28 February 2021

News Flash

दिवाळी उत्सव विशेष :  आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या अंघोळी

घरातला अन् मनातला भीतीचा अंधार दूर करायचा. हे दिवस वर्षांतून  एकदाच  येतात.

ऋतुपर्णा मुजुमदार

‘घरोघरी जागविते, माय मुले झोपलेली..!!’ गारठा पडू लागतो दिवाळीची चाहूल लागते, मन आनंदाने भरून जातं. आजकाल पहाटेच्या आंघोळी तशा दुर्मीळ झाल्या आहेत. मुलं उठायला बघत नाहीत एवढय़ा पहाटे. मला आठवतं, आम्ही लहान होतो तेव्हा अगदी पहाटेपासून आंघोळी  सुरू होत असत. तेव्हा थंडीपण खूप असायची. मन दिवाळी  साजरी करायला अधीर झालेलं असायचं. कुडकुडत अंगणात येताच आधी नजरेला पडायची अंगणातली देखणी सडा-रांगोळी, आमच्या आधी उठून आईने  काढलेली! बंब पेटला  असायचा. नुकतीच न्हालेली आई त्या दिवशी वेगळीच  वाटायची. एकेकाला पाटावर बसवून तेल लावून  द्यायची. स्वयंपाकघरात  मोरीजवळ पणती तेवत असायची. तेल, उटणं लावताना आई गाणं गुणगुणत असे- ‘आली दिवाळी दिवाळी, वर्षांचा  मोठा सण’.. क्षणोक्षणी आज आईची आठवण येते. त्या दिवशी आई सगळ्यांना चोळूनमाळून आंघोळ घालायची. ओवाळून लागलीच फराळाची तयारी करायची. आमच्याकडे त्या दिवशी गरम चकल्या असायच्या. देवालासुद्धा पहाटे ऊन ऊन पाण्याने आंघोळ, अत्तर, नवीन कपडे, असा  थाट असायचा. नैवेद्यासाठी साजूक तुपातला शिरा.. मंदिरात काकडआरती व्हायची. साध्या बिनखर्चाच्या छोटय़ा गोष्टींत  खूप आनंद भरलेला असायचा. बघताबघता दिवस सरले. आपला संसार  करताना या गोष्टी मी आवर्जून पाळल्या. सण साजरे  करताना परंपरा  जपण्याचा  प्रयत्न केला. या वर्षी दिवाळीवर करोनाचे सावट आहे. मनात धाकधूक आहे, पण सण आनंदाने  साजरा  करायचा. घरातला अन् मनातला भीतीचा अंधार दूर करायचा. हे दिवस वर्षांतून  एकदाच  येतात.

सण आणि  परंपरा काय देतात आपल्याला? तर रोजच्या  जगण्याला बळ मिळवून देतात. म्हणूनच हे क्षण जपायचे, बाकी काही नाही. डोळे मिटले की  मनात आनंदाचे तरंग उठले पाहिजेत. ही दिवाळी जीवनातल्या समस्यांना, कटकटींना पुरून उरणारी; हास्याचे, आनंदाचे मळे फुलवणारी असू दे, हीच प्रार्थना!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 2:45 am

Web Title: diwali festival 2020 article one zws 70
Next Stories
1 ‘अर्ध्या कोयत्या’चे आरोग्य..
2 राजकीय पार्श्वभूमीवरची प्रेमकथा “कारभारी.. लय भारी” ..!
3 इस्लामने मूळ संदेशाकडे वळावे!
Just Now!
X