भारतीय शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षण भारतीचे राष्ट्रीय कार्यवाह दीनानाथ बात्रा यांच्या संकल्पनेतून गुजरातमध्ये  शालेय पाठय़पुस्तक मंडळाकडून नऊ पुस्तकांचा एक संच तयार करून घेतला आहे.  ही पुस्तके शालेय अभ्यासक्रमाबरोबरच पुरवणी अभ्यास म्हणून समाविष्ट करण्यात आली असून  राज्यातील ४२ हजार सरकारी शाळांमधून ही पुस्तके मोफत वाटली जाणार आहेत. या ‘विधायक’ उपक्रमाची ही नोंद..
प्राचीन भारतीय काळात गुरुकुल पद्धत दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श मानली जात होती. तीच पद्धत आजच्या काळात रूढ व्हावी, विद्यार्थ्यांनी गुरुकुल पद्धतीने शिक्षण घ्यावे आणि परदेशी शिक्षण पद्धतीचे ढोंग बाजूला ठेवून अस्सल भारतीय शिक्षण आत्मसात करावे, असा गुजरात सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकारने राज्य शालेय पाठय़पुस्तक मंडळाकडून नऊ पुस्तकांचा एक संच तयार करून घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षण भारतीचे राष्ट्रीय कार्यवाह दीनानाथ बात्रा यांच्या संकल्पनेतून या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याचा महान उद्देश या निर्मितीमागे आहे. यासाठी बात्रा यांनी अखंड भारताचे चित्र नकाशाच्या रूपाने विद्यार्थ्यांसमोर ठेवले आहे. त्यांना भारताचा नकाशा नव्याने आखायचा आहे. यासाठी पुस्तकांमध्ये अखंड भारताचा नकाशा आहे. भारतात पूर्वी जुने प्रांत होते, जे आज स्वतंत्र देश आहेत, ते या नकाशात समाविष्ट करण्यात आले आहेत.
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०१४ मध्ये पाठय़पुस्तक मंडळाने ही पुस्तके छापली आहेत. शासनाने एक परिपत्रक काढून ही पुस्तके राज्यातील प्राथमिक- माध्यमिक शाळांमध्ये पुरवणी अभ्यासक्रम म्हणून सक्तीची करण्याचा आदेश दिला आहे. राज्यातील ४२ हजार सरकारी शाळांमधून ही पुस्तके मोफत वाटण्यात यावीत, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या संचातील ‘प्रेरणादीप’ या शीर्षकाखालील चार पुस्तकांची मालिका आहे. यातील गोसेवा या प्रकरणात मूलबाळ नसलेल्या एखाद्या दाम्पत्याने गाईची सेवा केली तर त्यांना इच्छित फळ कसे प्राप्त होऊ शकते, हे सांगण्यात आले आहे. याशिवाय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि स्वामी विवेकानंद यांच्या हजरजबाबीपणाचे काही किस्सेही आहेत. शिक्षणाचे भारतीयीकरण या पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून शिक्षण हा भाग आहे. विद्यार्थ्यांनी संग्राहक व्हावे या उद्देशाने त्यांनी तिकिटे, विविध आकारांचे दगड, टपाल तिकिटे, चित्रे, पक्ष्यांची पिसे मिळवून चिकटवही बनवावी, सामाजिक उपक्रमातील सहभाग वाढवावा, दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहावेत असे सुचविण्यात आले आहे. तसेच शाळांसाठी आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करणे, अशा स्वरूपाच्या संकल्पना या अंतर्गत राबवण्यात येणार आहेत. याच पुस्तकात ‘प्रोफेसर’ऐवजी ‘आचार्य’ हा पर्यायी शब्द देण्यात आला आहे. ‘प्रोफेसर’ हा केवळ शिकवतो, प्रवचन देतो, तर आचार्य जे शिकवतात ते आचरणात कसे आणावे याचा परिपाठ घालून देतात. त्यामुळे इंग्रजीचा दिखाऊपणा सोडून चिरंतन टिकणारे आचार्यपण अंगी बाणवण्याचा सल्ला या पुस्तकातून देण्यात आला आहे. आजवर या पुस्तकांच्या ५० हजारांहून अधिक प्रती राज्यातील सरकारी शाळांमधून वितरित झाल्या असून, ‘विद्यालय : प्रवृत्तीयो नु घर’, ‘शिक्षण मा त्रिवेणी’, ‘प्रेरणादीप’, तसेच ‘शिक्षण नु भारतीयकरण’, ‘वैदिक गणित’ आणि ‘तेजोमय भारत’ या गुजराती भाषेतील पुस्तकांचा त्यात समावेश आहे.  दीनानाथ बात्रा यांनी या पुस्तकांच्या लेखनासाठी सरकारकडून एक पैसाही मानधन घेतले नाही. पुस्तकांच्या एका पानावर त्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, भूपेंद्रसिंह चुडासामा आणि वसुबेन त्रिवेदी यांची संदेशपत्रे आहेत. आठ वर्षांपूर्वी बात्रा यांनी मेहनत घेऊन िहदी भाषेत ही पुस्तके लिहिली आहेत. ते सांगतात, ‘पाठय़पुस्तक मंडळाने ही पुस्तके वाचली आहेत. त्यातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. त्यांना ते आवडले. त्यामुळे त्यांनी या िहदी पुस्तकांचा गुजराती अनुवाद करण्याचा मानस बोलून दाखविला. ही पुस्तके शालेय अभ्यासक्रमाबरोबरच पुरवणी अभ्यास म्हणून समाविष्ट करण्याबाबतची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. अर्थात यात कोणताही आíथक व्यवहार झालेला नाही. आमच्यातील चांगल्या संबंधांवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.’
दीनानाथ बात्रा यांच्या पुस्तकातील काही उतारे.. 

आम्ही असू लाडके देवाचे..
देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एकदा रात्रीचे जेवण घेण्यासाठी एके ठिकाणी गेले होते. त्या वेळी तेथे एक ब्रिटिश नागरिक आला होता. जेवतानाच तो जरा तोऱ्यातच म्हणाला, आम्ही या पृथ्वीतलावरचे देवाचे सर्वात लाडके आहोत. यावर राधाकृष्णन हसले आणि जमलेल्या सर्व मान्यवरांसमोर उभे राहून म्हणाले, मित्रांनो, एक दिवस देवाला वाटले की, भाकरी बनवाव्यात. मग त्याने पहिली भाकरी बनवली आणि तव्यावर ठेवली, पण ती थोडी कमी भाजली, कच्ची राहिली.. तेव्हा ब्रिटिश जन्माला आले, मात्र दुसरी भाकरी तव्यावर जास्तच वेळ राहिल्याने ती करपून काळी पडली आणि निग्रोंना देवाने जन्माला घातले. तिसऱ्या भाकरीच्या वेळी मात्र देवाने काळजी घेतली. पूर्वीच्या दोन चुका टाळून त्याने अगदी योग्य भाकरी भाजली, म्हणजेच भारतीय जन्माला आले.     (प्रेरणादीप-३, पान-८)  

गो-सेवा
राजा दिलीप याला मूलबाळ नसल्याने तो चिंतेत होता. आपल्या राज्याचा वारसा पुढे कुणी चालवायचा, या विचाराने त्याला ग्रासले होते. यावर उपाय शोधण्यासाठी तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमात जातो. तो आपले दु:ख ऋषींसमोर मांडतो. वसिष्ठ मुनी राजाला सांगतात की, तू आणि तुझ्या पत्नीने यापुढे शपथ घे की, तुम्ही गायीची मोठय़ा भक्तिभावाने सेवा कराल. मोठय़ा कळपाने गायी बाळगाल. त्या जिथे जातील, तिथे त्यांच्यासोबत राहाल. राजा आणि राणी ऋषींचा आदेश शिरसावंद्य मानून गो-सेवेला आरंभ करतात. एके दिवशी एक सिंह गायीवर हल्ला करतो, पण तेवढय़ात राजा दिलीप त्या सिंहासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, थांब, तुला असे करता येणार नाही. हवे तर तू मला खा, पण या गायीला अभय दे! राजाची गायीच्या प्रति निष्ठा पाहून सिंह अचंबित होतो. तो गायीला सोडून देतोच, पण राजालाही कोणती इजा करीत नाही. याचे फळ राजाला मिळते. कालांतराने दिलीप राजाला मुले होतात आणि तो सुखाने संसार करू लागतो.  (प्रेरणादीप-३, पान-३९)  

स्वस्तिकचा अभिमान
अमेरिकेतील कनेक्टिकट येथील शाळेत शिकणाऱ्या हरीश आणि सतीश या दोघा भावांचे कुटुंब विश्व िहदू परिषदेशी संबंधित होते. त्यामुळे घरात त्यांच्यावर दाट संस्कार झाले होते. एक दिवस शाळेत हरीश आपल्या वहीवर स्वस्तिक काढून ते रंगवू लागला असताना ज्यू धर्मीय शिक्षिकेने चिंता व्यक्त करीत हरीशकडून वही हिसकावून घेतली. स्वस्तिक हे हुकूमशहा हिटलरच्या नाझी साम्राज्याचे द्योतक आहे. त्यामुळे तुला हे चित्र काढता येणार नाही, असे तिने हरीशला खडसावले. यावर हरीशने त्या शिक्षिकेला समजावण्याचा प्रयत्न केला. स्वस्तिक हे आमच्या िहदू धर्मातील शांततेचे प्रतीक आहे, असे सांगितले; परंतु त्या शिक्षिकेने हरीशला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले.
शिक्षिकेच्या या गरवर्तनाबाबत त्याने आपल्या वडिलांच्या कानावर घातले. त्यानंतर वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे याविषयी तक्रार केली. यावर मुख्याध्यापकांनी याची गंभीर दखल घेत त्या शिक्षिकेला माफी मागायला लावली.. या घटनेवरून एक लक्षात घेतले पाहिजे की, आपल्याला स्वत:चा धर्म आणि त्याच्या प्रतीकांविषयी अभिमान असायला हवा.(प्रेरणादीप-३, पान-१६)

स्वामींचे बूट
एक दिवस स्वामी विवेकानंद व्याख्यान देण्यासाठी गेले होते. समोर बसलेल्या जनसमुदायाला उद्देशून ते म्हणाले, की आपण नेहमी भारतीय वस्त्रे परिधान केली पाहिजेत.. त्या वेळी स्वामी विवेकानंद यांच्या अंगावर भगवी वस्त्रे होती आणि पायात परदेशी बूट होते.  ब्रिटनहून आलेल्या एका महिलेच्या ती गोष्ट लक्षात आली. ती म्हणाली, स्वामीजी, तुम्ही इतरांना स्वदेशी कपडे घाला, असा आग्रह धरीत आहात, परंतु तुमच्या पायात तर परदेशी बूट आहेत! स्वामींनी ते शांतपणे ऐकून घेतले आणि हसून म्हणाले, मला तेच तर सांगायचेय की, आमच्या लेखी परदेशी लोकांसाठीची जागा पायातच आहे. यावर ती महिला निरुत्तर झाली. (प्रेरणादीप-१, पान-१०)

नव्या व्याख्या
आधुनिकीकरण म्हणजे पाश्चिमात्यीकरण नव्हे, आधुनिकीकरण म्हणजे भारतीयीकरण. (शिक्षण नु भारतीयकरण, पान-८)

संस्कृती ही कधीच गटागटांत विभागलेली नसते. म्हणजे तिच्यात सामावलेल्या एखाद्या गोष्टीचे वैशिष्टय़ राहत नाही. म्हणजे गंगेच्या प्रवाहात मिसळलेली प्रत्येक गोष्ट गंगारूपी होऊन जाते. म्हणूनच भारतीय संस्कृती ही मिश्र संस्कृती आहे, असे म्हणणे योग्य नाही, तर तिला भारतीय संस्कृती म्हणणेच यथार्थ ठरेल. (शिक्षण नु भारतीयकरण, पान-१५)

आपल्याला ज्ञान देणाऱ्या व्यक्तीला प्रोफेसर म्हणणे योग्य नाही. प्रोफेसर हा फक्त शिकवतो, तर आचार्य ही शिकवण आचरणात आणतो. म्हणून अशा ढोंगी शब्दाचा त्याग करा, आचार्य हा शब्द वापरा.
अनुवाद : गोविंद डेगवेकर

या पुस्तकांच्या
४५ हजार प्रतींसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आम्ही आकारलेले नाही. याशिवाय लेखकाला रॉयल्टीही देण्यात आलेली नाही.
– नितीन पेठानी, अध्यक्ष गुजरात शालेय पाठय़पुस्तक मंडळ.