27 September 2020

News Flash

डोनाल्ड ट्रम्प गिल्टी / नॉट गिल्टी?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद हे अमेरिकी राज्यकारभार मंदिराचा कळस आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अनंत गाडगीळ

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तीन वेगवेगळ्या आरोपांखाली लवकरच महाभियोग खटल्यास सामोरे जावे लागणार आहे. त्यासंदर्भातील घडामोडींचा आढावा घेणारे हे टिपण..

‘मोनिका ओ माय डार्लिग’ या गाण्याने एका जमान्यात भारतीय जनतेने अभिनेत्री हेलनला डोक्यावर घेतले होते. दुसरीकडे दोनेक दशकांपूर्वी मोनिका लेविन्स्कीसोबतच्या संबंधांची कबुली जनतेला न दिल्यामुळे ‘शपथ घेऊनही असत्य कथन केल्याबद्दल’ राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना महाभियोगाला सामोरे जाण्यास भाग पाडत अमेरिकी जनतेने पदावरून खाली उतरवले. आणि आता विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तीन गंभीर आरोपांवरून महाभियोगाला सामोरे जावे लागत आहे. किंबहुना सदर प्रक्रियेची नुकतीच सुरुवातही झाली आहे.

पहिला आरोप म्हणजे, ट्रम्प यांनी त्यांच्याशी ‘अनैतिक संबंध’ ठेवणाऱ्या स्त्रियांना ‘मौन’ बाळगण्याच्या बदल्यात कोटय़वधी रुपयांचा मोबदला दिला. दुसरा आरोप म्हणजे, स्वत:च्या निवडणुकीसाठी रशियन लोकांची गुप्तपणे मदत घेतली. तर, ट्रम्प यांनी त्यांचे राजकीय वैरी असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी युक्रेनमध्ये केलेल्या तथाकथित गैरव्यवहारांची युक्रेन सरकारने चौकशी करावी म्हणून दबाव आणण्यासाठी युक्रेनची आर्थिक मदत रोखून धरली, हा तिसरा आरोप.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद हे अमेरिकी राज्यकारभार मंदिराचा कळस आहे. यालाच हादरा देणारी बाब एका ‘व्हिसलब्लोअर’च्या गौप्यस्फोटामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली. युरोपीय समुदायाचा सदस्य नसलेल्या युक्रेन देशाला लष्करी साहाय्याच्या रूपाने अमेरिका जवळपास तब्बल तीन हजार कोटी रुपयांची मदत देणार होती. मात्र अचानक ट्रम्प यांनी ती रोखून धरली. ट्रम्प एवढय़ावरच थांबले नाहीत; तर युक्रेनचे राष्ट्रप्रमुख वोलोदीमीर झेलेन्स्की यांना एक गुप्त निरोप पाठवला की, जर ही मदत हवी असेल तर यंदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना विरोध करणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे इच्छुक उमेदवार जो बायडन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या युक्रेनमधील गुंतवणुकीतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची जाहीर घोषणा युक्रेन सरकारने करावी.

सदर प्रकरणाचा गौप्यस्फोट होताच, ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकीकडे हात झटकले, तर दुसरीकडे युक्रेनमधील अमेरिकेच्या राजदूताने याची प्रत्यक्ष कबुलीच दिली. परिणामी या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. नेमका याच संधीचा फायदा घेत, अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांच्याविरुद्ध युक्रेन प्रकरणावरून महाभियोग चालवणार असल्याची घोषणा केली.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला पदावरून काढून टाकण्याच्या राजकीय प्रक्रियेचा पहिला भाग म्हणजे- महाभियोग! अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत अ‍ॅण्ड्रय़ू जॉन्सन (१८६८) आणि बिल क्लिंटन (१९९८) या केवळ दोनच राष्ट्राध्यक्षांना महाभियोगाद्वारे दोषी ठरवण्यात आले आहे. तर राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी ‘वॉटरगेट’ प्रकरणात महाभियोगापूर्वीच राजीनामा (१९७४) दिला होता.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सहजासहजी खुर्चीवरून खाली खेचणे आपल्याकडील जिल्हा परिषद-महापालिकांइतके सोपे नाही. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदावर आहे, तोपर्यंत त्याच्यावर खटला दाखल करता येत नाही; परंतु तत्पूर्वी महाभियोगाद्वारे त्याला पदावरून दूर करावे लागते. यासाठी वरिष्ठ सभागृह- म्हणजे ‘सेनेट’मध्ये दोनतृतीयांश बहुमताने ट्रम्प यांच्याविरुद्ध ठराव मंजूर व्हावा लागेल. ‘हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह’मध्ये (आपल्या लोकसभा समकक्ष) डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे, तर सेनेटमध्ये (आपल्या राज्यसभा समकक्ष) रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. यामुळे खालच्या प्रतिनिधीगृहात महाभियोगाचा ठराव मंजूर झाला, तरी सेनेटमध्ये बहुमताच्या जोरावर रिपब्लिकन सदस्य तो हाणून पाडतील. त्यामुळेच ट्रम्प बेफिकीर आहेत, असेही चित्र दिसते आहे.

महाभियोग प्रक्रियेच्या सुरुवातीला शिखरावर असलेली ट्रम्प यांची लोकप्रियता घसरली असून येत्या काळात ती आणखी घसरली, तर सेनेटमधील रिपब्लिकन सदस्यांना ट्रम्प यांची बाजू लावून धरणे अवघड जाणार आहे. चार भिंतींच्या आत गोपनीय स्वरूपात सुरू झालेल्या ट्रम्प यांच्याविरुद्धच्या महाभियोगाचे आता ‘जाहीर सुनावणी’मध्ये रूपांतर झाले आहे. यामुळे चित्रवाणी वाहिन्यांवरील महाभियोग सुनावणी पाहून लोकमत ट्रम्प यांच्याविरुद्ध जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतिनिधीगृहाने ट्रम्प यांच्यावरील आरोप निश्चित केल्यास, त्यांच्या हकालपट्टीचा ठराव संमत करणे अशक्य राहणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांची पळता भुई थोडी अशी अवस्था होईल.

प्रतिनिधीगृहाने याप्रकरणी तीन सदस्यीय समिती नेमून एकापाठोपाठ एक अशा सर्व संबंधितांच्या साक्षी घेण्याचा सपाटाच लावला. अमेरिकी प्रतिनिधीगृहांच्या गुप्तचर समितीने (हाऊस इंटलिजन्स कमिटी) घेतलेल्या एकूण साक्षींच्या आधारे तयार केलेल्या अहवालात ट्रम्प यांच्यावर ठपका ठेवला आहे. आता ट्रम्प समर्थक आणि विरोधक – दोघांनाही एकमेकांची उलट तपासणी करण्याची संधी दिली जाईल.

या सगळ्यात ट्रम्प यांची विचित्र अवस्था झाल्याचे दृश्य समोर येत आहे. एकीकडे, ट्रम्प यांचे मित्र, कायदेशीर सल्लागार आणि न्यू यॉर्कचे माजी महापौर रुडी ज्युलियानी आणि २०१६च्या ट्रम्प यांच्या विजयामागचे आखणीकार स्टीव्ह बॅनन यांनी तर महाभियोगाविरुद्ध रान उठवले आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांचे अनेक खटले जिंकणारे त्यांचे अनेक वर्षे वकील राहिलेले मायकेल कोहेन यांनी ट्रम्प यांच्या परस्त्रीसंबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. भरीत भर म्हणजे, ट्रम्प यांचे निवडणूक प्रचारप्रमुख पॉल मॅनफोर्ट हे एका बँक गैरव्यवहारात दोषी ठरले आहेत.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात चौकशी समितीने युरोपीय समुदायातील अमेरिकेचे राजदूत गॉर्डन सोण्डलॅण्ड यांना साक्षीला पाचारण केले असता, ट्रम्प प्रशासनाने त्यांना साक्ष देण्यापासून मज्जाव केला होता. सोण्डलॅण्ड हे वास्तविक सिअ‍ॅटलमधील हॉटेल व्यवसायातील एक मोठे प्रस्थ. ट्रम्प यांच्या २०१६ च्या निवडणूक निधीसाठी सोण्डलॅण्ड यांनी भरघोस देणगी दिली होती. राष्ट्राध्यक्ष बनताच ट्रम्प यांनी सोण्डलॅण्ड यांना राजदूत नेमून उपकाराची परतफेड केली. वास्तविक विविध युरोपीय राष्ट्रप्रमुखांऐवजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्कींशी त्यांची जवळीक हाच चर्चेचा विषय ठरला होता.

स्वत:च्या डायरीतील नोंदींमुळे अनेक राजकीय नेते, उद्योगपती अनेकदा अडचणीत सापडतात. याउलटचे उदाहरण : अमेरिकेचे युक्रेनमधील राजदूत विल्यम टेलर यांना त्यांच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने महाभियोग समितीसमोर साक्ष देण्यास मज्जाव केला. मात्र, टेलर यांनी सर्व दबाव झुगारत समितीसमोर केवळ औपचारिकता म्हणून साक्ष दिली नाही, तर आपल्या डायरीमध्ये वेळोवेळी केलेल्या नोंदींच्या आधारे ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर कसा दबाव आणला, कशा अटी घातल्या, याचा पर्दाफाशच केला. एवढय़ावरच टेलर थांबले नाहीत, तर ‘युक्रेनला द्यावयाची मदत मंजूर करू नका’ असा आदेश आम्हाला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वतीने आल्याचा’ दावा अर्थमंत्रालयाच्या एका महिला अधिकाऱ्यांनी केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

बीबीसी, सीएनएन यांसारख्या वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या महाभियोग सुनावणीमध्ये गुप्तचर समितीचे प्रमुख अ‍ॅडम शिफ यांनी ‘ट्रम्प यांनी मित्रराष्ट्राच्या असहायतेचा वैयक्तिक लाभाकरिता गैरफायदा घेतला,’ असे निवेदन केले आहे. आतापर्यंत सभागृहाच्या चौकशी समितीसमोर साक्षीसाठी बोलावण्यात आलेल्यांमध्ये मेरी योवानोविच, मायकेल अ‍ॅटकिन्सन, कर्ट वोल्कर, कर्नल अ‍ॅलेक्झँडर विंडमन यांसारखे राजनैतिक अधिकारी होते. मात्र, सोण्डलॅण्ड यांनी साक्षीला होकार दिल्यामुळे चांगलीच रंगत भरली. आतापर्यंत झालेल्या या साक्षीमध्ये एक गोष्ट प्रकर्षांने पुढे आली, ती म्हणजे- ट्रम्प यांनी अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांमार्फत जो बायडन यांच्या चौकशीसाठी युक्रेनवर दबाव आणला.

नियतीचा खेळ विचित्र असतो असे म्हणतात. अमेरिकेच्या एनबीसी वाहिनीवर डोनाल्ड ट्रम्प निर्माते असलेला ‘द अ‍ॅप्रेन्टिस’ हा कार्यक्रम चक्क १३ वर्षे चालला. यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला एक व्यावसायिक जबाबदारी देऊन त्याच्या कौशल्याची परीक्षा घेतली जायची. अपयशी ठरणाऱ्या स्पर्धकाला ट्रम्प ‘यू आर फायरड्’ असे म्हणत कार्यक्रमाच्या बाहेर घालवायचे. महाभियोगाच्या कार्यक्रमानंतर अमेरिकी जनता ट्रम्प यांनाच ‘यू आर फायरड्’ म्हणणार का, हे आता लवकरच कळेल!

लेखक महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य असून, २०१६च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत ‘आंतरराष्ट्रीय अभ्यास निरीक्षक’ म्हणून आमंत्रित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:09 am

Web Title: donald trump face impeachment charges on three separate charges abn 97
Next Stories
1 हिंदुत्व : भाजपचे आणि शिवसेनेचे
2 विश्वाचे वृत्तरंग : हाँगकाँगची हाक
3 मैदानातील माणसे.. : झुंजार सेनानायक
Just Now!
X