18 October 2019

News Flash

उचित सन्मान

दिवाकर मोहनींचे सुरुवातीचे भाषाशिक्षण खरे म्हणजे घरीच झाले.

|| अनुराधा मोहनी

दिवाकर मोहनी हे नागपूरचे आहेत. ‘आजचा सुधारक’ या वैचारिक मासिकाचे संपादक व प्रकाशक, साहित्यरसिक, विवेकवादाचे खंदे पुरस्कत्रे व भाष्यकार आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक अशी त्यांची ओळख आहे. मात्र मुद्रण, प्रकाशन, नागरी लिपी, व्याकरण व भाषाशास्त्र या विषयांत त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. याशिवाय ते नागपूर – विदर्भातील विविध क्षेत्रांतील अनेक ‘धडपडणाऱ्या मुलांचे’ लाडके आबादेखील आहेत.

दिवाकर मोहनींचे सुरुवातीचे भाषाशिक्षण खरे म्हणजे घरीच झाले. त्यांचे वडील पुरुषोत्तम कृष्ण मोहनी यांनी एक प्रयोग म्हणून आपल्या या अपत्याला शाळेत न घालता घरीच शिकवायचे ठरविले. त्यातून जीवनोपयोगी शिक्षण, खोलात जाऊन विचार करण्याची वृत्ती, घोकंपट्टी, पोपटपंची व स्पर्धा यापासून सुटका या गोष्टी दिवाकरांना प्राप्त झाल्या.

पुढे त्यांनी व्यवसायही मुद्रकाचाच केला. ‘मोहिनीराज मुद्रा’ हे त्यांचे मुद्रणालय. मुद्रण क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानांचे त्यांनी नेहमीच स्वागत केले व त्यामागील विज्ञान समजून घेऊन, आत्मसात करून त्याचा अंगीकार, एवढेच नव्हे तर प्रचार-प्रसार केला. नागपुरातील पहिले शुष्कमुद्रण (झेरॉक्स) मशीन त्यांनी आणले. प्रतिरूप मुद्रण (ऑफसेट), स्क्रीन पिट्रिंगचे कामही त्यांनी बरीच वष्रे केले. नागपुरात अनेक मुद्रकांना, उद्योगेच्छुक तरुणांना त्यांनी ते शिकवले व करण्यास उद्युक्त केले. हे सर्व करीत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, मौलिक विचारांचा व प्रयोगशीलतेचा वसा त्यांनी कधीही सोडला नाही.

मुद्रक म्हणून काम करीत असतानाच मोहनींचे लक्ष देवनागरी लिपीच्या रचनेकडे गेले. आपल्या स्वभावधर्मानुसार त्यांनी संस्कृत, हिन्दी, मराठी व नेपाळी अशा चार भाषा जिच्यातून लिहिल्या जातात अशा या प्राचीन लिपीचे स्वयंअध्ययन सुरू केले. त्यातून तिच्यासंबंधात एक अंतर्दृष्टी मिळवली. मानवी विचारांचे शरीर आहे भाषा व भाषेचे शरीर आहे लिपी. सध्या आपला वैचारिक वारसा गमावून बसलेला मराठी समाज सांस्कृतिक ऱ्हासाकडे वाटचाल करीत आहे. मराठी भाषा हा रोजगार मिळवून देणारा विषय नाही, म्हणून मराठी समाजाने त्याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. अशा वेळी भाषेचे गेलेले अधिष्ठान पुन्हा त्याच्या विचाराला मिळवून दिले तरच त्याचा अभ्युदय होऊ शकेल, या प्रेरणेतून मोहनींनी गेली अनेक दशके भाषेच्या विविध पलूंबद्दल गंभीर अध्ययन व संशोधन केले आहे.

मोहनींची भाषाविषयक मांडणी ही या पाश्र्वभूमीवर झालेली आहे. पूर्वी ज्ञानी माणसाला बहुश्रुत म्हणजे खूप काही ऐकलेला, असे म्हटले जात असे. आज मात्र त्यासाठी वाचनच करावे लागते. आता आपल्याला ऐकण्याकडून बघण्याकडे जायचे आहे म्हणून लेखनाकडे लक्ष द्या, हा त्यांच्या सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीचा सिद्धान्त आज टेलिफोनकडून व्हॉटस्अ‍ॅपकडे जाताना पुन्हा एकदा खरा ठरतो आहे. कोणत्याही व्यक्तीला वेगाने वाचन करायचे असल्यास त्या भाषेच्या लिखित स्वरूपाविषयीचे नियम वैज्ञानिक आधारावर उभारलेले असावेत व त्यांच्यात सातत्य राखले जावे, हा त्यांचा आग्रह होता व आहे. देवनागरीच्या अध्ययनातून त्यांना भाषालेखनाचे जे तर्कशास्त्र सापडले, त्याच्या आधारावर, जुने लेखननियम हेच बरोबर होते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. उच्चारानुसारी लेखनाच्या नावाखाली जे नवीन नियम लादण्यात येत आहेत त्यांच्यावर व वारंवार नियम बदलण्याच्या वृत्तीवर त्यांनी कठोर टीका केली आहे. नवीन शुद्धलेखनामुळे जुन्या वाचकांची गरसोय झाली व ते वाचनापासून दूर झाले आणि नवीन नियमांत ताíककता नसल्याने ते नवीन शिकणाऱ्यांना सहजपणे अवगत होत नाहीत, हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले.

मोहनींचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे नागरी लिपीमागील तर्कशास्त्र उलगडून सांगणारा त्यांचा स्वरदंडविचार वा सिद्धांत. प्रत्येक अक्षरात स्वरांश व व्यंजनांश असे दोन भाग असतात. देवनागरीतील स्वरांश हा दंडरूप (सरळ उभी रेघ) असल्यामुळे जोडाक्षर लिहिताना ती व्यंजने एकाच दंडाला बिलगून लिहावीत असे त्यांनी मांडले. ‘माय मराठी’ हे त्यांचे साहित्यप्रसार केंद्राने काढलेले  पुस्तक २००५ साली प्रसिद्ध झाले. पत्नी सुनन्दा मोहनी यांच्यासोबत ‘देवनागरी लिपीचा नव्याने परिचय’ या नावाने २०११ साली डीव्हीडी काढली. तीमध्ये स्वर व व्यंजन मिळून वर्ण कसे तयार होतात, तसेच संधी व समास कसे बनतात हे सारे अ‍ॅनिमेशनच्या साहाय्याने दर्शविले आहे. त्यांचे संपूर्ण सद्धान्तिक लेखन समाविष्ट करणारे ‘शुद्धलेखनाचे तत्त्वज्ञान’ हे पुस्तक पुण्याचे पद्मगंधा प्रकाशन काढत असून तेही प्रकाशनाच्या वाटेवर आहे. वर्णमालेचा आणि व्याकरणाचा अत्यंत कठीण समजला जाणारा हा विषय त्यांतील अंगभूत तर्कसंगतीमुळेच घोकंपट्टीच्या क्षेत्रातून बाहेर काढून आकलनाच्या क्षेत्रात आणण्याच्या उद्देशानेच त्यांनी हे काम केले आहे. आज अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने भाषाव्रती पुरस्कार देऊन त्यांचा उचित सन्मान केला आहे. त्यांच्या कार्याला अनेक शुभेच्छा!

anumohoni@gmail.com

First Published on January 13, 2019 12:16 am

Web Title: divakar mohani