News Flash

शिक्षणाबरोबरच उत्पादक उपक्रमांवर भर

जिल्हा परिषदेच्या एखाद्या शाळेत अचानक जाऊन धडकलं तर काय दृश्य दिसेल याची खात्री नसते.

शाळेत फुललेली शब्दांची बाग.. आणि साहित्यातून गणित

जिल्हा परिषदेच्या एखाद्या शाळेत अचानक जाऊन धडकलं तर काय दृश्य दिसेल याची खात्री नसते. सहज अपेक्षित दृश्य म्हणजे शिक्षक वर्गावर नाहीत, त्यामुळे साहजिकच मुलांचा गलका. कोणी तरी खोडय़ा काढत बसलेलं, तर कोणी भोकाड पसरलेलं. शाळेच्या वर्गापेक्षा व्हरांडा किंवा अंगणात बहुसंख्य मुलांचा अड्डा, तर काही मोजकी मुलं या गोंधळाकडे असहायपणे बघत एखाद्या कोपऱ्यात बसलेली. थोडक्यात म्हणजे, शालेय पातळीवरची अराजकाची परिस्थिती. पण रत्नागिरी जिल्ह्य़ातली पोमेंडी येथील जिल्हा परिषदेची केंद्र शाळा याला अपवाद ठरली..

कोणतीही पूर्वसूचना मुद्दामच न देता हिरव्या झाडीतून वळणावळणाच्या रस्त्याने पोमेंडी शाळेच्या प्रवेशद्वाराशी पोचेपर्यंत इथे शाळा असल्याची कल्पनाही आली नाही. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच्या अंगणात मुलांना चित्रमय पद्धतीने शिकवण्यासाठी विविध रेखाकृती चितारलेल्या. त्यामागे शाळेची एकमजली टुमदार इमारत. तिथेही कठडय़ावर, भिंतींवर, जमिनीवर, थोडक्यात म्हणजे, जिथे जागा मिळेल तिथे सुरेख रंगीत चित्रं, सुविचार लिहिलेले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा मिरकर पहिली-दुसरीच्या मुलांना काही तरी शिकवत होत्या. येण्याचं प्रयोजन सांगितल्यावर पुढे होऊन शाळेच्या निरनिराळ्या उपक्रमांची माहिती देऊ लागल्या.

रानभाज्यांचं प्रदर्शन

आदल्याच दिवशी शाळेत केंद्रीय गट संमेलन झालं होतं. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत कोकणात भारंगी, टाकळा, फोडशी इत्यादी विविध प्रकारच्या रानभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. संमेलनाच्या निमित्ताने शाळेतली मुलं आणि त्यांच्या पालकांनी ‘उत्पादक उपक्रमा’अंतर्गत या रानभाज्यांचं छोटेखानी प्रदर्शनच भरवलं आणि त्यांची विक्रीही केली. संमेलनासाठी आलेल्या इतर शाळांच्या शिक्षकांनी या ताज्या रानभाज्यांची कौतुकाने खरेदी केली.

अशाच प्रकारे वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने अनुरूप उत्पादक उपक्रम राबवले जातात. पुढच्याच आठवडय़ात असलेल्या राखी पौर्णिमेसाठी राख्या तयार करून विकण्याचं नियोजन सध्या सुरू आहे. शाळेतल्या शिक्षिका त्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करून आणतात आणि मुलांकडून राख्या तयार करून घेतात. शाळेत आणि गावात त्यांची विक्री केली जाते. याच पद्धतीने दिवाळीच्या काळात सुगंधी उटणं तयार करून त्याची पाकिटं विकली जातात. ‘या उत्पादक उपक्रमांमधून उलाढाल किती होते, यापेक्षा मुलांना निरनिराळ्या प्रकारची उत्पादनं करण्याचं कौशल्य प्राप्त होणं, या उत्पादनांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याचं भान येणं महत्त्वाचं असतं आणि तोच आमचा मुख्य उद्देश आहे’, – मुख्याध्यापिका मिरकर यांनी या उपक्रमांमागची भूमिका बोलण्याच्या ओघात स्पष्ट केली.

गणित-इंग्रजीसाठी साहित्यभाषा

अर्थात हे करीत असताना शैक्षणिक बाजूकडे दुर्लक्ष झालेलं नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अलीकडच्या काळात सर्वत्र राबवण्यात येत असलेलं ज्ञानरचनावादावर आधारित दर्जेदार शिक्षण मुलांना देण्याचा प्रयत्न शाळेतले सर्व शिक्षक कसोशीने करीत आहेत. त्यासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य शिक्षकांनी कल्पकपणे तयार केलं आहे. विशेषत: भाषा आणि गणित शिकवण्यासाठी या साहित्याचा उपयोग केला जात आहे. इंग्लिश भाषेतली शब्दसंपत्ती वाढावी म्हणून मुलांना दररोज दोन शब्द स्पेलिंगसह पाठ करण्यासाठी दिले जातात आणि नंतर त्यांची उजळणीही घेतली जाते. शाळेतली वेगवेगळ्या इयत्तेतील मुलं या साहित्याचा अतिशय उत्साहाने आणि सहजपणे वापर करीत होती. शाळेत नव्यानेच प्रवेश घेतलेला नेपाळी गुरख्याचा मुलगाही त्यात मागे नव्हता. शाळेतल्या वर्गाच्या भिंतींचादेखील या प्रकारच्या शिक्षणासाठी चांगल्या प्रकारे वापर केला आहे. तसंच शाळेच्या इमारतीसमोर असलेल्या अंगणातही त्या दृष्टीने उपयुक्त रेखाकृती काढलेल्या आहेत. भरपूर जागा असेल तर झाडं लावणं किंवा पालेभाज्या पिकवणं सहज शक्य असतं. पण इथे त्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या आणि टायरचा वापर करताना सुशोभीकरणही साधलं आहे.

‘डिजिटल इंडिया’ किंवा ‘ई-लर्निग’ हे सध्या परवलीचे शब्द झाले आहेत. उत्तम शैक्षणिक सुविधांची कमतरता असलेल्या कोकणासारख्या दुर्गम भागात त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन शाळेत दोन संगणक आणि प्रोजेक्टर बसवलेला आहे. विशेष म्हणजे, शाळेतले विद्यार्थी हे साहित्य अतिशय सहजपणे हाताळतात. सुमारे ऐंशी हजार रुपये खर्चाच्या या उपक्रमाला पोमेंडीच्या ग्रामस्थांनीही मोठा हातभार लावत प्रगत शिक्षणासाठी अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची जाण कृतीतून व्यक्त केली.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू शिंदे शाळेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना म्हणाले की, शाळेच्या शिक्षिका चांगल्या प्रकारे शिकवतात. आम्हा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा आवश्यक तिथे संपूर्ण सहभाग असतो. विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्यही भरपूर उपलब्ध आहे. इथे सातवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. तरीही काही पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत घालतात, याबद्दल मात्र त्यांनी खेद व्यक्त केला. अर्थात ही समस्या सार्वत्रिक आहे. त्यातच सध्या इंग्लिश माध्यमाचं खूळ बोकाळलं असल्याने आणखी भर पडली आहे. याचा दुसरा महत्त्वाचा परिणाम या शाळांच्या पटावर झाला आहे. पण त्यामुळे डगमगून न जाता या शाळेतले शिक्षक आणि पालक इथे असलेल्या मुलांच्या सर्वागीण विकासासाठी मनापासून प्रयत्न करीत आहेत.

तसं पाहिलं तर लहानशीच शाळा. शेजारच्या एक-दोन वाडय़ांमधल्या मुलांसाठी सोईची. जिल्हा परिषदेची असल्याने अनेक नियम-अटींनी बांधलेली. ठरावीक काळानंतर शिक्षकांच्या बदल्या हेही ओघाने आलंच. तरीही उपलब्ध साधनसामग्री आणि क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याची सर्वसंबंधितांची धडपड वाखाणण्याजोगी. केंद्रप्रमुख अनुराधा चौकेकर आणि मुख्याध्यापिका मिरकर यांच्यासह जुई पाटणकर, नीलम पाडळकर, सुखदा कारेकर या सहकारी शिक्षिका आणि अर्थातच विष्णू शिंदे यांच्यासह तमाम पोमेंडीकरांना त्याचं श्रेय द्यायला हवं.

 

– संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

– सतीश कामत

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2016 2:45 am

Web Title: district council school in ratnagiri district
Next Stories
1 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा खेळखंडोबा
2 ‘गोमाते’चे आक्रंदन
3 एका संघर्षांची कथा!
Just Now!
X