सतीश शिवाजी जगताप हे दिलासा केअर सेंटरचे जन्मदाते. सोलापूर जिल्ह्य़ातील अकलूज हे मूळ गाव असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील जगताप आज नाशिकमध्ये व्याधिग्रस्त अशा ७० जणांचे पालकत्व यशस्वीपणे पार पाडत आहेत. सुधारणा झालेले शेकडो जण पुन्हा आपआपल्या कुटुंबात रमले आहेत. तब्येत व्यवस्थित झालेल्या रुग्णांना नातेवाईकांनी परत घरी नेणे आणि नवीन रुग्णांनी दिलासामध्ये येणे हे चक्र सातत्याने सुरू राहात असल्याने संस्थेतील रुग्णांची संख्या कायम बदलत असते..

समाजसेवा ही ओढूनताणून करता येत नाही. ती अंगातच मुरलेली असावी असे म्हणतात. १९९८ मध्ये पुण्यातील ‘आयबीएम’सारख्या प्रसिद्ध कंपनीत कार्यरत त्या अभियंता तरुणास तर हे तंतोतंत लागू होते. कंपनीतील आपल्या एका महिला सहकाऱ्यास कामावर येण्यास रोजच उशीर होण्याचे काय कारण, हे कोडे त्याला उलगडेना. एक दिवस त्याने उशिराचे कारण विचारल्यावर वृद्ध आई-वडिलांमुळे उशीर होत असल्याचे उत्तर मिळाले. उत्तर पटण्यासारखे नसल्याने एकदा तो तिच्याबरोबर घरी गेला असता घराला कुलूप होते. तिने स्वत:जवळील चावीने कुलूप उघडल्यावर तो आत गेला असता एका पलंगावर अर्धागवायूने जर्जर वडील, तर दुसऱ्या पलंगावर अस्थिभंगामुळे अंथरुणाला खिळलेली आई दिसली. घरात आपल्याशिवाय यांना सांभाळणारे दुसरे कोणीही नसल्याने त्यांचे सर्व काही आवरूनच कंपनीत येणे जमत असल्याचे तिने सांगितले. समोर दिसणारे वास्तव पाहून सर्द झालेल्या त्या तरुणाच्या मनात समाजात अशा प्रकारे अनेक जण असतील याची जाणीव झाली. अशा अंथरुणाला खिळलेल्या व व्याधिग्रस्त वृद्धांना ‘दिलासा’ देण्यासाठी आपणास काय करता येईल, या अस्वस्थतेने तो बेचैन झाला. या अस्वस्थेतूनच जन्म झाला ‘दिलासा केअर सेंटर’चा.

article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
How to make raw mango dal mango dal
तुम्ही कधी चटकदार कैरीची डाळ खाल्ली आहे का? नसेल तर ही घ्या सोपी रेसिपी

दिलासाचा जन्म होण्यास वृद्धाश्रमांच्या किचकट अटीही कारणीभूत ठरल्या. आजारी, व्याधिग्रस्त वृद्धांना अशा आश्रमांमध्ये प्रवेश दिला जात नाही. हिंडण्या-फिरण्यास सक्षम आणि स्वत: आपले सर्व काही आवरू शकतील अशा वृद्धांनाच आश्रमांमध्ये प्रवेश मिळत असल्याने व्याधिग्रस्तांनी जावे तरी कुठे? पती-पत्नी दोघेही नोकरीस असल्यास लहान मुलांना पाळणाघरात ठेवण्याची सोय आहे. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात घरातील वृद्धांना आणि त्यातही ते व्याधिग्रस्त, जर फारसे हिंडते-फिरते नसतील, तर सांभाळणे कठीण होऊन बसते. अशा अवस्थेतील आई-वडिलांना मायेने आधार देण्याचे काम दिलासाकडून केले जात आहे. घरातील एकाकीपणापेक्षा वृद्धांना दिलासामध्ये बहुतांश प्रमाणात समदु:खी असलेल्या समवयस्कांमध्ये रममाण होण्यास मिळत असल्याने काही जण तर नंतर घरातील मंडळी घ्यावयास आली तरी जाणे टाळतात. मायेचे पांघरुण घालणारे दिलासा हेच आपले खरे कुटुंब असल्याचे ठणकावून सांगणारेही अनेक जण आहेत. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी दीड वर्षांतच आयबीएममधील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला व्याधिग्रस्तांच्या सेवेसाठी तिलांजली देण्याची हिंमत दाखविणाऱ्या जगताप यांच्या मनाचा एक कोपरा अशा वेळी निश्चितच सुखावत असेल. सन २००० मध्ये पुण्यातील एका छोटय़ा बंगल्यात एका बेवारस रुग्णाला दिलासा देण्यापासून जगताप यांनी समाजकार्यास सुरुवात केली. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. खर्च वाढू लागला आणि आर्थिक गणित जमविणे कठीण होऊ लागले. पुण्यापेक्षा नाशिक हे आर्थिकदृष्टय़ा निश्चितच परवडणारे असल्याने त्यांनी पुण्याहून नाशिकला सर्व बाडबिस्तरा हलविण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये नाशिक येथे सर्वप्रथम गंगापूररोड आणि त्यानंतर पाथर्डी फाटा परिसरात त्यांनी मुक्काम हलविला. अर्थात दोन्ही ठिकाणी भाडेकरू म्हणूनच ते राहात असल्याने रुग्णांच्या ओरडण्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी परिसरातील लोकांकडून होऊ लागल्यावर पुन्हा त्यांच्यासमोर घराचा प्रश्न उभा राहिला. अशा वेळी डॉ. अजित भामरे त्यांच्या मदतीला धावून आले. २००९-१० मध्ये सिडकोतील पारिजातनगरमध्ये असलेल्या आपल्या इमारतीपैकी दोन मजल्यांचा वापर करण्यास त्यांनी जगताप यांना सांगितले. त्या वेळी रुग्णांची संख्या २० ते २२ पर्यंत मर्यादित होती. तोपर्यंत संस्थेची नोंदणी झालेली नसल्याने मदतीसाठी पुढे येणाऱ्यांनाही पेच पडत असे. २०११ मध्ये ‘दिलासा प्रतिष्ठान संचलित दिलासा केअर सेंटर’ अशी संस्थेची नोंदणी झाल्यावर एक मोठी समस्या दूर झाली. पुढे जगताप यांचे कार्य पाहून भामरे यांनी त्यांना तिसरा मजलाही वापरण्यास परवानगी दिली. समाजात सर्वच काही वाईट नाही. काही चांगले घटकही कार्यरत आहेत. त्यांच्यामुळेच सर्व अडचणींवर मात करण्याचे बळ मिळते, अशी धारणा असलेल्या जगताप यांच्या दिलासामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान येथील व्याधिग्रस्त आणि अंथरुणाला खिळलेल्यांचा मुक्काम आहे. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. हा संपूर्ण डोलारा सांभाळण्यासाठी त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही समाजकार्यात झोकून देणारी पत्नी उज्ज्वलासह आई मंगला जगताप, शैलेंद्र चव्हाण, पल्लवी चव्हाण, सुनील महाडिक, वनिता महाडिक ही जवळची मंडळी आणि जो मोबदला मिळेल त्यावर समाधान मानत अहोरात्र कार्यरत राहणारे १५ कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे.

व्याधिग्रस्त, अंथरुणाला खिळलेल्यांच्या जीवनात ‘दिलासा’

आजारी, मनोरुग्ण, व्यसनग्रस्त, अपंग असे सर्वच प्रकारचे रुग्ण या ठिकाणी पाहावयास मिळतात. २००८ मध्ये जिल्हा रुग्णालयातून बापू नावाच्या मुलास दिलासामध्ये आणण्यात आले. कुठल्या तरी अपघातात दोन्ही पाय गमावलेला बापू बोलूही शकत नाही. प्रारंभी घाबरलेला आणि बावरलेला बापू दिलासामधील वागणुकीमुळे पूर्णपणे बदलला. सतीश जगताप यांनी त्यास इतरांची दाढी करणे शिकविले. त्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली. वय वर्षे ३८ ते ४० असलेल्या तीन मुलांचा अपवाद वगळता दिलासामधील इतर सर्व रुग्ण सत्तरी ओलांडलेले आहेत. त्यात शंभरी ओलांडलेल्या एका आजींचा समावेश आहे. व्याधिग्रस्त किंवा स्वत:ची कामे करण्यास असमर्थ असलेल्या नातेवाईकांविषयी असलेल्या भिन्न विचारसरणीचे दर्शन दिलासामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या माध्यमातून होते. २००९ मध्ये व्याधिग्रस्त पत्नीस दिलासामध्ये दाखल केल्यानंतर पुन्हा कधीही चौकशी न करणारा पती असो किंवा बऱ्या झालेल्या आई-वडिलांना घरी परत घेऊन जाताना मुलांच्या डोळ्यांमध्ये तरळणारे अश्रू असोत, किंवा आपल्या नातेवाईकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यावर आम्हाला वेळ नाही. तुम्हीच पुढील सर्व व्यवस्था पाहून घ्या असा सल्ला देणारे असोत, अशा मानवी प्रवृत्तींचे दर्शन येथे होते.

संस्थेचा महिन्याचा सर्व खर्च साडेतीन लाखांच्या घरात जातो. संस्थेस शासकीय अनुदान नसताना नाशिक रन, नसती उठाठेव, कालिका माता ट्रस्ट  मिडास टच, इनरव्हील क्लब, लायन्स क्लब यांसारख्या संस्था, अल्कॉन, मायलॉन, वासन टोयोटा, महिंद्र या कंपन्यांकडून विविध स्वरूपात मिळणाऱ्या मदतीमुळे आर्थिक बोजा काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते.  रुग्णांना योगासने शिकविण्यासाठी दररोज दीड तास वेळ देणाऱ्या स्वत:ची कंपनी असलेल्या प्रज्ञा पाटील.. रुग्णांचे समुपदेशन करणाऱ्या अ‍ॅड. सुनीता लाड.. दर शनिवारी रुग्णांसाठी गाण्यांची मैफल सजविणाऱ्या डॉ. संगीता शहा.. नवरात्रीत धार्मिक कार्यक्रम करणाऱ्या पूजा धर्माधिकारी.. स्वत:ची कमाई अत्यल्प असतानाही संस्थेतील सर्व कामे विनामोबदला करणारा प्लम्बर, विनामोबदला रंगकाम करणारा कारागीर.. डॉ. किरण सूर्यवंशी, गंगाधर जोशी, गौरीताई गोगटे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार किंवा एकदाही संस्थेला भेट न देता आपल्या सहकाऱ्यांना मदतीचे आवाहन करणारे इचलकरंजीजवळील जयसिंगपूरचे बाळासाहेब हिंगणे, मुंबईचे गजानन कान्हेरे यांसारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रयत्नही संस्थेच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण आहेत.

 

संस्थेपर्यंत कसे जाल?

मध्यवर्ती बस स्थानकापासून संस्था सुमारे चार किलोमीटरवर आहे. रेल्वेमार्गे येणाऱ्यांसाठी नाशिकरोड स्थानक तसेच सीबीएसपासून राणाप्रताप चौक, विजयनगर ही शहर बससेवा उपलब्ध आहे. या बसने राणाप्रताप चौकात उतरल्यावर अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर संस्था आहे.

 

धनादेश या नावाने पाठवा..

दिलासा प्रतिष्ठान (Dilasa Pratishthan) (कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत)

 

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०५३६
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३८५१३२
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

 

रुग्णांची मनोभावे शुश्रूषा

घशाचा विकार असणाऱ्या काही जणांना नळीतून अन्न दिले जाते. रुग्णांची दररोज डॉ. योगेश भावे यांच्याकडून आरोग्य तपासणी केली जाते. गरज भासल्यास अन्य डॉक्टरांना बोलविले जाते. त्यासाठी वक्रतुंड रुग्णालयाची संस्थेला विशेष मदत होते. एखाद्या रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक उपस्थित न झाल्यास पुढील सर्व विधी दिलासालाच पार पाडावे लागतात.

दिलासा केअर सेंटर नाशिक

ज्येष्ठांसाठी मसाज व योग केंद्र, सुसज्ज व्यायामशाळा, उद्यान यांसह इतर दैनंदिन खर्च भागविण्यासाठी दिलासाला मदतीची गरज आहे. ही मदत आर्थिकसह वस्तुरूप देणगी, इमारत निधी, अन्नधान्य, अंथरुण-पांघरुण, औषधे, किराणा, भाजीपाला, फळांचा पुरवठा अशा कोणत्याही स्वरूपात करता येऊ शकेल.

 

  • रुग्णांच्या एकटेपणावर मात करण्यासाठी विविध खेळांचा आधार घेतला जातो. रुग्णांचे मन रमावे यासाठी कधी चित्रपट दाखविणे, कॅरम, बुद्धिबळ, संगीतखुर्ची यांसारखे खेळ खेळले जातात.
  • दर महिन्याच्या १५ तारखेला त्या महिन्यातील जन्मतारीख असलेल्या रुग्णांचा वाढदिवस तसेच दिवाळी, गणेशोत्सव, नाताळ यांसह सर्वच सण साजरे केले जातात.

 

– अविनाश पाटील