अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्यातील हनोई परिषद निष्फळ ठरल्यानंतर पुढे काय होणार, याबाबतची उत्सुकता आता अधिक ताणली गेली आहे. त्याचे कारण म्हणजे किम आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात गेल्या गुरुवारी झालेली परिषद. त्यात द्विपक्षीय संबंधाचा मुद्दा तोंडी लावण्यापुरता. खरा मुद्दा होता तो कोरियन द्वीपकल्पातील शांततेचा. त्यामुळे जगभरातील माध्यमांनी या परिषदेची दखल घेताना याच अनुषंगाने विश्लेषण केले आहे.

रशियासारख्या शक्तिशाली देशाशी मित्रत्वाचे संबंध असल्याचे, आपले आर्थिक भवितव्य फक्त अमेरिकेवर अवलंबून नसल्याचे दाखवून देण्याची मोठी संधी उत्तर कोरियाला या परिषदेतून मिळाली, असे ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावरील एका लेखात म्हटले आहे. शीतयुद्धाच्या काळात तत्कालीन सोव्हिएत युनियन  आणि उत्तर कोरिया यांच्यातील लष्करी आणि व्यापारी संबंध दृढ होते. मात्र, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर उत्तर कोरियाचा व्यापारकल चीनकडे वाढू लागला, याकडे लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. दुसरीकडे, कोरियन द्विपकल्पाबाबत आपलीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे, हे अधोरेखित करण्याची संधी रशियाला या परिषदेतून मिळाली, असे नमूद करताना या लेखात पुतिन यांचे सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांच्या विधानाचा उल्लेख करण्यात आला आहे. उत्तर कोरियातील अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत तोडगा काढण्यासाठी उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, चीन, जपान, रशिया आणि अमेरिका अशी सहा पक्षीय चर्चा हाच एकमेव मार्ग आहे, असे पेस्कोव्ह यांनी म्हटले होते.

उत्तर कोरियावरील आंतरराष्ट्रीय र्निबध हटविण्यासाठी पुतिन यांच्याकडून मदत मिळवण्याबरोबरच ट्रम्प यांना इशारा देण्याचा प्रयत्न किम यांनी या परिषदेद्वारे केल्याचे मत ‘एनबीसी न्यूज’च्या संकेतस्थळावरील लेखात व्यक्त करण्यात आले आहे. उत्तर कोरिया सरकारपुरस्कृत ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’ने परिषदेबाबत तीन लेख प्रसिद्ध केले आहेत. या परिषदेमुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास त्यात व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर कोरियाप्रश्नी रशिया आणि चीन हे मदत करत असल्याचे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने प्रसिद्ध करत रशियाबरोबरच या प्रश्नात चीनचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे सूचित केले आहे.

अमेरिकी माध्यमांनी या परिषदेचे सखोल विश्लेषण करून विविध कंगोरे उलगडले आहेत. ‘आफ्टर मीटिंग किम जोंग उन, पुतिन सपोर्ट्स नॉर्थ कोरिया ऑन न्यूक्लिअर डिसआर्ममेन्ट’ या मथळयाखाली ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत ट्रम्प यांच्या भूमिकेला वाकुल्या दाखवत पुतिन यांनी उत्तर कोरियाला पाठिंबा दिला आहे. अण्वस्त्रांचा त्याग करण्यासाठी उत्तर कोरियाला अमेरिकाच नव्हे, तर इतर देशांकडूनही सुरक्षा हमी हवी असल्याची भूमिका पुतिन यांनी मांडली’ असे त्यात म्हटले आहे. पण, अशी सुरक्षा हमी अमेरिका देऊ शकेल काय? हा कळीचा मुद्दा आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’मधील ‘नॉर्थ कोरिया वॉन्टस सिक्युरिटी गॅरंटीज, बट कॅन द युनायटेड स्टेट्स डिलिव्हर?’ या शीर्षकाच्या लेखात याबाबत सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील लष्करी सहकार्याला उत्तर कोरियाने नेहमीच आक्षेप घेतला आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातून सैन्य मागे घेण्याची मागणी उत्तर कोरिया करण्याची शक्यता आहे. अमेरिका आपल्या देशावर हल्ला करणार नाही किंवा देशांतर्गत बंडाळीला मदत करणार नाही, याची हमीही किम यांना हवी आहे. मात्र, किम यांना अपेक्षित असलेली सुरक्षा हमी अमेरिका कधीच देणार नाही, असे निरीक्षण उत्तर कोरियाच्या कुकमीन विद्यापीठातील तज्ज्ञ आंद्रे लॅन्कोव्ह यांचा दाखला देत या लेखात नोंदवण्यात आले आहे. अशी हमी दिली तरी अमेरिकेच्या विश्वसनीयतेवरही प्रश्नचिन्ह असल्याचा मुद्दा मांडत या लेखात इराणशी केलेल्या कराराचा दाखला देण्यात आला आहे. आधीच्या अध्यक्षांनी इराणशी केलेला करार ट्रम्प यांनी मोडला. त्यामुळे ट्रम्प यांनी किम यांच्याशी करार केला तर अमेरिकेचे नवे अध्यक्ष तो मोडीत काढणारच नाहीत, याची शाश्वती देता येणार नाही, असे मत लेखात नोंदवण्यात आले आहे. लिबियाच्या गद्दाफीचे उदाहरणही लेखात देण्यात आले आहे.

संकलन : सुनील कांबळी