28 February 2020

News Flash

विश्वाचे वृत्तरंग: राजवाडय़ातील कोंडमारा

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दुबईची राजकन्या शेख लतिफा यांनी संयुक्त अरब अमिरातीतून पलायन केल्यानंतर मोठा गहजब उडाला होता.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दुबईची राजकन्या शेख लतिफा यांनी संयुक्त अरब अमिरातीतून पलायन केल्यानंतर मोठा गहजब उडाला होता. आपला छळ होत असून, कैदेत असल्यासारखे वाटत असल्याची भावना लतिफा यांनी एका चित्रफितीद्वारे व्यक्त केली होती. मात्र, भारताच्या किनाऱ्याजवळ पकडून त्यांना गूढरीत्या परत दुबईत नेण्यात आले. या प्रकरणाची माध्यमांत जोरदार चर्चा झाली. दुबईचे शासक आणि लतिफाचे वडील शेख मोहम्मद अल-मख्तुम यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्या वेळी या प्रकरणावर पांघरूण घालण्यात आले. त्यात दुबईच्या राणी आणि शेख मोहम्मद यांच्या सहाव्या पत्नी हाया बिन्त अल-हुसैन यांची महत्त्वाची भूमिका होती, असा आरोप आहे. त्यांनी आपली मैत्रीण आणि संयुक्त राष्ट्रांच्या माजी मानवाधिकार उच्चायुक्त मेरी रॉबिन्सन यांना दुबईत बोलावून लतिफा सुस्थितीत असल्याचे चित्र रंगवण्यास मदत केली. आता याच हाया यांनी दुबईतून पलायन करून ब्रिटनमध्ये आश्रय घेतला आहे. सध्या त्या लंडनमधील एका आलिशान बंगल्यात वास्तव्यास असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय माध्यमांना चर्चेचे नवे खाद्य मिळाले आहे.

‘शेख लतिफा यांच्या पलायन प्रकरणात काही नव्या गोष्टी उघड झाल्याने हाया आणि शेख मोहम्मद यांच्यात दुरावा निर्माण झाला असावा’ असा अंदाज ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावरील एका लेखात वर्तविण्यात आला आहे. हाया आणि शेख मोहम्मद यांचा घटस्फोटाचा खटला ब्रिटनच्या न्यायालयात चालणार आहे. मात्र, आपले अपहरण होऊन पुन्हा दुबईत पाठविण्यात येईल, अशी भीती हाया यांना सतावू लागली आहे. हे प्रकरण साधेसोपे नाही. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाचे व राजनयाचे घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. हाया यांचे शिक्षण ब्रिटनमधले. त्या ऑक्स्फर्ड विद्यापीठात शिकल्या. ब्रिटनच्या राजघराण्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिराती आणि ब्रिटन यांचे संबंध उत्तम आहेत. अशा स्थितीत हाया यांना दुबईत परत पाठवण्याची मागणी त्यांचे पती शेख मोहम्मद यांनी केली तर ती ब्रिटन सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरेल, असे ‘बीबीसी’च्या या लेखात म्हटले आहे. या प्रकरणात जॉर्डनचीही कोंडी होईल. हाया ही जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (दुसरे) यांची सावत्र बहीण. ‘जॉर्डनचे जवळपास अडीच लाख नागरिक संयुक्त अरब अमिरातीत काम करतात. त्यामुळे दुबईसोबतचे संबंध बिघडू देणे जॉर्डनला परवडणारे नाही’ असे निरीक्षणही या लेखात नोंदवण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे ब्रिटन आणि संयुक्तअरब अमिराती यांच्यातील संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता ‘द गार्डियन’मधील एका लेखात वर्तवली आहे. याआधी शेख लतिफा यांच्याप्रमाणेच शेख मोहम्मद यांची आणखी एक कन्या शमसा यांनी २००० मध्ये ब्रिटनमधील शेख मोहम्मद यांच्या घरातून पलायन केले होते. पण शेख यांच्या कर्मचाऱ्यांनी लंडनमध्येच शमसा यांना ताब्यात घेतले होते, याकडे या लेखात लक्ष वेधले आहे. हाया यांनाही अशा प्रकारे शेख यांच्या हाती पडण्याचे भय आहे. त्यामुळेच त्यांनी ‘क्वेस्ट’ या खासगी कंपनीकडून सुरक्षा घेतली आहे. स्कॉटलंड यार्डचे माजी महानगर पोलीस आयुक्त जॉन स्टीव्हन यांची ही कंपनी असून, हाया यांनी २०१० मध्येही या कंपनीची सेवा घेतली होती. हाया आणि शेख मोहम्मद यांच्या घटस्फोट खटल्याची सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे. त्यासाठी शेख आणि हाया यांनी नामांकित आणि साहजिकच महागडे वकील नेमले आहेत. त्याचा तपशील ‘द गार्डियन’च्या वृत्तात आहे.

हाया आणि शेख मोहम्मद यांचा विवाह २००४ मध्ये झाला. हाया ही शेख यांची सहावी पत्नी आहे. या दोघांना ११ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा आहे. त्यांचा ताबा कोणाकडे जाईल, याबाबतचा ऊहापोह ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तात करण्यात आला आहे. तर शेख लतिफा प्रकरणावर आता हाया अधिक प्रकाश टाकू शकतील, असे मत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका लेखात नोंदवण्यात आले आहे. महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळायला हवेत, असे मत हाया यांनी दोन वर्षांपूर्वी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. याचा संदर्भ देत ‘द टेलिग्राफ’च्या एका लेखात दुबईच्या शासक शेख घराण्यातील महिलांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. किंबहुना लतिफा प्रकरणाचे सत्य शेख मोहम्मद यांना ब्रिटनच्या न्यायालयात सांगावे लागण्याची शक्यता या लेखात वर्तविण्यात आली आहे.

संकलन : सुनील कांबळी

First Published on July 8, 2019 12:07 am

Web Title: dubai princess sheikha latifa mpg 94
Next Stories
1 तिवरे धरणाच्या बळींचे गुन्हेगार कोण?
2 मुखी कुणाच्या पडते लोणी। कुणा मुखी अंगार॥
3 शेतमालाच्या भावाची नुसतीच हमी!
Just Now!
X