News Flash

उन्माद नको, इतकेच..

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात वाढत गेलेला उन्माद, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा दिसू लागला. तो कमी होत नाही

| October 14, 2014 12:09 pm

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात वाढत गेलेला उन्माद, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुन्हा दिसू लागला. तो कमी होत नाही, हेही यानिमित्ताने दिसले. या उन्मादाबद्दल पडलेले प्रश्न मांडणारा आणि सर्वाना बरोबर घेऊन ते सोडवू पाहणारा हा लेख..
आणीबाणीनंतरच्या, १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा दिवस. तेव्हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग नव्हते. मुंबईत दादरच्या रुपारेल कॉलेजच्या बाहेर मी मित्राबरोबर उभा होतो. भोवती काही शे माणसे होती. आत मतमोजणी चालू होती. मतमोजणीची पहिली घोषणा ऐकायला आम्ही सारे आतुर होतो. आणीबाणीची दहशत वातावरणातून गेली नव्हती. अनोळखी लोकांशी न बोलता, कुणाच्या डोळ्याला डोळा न देता सर्व जण ताटकळत होते.
िभतीवरचा लाऊडस्पीकर खरखरला. मतमोजणीचे आकडे ऐकू येऊ लागले. ‘..अहिल्या रांगणेकर बहात्तर हजार.. दोन-चार नावे झाली आणि घोषणा झाली, ‘आर डी भंडारे सत्तावन्न हजार..’ पुढचे शे वगरे मी ऐकलेच नाहीत. उत्स्फूर्तपणे माझ्या तोंडून एक भली मोठी आरोळी निघाली.. आणि मी दचकलोच. कारण भोवतीच्या गर्दीतल्या जवळपास प्रत्येकाच्या तोंडून तशीच आरोळी निघाली होती! हे सगळेच आपल्या बाजूचे असतील, असे मला अजिबात वाटत नव्हते.
पुढचा इतिहास सर्वाना माहीत आहे. इंदिरा, संजय यांचा पराभव झाला. काँग्रेसचे राज्य गेले. जनता पार्टीचे आले. ‘दुसऱ्या स्वातंत्र्या’चा उत्सव देशभर साजरा झाला. आनंदी आनंद गडे.
पण तेव्हा मला किंवा इंदिरा गांधी पराभूत झाल्याचा आनंद झालेल्या माझ्या परिचयातल्या कुणालाही उन्मादाची बाधा झाल्याचे मला दिसले नाही. ‘आता आपले राज्य आलेय, आता एकेका काँग्रेसवाल्याला पकडून लम्बे करायचे स्वातंत्र्य, नव्हे अधिकार आपल्यापाशी आहे,’ असे झाले नव्हते. अशी भावना अगदी काँग्रेसच्या कडव्या विरोधकाला, आणीबाणीत तुरुंगात जावे लागलेल्याला होत असल्याचे मला जाणवले नाही.
थोडक्यात, तेव्हा हवेला उन्मादाचा उग्र दर्प सुटला नाही.
काँग्रेसची तर गोष्टच वेगळी. हारजीत होण्यामुळे त्यांच्या वागण्यात फरक पडत नाही. विरोधकांशी ते तसेच वागतात. हरलेल्या विरोधकाला खिजवावे, त्याचा वारंवार पाणउतारा करावा, असे काँग्रेसवाल्यांचे वागणे झाल्याचे मी पाहिले नाही की ऐकले नाही. ‘आपण राज्यकत्रेच’ असे त्यांना अंतर्यामी वाटते की काय नकळे. वारा येईल तशी पाठ फिरवणारे काय, सगळ्या पक्षांत असतात; पण विशेष म्हणजे, विजयी झाल्यावर प्रचंड जल्लोष करणाऱ्या शिवसनिकांच्या वागण्यातही सातत्याने मुंबई महापालिका जिंकताना एक उन्माद मुक्कामाला आलाय असे झालं नाही.
मग आता नेमके काय वेगळे झालेय? भाजप (की मोदी, केवळ मोदी? कळत नाही) विजयी झाल्यामुळे काही जण जे चेकाळून बसलेत, त्यांचा उन्मादज्वर आवरतच नाही! त्यांना समंजस बोलता येत नाही, त्यांना प्रतिवाद ऐकू येत नाही, त्यांना विरोधी ब्रसुद्धा सहन होत नाही. कर्कश सुरात त्यांचा उग्र उन्माद सतत उतू जाताना आढळतो. नाही, ‘समाजात सर्व प्रकारचे लोक असतात, शहाणे असतात, तसेच माथेफिरूही असतात,’ असे म्हणून हा प्रकार सोडून देता येत नाही. कारण या उन्मादमत्तांची संख्या अपवाद म्हणून सोडून देण्याइतकी क्षुद्र नाही. आणखी एक गोष्ट अशी की, कानठळ्या बसतील अशा आवाजातच स्वत:चा आनंद व्यक्त करण्याची संस्कृती असलेले हे लोक नव्हेत! गणपतीच्या मिरवणुकीपुढे अचकट विचकट नाचणारे हे लोक नव्हेत! यांचा असा िहस्र पशू का होतोय? याविषयी केवळ अचंबा, चिंता व्यक्त करून मोकळे होऊ नये म्हणून काही पावले पुढे जाण्याचा हा प्रयत्न.
ट्विटर, फेसबुक यांना सोशल मीडिया म्हणतात. मला ‘व्हच्र्युअल मीडिया’ हे नामाभिधान जास्त योग्य वाटते. इथे आपला केवळ शब्द असतो. आपली ओळख लपवायची झाली, तर ते शक्य असते. परिणामी लोक जास्त मोकळे होतात. वाटले होते, हे रेचन आहे. यातून मनात साचत जाणाऱ्या कर्दमाचा निचरा होईल आणि त्यायोगे शुद्ध झालेला एकेक जण समाजात जास्त नीट वागेल. समाजस्वास्थ्याला हे पूरक ठरेल.
पण तसे होत नाही. एकीकडे निरागस, भोळ्या मनांना फसवण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला जातो; तर दुसरीकडे मनातले गरळ बाहेर काढायला ही जागा कामाची ठरते. पण गरळ ओकून निचरा न होता, त्याची चटक लागू लागते. आजवर समाज जात, वर्ग, भाषा वगरे निकषांवर विभागलेला होता; आता विचार, विकार हे निकष माणसांना एकत्र आणताहेत, वेगळे पाडताहेत. सोशल मीडियामुळे गरळ ओकणारे, विशिष्ट प्रकारची विकृती असणारे यांचे फावते. बाकी कोणाशी आपल्याला (आत्ता, या ठिकाणी) कर्तव्य नाही; पण मोदीभक्तांमध्ये गलिच्छ शिव्या देणारे, एकदम गदारोळ करून तुटून पडणारे, सतत त्रास देणारे, यांचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यांच्यावर तर्कशुद्ध विवेचनाचा परिणाम होत नाही. विरोधकाचे चारित्र्यहनन करण्यात भरपूर वेळ घालवताना त्यांना सुख मिळते, असा संशय घ्यायला जागा आहे. अशांच्या उन्मादी वचनांनी व्हच्र्युअल मीडियाची जागा दरुगधमय होऊ लागली आहे. हे विचित्र आहे. असे यापूर्वी झालेले माहीत नाही. नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांत भाजपला अनपेक्षितरीत्या मार खावा लागला, पण त्यामुळे अंगात उन्माद येऊन भाजप विरोधकांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आहे, असे झाले नाही. निकाल जाहीर झाले, व्हायची ती ढोलबजावणी झाली; संपले.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला देशभरातल्या मतदारांनी भरघोस मते दिली. ‘काँग्रेसला घालवणे, हा मुख्य उद्देश होता’ असे म्हटले, तरी ‘मोदींवर मतदारांनी विश्वास टाकला,’ हे खरेच! पण त्या मतदाराला काँग्रेस गेल्यामुळे, मोदी आल्यामुळे उन्मादावस्था प्राप्त झालेली नाही. तीन महिन्यांनंतरच्या पोटनिवडणुका याची ग्वाही देत आहेत. भाजप हा राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षात काही नेते आहेत, काही कार्यकत्रे आहेत, काही नुसते सभासदही आहेत. हे सगळे उन्मादाने धुंद झालेले नाहीत. मग हे कोण लोक आहेत, ज्यांना ‘आता आपले राज्य आलेय, आता मी म्हणेन तो कायदा; मी कोणालाही शिवीगाळ करीन, माझ्यासारखे दहा जमवून विरोधकांची बोलती बंद करीन, जो ऐकणार नाही त्याच्यावर शारीरिक हल्ला करीन,’ असा माज आला आहे? जात, भाषा, धर्म, वर्ग अशा कशावर त्यांची ओळख ठरवता येते का? हे लोक केवळ ‘गुजराती’ किंवा ‘हिंदू’ अशा रकान्यांत बसवणे मूर्खपणाचे ठरेल. कारण वाणीसुद्धा गुजराती असतात आणि वाण्यांना सर्वाशी धंदा करायचा असतो. ते कधीच उर्मट, उद्धट होणार नाहीत. ‘मी देव मानणार नाही, मी गीतेला धर्मग्रंथ म्हणणार नाही, मी वेळ आली तर गोमांस खायला कचरणार नाही, मी पक्का िहदू आहे,’ असे मी इथे ताठ मानेने म्हणू शकतो. इथे जशी जातीची (आणि काही प्रसंगी जातपंचायतीची) पकड मजबूत आहे, तशीच ती पकड झुगारण्याची मुभा व्यक्तीला आहे. या संस्कृतीच्या चिवटपणाचं रहस्यच तिची लवचीकता, हे आहे. सरसकट िहदू जर उन्मादाच्या आहारी गेला, तर हा देश बुडाला, या देशाची अतिप्राचीन संस्कृती बुडाली. स्थिती तेवढी वाईट नाही, होणारही नाही.
हे कसे आहे, तर जणू या देशात निवडणुकांद्वारे लोकप्रतिनिधी ठरवायला सुरुवात झाल्यापासून हे (आता उन्मत्त झालेले) लोक गुदमरलेले होते आणि त्यांच्या घुसमटीला शब्द मिळत नव्हता. राजवट काँग्रेसची येवो की समाजवाद्यांची/ जनता पार्टीची की केवळ भारतातच सापडतील अशा विविध आघाडय़ा-युत्यांची.. त्यांना ‘आपले राज्य’ आल्यासारखे वाटत नव्हते. आपण या देशाचे भाग्यविधाते आहोत, ही ईश्वरेच्छा आहे, ते आपले जन्मदत्त कर्म आहे, असे वाटणारे काही लोक असतात. आपोआपच त्यांना शिकलेले- न शिकलेले, कमावते- भणंग, बुद्धिजीवी- श्रमजीवी, शहरी-गावंढळ, अशा सर्वाचे मत एकाच तागडीने तोलणारी लोकशाही चुकीची वाटते. त्यांना भाजप हा आपला पक्ष वाटतो. या वेळी एकटय़ा भाजपला निर्वविाद बहुमत मिळाल्यावर, नरेंद्र मोदींसारखा कडवा निष्ठावंत आणि कठोर प्रशासक आणि त्याबरोबर अमित शहांसारखा होत्याचे नव्हते करू शकणारा बलदंड पक्षाध्यक्ष लाभल्यावर त्यांना प्रथमच असे वाटू लागले आहे की, आता जे होईल, ते अगदी आपल्या मनासारखे असेल! आणि याचा त्यांना उन्माद आला असेल!
तरीपण हे ‘अगदी आपल्या मनासारखे’ म्हणजे काय? त्याचा अर्थ ‘या देशाचा विकास’, असा असू शकत नाही कारण स्वातंत्र्यानंतरचा इतिहास दृष्टिआड करून उद्याच्या विकासाची कल्पना करता येत नाही. पाकिस्तान आणि भारत एकाच वेळी स्वतंत्र झाले. इथे धरणे झाली, पोलादाचे कारखाने झाले, विमाने/ रणगाडे यांसारख्या सामग्रीची निर्मिती होऊ लागली, श्रेष्ठ दर्जाच्या आयआयटीसारख्या स्वायत्त शिक्षणसंस्था सुरू झाल्या, अणुविज्ञान विकासाला चालना मिळाली. देशातल्या तुटपुंज्या साधनसंपत्तीवर अगोदर गरिबांचा हक्क असेल, असे तत्त्व प्रमाण मानले गेले आणि हे सगळे होत असताना देशाच्या नाडय़ा कुणा परदेशी महासत्तेच्या हाती कधीच द्याव्या लागल्या नाहीत. सुनामीचा फटका भारताच्याही दक्षिण किनाऱ्याला बसला. तेव्हा बडय़ा पाश्चात्त्य देशांनी मदत देऊ केली होती, पण मनमोहन सिंग सरकारने ती नम्रपणे नाकारली. धोरणलकव्याचा रोग लागलाच असेल, तर तो मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या टर्ममध्ये लागला. त्याअगोदरचे काय? संगणक प्रसाराचे, गावोगाव टेलिफोन नेण्याचे श्रेय राजीव गांधींना नाही? बँकांचे राष्ट्रीयीकरण करून गावागावांपर्यंत त्यांचा विस्तार करण्याचे, बांगलादेश स्वतंत्र करून पाकिस्तानच्या अस्मितेला जबर तडाखा देण्याचे श्रेय इंदिरा गांधींचे नाही? गांधीजींच्या अिहसा-सविनय कायदेभंग या प्रगल्भ तत्त्वांच्या द्वारे या कंगाल देशाला सतत जागतिक व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवून देणे, हा नेहरूंच्या परराष्ट्रनीतीचा मोठेपणा नाही? ‘काँग्रेसच्या साठ वर्षांच्या अंदाधुंदीत’ ही कुठली भाषा? नेहरू-गांधी आडनावाच्या लोकांनी देश फक्त लुटला, असे म्हणताना या सगळ्या गोष्टी काय दिसत नाहीत?
विकासाच्या अपेक्षेने माणसात उत्साह येतो, ऊर्जा येते; त्या ऊर्जेला कामाला लावण्याचा पंतप्रधानांचा प्रयास लक्षात येतो आहे. ते वेगळे आणि हा ‘राजापेक्षा राजनिष्ठ’ असा काहीसा उन्माद वेगळा.
 मुळात उन्माद हे विवेकाचे, लाभ-हानीचा हिशेब केल्याचे लक्षण नाही. उन्मादातून कोणी स्वत:चे भले केल्याचा इतिहास नाही. ज्या गृहीतांतून हा उन्माद उसळला आहे, त्या गृहीतांचा पाया कमकुवत आहे, भविष्यात अपेक्षाभंग अटळ आहे, हे या उन्मादधुंद जमातीच्या का लक्षात येत नाही? उन्मादातून केवळ ‘स्वत:ला शहाणे समजणारे डावे विचारवंत’च नव्हे, तर काही समाजघटकही दुखावले जातील. लोकशाहीत सत्तेचा निरंतर पट्टा कोणालाच मिळत नसतो. आजच्या उन्मादाला आवरले नाही, तर पाच र्वष जास्तच म्हणावी लागतील.
जगात विकृत क्रूरकम्र्यापेक्षा किती तरी जास्त संहार तत्त्वनिष्ठांनी केला आहे. कोणी तरी त्यांना पटवून द्यायला हवे, हा रस्ता अनिवार्यपणे गत्रेच्या दिशेने नेणारा आहे. स्वत:चे हित ओळखा आणि भानावर या!
लेखकाचा ई-मेल: hemant.karnik@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 12:09 pm

Web Title: derangements in the assembly elections campaign of maharashtra
टॅग : Election Campaign
Next Stories
1 मुद्दे नव्हतेच, होता गोंधळ!
2 आठवड्यातील आठवावेसे
3 हरित अर्थ-राजकारणाची संधी
Just Now!
X