News Flash

नोटाबंदीचे दिवस : लग्नात विघ्न

घरी लग्नाची जोमाने तयारी सुरू असतानाच ८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केली

घरी लग्नाची जोमाने तयारी सुरू असतानाच ८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यानंतरचा प्रत्येक दिवस आमच्या शुभकार्यात सतराशे विघ्ने घेऊन आला. अचानक झालेल्या या निर्णयाने लग्नाच्या खरेदीचा बट्टय़ाबोळ झाला. बँकेच्या खात्यांमधून फारच कमी रक्कम काढण्याची मुभा असल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. आगाऊ  स्वरूपात सभागृहाची आणि भोजनव्यवस्थेची नोंदणी करताना पैशांच्या अभावाने अडचणींना तोंड द्यावे लागले. बँकेच्या खात्यात पैसे असूनही ते इच्छेनुसार काढता येत नव्हते सभागृह, सोनार, भोजनापासून प्रत्येक गोष्टीसाठी धनादेशाऐवजी रोखीनेच पैसे देण्याची मागणी होत होती. काही जणांनी मोठेपणा दाखवीत उधारीवर सामान दिले. पण तेवढय़ानेच प्रश्न मिटले नाहीत. आधीच रोकडटंचाई आणि लग्नकाळात छोटय़ा छोटय़ा कामांसाठी लागणारा खर्च यांचे गणित जुळवणे कठीण बनले होते. वाहन नोंदणी करण्यापासून, पूजेचे साहित्य इत्यादींची खरेदी करताना रोखीने पैसे देणे आवश्यक असल्याने तिथे बरीच रक्कम खर्च झाली. त्यानंतर किमान दोन महिने परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने लग्नखर्चाची परतफेड होईपर्यंत बराच अवधी जावा लागला.

अनिमेष केणी, नोकरदार, दादर

नेपाळ सहलीचे दु:स्वप्न

विशाल यात्रा या सहल कंपनीत समन्वयक म्हणून मी काम करतो. मुंबई, नाशिक, पुणे भागातील सुमारे ६० पर्यटकांना घेऊन आम्ही नेपाळ पर्यटनाला गेलो होतो. त्याच दिवशी, ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी ५०० व एक हजारच्या नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून आम्हाला संकटांना तोंड द्यावे लागले. नेपाळमध्ये कुठेच या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या. सहल पुढे कशी न्यायची, हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. तेथील एटीएममध्येही पैसे नव्हते. ज्या हॉटेलात मुक्काम होता तेथील मालकांची समजूत काढली आणि आमच्याकडील सोन्याच्या वस्तू, ओळखपत्रे, आधारकार्ड त्यांच्याकडे ‘तारण’ ठेवत कसेबसे निभावून नेले. पण इतर ठिकाणी रोकडची समस्या कायम होती. सर्वच प्रेक्षणीय स्थळी बाद नोटांना नकार देण्यात येत होत्या. पेट्रोल पंपावर बसच्या इंधनासाठी पैसे नव्हते. बसचालक हा नेपाळमधील रहिवासी असल्याने त्याच्या ओळखीने प्रवास सुरू होता. शेवटी सर्व पर्यटकांकडील १००, ५०च्या नोटा गोळा करून त्यातून भागवले. या सगळय़ा गोंधळामुळे सर्वच पर्यटकांचा हिरमोड झाला.

– मेराज आलम, सहल समन्वयक

घराचा व्यवहार योग्य मार्गाने

नोटाबंदीच्या निर्णयाआधीच आम्ही घर घेण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानुसार गोराई या ठिकाणी एक जागाही पाहून ठेवली होती. विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने प्रचलित प्रथेनुसार काळय़ा पैशाची मागणी केली होती. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही प्राध्यापक असल्याने काळा पैसा असण्याचा प्रश्नच नव्हता. जागेची किंमत ५० लाख रुपये होती. त्यापैकी साधारण ३२ लाख रुपये रोकड अर्थात काळा पैसा देण्याची मागणी त्या व्यावसायिकाने केली. त्यामुळे हा व्यवहार नाकारण्याखेरीज पर्याय नव्हता. पण त्याच वेळी नोटाबंदीची घोषणा झाली आणि सगळे चित्र पालटले. कालपर्यंत काळय़ा पैशाचा आग्रह धरणारा तो व्यावसायिक संपूर्ण रक्कम योग्य मार्गाने घेण्यास तयार झाला. साहजिकच ते घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

– प्रा. गजेंद्र देवडा, साठय़े   महाविद्यालय, विलेपार्ले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 12:16 am

Web Title: demonetisation effect on weddings
टॅग : Demonetisation
Next Stories
1 विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते ‘सर्वकार्येषु’मधून एकत्र यावेत!
2 इस्लामच्या आक्रमणामुळेच बौद्ध धर्माचा लोप
3 ‘राज्य’कारण हिमाचल प्रदेश : हिमाचलचे सफरचंद भाजपच्या परडीत?
Just Now!
X