20 November 2017

News Flash

हे विश्वची झाले घर!

मी एक अतिशय सामान्य आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. माझ्या छोटय़ा संस्थेला लोकसत्तेने खूपच मोठं

गीता कुलकर्णी (साईधाम वृद्धाश्रम, खिडकाळी) | Updated: November 14, 2012 2:32 AM

मी एक अतिशय सामान्य आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. माझ्या छोटय़ा संस्थेला लोकसत्तेने खूपच मोठं केलंय. २२ सप्टेंबरला आमच्या संस्थेबाबत लेख छापून आला आणि दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद वगैरे सगळीकडून विचारणा झाली. माझं काम घराघरांत पोहोचलं. अविनाश बर्वे यांनीही गेली १५ र्वष त्यांची संस्था सांभाळून आम्हाला सहकार्य करत आहेत. आमच्या संस्थेबद्दल अनेकांना त्यांनी माहिती दिली. लोकसत्ताच्या या उपक्रमात आमच्या संस्थेचा सहभाग त्यांच्यामुळेच. आमच्याकडील वृद्ध गृहस्थ नेहमी मराठी मालिका पाहतात आणि त्यांचं अमरापूरकरांवरच नाही, तर सगळ्याच मराठी कलाकारांवर खूप प्रेम आहे. ते सर्वच कलाकारांचं कौतुक करत असतात. लोकसत्तामुळे आमचं खूप नाव झालं. अनेक संवेदनशील वाचकांनी आम्हाला वैयक्तिक धनादेशही पाठवले. आम्हाला ग्रामस्थांनीही खूप मदत केली. आता तर लोकसत्ताचे वाचकही आमच्या संस्थेशी जोडले गेले आहेत. पुन्हा एकदा लोकसत्ताच्या मान्यवरांना धन्यवाद. आमचा वृद्धाश्रम हा साई परिवार नावाचं घर आहे. त्या घराचा व्याप आता ‘लोकसत्ता’मुळे वाढला आहे.
गीता कुलकर्णी (साईधाम वृद्धाश्रम, खिडकाळी)

विज्ञानदीप लावू जगी!
लोकमान्यांनी १८९२मध्ये पुण्यात गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर केसरीही सुरू केला. लोकमान्यांनी अनेक सामाजिक कार्ये सुरू केली. आता ते लोकमान्य होते, म्हणून त्यांनी या कामांना हातभार लावला की, ते संपादक होते म्हणून त्यांनी हे उपक्रम सुरू केले, हा इतिहास संशोधकांचा विषय आहे. पण ‘लोकसत्ता’ने सुरू केलेला ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रमही त्याच तोडीचा आहे. लोकमान्यांची ती परंपरा लोकसत्तेने चालवली आहे. मविप ‘लोकसत्ते’शी गेली सात वर्षे निगडित आहे. आमचा एक कॉलम सातत्याने ‘लोकसत्ते’ अनेक लोक वाचत आहेत. आमच्या ‘विज्ञाना’त अवकाश शास्त्रापासून भूगर्भशास्त्रापर्यंत अनेक भाग आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची जबाबदारी आमच्या संस्थेवर आहे. ती जबाबदारी आम्ही आमच्या कार्यक्रमातून पार पाडतो. आपल्याकडे विजेचा, पाण्याचा तुटवडा आहे. त्याचबरोबर स्वच्छतेबाबत आपण अत्यंत अस्वच्छ आहोत. या गोष्टींबाबत जागृती करायला हवी. त्याचप्रमाणे कचऱ्याचं निर्मूलन कशा प्रकारे करता येईल, याचं प्रात्यक्षिक म्हणून आम्ही गच्चीवरचा बगिचा, ही संकल्पना काही वर्षांपूर्वी अमलात आणली होती. ती संकल्पना खूपच गाजली. घरच्या ओल्या कचऱ्याचा उपयोग करून फळं-फुलं काढता येतील, ते त्यातून शिकता येतं. शाळेत आपण विज्ञानाच्या दोन दोन ओळीतल्या व्याख्या पाठ करतो. पण विद्यार्थी त्या समजून घेत नाहीत. मग या संकल्पना समजून देण्यासाठी एकेका संकल्पनेवर तीन तीन तास खर्च करून एक कार्यक्रम केला जातो. त्यासाठी आम्ही दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करतो. त्याचप्रमाणे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मुलांना अनेक संकल्पना समजावून देणं, हे काम आम्ही करतो. उदा. शिकवताना पानाचा रंग हिरवा आहे, असं शिकवतात. प्रत्यक्षात दहावीच्या पुस्तकात तो रंग काळा दिसतो. आणि बाहेर डोकावून बघितल्यावर एकाच हिरव्या रंगाच्या हजारो शेड्स दिसतात. त्या प्रत्यक्ष दाखवल्याशिवाय समजत नाहीत. मग त्या कोणी दाखवायच्या? या संकल्पना समजल्यावर पाठांतर करावं लागत नाही.
– अ. पां. देशपांडे (मराठी विज्ञान परिषद)

 मेळघाटाला कुपोषणाच्या छायेतून बाहेर काढायचंय  
सुरुवातीलाच मी लोकसत्ताचे मन:पूर्वक आभार मानतो. मेळघाट म्हटलं की, कुपोषण, हातापायाच्या काडय़ा आणि पोटाचा नगारा. बस तेवढंच! पुण्या-मुंबईहून कोणी आले आणि विचारले की काय पाहायचे आहे? ते म्हणतात, आम्हाला कुपोषण पाहायचे आहे. हे काय कुपोषणचे म्युझियम आहे? संपूर्ण बांबुकेंद्र कुपोषणात काम करत नाही. किंबहुना अपंग जरी आमच्याकडे असला तरी आम्ही त्याला अपंग म्हणून वागणूक देत नाही. आमच्याकडे तीन जण असे आहेत जे अजिबात आपल्या पायावर चालू शकत नाहीत. बांबूच्या काठीच्या आधाराने ते चालतात आणि हाच बांबू त्यांच्या जीवनाचा आधार व्हावा, म्हणून हे काम आम्ही सुरू केले. पूर्ण मेळघाट हा खिचडीवर जगतो आहे, असं शासनाला वाटतं. आणि त्या खिचडीतूनच कुपोषण दूर होईल, असं शासनाला वाटतं. त्या पद्धतीने तिथली व्यवस्था चालू आहे.
या माध्यमातून आम्ही तिथे ग्राम ज्ञानपीठाची उभारणी करत आहोत. भारतीय जीवनशैली काय होती, ते विज्ञान काय होते याचे डॉक्युमेंटेशन करण्याचे काम या ज्ञानपीठात केले जाणार आहे. हा माणूस इथे घडावा, त्याने आपल्या पायावर उभं राहावं आणि मेळघाटलाही उभं करावं, ही या ज्ञानपीठामागची सदसद्विवेकबुद्धी आहे.
सुनील देशपांडे (संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाट, सुनील देशपांडे)

‘चांगलं मरण देण्यासाठी’..  
 एचआयव्हीवर अद्याप शंभर टक्के औषध काही सापडलेलं नाही. पण आता एचआयव्ही बाधित रुग्ण औषधोपचाराने आपलं जीवनमान वाढवू शकतो, एवढं नक्की! तसंच ‘क्वालिटी ऑफ लाईफ’सुद्धा सुधारलं आहे. त्यामुळे मग आमच्या संस्थेचं ध्येय बदललं. संस्थेतल्या मुलांना स्वतच्या पायावर उभं करून समाजात पाठवायचं, हे ध्येय आता संस्थेनं अंगिकारलं आहे. सरकार दरबारी १७ वर्षे ३६५ दिवस झाल्यानंतर मुलगा सज्ञान होतो. पण आम्हाला असं करता येणार नाही कारण ती आमची घरची मुलं आहेत. त्यामुळे आम्ही २४ वर्षांपर्यंत त्या मुलांना आमच्या संस्थेत ठेवतो. त्या दरम्यान त्यांना काही पायाभूत धंदेशिक्षण वगैरे देतो. त्या मुलांचा सपोर्ट ग्रुप करायचा. त्यांना काही उद्योगधंद्यासाठी बीजभांडवल लागलं, तर ते कमीत कमी व्याजदराने पुरवायचं. त्यासाठी आम्ही आता निधी उभारण्याचा विचार करत आहोत. त्यामुळेच ती मुलं स्वतच्या पायावर उभं राहून समाजात आपलं योगदान देऊ शकतील.
शिरीष लवाटे (मानव्य गोकुळ, पुणे)

बादलीत बसून बादली उचलणं अशक्य!  
मी इथे आलो आहे तो, एका दुष्काळग्रस्त भागातून. पण सर्वच दुष्काळ मानवनिर्मित असतात. आमच्या सोलापूर जिल्ह्यात आमच्या गरजेच्या तिप्पट पाऊस पडतो. आमच्या गावाला दहा लाख टँकर्स आकाशमार्गे येतात. त्यामुळे आम्ही स्वतला दुष्काळग्रस्त म्हणवून घेणं हे लांच्छनास्पद आहे. पुलंनी आम्हाला चावी मारली होती या कामासाठी.
 आमटय़ांकडे मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठातून शिक्षण घेतलं. पुलं तिथे नेहमी यायचे. बोलताना ते नेहमी म्हणायचे की, कृषी आणि ऋषी या दोन्ही संस्कृती एकत्र कशा येतील, हे माझं स्वप्न आहे. त्यातून आम्हाला चावी मिळाली. आणखी एक ट्रिगर पॉइंट मिळाला की, भोपाळचं गॅसकांड झालं. लाखो माणसं मृत्युमुखी पडली. आम्ही शपथ घेतली त्या युनियन कार्बाइडच्या गेटसमोर! या रासायनिक गोष्टींना पर्याय शोधायचा पण आम्ही केला. पण हे शहरात बसून होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ होती.
बादलीत बसून बादली उचलता येत नाही. आपल्याला ग्रामीण भागात जावं लागेल, हे कळून चुकलं. आमच्याकडे फजितीची प्रामाणिक नोंद आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणाची फजिती होऊ नये, हा त्यामागचा हेतू. लोकसत्ताच्या माध्यमातून आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे आम्हाला तरुण कार्यकर्ते मिळाले. माझ्या मते लोकसत्ताच्या या उपक्रमाचं हे खूप मोठं यश आहे.
अरुण देशपांडे (विज्ञानग्राम, सोलापूर)

ज्ञानाच्या पाणपोईला सिंचनाची गरज!  
असा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल मी लोकसत्तेचे आभार मानतो. कारण, जे शासनाला उमजलं नाही, ते लोकसत्तेने करून दाखवलं. राजवाडेंनी धुळ्यात आयुष्याची शेवटची २५ र्वष काढली. त्यांच्या संपूर्ण संशोधनाचं सार आज धुळ्यात एकवटलं आहे. राजवाडय़ांनी मराठय़ांच्या खऱ्या इतिहासाची ओळख महाराष्ट्राला करून दिली. पण आज त्यांच्या नावाने सुरू असलेली संस्था कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय काम करत आहे. एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल. अजूनही राजवाडय़ांच्या संशोधनापैकी तब्बल ३० हजार कागदपत्र असंरक्षित आहेत. त्यांना संरक्षित करणे आणि प्रकाशित करणे हे आमचे काम अव्याहतपणे सुरू आहे. त्यासाठी आमचे कार्यकर्ते अथक प्रयत्न करीत आहेत. पण भक्कम आर्थिक आधार ही आमचीही समस्या आहे. याच अडचणीमुळे, आमच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना पगार देणंदेखील आमच्या आवाक्यापलीकडचं आहे. पण त्यातही सुखाची एक गोष्ट म्हणजे, अनेक ज्ञानवंत केवळ संस्थेच्या आस्थेतून काम करत आहेत. त्यांच्या कामामुळेच आज संस्था ताठ मानेने उभी आहे. त्यातच ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात आमच्या संस्थेची साद्यंत माहिती आली आणि एक मोठा आधार आमच्या मागे उभा असल्याचं प्रत्यंतर आलं. खुद्द ‘लोकमान्य लोकशक्ती’ आमच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे आम्हाला खूप हिंमत मिळाली आहे. संस्थेचं काम अव्याहतपणे चालू आहे. पण आजकाल एक गोष्ट आम्हा सर्वाच्याच लक्षात आली आहे. ती म्हणजे, हल्ली लोक कागद हातात घ्यायला तयार नाहीत. त्यांना सर्व इंटरनेटवर हवं असतं. त्यामुळे आम्ही ई-बूक्स तयार केली. तब्बल २५ ई-बूक्स आम्ही तयार केली आहेत. पण ही पुस्तकं म्हणजे गोष्टी किंवा तत्सम मनोरंजनाचा ऐवज नाही. त्यामुळे त्याला बाजारात किंमत नाही. उलटपक्षी ई-बूक तयार करण्याचं काम खर्चिक आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक आधाराची गरज आहे. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाने आम्हाला हा आधार दिला, असं मला वाटतं.
संजय मुंदडा (इतिहासाचार्य वि. का. राजवाडे इतिहास संशोधन मंडळ, धुळे)

एकेक स्वप्न पेरत चाललो आहोत!
दिवाळी म्हणजे तिमिरातून तेजाकडे नेण्याचा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीपोत्सव. लोकसत्ताने घरकुलला असेच महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचवले आहे. २५ सप्टेंबरला लोकसत्तामध्ये घरकुलचे वृत्त छापून आले आणि त्यानंतर पत्रांचा, फोनचा आणि धनादेशांचा ओघ अखंड सुरू आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी लोकसत्ता परिवाराला कृतज्ञतेचा नमस्कार करते.या उपक्रमानंतर अनेक पालकांनी फोन करून त्यांच्या समस्या आमच्याशी शेअर केल्या. मानसिक अपंगत्व ज्या घरांमध्ये आहे त्या पालकांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांना आधार देणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. लोकसत्ताने खूप मोठं काम केलं. नाशिकमध्ये छोटय़ाश्या घरकुलात आम्ही काम करतो. पण लोकसत्ताने दखल घेतली आणि आम्हाला त्यांच्या वाचकांपर्यंत पोहोचवलं. आम्हाला न पाहिलेल्या वाचकांनी केवळ लोकसत्तावरील प्रेमापोटी आणि विश्वासापोटी घरकुलला मदत केली. हे नातं आता आम्हीही जपू, ही ग्वाही देते!
– विद्याताई फडके (घरकुल परिवार संस्था, नाशिक)

First Published on November 14, 2012 2:32 am

Web Title: different personality speach given in loksatta programme