ज्ञानेश्वर आणि तुकाराम, कंगना रनौतचा अभिनय व कुणाल कामराची स्टँड-अप कॉमेडी एकाच वेळी आवडू शकतात, तो आयुर्वेदाचा समर्थक आणि गोहत्याबंदीचा विरोधक असू शकतो हे ध्यानात ठेवावे.

आपल्या समाजात विभाजनरेषा आहेत, तशीच त्या सांधण्याची परंपराही आहे. सांस्कृतिक पातळीवर वारकरी- महानुभाव- लिंगायत यांनी हे कार्य शेकडो वर्षे केले. ९० वर्षांपूर्वी काकासाहेब गाडगीळ व केशवराव जेधे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे माजलेली दुफळी सांधून ‘आधी सामाजिक की राजकीय (परिवर्तन)’ हा निर्थक वाद निकालात काढला व दोन्ही परिवर्तनांना गती दिली. आज कोणत्याही प्रकारचा ‘गणवेश घालणारा समाज’ नको असणाऱ्या प्रत्येकाला हे काम करावे लागेल. त्यासाठी आधी मनातील जाणीव-नेणिवेतील वाघा बॉर्डर पुसाव्या लागतील, बेट बनून बसलेले आपले मित्र, कुटुंब, समूह, संघटना यांच्यामध्ये संवादाचे वारे घुमवावे लागेल. वेगळे विचार मांडणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. त्यासाठी अ-लोकप्रिय होण्याची जोखीम पत्करावी लागेल. हे केले नाही तर बाहेरून येणारा फॅसिझम आपल्या आतून येणाऱ्या कट्टरवादाशी हातमिळवणी कशी करेल, हे आपल्याला कळणारही नाही. म्हणून, सावधान!

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतरसंबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ईमेल : ravindrarp@gmail.com