नोटाबंदीने दहशतवादी व नक्षलवादी यांचे कंबरडे मोडले आहे. नंतरच्या काळातील विधानसभा निवडणुकांत काळ्या पैशाच्या लढाईत आपण कुणाच्या बाजूने आहोत, हे जनतेने दाखवून दिले आहे. या एका वर्षांत ज्या काही अडचणी सुरुवातीला जाणवल्या त्या आता राहिलेल्या नाहीत. निराशेचे मळभ आता दूर झाले आहे..

नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयास एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीच निर्णय साहसी, ऐतिहासिक आणि दूरदर्शी होता, हे सत्य आता देशातील सामान्य जनतेने मान्य केले आहे. या निर्णयाचे फायदे आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. काळा पैसा बाळगणाऱ्या धनदांडग्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नात रोखीचे प्रमाण १२ टक्क्य़ांवरून ९ टक्क्य़ांपर्यंत खाली आले आहे. नोटाबंदीने दहशतवादी व नक्षलवादी यांचे कंबरडे मोडले आहे. नंतरच्या काळातील विधानसभा निवडणुकांत काळ्या पैशाच्या लढाईत आपण कुणाच्या बाजूने आहोत, हे जनतेने दाखवून दिले आहे.

मागील सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या राक्षसाने आपली पाळेमुळे अगदी खोल व घट्ट रोवली होती. लाखो-करोडो रुपयांचे घोटाळे देशाच्या अर्थव्यवस्थेला खोल गर्तेत नेत होते. देशाचे शत्रू नकली नोटांचा वापर करून अर्थव्यवस्थेत घोटाळे करीत होते. देशातील एकूण चलनात हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचे प्रमाण नोटाबंदीपूर्वी ८५ टक्के इतके शिगेला पोहोचले होते. त्या मोठय़ा किमतीच्या नोटांचा भ्रष्टाचारासाठी वापर केला जात होता. देशाला त्या काळात अगदी निकडीने जबाबदार व पारदर्शी सरकारची प्रतीक्षा होती. निराशेचे काळे ढग दाटून आले असताना देशवासीयांसाठी नरेंद्र मोदी एक आशेचा किरण बनले. सत्तेवर येताच त्यांनी राष्ट्रहिताच्या निर्णयांची मालिकाच सुरू केली.

आजपर्यंतच्या काळात प्रत्येक सत्ताधारी पक्षाने एखादा निर्णय घेताना स्वत:च्या फायद्या-तोटय़ाचा आधी विचार केला, पण मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेताना राजकीय फायदा व नुकसान याचा विचार बाजूला ठेवून काळ्या पैशावर आघात करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. राजकारणापलीकडे जाऊन एखादा सत्ताधारी पक्ष निर्णय घेऊ शकतो हे प्रथमच दिसून आले. तो निर्णय धाडसी होता.

त्या दिवशी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, एखाद्या देशाच्या इतिहासात असे क्षण येतात जेव्हा प्रत्येक व्यक्तीला त्या क्षणाचा आपणही भाग असावे असे वाटत असते. त्या व्यक्तीलाही देशहितासाठी, राष्ट्रनिर्माणासाठी आपले योगदान द्यावेसे वाटत असते; पण असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात मोजकेच येत असतात. काळ आज आपल्याला पुन्हा देशहितासाठी काही तरी करण्याची संधी पुन्हा एकदा देत आहे. प्रत्येक  सामान्य व्यक्ती काळा पैसा व नकली चलनाच्या विरोधातील महायज्ञात आपले योगदान देऊ शकणार आहे..

पंतप्रधानांच्या या आवाहनाने सगळा देश त्यांच्याबरोबर साहचर्यास सज्ज झाला. अडचणी होत्या, पण प्रामाणिकपणे देशासाठी जनता खांद्याला खांदा लावून सरकारच्या बाजूने उभी राहिली. नोटाबंदीच्या एका वर्षांत सगळ्यात जास्त वेदना या विरोधी पक्ष विशेष करून काँग्रेस पक्षाला झाल्या. याचे कारण असे की, त्यांच्याच राज्यात भ्रष्टाचाराला वाव मिळाला, राजाश्रय मिळाला, अनेकांना आपले खिसे भरण्याची संधी मिळाली, पण जेव्हा काळ्या पैशावर मोदींनी कुठाराघात केला तेव्हा अनेक जण पंख कापलेल्या पक्षासारखे अर्धवट फडफडू लागले. नोटाबंदीच्या एका वर्षांत ज्या काही अडचणी सुरुवातीला जाणवल्या त्या आता राहिलेल्या नाहीत. सगळी परिस्थिती सुरळीत झाली आहे. ९९ टक्के पांढरा पैसा बँकिंग व्यवस्थेत परत आला. देशात डिजिटल क्रांती सुरू आहे. संशयित खात्यांवर कारवाई होत आहे. एकूणच देशातील प्रामाणिक व गरीब जनता नोटाबंदीच्या निर्णयावर बेहद्द खूश आहे. नोटाबंदीला केवळ काँग्रेस व विरोधी पक्षांचाच विरोध आहे, कारण  त्यांच्या भ्रष्ट मार्गाना आता पायबंद बसला आहे.

देशाने कदाचित पहिल्यांदा असा विरोधी पक्ष बघितला की, ज्याची मनोवृत्ती देशाच्या विकासात अडथळे आणण्याची म्हणजे नकारात्मक आहे. देशाला फायदेशीर ठरणाऱ्या योजनांना विरोध व लोकांची दिशाभूल करणे हा विरोधी पक्षांचा आता विरंगुळा बनला आहे. आपला काळा पैसा बाहेर येईल, काळे धंदे उघड होतील अशी भीती सर्वच विरोधी पक्षांना वाटली तर त्यात नवल नाही; पण त्या मुद्दय़ावर विरोधकांनी देशातील सामान्य जनतेची दिशाभूल केली.  पण त्यांच्या अपप्रचाराला बळी पडण्याइतकी देशातील जनता दुधखुळी नाही. नोटाबंदीला काही महिने झाले असताना उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, त्यात जनतेने मतांचा जोगवा भरभरून भाजपच्या झोळीत टाकला. भाजपची दोन्हीकडे प्रचंड बहुमताने सत्ता आली. नोटाबंदीचा साहसी निर्णय हा योग्यच होता यावर जनतेने केलेले ते शिक्कामोर्तब होते.

कुठल्याही मुद्दय़ावर राजकारण करणे हे तर विरोधकांचे कामच आहे, पण ते राजकारण सकारात्मक राहिलेले नाही. जनतेच्या समस्या सरकारपुढे मांडणे हे विरोधकांचे काम असते, पण आजचा विरोधी पक्ष विशेष करून काँग्रेस एकाच परिवाराच्या भक्तीत लीन आहे.

विरोधकांचे नकारात्मक राजकारण हे केवळ नोटाबंदीच्या विरोधापुरते नाही. जेव्हा पंतप्रधानांनी जनधन योजनेची सुरुवात केली तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्यात आली, पण त्या योजनेमुळे एरवी ज्या अनेक लोकांना बँक खाते म्हणजे काय हे माहिती नव्हते ते बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले व त्यांना आर्थिक सबलीकरणाचा अनुभव आला हे आता सर्वज्ञात आहे. पंतप्रधान मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वत: रस्त्यावर उतरून स्वच्छ भारताचा नारा दिला. त्या वेळीही विरोधकांनी त्याला पाठबळ देण्याऐवजी टीकाच केली. नंतर पंतप्रधानांनी प्रत्येक घरात स्वच्छतागृहाचा आग्रह धरला तेव्हाही त्यांना उपहासाचे धनी व्हावे लागले. एवढेच नव्हे तर देशात एकच कर असावा यासाठी वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी योजना लागू केली तेव्हा त्याबाबत खोटय़ा गोष्टी पसरवण्यात आल्या. ‘एक बाजार, एक कर’ ही ऐतिहासिक निर्णयाची खरी बाजू होती. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचे तर जगात कौतुक झाले, पण विरोधकांनी त्यातही उणीदुणी काढली, त्यावरही प्रश्न उपस्थित केले; पण प्रत्येक निर्णयात जनतेने मताधिकारातून विरोधकांना आरसा दाखवण्याचे काम चोखपणे पार पाडले.

मोदी सरकारने अनेक साहसी निर्णय घेतले व त्यावर जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांनी केले. अलीकडेच जागतिक बँकेनेही मोदी सरकारने राबवलेल्या धोरणानंतर उद्योग व्यवसाय करण्यासाठी भारतातील परिस्थिती सुधारल्याचे मान्य करीत शिक्कामोर्तब केले. गेल्या तीन वर्षांतील आर्थिक सुधारणांमुळे उद्योग-व्यवसायस्नेही देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ३० घरांनी वर जाऊन १०० व्या स्थानावर पोहोचला आहे. पारदर्शी कर धोरण, काळ्या पैशाविरोधात कायदा यामुळे करदात्यांच्या संख्येच्या दृष्टिकोनातूनही भारत ५३ घरे वर सरकला आहे.

साकल्याने विचार केला तर मोदी सरकारच्या दूरदर्शी धोरणांचा देशाला फायदा होत आहे. आज विश्वाच्या अथांग पटलावर भारताच्या आर्थिक ताकदीचा डंका वाजतो आहे. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनासाठी घामाचे योग्य दाम मिळत आहे. खतावर अनुदान मिळत आहे. खंबीर नेतृत्वामुळे देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल उंचावले आहे, त्यामुळेच आज देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. आपण शांतपणे जीवन जगत आहोत, कारण आपले जवान अधिक ताकदीने उभे आहेत, पण विरोधी पक्ष मात्र धृतराष्ट्रासारखी काळी पट्टी डोळ्यावर चढवून बसला आहे. त्यांना काही चांगले दिसत नाही व काही चांगले सुचतही नाही. यामुळेच जनता प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्षांना धूळ चारत आहे. त्यांचे पुन्हा सत्तेवर येऊन मलिदा खाण्याचे मनसुबे व त्यामागचे राजकारण यशस्वी होऊ देत नाही. आता जनता शहाणी झाली आहे. पंतप्रधान मोदी विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला क धीच देशहिताच्या आड येऊ देणार नाहीत. काँग्रेसचे राजकारण घराणेशाहीभोवती फिरणारे आहे, पण भाजपचे तसे नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा व पक्षापेक्षा देश मोठा, ही शिकवण या पक्षात विसरली जात नाही. त्यामुळेच देश सर्व क्षेत्रांत प्रगती करीत आहे. आता हा अश्वमेध विरोधकांना रोखता येणार नाही.

भाजपच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख