‘आधुनिक भारतीय रंगभूमीचे प्रणेते’ या शब्दांत नाटककार गिरीश कार्नाड यांनी इब्राहिम अल्काझींचा यथोचित गौरव केला आहे. अल्काझींनी ठरवून आपले आयुष्य रंगकार्याला वाहून घेतले. लंडनमधील रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स (‘राडा’) मधून रंगकार्याचे प्रशिक्षण घेतलेल्या अल्काझींना ब्रिटिश रंगभूमीवर कारकीर्द करण्याचा आग्रह अनेकांनी धरला होता. परंतु तरीही ते भारतात परतले. येथे ‘थिएटर युनिट’ या संस्थेची स्थापना करून त्यांनी अनेक पाश्चात्त्य नाटय़कृती सादर केल्या. या संस्थेतर्फे त्यांनी भारतीय रंगभूमीवरील घटना-घडामोडींचा परामर्श घेणाऱ्या ‘थिएटर युनिट बुलेटिन’ या मासिकाचा प्रारंभ केला. त्या वेळच्या त्यांच्या शिष्यांमध्ये पं. सत्यदेव दुबे, विजया मेहता आदी दिग्गज रंगकर्मीचा समावेश होता. पुढे अल्काझींना दिल्लीत राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या (एनएसडी) स्थापनेसाठी पाचारण करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील थिएटर युनिटची धुरा आपले शिष्य पं. सत्यदेव दुबे यांच्या हाती देऊन ते दिल्लीला गेले. १९५९ मध्ये दिल्लीत एनएसडीची स्थापना झाली तोवर देशात नाटय़प्रशिक्षण देणारी सर्वोत्तम दर्जाची अशी संस्थाच अस्तित्वात नव्हती. अल्काझींनी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या स्थापनेपासून तिला आकार मिळून देईतो १९६२ ते १९७७ तब्बल १५ वर्षे या संस्थेचे नेतृत्व केले. या काळात त्यांनी एनएसडीला रंगकर्मी घडवणारी देशातील एक सर्वोच्च संस्था म्हणून नावारूपास आणले.  नाटय़प्रशिक्षणक्रमाच्या आखणीपासून ते जगभरातील सर्वोत्तम रंगप्रशिक्षण येथल्या होतकरू तरुण रंगकर्मीना मिळावे यासाठी त्यांनी आपले सारे कार्यकौशल्य, प्रतिभा पणाला लावली.

गिरीश कार्नाड यांचे ‘तुघलक’, मोहन राकेश यांचे ‘आषाढ का एक दिन’, धर्मवीर भारतींचे ‘अंधा युग’सारखी नाटके त्यांनी रंगभूमीवर सादर केली. त्या काळातले हे तीन राष्ट्रीय ख्यातीप्राप्त नाटककार होत. कमानी रंगमंचासह खुल्या रंगमंचावरही नाटके सादर करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. कडक शिस्तीच्या अल्काझींना सुमार दर्जाचे काहीही खपत नसे. त्यामुळे आपण जी नाटके सादर करू ती सर्वागांनी सर्वोत्तम अशीच असावीत यावर त्यांचा कटाक्ष असे. नेपथ्यादी अंगांत सौंदर्यपूर्णतेचा त्यांचा आग्रह असे. नाटकाच्या संहितेचा सखोल अभ्यास करून त्यातल्या साऱ्या शक्यता धुंडाळण्यासाठी ते विद्यार्थ्यांसमवेत १२-१२ तास तालमी, चर्चा, विचारविनिमय करत.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

त्यांच्या रंगकर्मी म्हणून द्रष्टेपणाचे चिरंतन उदाहरण म्हणून राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातील त्यांच्या कारकीर्दीचा आजही आदराने उल्लेख केला जातो. आज नाटय़ तसेच चित्रपट क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजवणारे विजया मेहता, पं. सत्यदेव दुबे, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, मनोहर सिंग, बी. जयश्री, कमलाकर सोनटक्के, ज्योती सुभाष, उत्तरा बावकर, सुहास जोशी, रोहिणी व जयदेव हट्टंगडी, पंकज कपूर आदींचा त्यांच्या शिष्योत्तमांत समावेश होतो.

राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून निवृत्त झाल्यावर त्यांनी दिल्लीत ‘आर्ट हेरिटेज गॅलरी’ची स्थापना केली. साठच्या दशकातील मुंबईतील प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपशी त्यांचा बराच काळ संबंध होता. एम. एफ. हुसेन, रझा, सुझा, तय्यब मेहता आदी या ग्रुपशी संबंधित चित्रकारांशी त्यांचे निकटचे संबंध होते.

पुण्यात १९२५ साली अल्काझींचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण पुण्यामध्ये झाले आणि पुढे मुंबईला त्यांनी सेंट झेवियर महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयामध्ये असतानाच ते बॉबी ऊर्फ सुलतान पदमसी यांच्या इंग्लिश थिएटर कंपनीत सामील झाले.

एनएसडीमध्ये कार्यरत असताना त्यांनी रंगमंचावर नाटय़प्रयोग करणाऱ्या नाटय़ विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रेपर्टरी कंपनी सुरू केली. भारतीय नाटकांबरोबरच ग्रीक शोकांतिका, इब्सेन, चेकॉव्ह, बेकेट, मोलियर, स्ट्रिंडबर्ग यांची नाटके, आणि शेक्सपियरची नाटके विद्यार्थ्यांकडून बसवून घेतली. अल्काझींनी दिल्लीत त्यांचे रंगमंचीय प्रयोग केले. अल्काझी यांनी प्रादेशिक भाषेतील नाटके हिंदीत रूपांतरित करून ती सादर केली. तसेच संस्कृत नाटके इंग्रजीमध्ये उपलब्ध होती, ती त्यांनी हिंदीत अनुवाद करून सादर केली.

अल्काझींचा प्रारंभी जरी पाश्चात्त्य नाटय़कृतींकडे अधिक ओढा असला तरी पुढे आधुनिक भारतीय रंगभूमीचा पाया घालण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

आ द रां ज ली

अल्काझी माझ्यासाठी पितृतुल्य होते. त्यांच्या निधनाने नाटय़ क्षेत्रातील ऋषी आपण गमावला आहे. राष्ट्रीय नाटय़ अकादमीत काम करताना त्यांनी अनेक नवे कलावंत अक्षरश: घडवले. त्यामुळे संपूर्ण देशातील नाटय़निर्मितीचा पोतच बदलला. आधी केवळ एक-दोन राज्यांपुरती मर्यादित असलेली ही चळवळ या कलावंताने देशभर रुजवली. त्यांची नाटक बसवण्याची दृष्टीही वेगळी होती. परिपूर्णतेचा ध्यासही मोठा होता. त्यांना आदरांजली.

– महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाटककार

भारतीय रंगभूमीवरचा मोठा काळ इब्राहिम अल्काझी यांच्या जाण्याने संपुष्टात आला. भारतीय रंगभूमीचा संपूर्ण विचार करणाऱ्या अल्काझी यांनी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाची (एनएसडी) स्थापना केली. नाटक हा विषय आणि नाटय़प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे याची रूजवात त्यांनी घातली. ते जसे उत्तम दिग्दर्शक होते तसे ते उत्तम शिक्षक होते. गिरीश कार्नाड, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि बादल सरकार या भारतीय रंगभूमीवरच्या नाटककारांबरोबरच पाश्चात्त्य रंगभूमीवरील अनेक नाटककारांची नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. ‘अंधा युग’चा प्रयोग त्यांनी लाल किल्ल्यामध्ये केला होता. प्रयोगशील आणि शिस्तबद्ध अल्काझी यांनी भारतीय रंगभूमीला आकार दिला.

– अतुल पेठे, रंगकर्मी

स्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमी क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील खरोखर पितृतुल्य व्यक्तिमत्त्व असेच अल्काझी यांचे व्यक्तिमत्त्व होते. देशाच्या रंगभूमीवर त्यांचा विलक्षण प्रभाव होता. त्यांना माझी मन:पूर्वक श्रद्धांजली

– मकरंद साठे, रंगकर्मी

आमच्या मनातील जागतिक रंगभूमीची रुजवात ही केवळ अल्काझी यांच्यामुळे शक्य झाली. त्यांच्यासारखे ज्ञानसमृद्ध व्यक्तिमत्व, जागतिक नाटकाचा गाढा अभ्यास असलेले अभ्यासक व्यक्तिमत्व माझ्या ऐकिवात नाही. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते, मात्र एनएसडीत झालेली नाटके ही प्रामुख्याने हिंदी आणि उर्दूतच सादर झाली. एनएसडीमध्ये देशभरातील विविध भागांतून आलेले विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा दबाव न जाणवू देता, त्याचे महत्त्व सहज लक्षात आणून देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.

– ज्योती सुभाष, ज्येष्ठ अभिनेत्री

अल्काझी हे आधुनिक भारतीय नाटय़चळवळीचे प्रणेते, अत्यंत हुशार, बहुगुणी द्रष्टे रंगकर्मी आणि दृश्यकलेची उत्तम जाण असलेले असे एकमेव व्यक्तिमत्व होते. एनएसडीतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी के लेल्या नाटय़निर्मितीतून चोख काम, व्यावसायिकता, उच्च नीतीमूल्ये आणि दर्जा याचे मापदंड त्यांनी निर्माण केले होते. नाटकावरची श्रद्धा, शिस्त, निष्ठा आणि उच्च व्यावसायिक मूल्ये जपणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

– वामन केंद्रे, नाटय़दिग्दर्शक

नाटय़प्रशिक्षण हा अल्काझींचा ध्यास होता आणि आधुनिक नाटय़ उभे करणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यांनी भारताला नवीन रंगदृष्टी दिली. केवळ नाटकाचा अभ्यास नाही, कवितांवरच्या चर्चाचे कार्यक्रम त्यांनी केले. मराठीतील कवितांवरही तिथे चर्चा व्हायची. मराठी कवितांचाही त्यांनी अभ्यास केला होता, ते स्वत: या कविता इंग्रजीत अनुवादित करून त्या सादर करायचे.

– कमलाकर सोनटक्के, रंगकर्मी

अल्काझींसारखा दुसरा शिक्षक नाही. त्यांच्यामुळे आम्ही आहोत. आयुष्याबद्दल मार्गदर्शन करतो तो खरा शिक्षक असतो, तसेच ते होते. वक्तशीरपणा, व्यावसायिक मूल्यांची जपणूक या गोष्टी त्यांनी कधी जाणीवपूर्वक शिकवल्या नाहीत, त्या त्यांच्या कृतीतून आम्ही आपसूक शिकत गेलो. एखाद्या नाटकासाठी दिल्या जाणाऱ्या वेशभूषेमागचा विचारही आम्ही प्रयोगांमधून शिकलो.

– रोहिणी हट्टगंडी, अभिनेत्री