महाराष्ट्राचा अनेक भाग दुष्काळात होरपळत आहे. ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते, पण प्रत्यक्षात त्याचा लाभ गरजूंना मिळत नाही , अशी ओरड चालू असते. राज्याच्या काही भागांत तर दुष्काळ दरवर्षीच जाणवत असतो. तेथील हे वास्तव..

केवळ आपल्यापुरताच विचार करायचा, हे माझ्या स्वभावात नाही. शेजाऱ्यांचे दु:ख पाहताना बऱ्याचदा आपल्याकडं दुर्लक्ष होतं. आपल्या काय रोजच्याच जगण्याच्या विवंचना असतात म्हणून आवर्जून असं मी लक्ष दिलं नाही.
बहात्तरच्या दुष्काळात छावणी मी पाहिली नव्हती. पण संपूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळाचा सकारात्मक कार्यासाठी झालेला वापर माझ्या आठवणीत आहे. हे जे सर्वत्र आपण रस्त्यांचे जाळे विणले आहे ना ती बहात्तरच्या दुष्काळी कामाची देण आहे. माझ्या वस्तींचा वृत्तान्त. विरळी. सोबत रवी शेंडगे. नुकताच मूतखडा झालाय त्याला. चितळीच्या माळावर राहतो, पिण्यासाठी पाणी बोअरचे. क्षारपीडित पाणी वापरल्यानं हा आजार वाढतो बहुधा. म्हणून सोबत विकत घेतलेली दोन लिटरची पाण्याची बाटली. आणि ऊन हे असं. साधं घरातून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. माणसांनी कामं तरी कशी करायची? खूप लांब आहे ही विरळी. कलेढोणचा डोंगर नंतर तरसवाडी, नंतर विभूतवाडीचा माळ, धनगरांसाठी प्रसिद्ध झरे गाव. मी तर म्हणतो या संपूर्ण भागातील धनगरांचे हे मूळ ठिकाण. इथं ओव्या गाणारी काही माणसं आहेत. काशीबाईचा कटाव असा पोवाडा की धनगरी ओवी गाणारा एक माणूस आहे, सवडीनं तिथं एक रात्र मला राहायचं आहे. हा झरा तीन मल पुढं असताना दहीवडीला जाणारा रस्ता फुटतो उत्तरेला, उत्तरेकडं तोंड करून त्या माळावर आम्ही. पश्चिमेला एक डोंगर पसरलेला बोडका. पूर्वेला नजर ठरत नाही तिथवर नुस्ता अफाट माळ. आणि कधी काळी पाऊस पडत असताना पूर येऊन तयार झालेली मोठी वगळं, निर्मनुष्य. भीती वाटते. पुढं रस्त्याच्या कडेला उन्हात पेंगत असलेली छावणी, अशा या दुपारच्या झळात कशी कड काढीत असतील ही जनावरं. हाकेच्या अंतरावर पिप्रणीशिवाय कसलं झाड नाही, पिप्रणीला माणसानं खाण्यालायक चांगलं फळ नाही. पक्षी खातात, नाही तर हे झाड या माळावर कल्पवृक्ष झाले असते. तरीही सावली, शेरडामेंढरांना हिरवा पाला,पाखरांचा रहिवास आणि सरपणासाठी उपयोगी असं हे इथं वाढणारं एकमात्र झाड. बियांतून उगवत नाही बहुधा, शेवग्यासारख्या फांदय़ा पावसाळय़ात रोवल्या की पालवी फुटते आपोआप. अशी एकाच वेळी सलग लावलेली ही झाडं क्लोनसारखी दिसतात सर्वत्र. शंभर-दीडशे वर्षांची माळावर निलांडी असलेली काही पिप्रणीची झाडं देवत्वाला पोहचलेली असतात. अशा डेरेदार झाडाच्या सावलीत विसावा घेताना आपण अधिक नम्र होत जातो. नकळत हात जुळतात. असं पवित्र झाड क्वचितच कुठं दिसतं.  कासरा दीड कासराच्या अंतरावर लहरींसारखं तापलेलं हलणारं वारं. नऊ मल अंतरावर आलो तेव्हा लांबून डोंगराच्या दरीत दिसली ही गाव विरळी.
एकाला विचारलं बौद्ध समाजातील घरं कुठली? तर म्हणाला, ही काय मरीआईच्या पडक्या देवळाजवळ पसरलेली सगळी. आम्ही चौकशी केली. ती होती मातंग समाजाची घरं. घरांच्या बाहेर हातभर आलेल्या सावलीत ढळढळीत कुंकू लावून बसलेल्या बायका. सगळी घरं बुटकी-बठी मातीची, वर जीर्ण गंजलेले पत्रे, आदरानं आम्हाला आत बसवलं. ‘कशाला आलायसा, असं हय़ा दुपारी. कुठलं कराडकडचं? तरसवाडीचा डोंगर उतरल्यावर समोरचा हा उघडाभेसूर माळ बघितल्यावर डोळय़ाला पाणी इलं एखादाच्या. बसा. काय सांगावी तुमाला आमच्या जन्माची परवड. हे अडीच-तीन वर्षांचं लेकरू. आयबाप गेलेत तिकडं फटकरीला. त्याला काय समजावी घरची दळिंद्री. पावण्याचा मोबाइल आला तर सांगतंय.
‘काम नाय, धंदा नाय, पसा नाय, घरात, खायाला काय नाय, कसं जगायचं आमी, आजी आजारी हाय माजी.’ कुणी म्हणेल हे अती होतंय. असं नाही बोलावं लेकरानं. पण पदरचं काहीच नाही त्याच्या. ते भवतालच्या बकालपणाची भाषा शिकतंय.
सोबतीला आम्ही काहीच आणलेलं नाही.
दुष्काळात माप देतंय सरकार, आसं आमी नुस्तं ऐकतूया. पण आमच्या पावतूर कसलं नखभर पोहचत नाही. रोजगार हमीची कामं? कुठं दिसली का तुमाला. आसलीच तर आमाला. लेकांनू आमी कामाची माणसं. काम करून हय़ा हाताच्या नाडय़ा वाळून गेल्यात सात-आठ महिनं झालं रुपयाचं काम नाही कुणाला. सरकारनं बंडिंगची कामं कंत्राटी दिलीत टॅक्टरवाल्यांना. माणसांची हातं अशी रिकामी.
मग चालतं कसं?
समाजात कुणी बापय दिसला का? गाव सोडून सगळी गेलीत. कामच न्हाय तर खायाचं काय? कोण कुठं वसईला मातीकामावर, जोडीला तीन-साडेतीनशे मिळतात. त्यांनी तिथं आपली पोटं भरायचीत. राहिलं शे-पाचशे तर गावी इकडं घरातल्यांना. कोण फटकरीला मजी ऊस तोडायला तुमच्या भागात. आडवांस म्हणून घेतलीली उचलपण भागली न्हाय या साली. दुष्काळानं लवकर पडला पट्टा. नुस्तं पोटं भरायला गेल्यावानी हात हालवत आलेत माघारी. आता काय खायचं? माती. एक रुपाया जवळ आसला तर चहाची पुडं. कालवण दाखवूद्या का तुमाला, कांदवणी, लसणवणी ऐकलयसा कधी? या भितीवरल्या भाकऱ्या बघितल्या वाळलेल्या? गावातनं भीक मागून आणल्यात. या दुष्काळानं पार मानसातनं उठवलंय आमाला. गावात राहणारी मिळंल तो शेररोजगार करून मानानं जगलूय आमी. मातिमोल केलंय मानसाला.
केरसुणी, दावं आणि दोर असली कामं करायचेत ना पूर्वी?
मुळात असली कामं कुनी करत नाहीत. बाजारात सगळं इकत मिळतं आता. साळूत करतात कुणी पण त्याला घायपात लागतो, वडय़ावगळीना पाणी. कुजवायचं कुठं ते? सारं बंद पडलंय आता.
जेवनात काय. वशाट?
समजलं काय म्हनायचाय तुमाला. पण आलीकडं कुनी खात नाहीत ते. दहानंबराचं. वशाटाच्या नावानं कुठं बाजारातलं सुकट बोंबील, तेवढच खारटवणी. मटन या शिमग्याचं पुढल्या शिमग्याला. या दसऱ्याचं त्या दसऱ्याला. आमची रोजची कालवणं सांगिलती की मगाशी, नाही तर बटाटा-वांगी बाजार संपल्यावरची नासकी-कुजकी टाकूनच देतो यपारी. ती आमी सस्तात घ्यावीत वाटय़ाची. इचारतायसा म्हणूनच सांगायचं. पन आपलीच हालाकी अशी सांगायला लाज वाटती.
चौकशीतील एक रकाना जॉबकार्ड?
तेचाच पेट पडलाय त्यच्याशिवाय काम मिळत नाही. आणि गावातली ज्यांची हायीत त्यांची हजेरी लागतीय फुकटं. हो, सांगयला कुणाचं काय भ्या हाय व्हय. दरवाज्यात एक मुलगा आहे बरी कपडे असलेला. शाळा शिकत असावा. त्यानं बघायला एक फॉर्म मागितला. दिला. बँकेत आमची खाती नाहीत. खातं काढायला तिनसे रुपयं कुठनं आणायचं?
राशन?
मिळतं की गहू पंधरानं, तांदूळ दहानं, राकेल पंधरा दिवसाला दोन लिटर. साखर न्हाय. दुकानावं दारिद्य््रारेषंखालची आमच्यागत नाचार दुबळी माणसं गेली की हाकलून लावतात.
संपलं. सांगणाऱ्या बाईनं डोळ्याला पदर लावला, गरीबाचं कुणीच नाही वाली, आन सिलकीचं असलेलं पशेवाल्यांना विकतात.
शिक्षण? जवळपास सर्व जण निरक्षर. जेमतेम पंचवीस-सव्वीस वर्षांच्या तरुण स्त्रियासुद्धा अशिक्षित. शाळा शिकलेल्याच्या बोलण्यातूनही आत्मविश्वास जानवतो. कसलंही माणूस म्हणूनच्या अस्मितेचं भान नाही. गुरंढोर मेंढरांसारखी कुणीही हाकावीत.
आलायसा तर चहा नाही. पानी देवूद्या का? चांगलं हाय.
आम्हाला दुसऱ्या घरात बोलवण्यात येतं. घर बऱ्यापकी. खाली लादी, गॅस, टीव्ही, अण्णाभाऊ साठेंचा फोटो. पंखा चालू आहे. इतर दोन-तीन घरांत आजून वीज नव्हती. घरात नवरा-बायको, मधुकर महादेव सकट. रोजगार सेवक. पत्नी ग्रामपंचायत सदस्य. पाणी दिलं. मीही सांगितली माझी जात. म्हणाले, ‘माजुरी असतात आपली मानसं. त्यास्नी कामं करायला नकोत,’ बाई म्हणाल्या, ‘मगाशी तुमाला सांगणारे विरोधक आहेत आमचे.’
निवडून आलाय ना तुम्ही. हा तुमचाच मतदारसंघ, मग हे विरोधक कसे तुमचे? आणि मिस्टर सकट आपल्याच लोकांना माजुरी म्हणताय. चिडलोच मी. म्हणालो, शब्द मागं घ्या.
म्हणाला, हे बघा चौतीस मानसं कामाला आहेत. लिस्ट बघितली. सगळी गावातली आडनावं. इथं आपल्यातलं कोन दिसत नाही? ही सर्व धनगर-मराठा समाजातील नावं? बौद्ध , मातंग, रामोशी समाजातील नावालाच दोन-चार. त्यांनी कार्ड काढलं नाही. ही ऑनलाइन जॉबकार्ड आहेत. रोजगार हमीवर काम करणाऱ्यांची यादी. गावातील माणसांनीच तयार केलेली.
 मानेवाडीत अशीच एकदा कुमार शिराळकरांनी जॉबकार्डधारकांची िपट्र काढून दाखवली होती. पाणलोट क्षेत्राच्या मीटिंगला बसलेल्या मानेवाडीकरांनी सांगितले. ही सर्व प्रतिष्ठित कुकूडवाडकरांची नावं आहेत. आणि आता लक्षात आले, चितळीत बँकेत असताना एका सधन मराठा सामाजातील माणसानं आपल्याच घरातील लोकांची रोजगार हमीसाठी बँकेत बचतीची खाती काढलेली होती. इथंही असेच. म्हणजे रोजगार हमीची करड गरिबांसाठी नाहीत. गावातील प्रत्येक योजनेचे लाभार्थी गरीब, दलित नव्हेत. हे सधन श्रीमंत राजकारण ज्यांच्या हातात, त्यांच्या खात्यात काही काम न करता पसे आपोआप जात असतात. हे सकट सांगताहेत, सतरा लाखांची कामं मंजूर करून आणलीत. पण गरजवंतांना कामं नाहीत. का तर म्हणे त्यांचे सेव्िंहग खाते नाही. इथं चार माणसांचं कुटुंब. एका आठवडय़ाचं कुटुंब चालवण्यासाठी जवळ शंभर रुपये नाहीत. आणि खात्यासाठी लागतात तीनशे किंवा पाचशे. कशी काढायचीत खाती आणि कधी मिळणार काम? मघा दिसलेला मुलगा बहुधा या सकटांचा असावा.
नको म्हणालो चहा. अजूनही काही बौद्ध समाजातील घरं करायची आहेत. उठलोच तिथनं.
आहो ऐका ना. जरा कुठनं आलायसा, तू पण कशाला तसं बोलायचंस, विरोधक. आपलीच हायेत सगळी मानसं. तो रोजगार सेवक बायकोला डाफरत होता. आमच्या कारणानं त्या नवरा-बायकोत भांडणं नकोत म्हणून मग घेतला चहा.
बौद्ध समाजात जाताना एक लेकधनीण म्हणाली, खाणाऱ्यांनी खाऊद्यात. आमची ना नाही. फकस्त आमाला काम मिळूद्यात.
बाकी सारी मघा विषद केलेली सेम स्टोरी. ही इथलीच नव्हे, माण तालुक्याची.
एक स्त्री पळत पाठीमागनं आली. सायब एक सांगायचं हाय. दीड-दोन र्वष झाली गावातल्या एका मराठय़ानं माझ्या लेकाला मारून टाकलं. चार हजार काढून घेतलं आणि दिलं तिकडं टाकून वडीवगळाला. पकडलं त्याला. सुटून परत आला. आपली कोन चौकशी करणारं न्हाय. काय करता येईल का?
मी काय करणार? कशाला हे माझ्या पाठीमागे. तरी येतानाच चुकून मनात आले या निलांडय़ा अफाट माळावरच्या वगळात कुठं कोणी एकाद्याला मारून टाकलं तर कुणाला काय कळणार?  कशी निर्माण होते गुन्हेगार मानसिकता. ज्याला मी टाळत आलोय आजवर देतोय दिलासा स्वत:लाच. आता कुठं काय राहिलंय? बदलताहेत माणसं. ते परत परत दिसतं दुष्ट स्वप्नं. सामाजिक अत्याचाराविषयी समाजात एखादी घटना? असा रकाना नाही. अशा असंख्य गोष्टी अन् घटना आहेत, त्यांची नोंद करून ठेवता येत नाही. या नसíगक अरिष्टाला सामोरं जाण्यासाठी एका व्यापक मानसिकतेचं अवकाश निर्माण करू इच्छिताना किती आढळतं यांना. आपणाला सामोर जावं लागणार.
शब्दाशिवाय दुसरं काही नाही माझ्याकडं. म्हणालो, मी लिहीन.
मातंग, चर्मकार अन् रामोशी समाजापेक्षा काही तरी वेगळं जाणवते बौद्ध समाजात वावरताना. चळवळीच्या वारश्याची एक आत्मभान जाणीव?  समजत नाही. पण असं व्यक्तिगत पातळीवर जगत असताना जाणीवपूर्वक ठेवलेली सामाजिक सतर्कता मला उभारीची वाटते.
 कारणाशिवाय मी व्यक्त होत नाही. जवळच्यांनाही सांगत नाही शक्यतो माझी जात. तटस्थपणे समजावून घेतो हरएकाचं दु:खं. एरव्हीच कोरडय़ा आभाळासारखं माझं व्यक्तिमत्त्व. जरा कुठं हवेची एकादी लहर आथवा पुसटसा काळा ढग दिसला तरी छाती भरून येते. माझ्या बोलण्यातून लोकांना अंदाज येत असावा वरवर कृष्णा-कोयनेच्या दुआबातील माझी भाषा थोडी दांड असली तरी एवढय़ाशा पाण्यात लगेच चिखलून जाते ही काळी माती.
तुमला कामं करायला नकोत?
कोण म्हणतं आमाला कामं करायला नगं? त्याला म्हनावं टॅक्टर आन् जीसीपी लावा मोठय़ा धनदांडग्यांचे आन् गोरगरीब त्यात गाडा. नाही तर इकाच्या पुडय़ा आणून द्या आमाला.
नुकतंच मी पेपरात बातमी वाचली, बरेच दिवस काम न मिळाल्या शेतमजुरानं फास लावून आत्महत्या केली. गावाचा अजून सरळ उलगडा झाला नाही म्हणूनच मी गेलेलो नाही. तिकडं जाईन एक-दोन दिवसांत. सलग दोन-अडीच वर्षांत पडलेल्या या दुष्काळात हातांना काम न मिळाल्यानं लोकांत सामूहिक आत्महत्येची मानसिकता तयार होत असावी. नाही तर पेपर न वाचलेली ही स्त्री कशाला व्यक्त करेल? बऱ्याच दिवसांपासून डब धरलेली, जीवनावरचा विश्वास उडालेली, अशुभ वासना.
 असं म्हणू नका, कबूल की दिवस वाईट आलेत.
तग तरी कसा धरायचा कसलाच आधार नसल्यावं? आज आठवडय़ाचा बाजार आन् जवळ पाच रुपयं नाहीत. शेनवडीत ज्वारी मोडायला गेलू हुतू मागल्या महिन्यात. दहा-बारा मल लांब.भावानं टॅक्टर आणला होता. पाच-सहा बायका आमी, खुडणी दिली न्हाय ,मजुरी दिली साठ रुपयं. आन येताना वहाण नाही. चालत आलू रात्री नव-दहा वाजता एकमेकीला आधार देत. तुमी आला त्या माळावरनं. तहान लागली तर वाटंत वस्ती न्हाय कुनाची. पावसाला आजून दोन-तीन महिनं हायतं. पुढं तुमीच सांगा कसं दिस काढायचं? कसला तो रोजगार नाही कुठं. येवढा मोठा समाज म्हारकीची जमीन? हाय की रानवडी, पिकत तर काय न्हाय. नुस्तं कुसळी गवत म्हणून दारिद्रय़रेषेखाली नावं नाही कुणाचं.
बोलता बोलता अचानक वारं उठलं आणि धुळीचं वादळ घरात शिरलं. बनगरवाडीत अशाच वादळाचं वर्णन केलं आहे माडगूळकरांनी. सगळी धूळ साचून राहिली आहे सर्वत्र आणि पाणी येतं चार दिवसांतून एक वेळ टँकरनं.
विरळी गाव तसं धनगरांचं. गणपा कोकरे म्हणाला होता, आमच्या लोकांचं वागणं अमगाळ. तुमाला कसं परवडणार आमचं गबाळगाणं? या अमगाळ अन् गबाळ वागण्यातील प्रमुख कारण पाणी. कसल्या स्वच्छतेची तुम्ही अपेक्षा करणार?
येवढंच सांगा सरकारला, छावन्या देतायसा तसं गोरगरिबांसाठी काय तरी रोजगार काढा, फुकटचं काय देव नगा.
चार वाजलेत आता. पश्चिमेकडे तोंड करून यायचं चितळीला आणि वेगानं वाहणारं हे वारं असं. येतानाच समजलं वाटेवरचे सगळे धाबे बंद पडलेत. चहा मिळाला नाही कुठं.
हा पाटण पंढरपूर रोड. पाच-पन्नास वर्षांपूर्वी इथं कुठल्या भाविकाने देऊळ बांधलंय विठोबाचं आणि पुढं हापशी धारेच्या खाली एक ढोणी. या दुष्काळातही या हापशीला पाणी आहे. बरं झालं देवा डोंगरातल्या पक्षी अन् प्राण्यांना कुटून मिळणार होतं पाणी? आम्ही हात-पाय धुतले, चूळ भरली. पृथ्वीच्या पोटातून आलेलं पाणी पिलो आणि देवळाच्या पायरीवर बसलो.
 भणभणत्या वाऱ्याशी झुंजत पाण्यासाठी ढोणीवर बसलेला एक छोटा पक्षी मावळतीच्या वाऱ्यानं त्याची इवलिशी पिसं थरथरत आहेत. कसली अचाट ताकत आहे वाऱ्याला? तो जुमानीत नाही, तसेच आपले पाय रोवून उभा आहे ताठ. केवढी असीम इच्छा टिकून राहण्याची! अशीच चिवट आहेत ही माणसं. ऊन-वादळ-दुष्काळाला तोंड देत या भूमीला चिकटून आहेत.