सामाजिक कर्तव्यभावनेतून काम  करणाऱ्या संस्था आणि समाजातील दातृत्व यांना जोडणारा दुवा म्हणजे लोकसत्ताचा सर्वकार्येषु सर्वदाउपक्रम. यंदाही या दानयज्ञाला दानशूर वाचकांनी भरभरून प्रतिसाद देत सेवाव्रतींना खंबीर पाठबळ दिले. आर्थिक मदतीपुरते सीमित न राहता अनेक दानशूर वाचक या उपक्रमाद्वारे संस्थांशी जोडले गेले आहेत. रवींद्र नाटय़मंदिरात शुक्रवारी झालेला दातृत्वाचा मेळा त्याची साक्ष देत होता..

हाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ असून विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना ‘लोकसत्ता’ने एकत्र आणावे आणि ‘लोकसत्ता’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ठोस विधायक काम उभे केले जावे. हे काम सर्वासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपण समाज आणि देशासाठी काही तरी करावे, अशी इच्छा असते. पण प्रत्येकालाच तसे काम करता येत नाही. काही मंडळी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असतात. हे काम त्या त्या संस्थांच्या पातळीवर संस्थेतील कार्यकर्त्यांच्या मदतीने उत्तमपणे चाललेले असते. पण विखुरलेल्या या सर्व सामाजिक संस्था आणि त्यातील कार्यकर्ते जर एकत्र आले तर त्यातून एक मोठी सामूहिक शक्ती तयार होईल. ही सामूहिक शक्ती तयार करण्याचे, सर्व सामाजिक संस्था व कार्यकर्ते आणि समाज यांना एकत्र जोडण्याचे काम ‘लोकसत्ता’ने करावे. सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि समाजाला जोडणारा हा ‘पूल’ ‘लोकसत्ता’ने बांधावा. यातून शाश्वत निधी उभारून महाराष्ट्रात ठोस आणि कायमस्वरूपी विधायक काम उभे करावे. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत ज्या सामाजिक संस्था जोडल्या गेल्या आहेत त्या सर्वाचा एक महोत्सव आमच्या ‘आनंदवन’मध्ये आपण साजरा करू या.

समाजात दोन प्रकारची माणसे असतात. एका गटातील माणसे एखादा माणूस जर खड्डय़ात पडला असेल तर त्याला ती मंडळी बाहेरूनच कसा वर ये, असे सांगत असतात. त्याखेरीज ही माणसे काहीही करत नाहीत, तर दुसऱ्या गटातील माणसे खड्डय़ात पडलेल्या माणसाला खड्डय़ातून वर येण्यासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करतात. आपला हात त्याच्या हातात देतात आणि थेट कृती करतात. आपला समाजही असाच खड्डय़ात पडला असून त्याला वर आणण्यासाठी वर ये, वर ये असे सांगणारी नव्हे तर प्रत्यक्ष मदतीचा हात देणारी, आपला हात त्याच्या हातात घालून त्याचा विकास व प्रगती करणारी माणसे व समाज हवा आहे. ‘लोकमान्य लोकशक्ती’ असलेला ‘लोकसत्ता’ हे काम नक्कीच करू शकतो. ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने ते दाखवूनही दिले आहे. विधायक व चांगल्या गोष्टी करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांची माहिती व त्यांचे काम दर वर्षी गणेशोत्सवाच्या काळात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जाते. या संस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन करून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून त्या संस्थांना आर्थिक मदतही मिळवून दिली जाते. सामाजिक काम करणाऱ्या अशा संस्थांना त्यांचे काम करण्यासाठी असे आर्थिक पाठबळ आवश्यकच असते.

कुष्ठरोगी हा समाजाने नाकारलेला आणि दुर्लक्षित असा घटक होता आणि आजही आहे. तुमच्या पूर्वजन्माचे पातक म्हणून तुमची ही अवस्था झाल्याचेही समाजाकडून त्यांना बोलले जाते. कुष्ठरोगी बरा झाला तरीही समाज त्यांना स्वीकारत नाही. बाबा आमटे यांनी या कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांचा आत्मसन्मान जागृत करण्याचे काम केले. ‘आनंदवन’ हे कायमस्वरूपी सुरू न राहता ते बंद व्हावे, अशी बाबांची इच्छा होती. ‘आनंदवन’ बंद व्हावे हे आमचे ब्रीदवाक्य आहे. बाबांच्या प्रेरणेतून कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी अन्यही काही संस्था पुढे आल्या असून त्यांचेही काम चांगले सुरू आहे. ‘आनंदवन’ येथे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून आणि परदेशातूनही अनेक नागरिक भेट देण्यासाठी येतात. त्यांच्या परीने ते ‘आनंदवन’ आणि तेथील कुष्ठरोग्यांची मदत व सेवा करत असतात. बाबांनी सुरू केलेल्या ‘आनंदवन’ येथे आज कुष्ठरुग्ण सेवेबरोबरच अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. समाजाकडूनही या प्रकल्पांना मदत मिळत आहे. विहित वयोमानानुसार आपापल्या नोकरी-व्यवसायातून निवृत्त झालेल्या समाजाच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींना बाबांनी एकत्र आणले आणि त्या सर्वाना ‘आनंदवन’च्या कामाशी जोडून घेतले. हा ‘उत्तरायण’ प्रकल्प बाबांनी यशस्वी केला. ‘लोकसत्ता’नेही समाजाच्या विविध क्षेत्रांतील लोकांनाही अशा प्रकारे एकत्र आणावे आणि त्यांना सामाजिक कामात जोडून घ्यावे.

महाराष्ट्रात अनेक संस्था आणि या संस्थांचे कार्यकर्ते निरलसपणे आणि एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन वेगवेगळे सामाजिक काम करत आहेत. पण या सगळ्यांचा आपापसात म्हणावा तितका मेळ नाही. एखादी सामाजिक किंवा स्वयंसेवी संस्था दुसऱ्या संस्थेबद्दल चांगले बोलत नाही. हेच चित्र समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या डॉक्टर्स, वकील, प्रसारमाध्यमे व अन्य घटकांमध्येही पाहायला मिळते.

विविध सामाजिक संस्थांना वाचकांकडून मिळालेल्या देणगीच्या माध्यमातून आर्थिक बळ देणारा ‘लोकसत्ता’ दैनिकाचा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा भारतातील एकमेव उपक्रम आहे. समाजात विविध संस्था आपल्या परीने वेगवेगळी सामाजिक कामे करत आहेत. या सर्व संस्थांना समाजाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या बळावरच आपले काम करता येते. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ अशा वेगवेगळ्या संस्थांची माहिती समाजापुढे आणून त्यांना आर्थिक मदत करून देण्याचे आणि त्यांच्या कामाशी समाजाला जोडून घेण्याचे खूप महत्त्वाचे काम करत आहे. भारतातील अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रात विविध प्रकारचे सामाजिक काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ असून तुम्हा काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा मला अभिमान आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या उपक्रमातून समाजात जनजागृती केली जात असून सर्वसामान्य माणसाला या सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याचा ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम नक्कीच गौरवास्पद आहे.

खासदारनिधीतून सामाजिक संस्थांना मदतीचा पायंडा अनुकरणीय

खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी त्यांच्या खासदार निधीतून दोन कोटी रुपयांचा निधी ‘सर्वकार्येषु सर्वदा’तील संस्थांना दिला आहे. त्यांचा हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आणि अन्य लोकप्रतिनिधींसाठी अनुकरणीय आहे. प्रत्येक खासदाराला वर्षांला पाच कोटी रुपये मिळतात. प्रत्येक खासदाराने या खासदार निधीचा विनियोग अशा सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी केला तर यातून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकेल, असा विश्वास ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी यावेळी व्यक्त केला. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष होते. आणखी तीन वर्षांनी दहा वर्षे पूर्ण होतील. त्या वेळी ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील आजवरच्या सर्व सहभागी संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे स्नेहसंमेलन ‘आनंदवन’ येथे घेऊ या, असेही त्यांनी सांगितले.

संस्था प्रतिनिधी म्हणतात..

विद्यार्थी विकास योजना, ठाणे

‘लोकसत्ता’चा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम वेगवेगळ्या संस्थांना समाजाशी जोडणारा आहे. या माध्यमातून ‘विद्यार्थी विकास योजना’ संस्थेला भरघोस मदत मिळाली. अनेकांनी ऑनलाइन पैसे पाठवून संस्थेला मदत केली आहे. केवळ लेखातील माहिती वाचून ठाण्यातल्या एका संस्थेला राज्यभरातून मदतीचा ओघ येणे, हे आम्हाला थक्क करणारे आहे. संस्थेचे काम न पाहता, ओळख नसतानाही फक्त ‘लोकसत्ता’वर विश्वास ठेवून इतक्या मोठय़ा संख्येने दानशूर व्यक्ती या दानयज्ञामध्ये सहभागी होतात, हेच या उपक्रमाचे सार्थक आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर केवळ पैशाअभावी मुलांची उच्च शिक्षणाची कवाडे बंद होऊ  नयेत, म्हणून ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या संस्थेमुळे आज अनेक मुलामुलींचे वैद्यकीय, व्यवस्थापन, अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होत आहे.

रवींद्र कर्वे

थिएटर अ‍ॅकॅडमी, पुणे

‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ नाटय़ संस्था व महाराष्ट्रीय मंडळाच्या सहकार्याने सकळ ललित कलांचे संस्कार शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर व्हावेत या उद्देशाने ‘सकळ ललित कला संकुल’ साकारण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे. या माध्यमातून पुण्यामध्ये प्रायोगिक रंगभूमी सभागृह उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमामुळे आर्थिक मदत लाभली आहेच, परंतु त्याचबरोबर राज्यभरात असे आगळेवेगळे काम सुरू असल्याची माहिती यानिमित्ताने पोहोचली हे आमच्यासाठी खूपच आनंददायी आहे.

धनंजय ताम्हणे

शांतिवन, बीड

आतापर्यंत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतून धान्य व अन्य प्रकारच्या मदतीमधून इथले लोक संस्थेशी जोडले गेले आहेतच; परंतु ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील मदतीचे हात संस्थेशी जोडले आहेत. संस्थेमध्ये दाखल होणाऱ्या अनेक मुलांना आपले आईवडील कोण, हेही माहीत नाही. तमाशातल्या स्त्रियांच्या मुलांमध्ये तर सख्ख्या भावंडांपैकी एकाचा धर्म मुस्लीम असतो तर दुसऱ्याचा हिंदू. अशा परिस्थितीतून आलेल्या मुलांना संस्थेने आधार दिला आहे. संस्थेत दाखल झालेली ऊसतोड कामगारांची तीन मुले वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. संस्थेतील मुलांना आर्थिक मदतीव्यतिरिक्त मायेचा ओलावा हवा आहे, कार्यकर्त्यांचा हात हवा आहे.

दीपक नागरगोजे

पुणे नगर वाचन मंदिर, पुणे

२६ मार्च १८४८ साली लोकहितवादींनी जी शतपत्रे लिहिली त्यातील तिसऱ्या पत्रात या संस्थेच्या स्थापनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तीनशे पुस्तके व चार वृत्तपत्रे यांच्या साहाय्याने पुण्यातील बुधवार वाडय़ात या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सध्या पुण्यातील सिटी पोस्ट चौकात ही संस्था उभी आहे. मधू लिमये, प्रल्हाद केशव अत्रे, दुर्गा भागवत यांसारख्या साहित्यिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचा सहवास पुणे नगर वाचन मंदिराला लाभला आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून मिळालेल्या निधीतून दुर्मीळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी सातारा, वाई, सांगली, सोलापूर येथील ग्रंथालयांशी संपर्क केला आहे.

अरविंद रानडे

माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला

महिला व बालकांना सक्षम करण्यासाठी माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीतून प्रतिष्ठानचे काम वाढविण्यासाठी आम्हाला मदत होईल. माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही संस्कार वर्ग, बालवाडी, महिलांसाठी सहविचार केंद्र असे बरेच उपक्रम राबवितो. सामाजिक क्षेत्रातील अनेक महिलांनी या प्रतिष्ठानला मदत केली. या संस्थेची घोडदौड ही महिलांच्या हातांनी सक्षमपणे पेलली आहे. विदारक परिस्थितीत काम करणाऱ्या महिलांना परिस्थितीच्या रेटय़ातून बाहेर काढण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहोत. महिलांचे सक्षमीकरण हे आमच्या संस्थांचे ध्येय आहे.

नीलिमा कुलकर्णी 

महाराष्ट्र आरोग्य मंडळ, हडपसर

साने गुरुजी यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन ११ जून १९६० रोजी हडपसर येथे महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि साने गुरुजी आरोग्य केंद्राची स्थापना केली. आमच्या संस्थेने आरोग्याबरोबरच आदिवासी विकास, पाण्याची समस्या, शेती अशा अनेक क्षेत्रांत काम हाती घेतले आहे. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी आपल्या खासदार निधीतून २५ लाखांची मदत केली. यासाठी त्यांचे आभार आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून मिळालेल्या मदतीमुळे आमच्या कामाचा विस्तार होईल, असा विश्वास आहे.

डॉ. एस. एल. घाटे

आम्ही आमच्या आरोग्यासाठी, गडचिरोली

गडचिरोलीतील आदिवासी समाजात असलेले आरोग्यविषयक पारंपरिक ज्ञान पुढे नेणे व त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मार्ग काढणे यासाठी बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही संस्था गेली २५ वर्षे कार्यरत आहे. सरकारचा जीव कागदात अडकलेला असतो, याची आम्हाला काम करताना वेळोवेळी प्रचीती आली आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेला मोठी मदत मिळाली आहे. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था राज्याच्या एका टोकाला गडचिरोलीला काम करीत आहे, हे खरे आहे. त्यामुळे आम्ही दूर आहोत. पण तुम्ही जवळ या. मग जास्त अंतर उरणार नाही.

शुभदा देशमुख

आविष्कार, रत्नागिरी

बौद्धिकदृष्टय़ा अक्षम मुलांसाठी काम करणारी आविष्कार ही कोकणातली पहिलीच संस्था आहे. तरीही आमच्या कामाच्या महतीचा परीघ कोकणापर्यंतच मर्यादित राहिला. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाच्या माध्यमातून या संस्थेला राज्यभरात पोहोचण्याची संधी मिळाली. ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्थांच्या कामाची दखल घेतली आहे. हे काम या उपक्रमातून समाजासमोर आले आहे. बौद्धिकदृष्टय़ा अक्षम मुलांनी तयार केलेले दिवाळीच्या शुभेच्छांचे भेटकार्ड, उटणे व पोचपावती असे एक पाकीट संस्थेच्या वतीने सर्व देणगीदारांना कृतज्ञता म्हणून पाठविण्यात आले आहे.

नीला पालकर

रचना ट्रस्ट, नाशिक

‘रचना ट्रस्ट’ ही संस्था १९६८ पासून कार्यरत असून आम्हाला वारसाहक्काने मिळालेली आहे. त्यामुळे इथे जमलेल्या इतर संस्थांप्रमाणे संस्था उभी करण्यापासूनचे काम जरी आम्ही केले नसले तरी संस्थेचे काम मात्र नेटाने पुढे नेण्यासाठी बांधील आहोत. नाशिकमधील आदिवासी मुलींच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या या संस्थेची सुरुवात चार-पाच मुलींपासून झाली होती. आजघडीला मुलींच्या वसतिगृहात ८७ मुली तर आश्रमशाळेमध्ये ४३४ विद्यार्थी शिकत आहेत. दहावी झाल्यानंतर या मुलींनी काय करायचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने संस्थेने परिचारिका महाविद्यालय उभारले आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे मिळालेल्या निधीतून संस्थेच्या इमारतीमध्ये पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचा पुनर्वापर आदी बाबी करण्यात येणार आहेत.

सुलक्षणा महाजन

चेतना अपंगमती विकास संस्था, कोल्हापूर

‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात सहभागी झालेल्या संस्थांना वाचकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादातून वाचकांचा ‘लोकसत्ता’वरील अभूतपूर्ण विश्वास दिसून येतो. गेली ३१ वर्षे चेतना ही संस्था कोल्हापुरात बौद्धिक अक्षम मुलांच्या शिक्षण व पुनर्वसनाचे काम करीत आहे. सरकारकडून सामाजिक संस्था हा विषय दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे यापुढे समाजावर अवलंबून राहून सामाजिक संस्थांचे कार्य सुरू राहील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातून मिळालेल्या मदतीतून बहुउद्देशीय पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची इच्छा आहे. यामध्ये कुष्ठरोगी, अपंग, कर्णबधिर अशा विविध अक्षम मुलांचा समावेश करता येईल. या मुलांना शैक्षणिक व आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा प्रयत्न या केंद्राच्या माध्यमातून केला जाईल.

पवन खेबुडकर

सामाजिक परिवर्तन अभ्यास केंद्र (सीएसएससी), मुंबई

१९७१ साली गोविंदराव तळवलकर, गोवर्धन पारीख यांनी सामाजिक परिवर्तन अभ्यास केंद्रांची (सीएसएससी) स्थापना केली. त्या काळात आर्थिक विकासाबरोबर सामाजिक सुधारणा व्हावी यासाठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर डॉ. इंदुमती पारीख यांनी या संस्थेची धुरा हातात घेतली. प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या वैचारिक जाणिवेची आवश्यकता असते ती या संस्थांच्या माध्यमातून पुरविली जाते. लोकाश्रयावर अवलंबून न राहता स्वावलंबी बनविण्याचे महत्त्वाचे काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या संस्थेला मदत तर मिळालीच, पण २०० हून अधिक लोक यानिमित्ताने आमच्या संपर्कात आले. त्यातील ५० जणांनी संस्थेच्या कामात कृतिशीलता दाखवली तरी आम्हाला नवे बळ मिळेल.

डॉ. आर. डी. पोतदार

डॉ. विकास आमटे यांनी सर्वकार्येषु सर्वदाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा संपादित अंश..