मोठा गाजावाजा करीत मुंबईहून गोव्याकडे निघालेली पहिली डबलडेकर वातानुकूलित गाडी अर्धा रस्ताही गेली नसेल, तो तिच्या वाटेत ‘संगीत मानापमाना’चे नाटय़ आले. गाडी रीतसर रोहा स्थानकात तासभर खोळंबली. या मानापमान नाटय़ावर पडदा पडल्यावर गाडी पुढे मार्गस्थही झाली, पण गाडीतल्या साताठशे आणि मुंबईत आपापल्या घरांत सामानसुमान बांधून तयार असलेल्या कित्येक लाख प्रवाशांच्या मनात एकच शंका उपस्थित झाली, यंदाच्या गणेशोत्सवासाठीच्या विशेष गाडीच्या पहिल्याच धावेला असा कुजका नारळ कसा फुटला? पुढील दिवसांत तरी प्रवास उत्तम होणार ना?
पण वाढवायचा नारळ कुजका निघाला, तर ते शुभ मानण्याचा एक संकेत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य, पश्चिम आणि कोकण या तीनही रेल्वे प्रशासनांनी मिळून तब्बल ४० विशेष फेऱ्या यंदा कोकणासाठी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या २००हून अधिक फेऱ्यांपैकी अनेक फेऱ्यांची आरक्षणेही फुल झाली आहेत. प्रतीक्षा यादीत असलेल्या किंवा आरक्षण मिळू न शकलेल्या लोकांसाठी काही अनारक्षित गाडय़ाही सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा रेल्वेमार्गाने कोकणात जाण्यासाठी प्रवाशांसमोर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. यंदा एकटय़ा मध्य रेल्वेने १६२ जादा गणपती विशेष गाडय़ा कोकणासाठी सोडल्या आहेत. त्याशिवाय मध्य रेल्वेच्या नेहमीच्या कोकणात जाणाऱ्या गाडय़ांचे आरक्षणही फुल आहे. त्याशिवाय पश्चिम आणि कोकण रेल्वेनेही विशेष गाडय़ा सोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदा कोकणवासीयांसाठी २१० पेक्षा जास्त विशेष गाडय़ा उपलब्ध आहेत.
यातील ग्यानबाची मेख अशी की, या सर्व गाडय़ा कोकणात जाण्यासाठी एकच मार्ग आहे. पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, कणकवली वगैरे वगैरे.. या मार्गाचे दुपदरीकरण अद्याप तरी झालेले नाही. त्यामुळे एका वेळी या मार्गावरून एकच गाडी धावू शकते. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यानच नाही, तर इतर वेळीही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या एका मार्गिकेचा भयंकर त्रास होत असतो. कारण चांगली धडाधड चालणारी आपली गाडी अचानकपणे एखाद्या स्टेशनपाशी सायडिंगला टाकतात आणि अर्धा तास ती तिकडेच उभी राहते. गणेशोत्सवाच्या काळात तर अशा सायडिंगला पडलेल्या गाडय़ा अनेक असतात. त्यामुळे प्रवास निर्वेध झाला, तरी तो करण्यास किती काळ लागेल, हा प्रश्न चाकरमान्यांना नक्कीच भेडसावणार आहे. अनेकदा तर रत्नागिरी-कुडाळ येथे जाण्यासाठीही १५-१५ तास गाडय़ांमध्ये अडकण्याचा अनुभव प्रवाशांना आहे.
यंदा राज्य परिवहन महामंडळाने गणेशोत्सवासाठी म्हणून १८९५ विशेष गाडय़ा चालवण्याची तयारी ठेवली होती. यापैकी १२८५ गाडय़ांचे आरक्षण महामंडळाने सामूहिक आरक्षित गाडय़ांसाठी केले होते, तर ६१० गाडय़ा नियमित आरक्षणासाठी राखीव ठेवल्या होत्या. या १८९५ पैकी १८५० गाडय़ांचे आरक्षण याआधीच झाले आहे. तर ६१० ऐवजी महामंडळाने ६२४ नियमित आरक्षणाच्या गाडय़ा सोडण्याचा विचार केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत आणखी ४० गाडय़ा आरक्षणासाठी उपलब्ध असतील.
राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ांशिवाय अनेक खासगी बसगाडय़ाही गणेशोत्सवासाठी कोकणाकडे रवाना होणार आहेत. २७ ऑगस्टच्या रात्रीपासूनच या खासगी बसगाडय़ा कोकणाकडे रवाना होणार आहेत. दर रात्री दोनशे ते अडीचशे खासगी बसेस मुंबईहून कोकणाकडे निघतील. तसेच अनेकांनी कुटुंबीयांसह गावाला जाण्यासाठी ट्रॅक्स, सुमो, इनोव्हा अशा खासगी गाडय़ाही बुक केल्या आहेत. या वाहनांची संख्याही दर दिवशी साडेसात ते आठ हजार एवढी असणार असल्याचा दावा वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. यातील खासगी गाडय़ा वगळता खासगी आणि एसटी महामंडळाच्या बसगाडय़ा मुंबई-गोवा महामार्गाचाच पर्याय कोकणात जाण्यासाठी स्वीकारतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीपासूनच या महामार्गावर मोठय़ा प्रमाणात ताण पडणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासाची साधने मुबलक असली, तरी मागणीपेक्षा पुरवठा कमीच असल्याचे सातत्याने जाणवते. त्यातच मध्य रेल्वेने गणेशोत्सवादरम्यान प्रीमियम गाडी चालवण्याचे जाहीर केल्यानंतर आणि या गाडीच्या आरक्षणासाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागल्यानंतर या प्रीमियम गाडय़ांकडे प्रवाशांनी पाठच फिरवली आहे.
मुंबई ते गोवा या प्रवासाचा विचार फक्त गणेशोत्सवापुरताच केला जातो, हे कोकणवासीयांचे दुर्दैव म्हणायला हवे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री होते, त्या वेळी ‘कोकणचे कॅलिफोर्निया करायला हवे’, अशा प्रकारचे वारे खेळत होते. आताच्या ‘मुंबईचे शांघाय करण्याच्या’ हाकेएवढाच फोलपणा त्यात होता. पण कोकणातील पर्यटनाला आणि उद्योगधंद्यांना गती देण्यासाठी योग्य अशा पायाभूत सुविधांचा विकास अद्यापही कोकणात झालेला नाही.  तरीही रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होतातच. रेल्वेच्या बाबतीतही अद्याप दुपदरीकरणाचे काम रोह्य़ाच्या पुढे सरकलेले नाही. कोकण रेल्वेतर्फे तर दुपदरीकरण फक्त सर्वेक्षणापुरतेच मर्यादित आहे.
या सर्व गोष्टी होण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती आणि जनमताचा जोर कोकणात नाही. कोकणातले नेते एकमेकांचेच पंख छाटण्यात मश्गूल आणि लोक प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याच्या तयारीत! त्यामुळे आमच्या प्रदेशात अमुक एक गोष्ट हवी, यासाठी कोकणात आंदोलन झाल्याचे स्मरणातच नाही. प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि त्याला जनमताची जोड मिळाल्यास किमान पुढल्या वर्षी तरी गणेशोत्सवादरम्यानचा कोकणवासीयांचा प्रवास नक्कीच निर्विघ्नपणे पार पडेल.
खासगी बसचे दरही तिप्पट!
कोकणात जाण्यासाठी खासगी बसगाडय़ांचे आरक्षण करायला गेल्यास इतर वेळी साध्या बसगाडीचे कुडाळपर्यंतचे भाडे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत घेतले जाते. तर याच प्रवासासाठी वातानुकूलित बसगाडय़ा ८०० ते १००० रुपये आकारतात. मात्र गणेशोत्सवात वाढती मागणी पाहून साध्या गाडय़ांचे दरही तिप्पट आकारले जातात. कुडाळपर्यंतच्या साध्या बसमधील एका सीटसाठी आम्ही माणशी १५०० रुपये मोजल्याचे प्रशांत गावडे यांनी सांगितले. वातानुकूलित खासगी बसगाडय़ांचे दर तर अवाच्या सव्वा आकारले जातात. हे दर अनेकदा अडीच ते तीन हजार रुपयांच्या घरात असतात. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी रिकाम्या असलेल्या एका सीटसाठी चार हजारांपर्यंत दर आकारले गेल्याचे काही प्रवासी सांगतात. मात्र आपल्या गावी पोहोचण्याची आस असल्याने प्रवासीही वाट्टेल तेवढे पैसे मोजायला तयार होतात.
प्रीमियम गाडी, उत्तम पर्याय!
या खासगी बस वाहतूकदारांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी प्रीमियम गाडी, हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र प्रीमियम रेल्वे गाडीचे तिकीट काढण्याआधी काही गोष्टींची खातरजमा करून घेणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वे अधिकारीच सांगतात. सर्वप्रथम या गाडीचे तिकीट मागणी आणि प्रवासाची तारीख यांच्यावर ठरत असते. त्यामुळे शक्यतो प्रीमियम गाडीत ग्रुप बुकिंग करण्याचे टाळायला हवे. ग्रुप बुकिंग केल्यास पहिली आरक्षित होणारी सीट आणि पाचवी किंवा सहावी सीट यांच्यातील तिकिटांच्या दरांत तफावत असू शकते. तसेच गाडीचे आरक्षण करताना अनेकदा आपल्या स्थानकापर्यंतची तिकिटे संपलेली असू शकतात. मात्र अंतिम स्थानकापर्यंत तिकीट काढून त्याआधीच्या आपल्या स्थानकावर उतरण्याचे स्वातंत्र्य प्रवाशांना आहे. त्याशिवाय आरक्षण निश्चित करताना अगदी शेवटच्या विंडोमध्ये प्रवाशांना त्यांना भराव्या लागणाऱ्या रकमेबाबत माहिती दिली जाते. ती रक्कम व्यवस्थित पाहून मगच तिकीट आरक्षित करायचे अथवा नाही, हे ठरवायला हवे. प्रीमियम गाडीचे भाडे साधारण डब्यांसाठी १५० टक्के आणि वातानुकूलित जागेसाठी २०० टक्के जास्त आकारले जाऊ शकते. पण खासगी बस वाहतूकदार दुप्पट किंवा तिप्पट भाडे आकारत असतील, तर त्यापेक्षा रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, वक्तशीर आहे. तसेच रेल्वेच्या या तिकिटात खाण्याची सुविधाही दिलेली असल्याने प्रवाशांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.